ऋग्वेदादि तीन वेदांच्या उद्देशाने केले जाणारे जे त्रैवेदिक व्रत ते गुरुकुली राहून छत्तीस वर्षे करावे किंवा अठरा वर्षे पाळावे अथवा ९ वर्षे त्याचे अनुष्ठान करावे. सारांश, वेदाचे अध्ययन संपेपर्यंत हे व्रत करावे. (पूर्व पक्षाप्रमाणे प्रति वेदाध्ययनास बारा वर्षे सापडतात, दुसर्या पक्षाप्रमाणे सहा वर्षे, तिसर्या पक्षाप्रमाणे नऊ वर्षे व शेवटच्या पक्षाप्रमाणे याहून अधिक किंवा कमी काल मिळतो.) ॥१॥
आपल्या शाखेसह वेदांच्यातीन भिन्न भिन्न शाखा शिकून किंवा दोन शाखा शिकून अथवा निदान आपलीच एक शाखा प्रथम मंत्र व नंतर ब्राह्मण या क्रमाने शिकून ज्याचे ब्रह्मचर्य लुप्त झालेले नाही अशा द्विजाने गृहस्थाश्रमाचा स्वीकार करावा. ॥२॥
ब्रह्मचार्याच्या धर्माचे अनुष्ठान केल्यामुळे प्रसिद्ध झालेल्या, पित्यापासून ब्रह्मरूपी धनाचे हरण करणार्या, माळेच्या योगाने अलंकृत झालेल्या व उत्कृष्ट आसनावर बसलेल्या त्या वेदवेत्त्याची विवाहाच्या पूर्वी मधुपर्क विधीने पूजा करावी. ॥३॥
गुरूने ज्यास दिली आहे व गृह्योक्त विधीने ज्याने स्नान व समावर्तन केले आहे अशा द्विजाने समानवर्णाच्या सुलक्षणी कन्येशी विवाह करावा. ॥४॥
मातेच्या व पित्याच्या सपिंडातील व समान गोत्रातील जी नसेल ती कन्या द्विजास स्त्रीत्वाच्या योगाने संपन्न होणार्या विवाहाविषयी व स्त्रीपुरुषसाध्य अग्न्याधान पुत्रोत्पादन इत्यादिकांविषयी प्रशस्त आहे. (मातेच्या सगोत्रांतील असे जे वर म्हटले आहे त्याचा अर्थ मातेच्या परंपरात्मक वंशांतील असा समजावा.) ॥५॥
गायी, बकर्या, मेंढ्या, धन, धान्य इत्यादिकांच्या योगाने अति समृद्ध व अति मोठी अशी ही दहा कुळे स्त्रीसंबंधामध्ये वर्ज्य करावी. ॥६॥
१. जातकर्मादिक्रियाशुन्य व अध्यापन चालत नाही असे कुल.
२. ज्यात कन्याच फार होत असतील असे कुल,
३. ज्यात वेदांचे अध्ययन व अध्यापन चालत नाही असे कुल,
४. ज्यातील स्त्री पुरुषांच्या अंगावर लांब व पुष्कळ केस असतात असे कुल,
५. मुळव्याधीने युक्त असलेले कुल,
६. व क्षय, ७. अग्निमांद्य, ८. अपस्मार, ९. पांढरे कोड व १०. कोड या रोगांनी युक्त असलेली कुळे सोडावीत. ॥७॥
जिचे केस पिंगट वर्ण आहेत, जिला एकादा अवयव अधिक आहे, जी नित्य रोगी असते, जिला मुळीच केस नाहीत, जिला पुष्कळच केस आहेत, जी पुष्कळ व कठोर भाषण करिते व जिचे डोळे पिंगळे आहेत अशा कन्येशी विवाह करू नये. ॥८॥
आर्द्रा, रेवती इत्यादी नक्षत्राचे नाव जिला ठेविले आहे, वृक्ष, नदी, म्लेच्छ, पर्वत, पक्षी, सर्प, दास यांचे व भयानक नाव जिचे आहे अशा कन्येस वरू नये.॥९॥
जिचे अंग विकल नाही, नाव ऐकण्यास मधुर व उच्चारण्यास सहज आहे, जी हंसाप्रमाणे व गजाप्रमाणे गमन करणारी आहे, लोम, केस व दात हे जिचे बारीक आहेत व जिचे अंग मृदु आहे अशा कन्येशी विवाह करावा. ॥१०॥
जिला भाऊ नसेल तिच्याशी पुत्रिकाधर्माच्या भीतीने शहाण्याने विवाह करू नये. (हिला जे अपत्य होईल ते माझे श्राद्धादि करील असे केवल मनात आणिल्यानेही ती कन्या पुत्रिका होते.)
तसेच जिचा पिता कोण हे विशेषे करून समजत नाही तिच्याशीही शहाण्याने विवाह करू नये. ॥११॥
द्विजांचा प्रथम विवाह कर्तव्य असता सवर्ण स्त्री श्रेष्ठ होय. पण केवल कामलोलुप होऊन विवाहास प्रवृत्त होतात त्यास ह्या पुढील क्रमाने प्रशस्त आहेत. ॥१२॥
शूद्राची स्त्री केवल शूद्रालाच होऊ शकते; अन्य जातीची नाही. वैश्यास वैश्य व शूद्रा अशा जातीच्या कन्या उक्त आहेत. क्षत्रियास शूद्रा, वैश्या व क्षत्रिया अशा तीन कन्या योग्य आहेत व ब्राह्मणास चारी वर्णाच्या कन्यांशी विवाह करिता येतो. ॥१३॥
पण गृहस्थ धर्माची इच्छा करणार्या ब्राह्मण व क्षत्रिय यांस ते आपत्तीमध्ये असले तरी व त्यास सवर्ण कन्या मिळत नसली तरी कोणत्याही इतिहासादिकांमध्येही शूद्रा स्त्री भार्या होते असे सांगितलेले नाही. ॥१४॥
मोहामुळे हीन जातीच्या स्त्रीशी विवाह करणारे द्विज संतानासहित आपल्या कुलासच तात्काल शूद्रत्वास पोचवितात ॥१५॥
शूद्रकन्येशी विवाह करणारा ब्राह्मण पतित झाल्यासारिखाच होतो असे अत्रीचे व उतथ्यपुत्र गौतमाचे मत आहे. शूद्रस्त्रीच्या ठायी पुत्रोत्पति केल्याने क्षत्रिय पतित होतो असे शौनकांचे मत आहे व शूद्रकन्येच्या अपत्यास आणखी अपत्य झाले की वैश्य पतित झाल्यासारखा होतो. ॥१६॥
सवर्ण कन्येशी विवाह न करिता जो ब्राह्मण शूद्र स्त्रीस भोगाकरिता आपल्या शय्येवर आरोपित करतो (तिच्याशी विवाह करतो) तो अधोगतीस जातो व तिच्या ठायी पुत्राची उत्पत्ति केल्याने तो आपल्या ब्राह्मण्यापासूनच भ्रष्ट होतो. ॥१७॥
ज्या ब्राह्मणाची होमादि देवकर्मे श्राद्धादि पितृकर्मेव अतिथिभोजनादि कर्मे विवाहित शूद्रास्त्रीच्या योगाने संपादित होतात त्याचे ते हव्य व कव्य क्रमाने देव व पितर खात नाहीत व तसल्या आतिथ्याने तो गृहस्थ स्वर्गास जात नाही. ॥१८॥
ज्याने शूद्रस्त्रीच्या अधरोष्ठाचे पान केले आहे व एका शय्येवर निजल्यामुळे तिच्या निश्वासाने जो भ्रष्ट झाला आहे व तिच्या ठायी ज्याने अपत्याची उत्पत्ति केली आहे. त्याची शुद्धि कोणत्याचप्रकारे सांगितलेली नाही. ॥१९॥
चारी वर्णाच्या लोकांस परलोकी व यालोकी जे काही हितकर व अहितकर स्त्रीविवाह आहेत ते हे आठ तू संक्षेपतः ऐक. ॥२०॥
ब्राह्म, दैव, आर्ष, प्राजापत्य, आसुर, गांधर्व, राक्षस व आठवा अधम पैशाच विवाह आहे. ॥२१॥
ज्या वर्णाच्या पुरुषास जो विवाह धर्मरूप आहे, ज्या विवाहाचे जे गुणदोष आहेत व त्या त्या विवाहाच्या योगाने उत्पन्न झालेल्या अपत्यांमध्ये जे गुण व अगुण असतात ते सर्व मी तुम्हांस सांगतो. ॥२२॥
वर सांगितलेल्या आठ विवाहातील ब्राह्मादि पहिले सहा विवाह ब्राह्मणास, शेवटचे चार क्षत्रियास, व राक्षस विवाहास सोडून बाकी राहिलेले तेच चार (अर्थात आसुर, गंधर्व व पैशाच हे तीन) वैश्य व शूद्र यांस धर्मरूप आहेत असे समजावे. ॥२३॥
पण ब्राह्मणास पहिले ब्राह्मादि चार विवाहच प्रशस्त्र आहेत; क्षत्रियास एक राक्षस विवाहच उक्त आहे. व वैश्य आणि शूद्र यांस आसुर विवाह विहित आहे असे ज्ञाते समजतात. ॥२४॥
प्राजापत्यादि शेवटच्या पांचापैकी प्राजापत्य, गाम्धर्व व राक्षस हे तीन विवाह धर्मास सोडून नसणारे असे आहेत व बाकीचे दोन म्हणजे आसुर आणि पैशाच हे धर्मास सोडून आहेत. असे या शास्त्रात सांगितले आहे. पैशाच व आसुर विवाह आपत्कालीही कोणी कधी करू नये. ॥२५॥
