वेंकटेश्वर माहात्म्य - अध्याय दहावा

वेंकटेश महात्म्याचे पारायण केल्यास प्रत्यक्ष बालाजीचे दर्शन घेतल्याचा अनुभव येतो.


जनकराजा विचारतो- हे शतानंद मुने, आपल्या मातेचे भाषण ऐकून सज्जनाना प्रिय असणार्‍या श्रीनिवासाने पुढे काय केले ते विस्ताराने मला सांग. ॥१॥

जनकाचा प्रश्न ऐकून शतानंद म्हणाला- हे राजा तू श्रीहरीच्या भक्तामध्ये अतिशय प्रिय व मुख्य आहेस त्यामुळे श्रीहरीच्या कथेमध्ये आसक्त असतोस म्हणून मी तुला सर्व चरित्र सांगतो. ॥२॥

श्रीनिवास, हे आनंदपरिपूर्ण असले तरी कर्माचे फल भोगणार्‍या मानवाप्रमाणे बकुलेच्या मुखातून सर्व हकीकत ऐकल्यावर मधुरवाणीने श्रीनिवास म्हणाला. ॥३॥

हा विवाहमहोत्सव पूर्ण करण्याकरिता माझे मन उद्युक्त होत नाही. कारण ज्याला कोणीहि आप्तेष्ट नाहीत अशा लोकांचा, बंधुबांधवांनी युक्त असणार्‍याशी संबंध प्रशस्त होत नाही. ॥४॥

ज्या दोघांची सांपत्तिक स्थिति समान आहे, ज्यांचे कुल समान आहे, त्या दोघांतच विवाह व मैत्री जमतात एक श्रेष्ठ व एक कनिष्ठ अशा दोघात मैत्री, विवाद हे होत नाहीत. ॥५॥

विवाह व विवाद हे समान व्यक्तीतच शोभतात. मी एकटा असून आकाशराजा मात्र बांधवांनी युक्त आहे. ॥६॥

अशा स्थितीत बंधुरहित अशा माझा, आप्तपणा जमणे हे बांधवानी युक्त अशा राजास कसे योग्य दिसेल? असा संबध सुखकारक होणार नाही असे सज्जन म्हणत आले आहेत. म्हणून मला ही चिंता त्रास देत आहे. ॥७॥

बंधुहीन अशा मला राजा आपली कन्या का देतो? त्यावेळी श्रीनिवासाचे भाषण ऐकून बकुळा म्हणाली. ॥८॥

तुझ्यासारखा पुरुष कधीहि लोकात खोटे बोलत नाही. निष्पाप असे मुनि सत्याचीच प्रशंसा करतात. ॥९॥

तुझ्या कार्यात रत असणारे शुक्राचार्य, देवांचे गुरु बृहस्पति आचार्य, सद्धर्माप्रमाणे वागणारा आकाशराजा त्याच्या इच्छा व्यर्थ करू नकोस. ॥१०॥

ब्रह्मरुद्रादि बांधव अशा सर्व देवताचे पुत्र, पौत्र, बंधू, स्नुषा यांचे पुरुषोत्तमा तू स्मरण कर. ॥११॥

या सर्वांचे कलियुगात भूतलावर आगमन हे दुर्लभच आहे. आकाशराजाहि तुझ्या संबंधिजनांना पाहू दे. ॥१२॥

याप्रमाणे आपल्या मातेचे बोलणे ऐकून ब्रह्माण्डपालक, श्रीनिवासाने आपल्या मनाने गरुड व शेष यांचे स्मरण केले. ॥१३॥

स्मरण करण्याबरोबर एका क्षणात गरुड व शेष हे दोघे श्रीनिवासाकडे आले. त्यावेळी भक्तीने आपल्यासमोर उभे राहिलेल्या गरुड शेषांस श्रीनिवासाने आज्ञा दिली. ॥१४॥

श्रीनिवास म्हणाला- हे गरुडा, सत्यलोकाधिपति व मला प्रिय असणार्‍या मुलाकडे-ब्रह्मदेवाकडे तू जा. शेषा, तू माझा नातू सर्पभूषण महादेवाकडे जा. ॥१५॥

याप्रमाणे सांगितल्यावर दोघांना शुभ अशी विवाहपत्रिका लिहून दिली. मग गरुडशेषानी नमस्कार करून आकाशमार्गाने इष्ट स्थळी प्रयाण केले. ॥१६॥

सत्यलोकी गेल्यावर सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा ब्रह्मदेवाला पाहून गरुडाने त्यांना नमस्कार केला व भक्तीपूर्वक ती श्रीनिवासाने दिलेली शुभपत्रिका ब्रह्मदेवास दिली. ॥१७॥

ब्रह्मदेव गरुडाला पाहून म्हणाला. हे काश्यपपुत्रा, गरुडा, फार दिवसांनी तू आलास. ॥१८॥

माझा पिता वासुदेव, श्रीनिवास सध्या कोठे आहे? ब्रह्मदेवाचा प्रश्न ऐकून गरुड म्हणाला. ॥१९॥

सध्या श्रीनिवास वैकुंठगिरीवर राहात आहे. हे ब्रह्मदेवा, मी श्रीनिवासाच्या विवाहार्थ मी आलो आहे असे समज. ॥२०॥

श्रीनिवासांनी लिहिलेली पत्रिका अवलोकन कर. (तेव्हा पत्रिका घेऊन) सर्वत्र व्याप्त असणार्‍या वायूने पत्रिका वाचण्यास प्रारंभ केला. ॥२१॥

चि. नाभीपासून जन्मलेल्या पुत्र ब्रह्मदेवास श्रीवेंकटाचलाधिपति श्रीनिवासाचे सदैव व सर्व प्रकारचे अनेक आशीर्वाद. आकाशराजा, कलियुगात मला कन्यादान करणार आहे. ॥२२-२३॥

ही पत्रिका पाहिल्याबरोबर पुत्रादि परिवारासह, स्त्रियासह लोकपाल, गंधर्व, सर्प यांचेसह लवकर ये. विवाहमहोत्सव आटोपल्यावर सुखाने परत जा. याप्रमाणे पत्रिकेतील मजकूर जाणून किंचित हसत हसत विवाहमहोत्सवाविषयी उत्सुक असणारा ब्रह्मदेव अतिशय आनंदित झाला व आपल्या द्वारपालांना बोलावून म्हणाला ॥२४-२५-२६॥

हे द्वारपालहो, माझे भूतलावर गमन सुचविणारी भेरी, दुंदुभि ही वाद्ये तुम्ही वाजवा. ॥२७॥

या प्रमाणे ब्रह्मदेवाची आज्ञा होण्याबरोबर द्वारपालांनी भेरी, दुंदुभि ही वाद्ये वाजविण्यास प्रारंभ केला. तेव्हा सेनापतीने ब्रह्मदेवास नमस्कार करून विचारले. प्रयाणानिमित्त होणार्‍या भेरीचा मंगलमय आवाज सर्वांनी ऐकला आहे. हे पितामहा, आता आपण कोणत्या देशास जाणार म्हणून या वाद्यांचा समूह वाजविला जात आहे. ॥२८-२९॥

तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला जंबुद्वीपातील भरतखंडात दक्षिण दिशेस असलेल्या शेषाचलास जाण्यासाठी अत्यंत श्रेष्ठ अशी चतुरंग सेना सिद्ध करा. असे ब्रह्मदेव आपल्या सेनापतीस म्हणाला. हे स्कंदा, सर्व देवाना, सर्व दिक्पालाना बोलवा याप्रमाणे स्कंदास सांगून सत्यलोकात राहणार्‍या लोकांना स्वतः ब्रह्मदेव म्हणाला- तुम्ही सर्वजण रसिक आहात. म्हणून कलियुगातील श्रीनिवासाच्या विवाहमहोत्सवासाठी माझ्या सेनाधिपतीसह आपण सर्वजण जाऊ याप्रमाणे ब्रह्मदेवाचे म्हणणे ऐकून सर्व सेनाधिपती ब्रह्मदेवास म्हणाले- हे ब्रह्मदेवा, आमचे वार्षिक वेतन अगोदर दे म्हणजे आम्ही तुझ्याबरोबर येऊ ॥३०-३१-३२-३३-३४॥