वर सांगितलेले जे गांधर्व व राक्षस असे दोन विवाह ते पृथक पृथक किंवा मिश्र असे केले तरी क्षत्रियांस धर्मरूपच आहेत असे सांगितले आहे (एकमेकांचे प्रेम एकमेकांवर जडून व तशा प्रकारचे परस्पर भाषणादि झाल्यावर वराने युद्धादिकांच्या योगाने कन्येस जिंकून नेल्यास गांधर्व व राक्षस मिश्र झाले आहेत असे समजावे.) ॥२६॥
कन्या व वर या उभयतंसही वस्त्राच्या योगाने आच्छादित करून अलंकारादिकांच्या योगाने पूजा करून विद्या व आचरण यांनी युक्त असलेल्या व कन्ये विषयी पूर्वी प्रार्थना न करणार्या वरास आणून कन्यादान करणे हा ब्रह्मधर्म आहे असे सांगितले आहे. ॥२७॥
ज्योतिष्टोमादि यज्ञास आरंभ झाला असता त्याच वेळी यथाशास्त्र कर्म करणार्या ऋत्विजास अलंकृत करून कन्या देणे यास मुनि दैवविवाह असे म्हणतात. ॥२८॥
गाय व बैल यांचे एक जोडपे, किंवा दोन जोडपी वरापासून यागादि धर्मार्थ किंवा कन्येस देण्याकरिता घेऊन यथाशास्त्र कन्यादान करणे हा आर्षविवाह असे सांगतात. ॥२९॥
तुम्ही दोघांनी मिळून धर्माचरण करावे असा कन्याप्रदान समयी वाणीने नियम करून (प्रार्थना करून) वराची पूजा केल्यावर त्यास कन्या अर्पण करणे हा प्राजापत्यविवाह आहे. ॥३०॥
कन्येचा पिता, भ्राता इत्यादि नातलगास किंवा स्वथ कन्येस आपल्या शक्तीप्रमाणे किंवा आपणास वाटेल तितके धन देऊन कन्येचा स्वीकार करणे हा आसरधर्म म्हणून म्हटले आहे. ॥३१॥
कन्या व वर यांचा त्यांच्या इच्छेने परस्पर संयोग होणे हा गांधर्वविहि आहे. हा मैथुनास हितकर आहे (वस्तुथ सर्वच विवाह मैथुनास हितकर आहेत हे खरे पण येथे विवाहविधीच्या पूर्वी मैथुन झालेले असले तरी चालते हे सुचविण्याकरिता तसा विशेष उल्लेख केला आहे.) ॥३२॥
प्रतिबंध करणार्या कन्येच्या आप्तांस मारून, तोडून व त्यांची मस्तके फोडून आक्रोश करणार्या व रडणार्या कन्येस घरांतून बलात्काराने हरण करून नेणे यास राक्षसविधि म्हणतात. ॥३३॥
निजलेल्या, मद्यादिकांच्या मदाने विव्हल झालेल्या व वेड्या अर्थात आपले शील सांभाळण्यास असमर्थ असलेल्या कन्येशी एकांतात मैथुन कर्म करण्यास प्रवृत्त होणे हा अति पापी व अधर्म पैशाचधर्म आहे. ॥३४॥
ब्राह्मणांचे उदकदानपूर्वकच कन्यादान होणे प्रशस्त आहे. क्षत्रियादि इतर वर्णाच्या लोकांचे उदकावाचून एकमेकांच्या इच्छेने केवळ वाणीनेही कन्यादान होते. ॥३५॥
या विवाहातील ज्या विवाहाचा जो गुण मनूने सांगितलेला आहे तो सर्वही हे विप्रहो, सांगत असलेल्या मजपासून ऐका. ॥३६॥
पूर्वीचे दहा वंशज, पुढचे दहा व आपण एक अशा एकंदर एकवीस पुरुषांस ब्राह्मविवाहाने वरलेल्या कन्येचा सदाचरणी पुत्र पापापासून सोडवितो. ॥३७॥
दैवविधीने विवाहित स्त्रीचा पुत्र मागचे सात व पुढचे सात अशा चवदा पुरुषांचा. आर्षविवाहविधीने वरलेल्या स्त्रीचा पुत्र मागच्यापुढच्या तीन तीन पुरुषांचा व प्राजापत्य विधीने वरलेल्या कन्येचा पुत्र मागच्या पुढच्या सहा सहा पुरुषांचा उद्धार करतो. ॥३८॥
क्रमाने सांगितलेल्या या ब्राह्मादि चार विवाहामध्ये ब्रह्मवर्चस तेजोयुक्त व शिष्टांस मान्य असे पुत्र होतात. ॥३९॥
व मनोहर आकृति, सत्व व बारा अध्यायात सांगितले जाणारे गुण यांनी युक्त व धनवान, कीर्तिमान, इष्टभोगसंपन्न आणि धार्मिक पुत्र उत्पन्न होतात व ते शंभर वर्षे वाचतात. ॥४०॥
बाकी राहिलेल्या चार दुष्ट विवाहात क्रूर, असत्य भाषण करणारे व वैदिक धर्माचा द्वेष करणारे पुत्र निपजतात. ॥४१॥
सारांश, अनिंद्य स्त्री विवाहाच्या योगाने अनिंद्य प्रजा होते व निंद्य विवाहाच्या योगाने मनुष्याची निंद्य प्रजा होते. यास्तव, निंद्य विवावाहाचा त्याग करावा. ॥४२॥
हस्तग्रहणरूप संस्कार सवर्ण कन्येच्या विवाहामध्येच सांगितलेला आहे. असमान जातीय कन्येच्या विवाहामध्ये हा पुढील विधि जाणावा. ॥४३॥
क्षत्रिय कन्येने पाणिग्रहणसमयी ब्राह्मण विवाहात त्याच्या हातातील बाणांच्या टोकांस धरावे. वैश्य कन्येने ब्राह्मण व क्षत्रिय यांच्याशी विवाह करताना त्यांनी हातात घेतलेल्या चाबुकाची दुसरी बाजू आपल्या हातात धरावी. व शूद्र कन्येने तिन्ही द्विजांशी विवाह करिताना वराने पांघरलेल्या वस्त्राच्या दशा धराव्या. ॥४४॥
स्त्री ऋतुमती असेल तेव्हाच तिच्याशी गमन करावे. सर्वदा आपल्या भार्येच्या ठायीच संतुष्ट असावे. अमावास्यादि पुढे सांगितली जाणारी जी पर्वे त्यांस सोडून भार्येस संतुष्ट करणे हेच ज्याचे व्रत आहे. अशा पुरुषाने ऋतुकाल नसतानाही केवल रतीच्या इच्छेने तिच्याशी गमन करावे. या श्लोकांत तीन विधि सांगितले आहेत. ॥१॥
ऋतुकाली भार्यागमन करावे. ॥२॥
परस्त्रीशी गमन करू नये. ॥३॥
भार्येची इच्छा पूर्ण करण्याकरिता ती ऋतुमती नसतानाही तिच्याशी गमन करावे. ॥४५॥
शोणित दर्शन झाल्यापासून स्त्रीसंपर्कादिकांस शिष्टांनी निंद्य मानलेले पहिले चार दिवस धरून प्रत्येक महिन्यात सोळा दिवस (रात्री) स्त्रियास स्वाभाविकपणे ऋतु असतो. (व्याधीसारख्या अन्य काही कारणांमुळे तो सोळा दिवसांहून कमी किंवा अधिक दिवसही राहू शकतो.) ॥४६॥
त्या सोळा रात्रीतील पहिल्या चार रात्री, अकरावी रात्र व तेरावी रात्र या गमनास निंद्य आहेत व बाकीच्या दहा रात्री प्रशस्त आहेत. ॥४७॥
या दहा रात्रीतील सहावी, आठवी इत्यादि सम रात्रींमध्ये गमन केल्यास पुत्र होतो व पांचवी, सातवी, इत्यादि विषम रात्री गमन केल्यास कन्या होत. यास्तव ज्यास पुत्राची इच्छा असेल त्याने ऋतुकाली सम रात्रीमध्ये स्त्रीशी गमन करावे. ॥४८॥
पुरुषाचे वीर्य अधिक झाल्यास विषमरात्रीही पुत्र होतो व स्त्रीचे शोणित अधिक झाल्यास समरात्रीही कन्या होते. स्त्री व पुरुष यांचे समान बीज झाल्यास नपुंसक पुत्र होतो. किंवा पुत्र व कन्या असे जुळे होते व दोघांचे निःसार आणि अल्पबीज झाल्यास गर्भाचाच संभव होत नाही. ॥४९॥
पूर्वोक्त सहा निंद्य रात्री व दुसर्याही कोणत्यातरी आठ रात्री सोडून पूर्ववर्ज्य बाकी राहिलेल्या दोन रात्रीमध्ये स्त्रीगमन करणारा कोणत्याही आश्रमातील पुरुष अखंडित ब्रह्मचारीच होतो. (कोणत्याही आश्रमातील असे जे जेथे म्हटले आहे ते वानप्रस्थाश्रमास उद्देशून होय) ॥५०॥
वरापासून आपल्या कन्येच्या बद्दल धन देणे हा मोठा दोष आहे असे जाणणार्या कन्येच्या पित्याने थोडेसे सुद्धा धन घेऊ नये. कारण लोभाने ते घेणारा पुरुष अपत्यविक्रयी होतो. ॥१॥