याप्रमाणे म्हटले असता ब्रह्मदेवाने त्यांचे वार्षिक वेतन दिले. विचित्र वाहने, नानाप्रकारचे रथ, भूषणे, वस्त्रे, नानातर्‍हेची रत्ने घेऊन सर्व सेनापति सिद्ध झाले. ब्रह्मदेवाने श्रीनिवासाच्या विवाहाकरिता जाण्यासाठी आपल्या पत्नीनाही आज्ञा केली. ॥३५-३६॥

स्वतः ब्रह्मदेवाने अंतःपुरात जाऊन अलंकार धारण केले. पश्चिमेकडील मस्तकावर किरीट धारण केला. दुसर्‍या मस्तकावर तांबड्या रंगाचा रुमाल बांधला. दक्षिण दिशेच्या मस्तकावर फेटा बांधला. ॥३७-३८॥

व चवथ्या मस्तकावर दर्भाचा उत्तम प्रकारचा किरीट धारण केला. कर्णभूषणे नीळ, मोती व वैडूर्य रत्नाने मढविले होते. व सुवर्णाच्या कडी तोड्यांनी हात अलंकृत केले. ॥३९॥

नवरत्ने यांनी विभूषित असा कमरपट्टा आपल्या कमरेस बांधला. ॥४०॥

त्यानंतर सरस्वति, गायत्री, सावित्री यांना तसेच मानसपुत्र, औरस पुत्र व नातू यांना त्यांच्या हत्ती, घोडे, रथ यांसह बोलावून अलंकार युक्त करून ब्रह्मदेव श्रीनिवासाच्या विवाहास जाण्याकरिता सिद्ध झाला. व अग्रभागी आपली सेना करून ब्रह्मदेव सत्य लोकापासून निघाला. ॥४१-४२-४३॥

ब्रह्मदेव चंद्राप्रमाणे शुभ्र अशा हंसावर आरूढ झाला. सरस्वती आदि स्त्रिया चित्रविचित्र विमानात आरूढ झाल्या. ॥४४॥

राजा, घंटेचा नाद व चामर योगाने युक्त असे हत्ती रथ यावर वीरासन घालून बसलेले धैर्यवान योद्धे शोभू लागले. ॥४५॥

उंच फडफडत असलेल्या ध्वजपताकांनी शोभिवंत दिसणारे व नाना तर्‍हेची आयुधे घेणारे वीर समुदाय त्यांच्यामध्ये ब्रह्मदेव; ज्याप्रमाणे आकाशात तारकागणांच्या समुदायात चंद्र शोभावा त्याप्रमाणे तो शोभू लागला. सुवर्णाचा दंड, अतिशय कांतिमान, रत्नकुंभ, तीनयोजन विस्तार असलेल्या, दहालक्ष जनांनी हातभार लावलेल्या, श्वेतछत्रांनी युक्त अशा ब्रह्मदेवाच्या योगाने आकाश प्रकाशित झाले होते. ॥४६-४७-४८॥

हे महाराजा, त्यावेळी नानाप्रकारची वाद्ये वाजत होती. नऊ हजार भेरी, तीनशे दुंदुभि, मृदंग, पणव, ढक्का, मड्ड, निस्सण, डिंडिम, गोमुख, मुरज, वीणा, झर्झरादि, बर्बर, शतशृंग, दीर्घशृंग, सर्पानाहि मोह उत्पन्न करणारे सुस्वर, सात स्वरांनी व सात रागानी युक्त असणारी वाद्ये वाजत होती. ॥४९-५०-५१॥

फूत्कार व षट्‌कार वाजविले जाणार्‍या शंखाचा ध्वनि होत होता. नाना प्रकारच्या स्वर रचनेत पंडित, गाननिपुण गंधर्व हे गात होते. ॥५२॥

वीणा वाजविण्याच्या दंडाच्या दोरीने आनंददायक अशी वाद्ये वाजविण्याने हाहाहुहु इत्यादि प्रमुख नटनर्तकाच्या योगाने सुक्त, सूत मागध बंदी व तुम्बुरु यांचेकडून स्तवन केले जाणारे, श्रीनिवासाचा विवाहमहोत्सव पाहण्याची इच्छा करणारे देव, पुढे जाणार्‍या ब्रह्मदेवाच्या मागोमाग जाऊ लागले. सत्यलोक, तपोलोक, जनलोक त्यानंतर महर्लोक, सुवर्लोक, स्वर्गलोक, भूलोक या क्रमाने येत असलेल्या ब्रह्मदेवाला लोकांनी पाहिले. ॥५३-५४-५५॥

सत्वसंपन्न ऋषि; अद्‌भुत दिसणार्‍या, वासुदेवाप्रमाणे आकार असलेल्या, अग्नीप्रमाणे तेजस्वी मुखकांति असणार्‍या सर्वांच्या अगोदर उत्पन्न झालेल्या, सर्व लोकाधिपति ब्रह्मदेवास पाहू लागले. काही गंभीरपणे त्यास नारायणच समजू लागले. ॥५६-५७-५८॥

काहीजण यास चार मुख आहेत म्हणून हा नारायण नाही असे म्हणत असता मग सर्वजण कवचादिकांनी युक्त अलंकार घातलेला व हंसावर आरूढ झालेला हा ब्रह्मदेवच आहे असे समजले. व त्या त्या ठिकाणचे लोक ब्रह्मदेवाबरोबर असणार्‍या लोकांना विचारू लागले. ॥५९-६०॥

ब्राह्मण म्हणतात, हे जनहो, कोणत्या देशाकडे तुम्ही जात आहात. ब्रह्मदेवाचे गमन कोणीकडे होत आहे? याप्रमाणे प्रश्न विचारला असता लोक म्हणाले- श्रीनिवासाच्या विवाहाप्रीत्यर्थ भूतलावर आम्ही जात आहोत. ॥६१॥

हे ब्राह्मणहो, आम्ही सर्वजण सत्यलोकापासून त्याच कारणास्तव येत आहोत त्यांचे ते भाषण ऐकून सर्व मोठमोठे ऋषि त्याच्या मागोमाग. ॥६२॥

अग्निहोत्र, पुत्र, शिष्य यांचेसह निघाले. परिवार व वैभव यासह ब्रह्मदेव वेंकटचलास जाऊ लागला. ॥६३॥

वाद्यांच्या आवाजाने नगार्‍यांच्या खणखणाटामुळे पर्वत, अरण्ये यासह सर्व जगत् भरून गेले. ॥६४॥

याचवेळी भगवान श्रीनिवास, लौकिक माणसाप्रमाणे ब्रह्मदेवाकडे गेलेला गरुड अजून परत आला नाही हे पाहू बकुलेस म्हणाला- हे माते, ब्रह्मदेवाकडे पाठविलेली गरुड परत का बरे अजुन आला नाही? न येण्याचे कारण काय असावे? वाटेत त्याला कोणी अडविला तर नाही ना? ॥६५-६६॥

याप्रमाणे श्रीनिवास बोलत असतानाच एक दूत त्याच्या नजरेस पडला. त्या दूताला पाहून श्रीनिवासास आनंद झाला. ॥६७॥

त्या दूतास श्रीनिवासाने विचारले की- तुला कोणी? पाठविले हे दूता, माझा पुत्र कोठे आहे? तेव्हा दूत म्हणाला- आपला मुलगा येत असून आता गंगा नदी ओलांडीत आहे. ॥६८॥

याप्रमाणे दूत बोलत असतानाच दुसरा एक दूत आला. तो दुसरा दूत म्हणाला- आपला पुत्र आपल्या पौरजनासह गोदावरी नदी पार होत आहे. ॥६९॥

याप्रमाणे दूताचे भाषण ऐकून श्रीनिवास मंदपणे हसू लागले. इतक्यात ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून गरुड त्या ठिकाणी आला. ॥७०॥

श्रीनिवासास नमस्कार करून तो म्हणाला. तुझा पुत्र कृष्णा नदी ओलांडून श्रीशैलपर्वतावर येऊन अहोबिलापर्यंत आला आहे व मला त्याने आज्ञा केल्यावरून मी पुढे आलो आहे. याप्रमाणे श्रीनिवासाशी बोलत असता हे राजा जनका, त्याचवेळेस विष्वक्सेन तेथे आला. व नमस्कार करून नम्रपणे श्रेष्ठांपेक्षाही श्रेष्ठ अशा श्रीनिवासास विष्वक्सेन म्हणाला- ॥७१-७२-७३॥