जे पति, पिता, इत्यादि स्त्रीचे संबंधी मोहाने स्त्री, कन्या इत्यादिकांचे स्त्री, वाहने, वस्त्रे इत्यादि प्रकारचे कोणतेही धन घेऊन त्यावर उपजीविका करितात ते पापी नरकास जातात. ॥५२॥
आर्ष विवाहामध्ये गाय व बैल यांच्या एक किंवा दोन जोड्या वरापासून घ्याव्या असे जे काही आचार्य सांगतात तेही बरोबर नाही असे म्हणतात. कारण थोड्या मूल्याचा असो की पुष्कळ मूल्याचा असो तो विक्रयच होय यात काही संशय नाही. ॥५३॥
आता ज्या कन्यांच्या प्रेमामुळे वराने दिलेले धन पिता भ्राता इत्यादि घेत नाहीत तर ते कन्येसच उलट देतात तो विक्रय होत नाही; कारण, अशा रीतीने कुमारिकांचे पूजन करणे हे केवळ दयालुत्व होय. ॥५४॥
(केवल विवाहसमयी वराने दिलेले धन कन्येस अर्पण करावे एवढेच नाही तर विवाहानंतरही) पिता, भ्राता, पति, दीर इत्यादि बहु कल्याणाची इच्छा करणारांनी त्यांची पूजा (सत्कार) करावा व वस्त्रालंकारांनी त्यांस भूषित करावे. ॥५५॥
ज्या कुलामध्ये पिता, पति इत्यादिकांच्या द्वारा स्त्रियांची पूजा होत असते तेथील देवता प्रसन्न होतात व ज्या ठिकाणी त्यांची पूजा होत नाही; तेथील देवता प्रसन्न रहात नसल्यामुळे यज्ञादि सर्व क्रिया निष्फळ होतात. ॥५६॥
ज्या कुलामध्ये सपिंडातील जवळच्या भगिनी, पत्नी, कन्या, स्नुषा इत्यादि स्त्रिया दुःख भोगीत असतात ते कुल लवकरच निर्धन होते व दैव, राजा, इत्यादिकांच्या द्वारा पीडा भोगते. पण ज्या कुलात ह्या शोक करीत नसतात ते कुल धनादिकांच्या द्वारा सर्वदा वृद्धि पावते. ॥५७॥
आपला सत्कार न झाल्यामुळे भगिनी, पत्नी इत्यादि स्त्रिया ज्या गृहास शाप देतात ती गृहे अभिचार कर्मांनी नष्ट झाल्याप्रमाणे सर्व प्रकारे नाश पावतात. ॥५८॥
यास्तव आपल्या समृद्धीची इच्छा करणारांनी सत्काराचे प्रसंग व उपनयनादि उत्सव यामध्ये त्यांची भूषणे, आच्छादने व अन्न यांच्या योगाने सदा पूजा करावी. ॥५९॥
ज्या कुलामध्ये भार्येच्या योगाने भर्ता संतुष्ट असतो व भर्त्याच्या योगाने भार्या संतुष्ट असते त्या कुलातील सर्वांचे अक्षय कल्याण होते. ॥६०॥
स्त्री जर वस्त्रे, भूषणे, इत्यादि शोभादायी पदार्थांच्या योगाने सुशोभित न होईल तर ती आपल्या स्वामीस आनंद देण्यास समर्थ होणार नाही. व तिचा पति जर आनंदित न होईल तर गर्भधारणा होणार नाही. ॥६१॥
अलंकारादिकांच्या योगाने स्त्री कांतियुक्त झाली की तिचे आपल्या पतीवर प्रेम बसते व ती परपुरुष संपर्क करीत नाही. त्यामुळे ते कुल दीप्तियुक्त होते. पण तिला संतोष नसला म्हणजे ती पतीचा द्वेष करू लागते व परपुरुषसंपर्क करिते त्यामुळे ते सर्व कुल मलिन होते. ॥६२॥
सारांश, असुरादि विवाहांच्या योगाने पूर्वोक्त जात कर्मादि कर्मांचा लोप झाल्यामुळे, वेदांचा पाठ न केल्यामुळे व ब्राह्मणांचे पूजन न केल्याने प्रख्यात कुलेही हीन अवस्थेस पोचतात. ॥६३॥
चित्रकर्मादि शिल्पाच्या योगाने, व्याजबट्याच्या योगाने, केवल शूद्रसंततीमुळे, गाई, बैल, घोडे रथ इत्यादिकांचा विक्रय केल्याने, शेतकी केल्याने, राजाची सेवा पत्करल्याने संस्कारभ्रष्ट व्रात्यांकडून यजन करविल्याने श्रौतस्मार्त कर्मांचे काही फल मिळणार नाही असे म्हणून नास्तिक बनल्यामुळे व वेद न शिकल्यामुळे कुळे तात्काळ नाश पावतात. ॥६४-६५॥
ज्या कुलात धन थोडे आहे अशी कुलेही वेदाध्ययन, त्यांचे अर्थज्ञान, आचरण इत्यादिकांनी संपन्न असली तर त्यांची उत्तम कुलात गणना होते व ती मोठी कीर्ति मिळवितात. ॥६६॥
(येथवर विवाह प्रकरण चालले होते. आता यापुढे महायज्ञाविषयी विचार चालेल.) विवाहसमयी प्राप्त झालेल्या अग्नीमध्ये गृहस्थाने सायंप्रातर्होम, अष्टका इत्यादि गृह्यस्त्रोक्त कर्म, पंचमहायज्ञान्तर्गत वैश्वदेवादिकांचे अनुष्ठान व रोज तयार करावयाचा पाक ही यथाविधि करावी. ॥६७॥
१. चूल, शेगडी इत्यादि पाकस्थान
२. पाटावरवंटा, जाते इत्यादि,
३. घर, कुंड इत्यादि झाडण्याचे केरसुणीसारखे साधन
४. उखळमुसळ
५. व पाणी साठविण्याचा रांजण, घागर इत्यादि साधने अशी पांच प्रकारची गृहस्थाची हिंसा स्थाने आहेत. (म्हणजे या पांच स्थळी गृहस्थाच्या हातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या प्रायः रोज हिंसा होते) त्या पांच हिंसास्थानी घडलेल्या पापाचा क्षय व्हावा. ॥६८॥
म्हणून क्रमाने गृहस्थानी प्रत्यही पंचमहायज्ञ करावे असे मन्वादि महर्षींनी सांगितले आहे. ॥६९॥
१. अध्ययन व अध्यापनरूप ब्रह्मयज्ञ, २. तर्पण हा पितृयज्ञ३. पुढे सांगितला जाणारा जो अग्नीतील होम तोच देवयज्ञ,
४. भूता करिता दिलेला बलि हा भूतयज्ञ, व ५. अतिथींचे पूजन हा मनुष्ययज्ञ होय. ॥७०॥
जो हे पाच महायज्ञ यथाशक्ति टाकीत नाही (म्हणजे मुख्य कल्पाने कदाच्त न करिता आल्यास अनुकल्पाने तरी अवश्य करितो) तो सतत गृहस्थाश्रमांतच जरी रहात असला तरी या हिंसा दोषांनी लिप्त होत नाही. ॥७१॥
देवता, अतिथि, वृद्ध मातापितरादिक अवश्य पोषणीय लोक, पितरे, व स्वतः आपला देह या पाचास जो अन्न देत नाही तो श्वासोच्छ्वास जरी करीत असला तरी जीवितसाफल्य करीत नसल्यामुळे जिवंत नाही असेच समजावे. ॥७२॥
अहुत, हुत, प्रहुत, ब्राह्मयहुत व ब्रह्मयज्ञसंज्ञक जप, हुत म्हणजे देवयज्ञनामक होम, प्रहुत म्हणजे भूतयज्ञाख्य म्हणजे पितृयज्ञसंज्ञक नित्यश्राद्ध होय. ॥७४॥
दारिद्र्यादि दोषामुळे अतिथि भोजनादिक जर करिता आले तर ब्रह्मयज्ञामध्ये नित्य युक्त असावे, व त्याचप्रमाणे अग्नि होम करण्यामध्ये तत्पर असावे. कारण होम नामक दैव कर्मामध्ये तत्पर असणारा पुरुष या स्थावर जंगम सृष्टीचे धारण करीत असतो. ॥७५॥
यजमानाने अग्नीमध्ये यथाविधि टाकिलेली आहुति आदित्यास प्राप्त होत. (कारण, सूर्य किरणांच्या द्वारा रसाचे वर आकर्षण करीत असतो हे सर्व प्रसिद्ध आहे.) मग आदित्यापासून वृष्टि होते. वृष्टीच्या योगाने अन्न उत्पन्न होते व अन्नाच्या द्वारा प्रजा निर्माण होते. ॥७६॥
ज्याप्रमाणे वायूचा आश्रय करून सर्व प्राणी राहतात त्याप्रमाणे गृहस्थाश्रमाचा आश्रय करून सर्व आश्रम रहातात. ॥७७॥
ज्याअर्थी गृहस्थातिरिक्त तिन्ही आश्रमी वेदार्थ व्याख्यान, अन्नदान इत्यादिकांच्या योगाने नित्य गृहस्थाकडून उपकृत होतात त्या अर्थी गृहस्थांचा आश्रम ज्येष्ठ आहे. ॥७८॥