हे श्रीनिवासा, तुझा परमश्रेष्ठ असा ब्रह्मदेव तुंबुरु तीर्थावर येऊन त्याठिकाणी स्नान करीत आहे. ॥७४॥

व तुझ्या दर्शनाविषयी अतिशय उत्सुक असलेला तुझा पुत्र इकडेच येत आहे. याप्रमाणे सेनापति विष्वक्सेनाचे भाषण ऐकून श्रीनिवास आनंदाने उठले. ॥७५॥

व प्रयाण करण्याच्या इच्छेने गरुडाच्या पाठीवर बसून निघाले. ॥७६॥

विष्वक्सेन अतिशय वेगाने ब्रह्मदेवाजवळ आला व त्यास भक्तिपूर्वक नमस्कार करून म्हणाला. ॥७७॥

कमलनेत्र भगवान श्रीहरि तुला पाहण्याविषयी उत्सुक होऊन गरूडाच्या पाठीवर बसून तुझ्याकडे येत आहे. ॥७८॥

बुद्धिमान विष्वक्सेनाचे भाषण ऐकून चंद्रबिंबाप्रमाणे शुभ्रवर्णीय हंसावरून ब्रह्मदेव खाली उतरून ज्या बाजूने श्रीनिवास येत होता तिकडे ब्रह्मदेव पायी निघाला हे राजा, ब्रह्मदेवाने आपला पिता श्रीनिवास यांस पाहिले. ॥७९-८०॥

मग ब्रह्मदेवाने हात जोडून त्यांस नमस्कार केला. श्रीनिवास गरुडावरून खाली उतरून ब्रह्मदेवाजवळ येत ॥८१॥

त्यास उठवून आलिंगन दिले. मग श्रीनिवास म्हणाला हे ब्रह्मदेवा, उठ तुझे मंगल असो. आतूर व कृश अशा मला पहा. ॥८२॥

फार दिवसांनी मला भेटण्याची बुद्धि झाली. तुला माझी भेट घेण्याची बुद्धि झाली हेही मी पुष्कळच समजतो. हे ब्रह्मदेवा, तुझ्यावाचून एकही वस्तु नसल्याने तुझ्याशिवाय मला संतोष होणार नाही. ॥८३-८४॥

याप्रमाणे श्रीनिवास बोलत असता ब्रह्मदेव काहीच बोलला नाही. मग श्रीनिवास थोडावेळ स्तब्ध बसला. ॥८५॥

दोघांच्याही डोळ्यांत अश्रु दाटले होते व दोघांचेहि मुख आनंदाने प्रफुल्लित झाली होती व ते एकमेकांकडे पहात होते. ॥८६॥

पुत्र आपल्या पित्याचे मुख पाहात होता तर पिता श्रीनिवास आपल्या मुलाचे मुख न्याहाळीत होता. त्यामुळे संतुष्ट झालेले पिता-पुत्र हे दोघेही अतिशय आनंदित झाले. ॥८७॥

याप्रमाणे त्या देव समुदायात श्रीनिवास व ब्रह्मदेव हे दोघेही (विडंबनात्मक) क्रीडा करीत होते. त्या दोघा पितापुत्राना पाहून सत्यनिवासी लोक त्या श्रीहरीच्या मायेने मोहित होत अतिशय आनंदित होऊन देव म्हणू लागले. ब्रह्मदेवासारखा पुत्र नाही व श्रीहरिसमान पिता नाही. ॥८८-८९॥

याप्रमाणे सर्व भक्तिरूपी स्नेहाने युक्त होऊन श्रीनिवास ब्रह्मदेव यांची प्रशंसा करू लागले. नंतर आपल्या मुलास आश्वासन देऊन त्याच्या डोळ्यातील अश्रु पुसले. ॥९०॥

नंतर आपल्या डोळ्यापर्यंत नेऊन त्याच्या हाताने आपल्या डोळ्यातील अश्रु पुसले आणि ब्रह्मदेवासह श्रीनिवास आपल्या वारुळातील स्थानाकडे आले. ॥९१॥