आणि असे आहे म्हणून चिरस्थायी स्वर्ग सुखाची इच्छा करणार्या व ऐहिक स्त्री, अन्न, पान व वस्त्रपात्र इत्यादिकांच्या द्वारा प्राप्त होणार्या पुरुषाने प्रयत्नाने गृहस्थाश्रमाचे अनुष्ठान करावे. कारण ज्यांनी आपल्या इंद्रियांचे नियमन केलेले नसते अशा दुर्बल पुरुषाकडून त्याचे अनुष्ठान होऊ शक्त नाही. ॥७९॥
ऋषि, पितर, देव, भूते व अतिथि हे सर्व गृहस्थापासून मिळण्याची आशा करीत असतात यास्तव शास्त्रज्ञाने त्यांस अन्नादि द्यावे. ॥८०॥
वेदाध्ययनाच्या योगाने ऋषींचे पूजन करावे. होमांच्या योगाने यथाविधि देवाचे पूजन करावे. श्राद्धांच्या योगाने पितरांस तृप्त करावे. अन्नाच्या योगाने अतिथीस संतुष्ट करावे व बलिकर्मांच्या योगाने भूतास तृप्त करावे. ऋषि, पितर, देव, भूते व अतिथि हे सर्व गृहस्थापासून मिळण्याची आशा करीत असतात यास्तव शास्त्रज्ञाने त्यांस अन्नादि द्यावे. ॥८१॥
पितरांची प्रीति संपादन करणार्या गृहस्थाने प्रत्यही अन्न, तिल, व्रीहि, इत्यादिक खाद्यपदार्थांच्या योगाने, उदकाच्या योगाने, अथवा क्षीर, फळे, मुळे इत्यादिकांच्या योगाने श्राद्ध करावे. ॥८२॥
पंचमहायज्ञान्तर्गत जो पितृयज्ञ त्यामध्ये निदान एका ब्राह्मणास तरी भोजन घालावे. याप्रसंगी वैश्वदेवार्थ ब्राह्मणास भोजन घालण्याची आवश्यकता नाही. ॥८३॥
ब्राह्मणादि द्विजांनी गृह्याग्नीवर यथाविधि सर्व देवाकरिता शिजविलेल्या अन्नाचा या पुढील देवतांस उद्देशून प्रत्यही होम करावा. ॥८४॥
अग्नये स्वाहा, व सोमाय स्वाहा असे म्हणून प्रथम दोन आहुत्या द्याव्या. नंतर त्या दोघांस मिळून एक आहुति "अग्निषोमाभ्यां स्वाहा" असे म्हणून द्यावी. नंतर
"विश्वेभ्यो देवेभ्यः स्वाहा" "धन्वंतरये स्वाहा" "कुव्है स्वाहा" "अनुमत्यै स्वाहा" "प्रजापतये स्वाहा" "द्यावापृथिवीभ्यां स्वाहा"
व शेवटी "अग्नये स्विष्टकृते स्वाहा" असे म्हणून आहुत्या द्याव्या. ॥८५-८६॥
याप्रमाणे देवतांचे ध्यान करून एकाग्रमनाने होम करून प्राच्यादि सर्व दिशांमध्ये प्रदक्षिणरीतीने इंद्र, यम, वरुण व सोम यांस त्यांच्या अनुयायांसह बलि द्यावा. (तो असा - पूर्वेस
इंद्रायनमः इंद्रपुरुषेभ्योनमः, दक्षिणेस यमायनमः यमपुरुषेभ्योनमः, पश्चिमेस वरुणायनमः वरुणपुरुषेभ्योनमः व उत्तरेस "सोमाय नमः सोमपुरुषेभ्यो नमः" असे म्हणून आहुत्या द्याव्या.) ॥८७॥
"मरुद्भ्यो नमः" असे म्हणून द्वारामध्ये बलि द्यावा. "अद्भ्योनमः" असे म्हणून पाण्यांत आहुति द्यावी. मुसळ व उखळ यांच्या ठिकाणी "वनस्पतिभ्यो नमः" असे म्हणून बलि अर्पण करावा. ॥८८॥
वास्तुपुरुषाच्या शिरःप्रदेशी म्हणजे ईशान्येस "श्रियै नमः" असे म्हणून बलि द्यावा." "भद्रकाल्यै नमः" असे म्हणून वास्तुपुरुषाच्या पायाकडे म्हणजेच नैऋत्येस बलि द्यावा. (दुसरे कित्येक गृहस्थ शयनस्थानी त्याच्या उशाकडे व पायगताकडे हे बलिहरण करावे असे म्हणतात.) "ब्रह्मणे नमः वास्तोष्पतये नमः" असे म्हणून गृहामध्ये बलि द्यावा. ॥८९॥
"विश्वेभ्यो देवेभ्योनमः" असे म्हणून गृहातील अंतरिक्षात बलि फेकावा. 'दिवार्चरेभ्यो भुतेभ्यो नमः" असे म्हणून दिवसा व 'नक्तंचरेभ्यो भूतेभ्यो नमः' असे म्हणून रात्री बलि द्यावा. ॥९०॥
गृहावर जे दुसरे गृह असते त्यास पृष्ठवास्तु असे म्हणतात. तेथे किंवा बलिदान करणार्याच्या मागच्या बाजूची जी भूमि तिच्यावर "सर्वात्मभूतये नमः' असे म्हणून बलि द्यावा. हे बलिदान केल्यावर जे अन्न राहिले असेल त्याचा बलि दक्षिण दिशेस तोंड करून त्याच दिशेस पितरांस उद्देशून प्राचीनावीति करून द्यावा. ॥९१॥
दुसरे अन्न पात्रामध्ये उपसून कुत्रे, पतित, चांडाळ, पापरोगी, कावळे व कृमि यांच्याकरिता हळूच भूमीवर टाकावे. (हळूच म्हणण्याचे कारण ते अस्ताव्यस्त रीतीने टाकल्यास त्यात माती मिसळेल व मग ते वरील प्राण्यास संपूर्णपणे खाता येणार नाही.) ॥९२॥
जो द्विज याप्रमाणे सर्व भूतांची अन्नदानाच्या द्वारा पूजा करितो तो सर अर्चिरादिमार्गाने तेजोमय ब्रह्मात्मक परम स्थानास जातो. ॥९३॥
हे अशा रीतीने बलिकर्म करून पूर्वी अतिथीस भोजन घालावे. संन्यासी व ब्रह्मचार यांस यथाविधि भिक्षा द्यावी. ॥९४॥
गुरूस यथाविधि गाय दिल्याने जे पुण्यफल प्राप्त होते तेच पुण्यफल गृहस्थ द्विजास योग्य अधिकार्यास भिक्षा घातल्याने मिळते. ॥९५॥
पुष्कळ अन्न नसल्याने ग्रास प्रमाण भिक्षाही तोंडीलावण्यासह सत्कारपूर्वक द्यावी. पण तेवढे अन्नही देता येण्यासारिखे नसल्यास जलपूर्ण पात्रही फलपुष्पादिउपचारपूर्वक सत्कार करून पूर्वपणे वेद व वेदार्थ जाणणार्या ब्राह्मणास स्वस्तिवाचनादि विधि करून द्यावे. ॥९६॥
दात्या पुरुषांनी अविवेकाने देव व पितर यांस उद्देशून द्यावयाचे जे अन्न ते वेदाध्ययन, व त्यांच्या अर्थाचे ज्ञान यांनी रहित असल्यामुळे तेजशून्य व त्यामुळेच भस्मरूप झालेल्या अपात्र ब्राह्मणास दिले असता निष्फळ होते. ॥९७॥
विद्या व तप यांनी समृद्ध असलेल्या ब्राह्मणाची मुखे हाच अग्नि असून त्यात हव्यकव्ये अर्पण केली असता ती दात्यास ऐहिक व्याधि, शत्रु, राजा इत्यादिकांपासून होणार्या तापांपासून व पारलौकिक नरकापासून सोडवितात. ॥९८॥
न बोलविता आपोआप आलेल्या अतिथीस आसन, पादप्रक्षालनार्थ उदक व यथा शक्ति भाजा, चटण्या इत्यादि तोंडीलावण्यासह उत्तम प्रकारे तयार केलेले अन्न (पुढे १०७. श्लोकात सांगितलेल्या) विधीप्रमाणे द्यावे. ॥९९॥
शेत कापल्यावर जे अवशिष्ट धान्य रहाते त्यास शिल असे म्हणतात. ते वेचून आणून त्यावर निर्वाह करणारा, व आवसथ्य आणि सभ्य यांसह त्रेताग्नीचे हवन करणारा असा जरी गृहस्थ झाला असला व त्याच्या गृही आलेल्या अतिथीचा योग्य यथाशक्ति सत्कार न झाला तर त्या गृहस्थाचे सर्व पुण्य तो ब्राह्मण घेतो. ॥१००॥
अन्नादि मुळीच काही जवळ नसल्यास बसण्याकरिता गवताचे आसन, भूमि, पाद-प्रक्षालनार्थ जल, प्रिय व सत्य वाणी ही तरी धार्मिक गृहस्थाच्या घरी अतिथीस मिळत नाहीत असे कधी होत नाही. ॥१॥
१. परगृही एक रात्र रहाणारा ब्राह्मण अतिथि होय. त्याचे वास्तव्य नित्य नसल्यामुळे त्यास अतिथि म्हणतात. (ज्यास दुसर्या तिथीस तेथेच रहावयाचे नसते तो अतिथि; अशी या शब्दाची व्युत्पत्ति आहे). ॥२॥
२. त्याच गावात रहाणारा, लोकांमध्ये विचित्र थट्टमस्करीच्या गोष्टी सांगून वृत्तीची इच्छा करणारा, ज्याच्या घरी भार्या व अग्निहोत्रही आहे असा पुरुश वैश्वदेवकाली जरी एकाद्या गृहस्थाच्या गृही आला तरी तो त्याचा अतिथि ब्राह्मण होत नाही. ॥३॥