त्याठिकाणी पुरुषोत्तम श्रीनिवास म्हणाला- ब्रह्मदेवा, तुझे व माझ्या सुनांचे कुशल आहे ना? ॥९२॥

हे पुत्रा तुझी मुले, नातू, पणतू या सर्वांचे कुशल वर्तमान मला तू सांग. याप्रमाणे विचारले असता ब्रह्मदेव म्हणाला- हे श्रीनिवासा, तुझ्या अनुग्रहाने आम्हा सर्वांचे कुशल आहे. हे पुराणपुरुषोत्तम ताता, तू आपले क्षेम मला सांग. याप्रमाणे ब्रह्मदेवाने विचारले असता श्रीनिवास म्हणाला-द्वापारयुगाच्या शेवटि घडलेली हकीकत मी तुला सांगतो ती तू सावधान चित्ताने श्रवण कर. ॥९३-९४॥

हे ब्रह्मदेवा, वैकुंठात शेषरूपी शय्येवर झोपलो असता भृगु मुनीने आपल्या पायाने माझ्या वक्षःस्थलावर तुझ्या मातेच्या निवासस्थानावर ताडन केले. ॥९५॥

तेव्हा तुझी माता महालक्ष्मी (माझा त्याग करून) करवीरपुरास निघून गेली. त्या दुःखाने संतप्त होऊन मी उत्तम अशा वैकुंठाचा त्याग केला. ॥९६॥

या वेंकटाचलावर आल्यानंतर येथे मला योग्य असे निवासस्थान दिसले नाही. मग सदैव या वारुळात राहात असता, राजभार्येकडून ताडन केल्या गेलेल्या चोलराजाच्या नोकराने आपल्या कुर्‍हाडीने माझ्या मस्तकावर प्रहार केला. त्या प्रहाराने झालेल्या जखमेतून कृपाळु अशा बृहस्पति आचार्यांच्या कृपेने जगलो आहे. ॥९७-९८॥

हे पुत्रा, माझे कल्याण करणार्‍या माझ्या मातेला अभिवादन कर. याप्रमाणे श्रीनिवासाने सांगितले असता ब्रह्मदेवाने बकुलादेवीस नमस्कार केला. ॥९९॥

ब्रह्मदेव म्हणाला- हे गोविंदा, ही तुझी माता पूर्वी कोठे जन्मली होती? हे मला सांग. कारण ते ऐकण्याविषयी मला फार उत्सुकता आहे. ॥१००॥

त्यावेळी भगवान श्रीनिवास म्हणाला- यशोदा हीच सध्या वेंकटाचलावर बकुला म्हणून आहे. हे ब्रह्मदेवा, पुष्कळ कालपर्यन्त तिने माझे रक्षण केले आहे. ॥१॥

आपत्कालात जो आपले रक्षण करील तोच आपला माता पिता व गुरू समजावा. मी एकदा मृगया करण्याच्या इच्छेने पद्मतीर्थाजवळ आलो असता तेथे पुष्पवनात काही मुली आल्या. त्यामध्ये उठून दिसणारी एक कन्या तेथे होती. ॥२-३॥

जिला आकाशराजाची कन्या पद्मावती या नावाने जाणतात. तिला पाहून मोह मला उत्पन्न झाल्याने माझे मन तिची इच्छा करीत आहे. ॥४॥

तू माझा अतिशय प्रिय असा पुत्र आहेस. म्हणून तिचा व माझा संयोग होईल असे कर. याप्रमाणे ब्रह्मदेवाशी श्रीनिवास बोलत असताना श्रीनिवासाने दुंदुभीचा आवाज ऐकिला. ॥५॥

तेव्हा श्रीनिवास म्हणाला- हे कोणाचे वाद्य आहे? कोण माझ्याकडे येत आहे? याप्रमाणे श्रीनिवास म्हणत आहे इतक्यात वायु त्याठिकाणी प्राप्त झाला. ॥६॥

काळवीटावर बसलेला भारतीपति वायु आपली पत्नी भारतीसह सुगंध पसरवीत त्या पर्वतावर आला. आपला गुणानी श्रेष्ठ असा ज्येष्ठ पुत्र कुशल असल्याचे श्रीनिवासाने आनंदाने पाहिले. ॥७॥

हे वायो बैस आलास फार चांगले झाले. असे वायूस श्रीनिवास म्हणाला. नंतर श्रीनिवास म्हणाला- मुलाच्या बाबतीत कल्याण कर अशा भारतीपते वायो, भारती देवी, सर्व लोकामध्ये प्रसिद्ध आहे असे मला वाटते. याप्रमाणें श्रीनिवासास वायूशीं बोलत असतानाच महादेव त्या ठिकाणीं आला. ॥८-९॥

महादेवानें पितामह श्रीनिवासास व पिता ब्रह्मदेवास नमस्कार केला.त्यानंतर पार्वती, षण्मुख व प्रथम गणाधिपति सेवकांनी नमस्कार केला. ॥११०॥

महादेव आले असतां श्रीनिवास त्याला आलिंगन देऊन म्हणाला- हे वत्सा, माझ्याजवळच इथें आसनावर बैस. ॥११॥

याप्रमाणें महादेंवाशीं श्रीनिवास बोलत असतां नरवाहन असा कुबेर त्याठिकाणीं आला.॥१२॥

आपल्या भार्यापुत्र इत्यादिकासह व आपल्या नौकरासह कुबेरास आलेला पाहून श्रीनिवास म्हणाला.॥१३॥

हे बुद्दिमंता कुबेरा, तूं सर्वदा धनवान हो,--- याप्रमाणें कुबेरास श्रीनिवास आशीर्वाद देत असतानाच स्वाहा व स्वधा या आपल्या दोन स्त्रियासह मेषावर आरूढ होऊन अग्नि, हा आपल्या पुत्रासह व बंधुसह वेंकटाचलावर आला.॥१४-१५॥

अग्नीस पाहून श्रीनिवास आनंदित झाला व श्रीनिवासानें अति जलद आलिंगन देऊन "बैस बैस" असें अग्नीस म्हटले. ॥१६॥

नंतर आपल्या भार्येसह प्रेताधिपति आपल्या वाहनावर ( रेड्यावर) बसून शेषाचलावर आला. ॥१७॥

महाबुद्दिमान चित्रगुप्तहि हे राजश्रेष्ठा त्याठिकाणी आला. नंतर मगरीवर आरूढ होऊन भक्तिमान जलाधिपति वरुणही वेंकटाचलावर आला. ॥१८॥

आपल्या भार्येसह अनेक रत्नांनी यूक्त असा शचीपति व स्वर्गलोकाधिपति इंद्र ऐरावत नामक हत्तीवर बसून शेषाचलावर आला.॥१९॥

सर्व भोंगांचा आश्रय असणारा, तीन लोकांचा अधिपति इंद्र आपल्या पौलोमी नामक भार्येसह व मुलासह त्या ठिकाणीं आला. तेंव्हा त्याच्या योग्यतेप्रमाणें श्रीनिवासानें सत्कार केल्यावर इंद्र तेथे बसला.॥१२०॥

याच वेळेस चंद्र व सूर्य तेथे आले. रतीसह मूलरूपानें मदनही घोड्यावर बसून तेथें आला.॥२१॥

कश्यप, अत्रि, भरद्वाज, वामदेव, गौतम, विश्वामित्र, वसिष्ठ, वाल्मिकी, परशुराम, पुलस्त्य, दधीचि, शुनश्शेप, गालव, गार्ग्य, व्यास इत्यादि ऋषि आपल्या भार्या पुत्रशिष्य वगैरे परिवारासह वेंकटाचलावर आले होते. गंधर्व, अप्सरा सर्व सिद्ध, सर्प याप्रमाणे श्रीनिवासाच्या विवाहासाठीं अनेक महर्षि देव, राजे, विष्णुभक्त हे सर्वजण अत्यंत उत्साहानें वेंकटाचलावर प्राप्त झाले.॥२२-२३-२४-२५-२६॥

हे जनकराजा, याप्रमाणे आलेल्या सर्वांचा यथायोग्य सत्कार करून सर्वांना समोरच्या जागेत सर्वांना राहण्यास सांगितले. ॥