जे अविवेकी गृहस्थ अतिथीच्या लोभाने दुसर्या गावी जाऊन परान्नचे सेवन करितात ते त्या परान्नाच्या योगाने मेल्यावर अन्नादि देणारांच्या गृही पशु होऊन रहातात. ॥४॥
सूर्यास्त झाल्यावर एकादा अतिथि आल्यास गृहस्थाने त्यास "येथे सोय होणार नाही" असे म्हणून त्याचा निषेध करू नये. दुसर्या वैश्वदेवाच्या वेळी किंवा सायंकालचे भोजन आटोपल्यावरही जरी कोणी अतिथि गृहस्थाच्या घरी आला तरी त्याने भोजनावाचून (उपाशी) रहाणे प्रशस्त नाही यास्तव त्यास अवश्य भोजन द्यावे. ॥५॥
घृत, दधि इत्यादि जे उत्कृष्ट पदार्थ अतिथीस दिले नसतील ते आपण खावू नयेत (तर त्यास अगोदर देऊन नंतर आपण भक्षण करावे.) अतिथिपूजन धनाचे निमित्त, यशाचे कारण, आयुष्याच्या वृद्धीचे मूळ, व स्वर्ग मिळवून देणारे आहे. ॥६॥
पीठ, चर्म इत्यादि आसन, विश्रामस्थान, खाट, पलंग इत्यादि शय्या, पोचवावयास काही पावले जाणे व सेवा, इत्यादि सर्व एकाचकाली अनेक अतिथि प्राप्त झालेले असल्यास त्यांत ज्याची जशी योग्यता असेल त्याप्रमाणे त्यास द्यावे (म्हणजे जो उत्तम असेल त्यास उत्तम, जो मध्यम असेल त्यास मध्यम व जो हीन असेल त्यास हीन आसनादि उपचार द्यावे.) ॥७॥
अतिथिभोजनापर्यंत वैश्वदेव केल्यावर जर दुसरा अतिथि आला तर त्याच्याकरिता दुसरा पाक करून त्यास यथाशक्ति अन्न द्यावे व त्या पुनः शिजविलेल्या अन्नातून बलि देण्याचे काही कारण नाही. ॥८॥
भोजन मिळावे म्हणून ब्राह्मणाने आपले कुळ व गोत्र ही सांगू नयेत. कारण, भोजनाकरिता ती सांगणारा वमनभक्षक होतो असे पंडितांनी सांगितले आहे. ॥९॥
ब्राह्मणाच्या गृही क्षत्रिय अतिथि होतो असे कोणीही शास्त्रकार सांगत नाहीत व त्याचप्रमाणे वैश्य, शूद्रही त्याचे अतिथि नव्हेत. (कारण ब्राह्मणाची जाती क्षत्रियादिकांच्या जातीहून श्रेष्ठ आहे.) मित्र व संबंधी हेही त्यांचे अतिथि नव्हेत व गुरूही गृहस्थांचा अतिथि होऊ शकत नाही. (मित्रादि आत्मसंबंधामुळे व गुरु प्रभु असल्यामुळे अतिथि होणे हे योग्यच आहे.) ॥११०॥
जर दुसर्या ग्रामाहून येणे, एका दिवसाहून अधिक दिवस न राहणे इत्यादि अतिथि धर्माने एखादा क्षत्रिय ब्राह्मणगृहस्थाच्या घरी आला तर त्याच्या घरी आलेला ब्राह्मण अतिथीचे भोजन झाल्यावर आपली इच्छा असल्यास त्यासही भोजन घालावे. ॥११॥
ब्राह्मणांच्या गृहामध्ये वैश्य व शूद्र जरी अतिथिधर्माने आले तरी त्यांच्यावर दया करून क्षत्रिय व भोजनानंतर व यजमान आणि पत्नी यांच्या भोजनापूर्वी वृद्ध मातापितरादिकांबरोबर त्यास भोजन घालावे. ॥१२॥
पूर्वोक्त भोजन समयी मित्र, सहाध्यायी इत्यादि प्रेमाने गृही आल्यास त्यांसही यथाशक्ति उत्तम अन्न करून भार्येच्या बरोबर, भोजन घालावे. (स्वतः गृहस्थाच्या भोजनाचाही तोच काल आहे.) ॥१३॥
नूतन विवाहित कन्या सुना, इत्यादि; कुमारी, रोगी व गरोदर स्त्रिया यास काहि एक विचार न करिता अतिथीच्या पूर्वी भोजन घालावे. ॥१४॥
अतिथिपासून मातापितरादि पोष्य वर्गापर्यंत जे वर सांगितलेले लोक त्यास भोजन न घालता अगोदर भोजन करण्यात महा दोष आहे असे न जाणणारा जो गृहस्थ स्वतः अगोदर भोजन करितो तो मूर्ख मरणानंतर कुत्रे व गिधाडे आपणास खातील हे जाणत नाही. ॥१५॥
यास्तव ब्राह्मण व आपला पोष्य वर्ग यांचे भोजन झाल्यावर नंतर जे अन्न अवशिष्ट राहील ते यजमान व पत्नी यांनी खावे. ॥१६॥
देव, ऋषि, मनुष्ये, पितर व गृह्यदेवता यांचे अन्नादिकांच्या योगाने पूजन करून नंतर गृहस्थाने शेषान्न भक्षण करावे. ॥१७॥
जो आपल्या करिताच अन्न शिजवून (देवादिकांस न देता) खातो तो पापास कारण होणारे असे ते पापच खातो; अन्न नव्हे. कारण पंचमहायज्ञ करून अवशिष्ट राहिलेले पदार्थ खाणे हेच सज्जनांचे अन्न आहे असे सांगतात. ॥१८॥
राज्याभिषिक्त क्षत्रिय राजा, ज्याने पूर्वी आपल्या यज्ञात ऋत्विजत्व केले असेल असा ऋत्विज, ब्रह्मचारी व्रताचा ज्याने त्याग केला आहे असा स्नातक, जामात, श्वशूर व मातुल हे एकदा पूजा केल्यापासून एका वर्षानंतर पुनः येतील तेव्हा गृह्योक्त मधुपर्काने त्यांची पूजा करावी. ॥१९॥
पण राजा व स्नातक हे वर्षानंतरही यज्ञकर्मामध्ये असल्यासच त्यांची मधुपर्काने पूजा करावी. यज्ञावाचून इतर निमित्ताने आल्यास करू नये. (जामात इत्यादिकांची यज्ञावाचूनही वर्षानंतर पूजा करावी) ॥१२०॥
सायंकाळी पत्नीने मंत्र न म्हणता सिद्ध अन्नाचा बलि द्यावा. कारण, वैश्वदेवसंज्ञक जे हे कर्म ते सायंकाळी व प्रातःकाळी गृहस्थास करणे विषयी विधान आहे. ॥२१॥
(आता येथून श्राद्धकल्पास आरंभ झाला.) साग्निक द्विजाने अमावास्येच्या दिवशी पिण्डपितृयज्ञनामक यज्ञ करून प्रतिमासी अवश्य कर्तव्य असे जे पिंडान्वाहार्यक श्राद्ध ते करावे. ॥२२॥
प्रत्येक महिन्यास होणारे जे हे श्राद्ध ते पितृयज्ञानंतर केले जात असल्यामुळे त्यास पिंडान्वाहार्यक असे विद्वान म्हणतात ते श्राद्ध पुढे सांगितल्या जाणार्या गंधादिरहित मांसाने प्रयत्नपूर्वक करावे. ॥२३॥
त्या श्राद्धामध्ये भोजन घालण्यास योग्य ब्राह्मण कोणते; त्याज्य कोणते, त्यांची संख्या किती असावी व त्यांस काय काय द्यावे ते सर्व सांगतो. ॥२४॥
देवश्राद्धात दोन ब्राह्मण व पिता, पितामह व प्रपितामह यांस उद्देशून तीन ब्राह्मण सांगावे किंवा देवाकडे एक व तिन्ही पितरांकडे मिळून एक असे दोनच सांगावे. येथे सांगितलेल्या ब्राह्मणांकडून अधिक ब्राह्मणांस भोजन घालण्याचे जरी यजमानास सामर्थ्य असले तरी तसे करू नये. ॥२५॥
कारण, ब्राह्मणांची पूजा, दक्षिणेकडे उतरता असलेला देश, अपराह्णकाल, शौच व योग्य ब्राह्मणांची प्राप्ति या पांचांस अधिक ब्राह्मण सांगण्यात बाध येतो यास्तव अधिक ब्राह्मण सांगण्याची हाव धरू नये. ॥२६॥
जे हे श्राद्धरूप पित्र्य कर्म ती परलोकस्य प्रेतांच्या उपकारार्थ क्रिया आहे हे प्रसिद्ध आहे. अमावास्येस या प्रेतोपकाररूप क्रियेमध्ये सतत तत्पर असलेल्या पुरुषाची ही स्मार्त क्रिया गुणवान पुत्रपौत्रधनादि फल प्रबंधरूपाने कर्त्यास प्राप्त होते; यास्तव, हे कर्म अवश्य करावे. ॥२७॥
वेदाध्यायी ब्राह्मणासच दात्यांनी हव्य कव्ये प्रयत्नाने द्यावीत. विद्या, आचार, कुळ इत्यादिकांच्या योगाने अति पूज्य अशा ब्राह्मणास ती दिल्याने मोठे फल मिळते. ॥२८॥
दैव व पितृकर्मामध्ये एक एक वेदतत्त्ववेत्त्या ब्राह्मणासच भोजन दिले तरी त्यापासून पुष्कळ श्राद्धफल प्राप्त होते. पण अनेक अज्ञानी ब्राह्मणांस भोजन घातल्याने ते थोडेसेही मिळत नाही. ॥२९॥
पिता, पितामह इत्यादिकांपासून यांचे कुल शुद्ध आहे की नाही याचा विचार करून संपूर्ण वेदाध्यायी ब्राह्मणाची परीक्षा करावी. कारण शुद्ध कुलातील विद्वान ब्राह्मणच हव्यादिकांचे मुख्य पात्र आहे. ॥१३०॥
वेदांस न जाणणारे दहा लक्ष ब्राह्मण ज्या श्राद्धात भोजन करितात त्याच ठिकाणी एकच वेदवेत्ता भोजनाने तृप्त झाला असता तो एकटाच त्या सर्वाकडून प्राप्त होणारे फल यजमानास देतो. (हा वेदाध्ययन न करणार्या दशलक्ष ब्राह्मणभोजनाचे फल एकट्या वेदवेत्त्या ब्राह्मणास तृप्त केल्याने मिळते.) ॥३१॥
विद्येने जे उत्कृष्ट असतील त्यास हव्यकव्ये द्यावी. मूर्खास देऊ नये. कारण रक्ताने भरलेले हात रक्तानेच धुता येत नाहीत तर ते पाण्याने धुतल्यासच स्वच्छ होतात. (त्याप्रमाणे मूर्खभोजनाने झालेला दोष मूर्ख भोजनानेच निवृत्त होणे शक्य नाही. ) ॥३२॥
वेदास न जाणणारा जितके हव्यकव्याचे ग्रास येथे खातो तितकेच शूल, ऋष्टि नामक आयुधाचे तापलेल्या लोखंडाचे गोळे श्राद्धकर्ता परलोकी गेल्यावर खातो. ॥३३॥
काही ब्राह्मण आत्मज्ञानपरायण असतात. काही प्राजापत्यादि तपश्चर्येमध्ये निमग्न असतात. कित्येकांची तप व अध्ययन यामध्ये निष्ठा असते व काही यज्ञायागादिकामध्ये तत्पर रहातात. ॥३४॥
ज्ञानपरायण जे असतील त्यांस पितरांचे कव्यसंज्ञक अन्न प्रयत्नाने द्यावे. व देवांची हव्यसंज्ञक अन्ने या पूर्वोक्त चारी प्रकारच्या ब्राह्मणांस द्यावी. ॥३५॥
ज्याचा पिता अश्रोत्रिय असून पुत्र वेद पारंगत आहे व ज्याचा पिता वेदपारंगत असून पुत्र स्वतः अविद्वान आहे त्या दोघांतील ज्याचा पिता श्रोत्रिय आहे त्यास श्रेष्ठ समजावे. पण वेदाच्या पूजनार्थ अश्रोत्रियाच्या विद्वान पुत्रही पूजेस योग्य आहे. ॥३६-३७॥
श्राद्धात मित्रास भोजन घालू नये. दुसर्या धनादिकाने त्याची मैत्री संपादन करावी. जो मित्र आहे किंवा शत्रु आहे असे वाटत नसेल त्या ब्राह्मणासच श्राद्धामध्ये बोलवावे. ॥३८॥
ज्याची श्राद्धे व हव्ये मित्रप्रधान असतात (म्हणजे त्यांत प्रायः मित्रासच अन्नादि दिले जाते) त्यास मरणानंतर हव्य कव्यसंबंधी फल मिळत नाही. ॥३९॥
जो मनुष्य शास्त्र विषयक अज्ञानामुळे श्राद्धाच्या द्वारा मैत्री संपादन करितो तो मित्रलाभार्थ श्राद्ध करणारा अधम द्विज स्वर्गलोकांतून भ्रष्ट ओतो. ॥१४०॥
ज्यामध्ये मित्रादिकांच्या बरोबर भोजनादि होते अशी दान क्रिया पैशाची (पिशाच धर्मयुक्त) होय असे द्विजोत्तमांनी म्हटले आहे. कारण आंधळी गाय जशी एकाच गृहामध्ये रहाते त्याप्रमाणे ती पैशाच क्रिया केवल या लोकीच रहाते. ॥४१॥
ज्याप्रमाणे माळावर बीज पेरून पेरणारास काही एक फळ मिळत नाही त्याप्रमाणे अविद्वानास श्राद्ध दान केल्याने दात्यास त्याचे फल मिळत नाही. ॥४२॥
वेदतत्ववेत्या ब्राह्मणास यथाशास्त्र दिलेले दान दाता व प्रतिग्रह करणारा या दोघासही ऐहिक व आमुष्मिक फलभागी करिते. (आयुष्य, प्रजा, धन, विद्या इत्यादि ऐहिक फल होय.) ॥४३॥
विद्वान ब्राह्मण न मिळाल्यास श्राद्धसमयी गुणवान मित्रासही भोजन घालावे पण विद्वान असलेल्या शत्रूस घालू नये. कारण शत्रूने भक्षण केलेले श्राद्ध परलोकी निष्फळ होते. ॥४४॥
मंत्र ब्राह्मणात्मक ऋग्वेदाचे अध्ययन करणार्या ब्राह्मणास प्रयत्नाने भोजन घालावे. त्याचप्रमाणे शाखा संपविलेल्या यजुर्वेदस व अध्ययन संपविलेल्या सामवेद्यास श्राद्धामध्ये अवश्य भोजन द्यावे. ॥४५॥
या तीन प्रकारच्या ब्राह्मणांपैकी कोणी तरि एक ज्याच्या श्राद्धामध्ये उत्तमप्रकारे पूजित होऊन अन्न खातो त्याच्या पितरांची सात पुरुषापर्यंत शाश्वत तृप्ति होते. ॥४६॥
हव्यकव्य प्रदानविषयी हा मुख्य पक्ष झाला. आता साधूंनी सर्वदा ज्याचे अनुष्ठान केले आहे असा हा अनुकल्प तुम्ही ऐका. ॥४७॥
मातामह, मातुल, भगिनीपुत्र, श्वशुर, विद्यागुरु, कन्यापुत्र, जामात, मावशीचा पुत्र इत्यादि बंधुत्रय, ऋत्विग व यजमान या दहातील कोणालाही मुख्य ब्राह्मण न मिळाल्यास श्राद्धामध्ये भोजन घालावे. ॥४८॥
धर्मज्ञ पुरुषाने देवसंबंधी कर्मामध्ये ब्राह्मणाची परीक्षा करू नये. पण पितृसंबंधी कर्म प्राप्त झाले असता (पूर्वी सांगितल्याप्रमाणे) कुलादिकाची परीक्षा अवश्य करावी. ॥४९॥
जे सवर्णावाचून दुसर्या पदार्थांची चोरी करणारे, महापातकी, नपुंसक व परलोक नाही असे म्हणून चालणारे, (नास्तिक) ब्राह्मण ते देवपितृकर्मामध्ये अयोग्य आहेत असे मनूने सांगितले आहे. ॥१५०॥
ज्याचे उपनयन मात्र झाले आहे पण वेद पढविलेला नाही. असा जटा धारण करणारा किंवा मुंडन केलेला ब्रह्मचारी, ज्याच्या अंगावरील चर्म वाईट आहे, जुगारी व तसेच जे अनेकांचे यज्ञ करवितात अशा पुरुषास श्राद्धामध्ये भोजन घालू नये. ॥५१॥
वैद्य, प्रतिमेची परिचर्या करून निर्वाह करणारा, एकदाही मांसविक्रय करणारा, व व्यापारावर उपजीविका करणारा असे हे सर्व देवपितृकर्मामध्ये त्याज्य आहेत. ॥५२॥
वेतन घेऊन ग्रामांचा व राजाचा आज्ञाधारक झालेला, ज्याची नखे वाईट आहेत, दात काळे आहेत, जो गुरूच्या प्रतिकूल आचरण करितो, ज्याने श्रौतस्मार्त अग्नीचा त्याग केला आहे व जो गायनादि कलांवर आपला निर्वाह करीत असतो त्या सर्वांस देवपितृकर्मामध्ये वर्ज्य करावे. ॥५३॥
क्षयरोगी, उपजीविकेकरिता बकर्या मेंढ्या इत्यादिकांचे पोषण करणारा, परिवेत्ता व अप्रिवित्ति, पंचमहायज्ञांचे अनुष्ठान न करणारा, ब्राह्मणादिकांशी द्वेष करणारा, व अनेक लोक मिळून जो एक उपजीविकेचा धंदा करीत असतात त्या गणामध्ये असणारा ॥५४॥
नाचावर आपला निर्वाह करणारा, स्त्रीसंपर्कामुळे ज्याचे ब्रह्मचर्य लुप्त झाले आहे असा ब्रह्मचारी व यति, सवर्णकन्येशी विवाह न करिता शूद्रास्त्रीशी विवाह करणारा, पुनर्विवाहित स्त्रीचा पुत्र, व ज्यच्या गृही स्त्रीचा जार आहे. ॥५५॥
वेतन घेऊन अध्ययन सांगणारा, व वेतन देऊन शिकणारा, व्याकरणादिकांच्या अध्ययनार्थ शूद्रशिष्य झालेला, ती शास्त्रे शूद्रांस शिकविणारा, कठोर भाषण करणारा, कुंड व गोलक जातीचा ॥५६॥
कारणावाचून माता, पिता व गुरु यांचा त्याग करणारा (म्हणजे त्यांची सेवा वगैरे न करणारा) पतितांशी अध्ययन, कन्यादान इत्यादिकांच्या योगाने संबद्ध झालेला ॥५७॥
घरास आग लावणारा, मरणास कारण होणारे विषारी पदार्थ खावू घालणारा, कुंडजातीच्या लोकांचे अन्न खाणारा, सोम लतेचा विक्रय करणारा, नौकेत बसून समुद्रातून द्वीपांतरास जाणारा, स्तुतिपाठक, तेलाकरिता तिळादि धान्यास घाण्यात घालून पिळणारा, खोटी साक्ष देणारा ॥५८॥
पित्याशी शास्त्रार्थाकरिता किंवा लौकिक वस्तु करिता निरर्थक वाद करणारा, स्वतः जुवा खेळण्यास जाणत नसताना आपले द्रव्य दुसर्यास देऊन त्याच्याकदून जुवा करविणारा, सुरेवाचून इतर मद्य पिणारा, महारोगी, महापातकाचा ज्याच्यावर आरोप आला आहे, कपटाने धर्म करणारा, गुडादि रसास विकणारा ॥५९॥
धनुष्ये व बाण करणारा, सख्ख्या मोठ्या बहिणीचा विवाह झालेला नसताना ज्या कनिष्ठ भगिनीचा विवाह होतो तिला अग्रेदिधिषु म्हणतात तिचा पति, मित्रास अपकार करण्यामध्ये तत्पर असलेला, जुगारीवर उपजीविकरणारा, पुत्राने ज्यास अध्ययन सांगितले आहे असा पुत्राचार्य पिता ॥१६०॥
अपस्मार रोगी, गंडमालांनी पीडिलेला, श्वेत कुष्ठयुक्त, दुर्जन, उन्मादयुक्त, आंधळा व वेदांची निंदा करणारा हे सर्व देवपितृकर्मामध्ये वर्ज्य होत. ॥६१॥
हत्ती, बैल, उंट व घोडे यास चालविणारा, ज्योतिषावर उपजीविका करणारा, क्रीडेकरिता पिंजर्यातून पक्ष्यांस पाळणारा, युद्धाकरिता आयुधविद्या शिकविणारा ॥६२॥
वाहणार्या जलाचा बांध फोडून त्यास अन्यत्र नेणारा, वाहणार्या नद्यादिकांच्या स्वाभाविक गतीस प्रतिबंध करणारा, वास्तुविद्येवर उपजीविका करणारा, पूर्वी सांगितलेल्या राजा व ग्राम यांच्या दूताहून भिन्न दूत, वेतन घेऊन वृक्ष लावणारा ॥६३॥
खेळण्याकरिता कुत्र्यास पाळणारा, ससाणा या नावाच्या पक्ष्याचा क्रयविक्रय करणारा, कन्येस दूशित करणारा (कन्येशी गमन करणारा) हिंसेमध्ये निमग्न असणारा, शूद्रांवर उपजीविका करणारा, विनायाकदि गणांचे याग करणारा ॥६४॥
आचारहीन, धर्मकृत्याविषयी निरुत्साह, सतत याचना करून दुसर्यास त्रास देणारा, स्वतः शेती करून त्यावर निर्वाह करणारा, व्याधींमुळे ज्याचा पाय स्थूल झाला आहे, कोणत्याही निमित्ताने साधूंच्या निन्देस पात्र झालेला. ॥६५॥
मेंढ्या व म्हशी (रेडे) यांचा क्रय विक्रय करणारे, पुनर्विवाहित स्त्रीचा पति व मजुरी घेऊन प्रेत वाहणारा हे सर्व प्रयत्नपूर्वक वर्ज्य करावे. ॥६६॥
ज्यांचा आचार निंद्य आहे अशा या सज्जनांच्या पंक्तीत बसण्यास अयोग्य असलेल्या ब्राह्मणास विद्वान ब्राह्मणश्रेष्ठाने दैव व पितृकर्मामध्ये घेऊ नये. ॥६७॥
गवताचा अग्नि जसा घृतादि हवीस जाळण्यास समर्थ नसतो व त्यांत घृतादि घातल्यास तो विझून जातो. म्हणजे असल्या अग्नीत केलेले हवन व्यर्थ होते त्याप्रमाणे अध्ययन शून्य ब्राह्मणास दिलेले दान व्यर्थ होते. त्यास देवान्न देऊ नये. कारण भस्मामध्ये कोणी हवन करीत नसतात. ॥६८॥
पंक्ति भोजनास अयोग्य असलेल्या ब्राह्मणास देवांचा हवि किंवा पितरांचे कव्यान्न दिले असता दात्यास दानानंतर कोणत्या फलाचा लाभ होतो ते मी आता संपूर्णपणे सांगेन ॥६९॥
वेदग्रहणार्थ ज्यांनी व्रते केलेली नाहीत व त्याचप्रमाणे परिवेत्रादि जे दुसरेही अपांक्त ब्राह्मण आहेत त्यांनी खालेलेल अन्न राक्षसाच्या तोंडात पडते. म्हणजे ते निष्फळ होते. ॥१७०॥
आपला सख्खा वडील भाऊ अविवाहित असताना व त्याने अग्निहोत्र घेतले नसताना जो कनिष्ठ भ्राता स्त्रीचे पाणिग्रहण व अग्र्याधान करितो तो परिवेत्रा व त्याचा ज्येष्ठ भ्राता परिवित्ति होय. ॥७१॥
असा परिवेत्ता, परिवित्ति, ज्याकन्येच्या योगाने परिवेदन करितो ती कन्या, कन्या दाता व पांचवा त्यांचा विवाह होम सांगणारा याज्ञिक हे सर्व नरकास जातात. ॥७२॥
मेलेल्या भ्रात्याच्या पुढे सांगितल्या जाणार्या धर्माने नियुक्त झालेल्या अशाहि स्त्रीशी प्रत्येक ऋतुसमयी एकदाच गमन करावे इत्यादि नियमांचे उल्लघंन करून कामतः अनुरक्त होतो तो दीधिषूपति होय असे समजावे. ॥७३॥
परस्त्रीचे ठायी कुंड व गोलक असे हे दोन पुत्र होतात. त्यातील पति जिवंत असता परपुरुषापासून होणारा जो पुत्र तो कुंड व पति मेल्यावर परपुरुषापासून होणारा जो पुत्र तो गोलक होय. ॥७४॥
ते परस्त्रीच्या ठायी उत्पन्न झालेले कुण्डादि पुत्र सामान्य प्राणी होत व त्यामुळे ते जरी ब्राह्मण असले तरी ब्राह्मणाचे कार्य करण्यास असमर्थ असल्यामुळे त्यास दिलेले दात्यांचे हव्यकव्य निष्फळ होते (ते दात्यांपासून प्राप्त झालेल्या हव्यादिकांचा नाश करितात) ॥७५॥
सज्जनासह एका पंक्तीत बसून भोजन करण्यास असमर्थ असलेला पापीजितक्या भोजनास योग्य असलेल्या ब्राह्मणांस भोजन करिताना पहातो तितक्यांच्या भोजनाचे फल अन्न दात्यास मिळत नाही ॥७६॥
आंधळा भोजनसमयी जवळ आला असता तो नव्वद योग्य ब्राह्मणांच्या भोजनाचे फल नाहीसे करितो. काण्याने योग्य ब्राह्मणांस भोजन करिताना पाहिल्यास तो साठ ब्राह्मणांच्या भोजनाचे फल नाहीसे करितो. श्वेतकुष्ठरोगी आपल्या पहाण्याने शंभर ब्राह्मणांच्या भोजनाचे फल घालवितो व पापरोगी सहस्त्र ब्राह्मण भोजनाच्या योगाने दात्यास मिळणार्या फलास प्रतिबंध करितो. ॥७७॥
शूद्रांच्या यज्ञादिकांमध्ये याजक होणारा ब्राह्मण जितक्या ब्राह्मणास आपल्या अंगांनी स्पर्श करितो तितक्यांच्या भोजनापासून दात्यास प्राप्त होणारे श्राद्धसंबंधी फल नाहीसे होते. (भोजनसमयी स्पर्श होण्याचा फारसा संभव नसल्यामुळे तो जितक्या श्राद्धभोक्त्या ब्राह्मणांच्या पंक्तीत बसतो असे समजावे.) ॥७८॥
वेदवेत्ताही ब्राह्मण शूद्र याजकापासून लोभाने प्रतिग्रह घेतल्यामुळे पाण्यात बुडविलेल्या मातीच्या कच्चा भांड्याप्रमाणे तात्काल नाश पावतो. ॥७९॥
सोमाचा विक्रय करणारास जे दान दिले जाते ते दात्याच्या भोजनार्थ विष्ठा होते. (म्हणजे तो दाता विष्ठाभोजी किड्याच्या जन्मास जातो.) त्याचप्रमाणे वैद्यास दिलेले दान पूर व रक्तरूपाने दात्यास उलट प्राप्त होते. वृत्यर्थ देवाची पूजा करणारा जो असतो त्यास दिलेले दान निष्फळ होते व वार्धुषि पुरुषांस दिलेले दानही निष्फळ होते. (कला व व्याजबट्टा यावर उपजीविका करणारा जो पुरुष त्यास वार्धुषि असे म्हणतात. ॥१८०॥
व्यापार करणार्या ब्राह्मणास दिलेले दान ऐहिक कीर्त्यादि कालाच्या उपयोगी नसते व पारलौकिक फलाच्याही उपयोगी नसते. पुनर्विवाहित स्त्रीच्या पुत्रास दिलेले दान भस्मामध्ये होम केलेल्या हव्याप्रमाणे व्यर्थ जाते. ॥८१॥
पंक्तिमध्ये बसून भोजन करण्यास अयोग्य असलेल्या अशा येथे सांगितलेल्या ब्राह्मणाहून जे इतर अपांक्त ब्राह्मण असतात त्यांस दिलेले अन्न दात्याच्या भोजनार्थ मेद, रुधिर, मांस, मज्जा व अस्थिरूप होते असे विद्वान सांगतात. ॥८२॥
अपांक्त्य परुषाच्या योगाने भ्रष्ट झालेली पंक्ति ज्या उत्तम ब्राह्मणांच्या योगाने पावन होते. त्या पंक्तिपावन श्रेष्ठ ब्राह्मणांची लक्षणे संपूर्णपणे ऐका. ॥८३॥
चारी वेदांमध्ये श्रेष्ठ, सहाही अंगामध्ये अतिशय निपुण, व दहापुरुषांपर्यंत एकसारिखे ज्यांच्या कुलात वेदाध्ययन चालू आहे असे ब्राह्मण पंक्तिपावन होत. ॥८४॥
त्रिणाचिकेत म्हणून यजुर्वेद भाग व त्याचे व्रत याच्याशी संबंध ठेवणार्या पुरुषासही त्रिणाचिकेत असे म्हणतात. असा त्रिणाचिकेत, अग्निहोत्री, त्रिसुपर्ण नमक ऋग्वेदभाग व त्याचे व्रत यांशी संबंध ठेवणारा, शिक्षादि षडंगे सांगणारा, ब्राह्मविवाहपद्धतीने विवाहित कन्येचा पुत्र, अरण्यामध्ये गाइली जाणारी जी ज्येष्ठ सामे त्यांचे गायन करणारा. ॥८५॥
वेदांची अंगे शिकलेली नसूनही गुरूंनी सांगितल्यामुळे ज्यास वेदार्थ समजत आहे असा, वेदार्थ सांगणारा, ब्रह्मचारी, सहस्त्र गायींचे दान करणारा (अथवा पुष्कळ द्रव्य देणारा) व शंभर वर्षे वाचलेला श्रोत्रिय, हे सर्व पंक्तिपावन ब्राह्मण आहेत असे समजावे. ॥८६॥
श्राद्धकर्म प्राप्त झाले असता पूर्व दिवशी किंवा त्या दिवशी वर सांगितलेल्या लक्षणांनी युक्त असलेल्या निदान तीन ब्राह्मणांस तरी मोठ्या सत्काराने निमंत्रण द्यावे. ॥८७॥
पितृकर्मामध्ये ज्या ब्राह्मणास निमंत्रण दिले असेल त्याने निमंत्रण पोचल्यापासून ज्या दिवशी श्राद्ध असेल ती अहोरात्र संपेपर्यंत मैथुननिवृत्ति, संयम, नियम इत्यादिकांनी युक्त होऊन रहावे. अवश्य कर्तव्य जपादिकावाचून वेदाध्ययन करू नये. श्राद्ध कर्त्यानेही तसेच व्रतस्थ रहावे. ॥८८॥
कारण, ज्यांस निमंत्रण दिले आहे अशा त्या ब्राह्मणांचे ठायी पितर येऊन राहतात. त्याच्या प्राणवायूप्रमाणे ते त्याच्या मागोमाग जातात व ते ब्राह्मण बसले असता पितरही त्यांच्याजवळ बसतात. (यास्तव नियमाने रहावे.) ॥८९॥
हव्यकव्यामध्ये ज्यास यथाशास्त्र निमंत्रण दिले आहे असा ब्राह्मण प्रथम निमंत्रण घेऊन मग जर काही कारणाने भोजन न करील तर त्या पापांमुळे तो जन्मांतरी डुकर होईल. ॥९०॥
श्राद्धाचे निमंत्रण दिल्यावरही जो आपला विवाहित शूद्रस्त्रीशी रममाण होतो त्यास दात्याचे जे दुष्कृत असते ते सर्व प्राप्त होते. ॥९१॥
क्रोधशून्य, अंतर्बहिःशौच युक्त, सतत ब्रह्मचारी, ज्यांनी युद्धाचा त्याग केला आहे असे दया, क्षमा इत्यादि आठ गुणांनी युक्त, अनादिदेवतारूप असे पितर आहेत. यास्तव श्राद्धकर्ता व भोक्ता यांनीही तसेच व्हावे. ॥९२॥
या सर्व पितरांची उत्पत्ति ज्याच्यापासून झाली आहे, ते पितर कोणते आहेत, ब्राह्मणादिकांनी त्यांची कोणत्या नियमांनी परिचर्या करावी इत्यादी सर्व तुम्ही संपुर्णपणे ऐका. ॥९३॥
स्वायंभुव मनूचे जे मरीच्यादिक पुत्र सांगितले आहेत त्या ऋषींचे जे पुत्र तेच पितृगण होत असे म्हटले आहे. ॥९४॥
सोमसद नावाचे जे विराटपुत्र ते साध्यांचे पितर असे सांगितले आहे (साध्य हे समूहाने रहाणारे देव असून ते एकंदर बारा आहेत.) मरीचीचे लोकांमध्ये प्रसिद्ध असलेले अग्निष्वात्त नामक पुत्र देवांचे पितर होत. ॥९५॥
अत्रिपुत्र जे बर्हिषद ते दैत्य, दानव, यक्ष, गंधर्व, उरग, राक्षस, सुवर्ण व किन्नर यांचे पितर आहेत. असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. ॥९६॥
सोमपनामक ब्राह्मणांचे पितर असून क्षत्रियांच्या पितरांचे नाव हर्विभुज असे आहे वैश्याच्या पितरांचे नाव आज्यप व शूद्रांच्या पितरांचे सुकालि आहे. ॥९७॥
सोमप हे भृगूचे पुत्र, हविष्मन्त अंगिरसाचे पुत्र, आज्यप पुलस्त्याचेपुत्र व सुकालि हे वसिष्ठपुत्र होत. ॥९८॥
अग्निदग्ध, अनग्निदग्ध, काव्य, बर्हिषद, अग्निष्वात व सोमसद असे जे दुसरेहि पितर आहेत ते ब्राह्मणांचे आहेत असेच समजावे. ॥९९॥
हे जे मुख्य पितृगण वर सांगितले आहेत त्यांचेही अनन्त पुत्रपौत्रादि या जगामध्ये आहेत असे समजावे. ॥२००॥
मरीच्यादि ऋषींपासून पितर झाले. पितरांपासून देव मानव झाले. व पुढे क्रमानेच देवांपासून सर्व चराचर जग झाले. ॥१॥
या पितरांस उद्देशून रुप्याच्या भांड्यांनी किंवा रुप्याने युक्त असलेल्या तांम्रादि पात्रांनी श्रद्धेने दिलेले पाणिही अक्षयसुखास कारण होते (मग पायसादि उत्तम अन्न दिल्यास काय सांगावे.) ॥२॥
२. द्विजांस देवकार्याहून पितृकार्ये विशेषे करून केली पाहिजेत. कारण देवकर्मे पितृकर्मांच्या पूर्वी होत असून सर्वदा ती पितृकर्माची परिपूरक आहेत. (अर्थात देवकार्य अंग असून पितृकार्य प्रधान होय) असे म्हटले आहे. ॥३॥
यास्तव पितरांची रक्षा करणारा असा जो विश्वेदेव ब्राह्मण त्यास पूर्वी आमंत्रण करावे. कारण रक्षारहित श्राद्धास राक्षस हरण करीत असतात. ॥४॥
यास्तव श्राद्धाचा आरंभ देवापासून करून अंतही देवकर्मानेच करावा. (म्हणजे निमंत्रणादि सर्व कर्म प्रथम देवब्राह्मणास उद्देशून करावे व विसर्जन मात्र पितृब्राह्मणांच्या विसर्जनानंतर करावे.) कारण पितरांपासून श्राद्धास आरंभ करून पितराच्या कर्मानेच अंत करण्याची इच्छा करणारा श्राद्धकर्ता वंशासह तात्काल नाश पावतो. ॥५॥
हाडे, कोळसे, इत्यादिकांनी रहित असलेल्या निर्जन प्रदेशास गोमयाने सारवावे. व तो देश प्रयत्नाने दक्षिणदिशेकडे उतरता होईल असे करावे. (अथवा दक्षिणेकडे उतरता असलेल्या प्रदेशासच सारवावे) ॥६॥
स्वभावतःच पवित्र असलेले जे अरण्यादि प्रदेश त्यामध्ये, नदी इत्यादि जलाशयाचे तीरी व त्याचप्रमाणे निर्जन प्रदेशी दिलेल्या श्राद्धादिकांच्या योगाने पितर सर्वदा संतुष्ट होतात. ॥७॥
त्या प्रदेशी हांतरलेल्या कुशयुक्त निरनिराळ्या आसनावर ज्यांनी स्नान, आचमन इत्यादि उत्तमप्रकारे केले आहे अशा त्या ब्राह्मणास बसवावे. ॥८॥
त्या अनिंद्य ब्राह्मणास आसनावर बसविल्यावर सुंदर गंधपुष्पादिकांनी त्यांची देवपूर्वक पूजा करावी (म्हणजे देवाच्या स्थानी बसविलेल्या ब्राह्मणाची पूजा केल्यावर पितृस्थानी बसविलेल्या ब्राह्मणांची पूजा करावी.) ॥९॥
त्या ब्राह्मणास तिळ व दर्भ यांनी युक्त असे अर्घ्योदक देऊन त्या सर्वांनी मिळून आज्ञा दिली असता कर्त्या ब्राह्मणाने अग्नीमध्ये पुढे सांगितलेला होम करावा. ॥२१०॥
अग्नि, सोम व यम