त्यानंतर विश्वकर्मा श्रीनिवासाच्या दृष्टीस पडला असता किंचित रागाने श्रीनिवास इंद्राला म्हणाला- ॥२७॥

हे इंद्रा, सध्या या विश्वकर्म्याचा उद्धटपणा पहा. हा आपल्या बंधूच्या बाहुबलावर विसंबून स्वतःचे हिताहित जाणत नाही. ॥२८॥

हा इतराप्रमाणेच माझ्याकडेहि पाहतो. बरे झाले. हे इंद्रा, स्वतःचे हित न समजणार्‍या या विश्वकर्म्याचा त्याग कर. ॥२९॥

तर माझ्यावरील भक्तीने युक्त असणार्‍या दुसर्‍या एखाद्या शाला बांधण्यात हुशार असलेल्यास देवतागृह बांधण्याकरिता नियोजित कर. ॥१३०॥

याप्रमाणे श्रीनिवासाचे कठोर भाषण ऐकून हे जनकराजा, तो विश्वकर्मावर्धकी भयविव्हल होऊन श्रीनिवासांना नमस्कार करीत म्हणाला, ॥३१॥

हे भगवन् दयानिधे. अज्ञानाने माझ्या हातून आपणास अपेक्षित गोष्ट घडली नाही. या माझ्या अपराधाबद्दल क्षमा असावी. ॥३२॥

देवाधिदेवा, हे देवेशा, क्षुद्र अशा माझ्यावर कोणत्या कार्यासाठी इतका आपला राग का झाला आहे? ॥३३॥

याप्रमाणे वर्धकीने श्रीनिवासाची प्रार्थना केली असता श्रीनिवास इंद्रास म्हणाला, हे देवेन्द्रा, देवांना व मुनींना राहण्याकरिता एक सभा तयार करव. ॥३४॥

पन्नास योजने लांब, तीस योजने रुंद अशी विस्तृत मनोहर, अशी विशाल सभा तयार करव. ॥३५॥

याप्रमाणे श्रीनिवासाने इन्द्रास सांगितले असता इन्द्राने वर्धकीस सांगितले. वर्धकीने उत्तम व विशाल अशी सभा तयार केली. नंतर श्रीनिवास इन्द्रास म्हणाला, हे इन्द्रा, आकाशराजाच्या नगरास तू जा शांतचित्ताने राजास या कार्याची (आपल्याकडील मंडली किती येणार वगैरेची) माहिती दे. ॥३६-३७-३८॥

व त्याठिकाणी (आकाशराजाच्या नारायणपुरास) अशा सभा, भवन वगैरे गोष्टी या वर्धकीकडून करव. याप्रमाणे श्रीनिवासाचे बोलणे ऐकून इन्द्र, विश्वकर्म्यासहित आकाशराजाच्या नगरास गेला व राजाच्या नगराभोवतालची पुष्कळ योजने अरण्ये, खाचखळगे, उंचवटे हे सर्व सपाट केले व त्यावर नानातर्‍हेची लहान मोठी घरे, मोठमोठ्या सभा तयार केल्या. ॥३९-४०-४१॥

सुंदर अशा रत्नादिकांनी तयार केलेला संपूर्ण निरनिराळ्या विभागांनी युक्त असलेला, निरनिराळ्या रंगाने चित्रविचित्र दिसणारा, रत्नांच्या खांबांनी युक्त असणारा विवाह मंडप श्रीनिवासासाठी आकाशराजाने वर्धकीकडून तयार करविला. इंद्राने विश्वकर्म्याकडून श्रीनिवासास राहण्यासाठी रत्नस्तंभ व गोपुरे यांनी युक्त असलेले भवन आकाशराजाच्या सांगण्यावरून तयार केले. ॥४२-४३॥

धनधान्य, रत्नाची तोरणे, शंभर विहीरी व आड, तसेच घोडे व हत्ती बांधण्यासाठी जागा तयार केल्या. ॥१४४॥

याप्रमाणे भविष्योत्तरपुराणांतर्गत वेंकटेशमाहात्म्याचा दहावा अध्याय समाप्त


References : N/A
Last Updated : April 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP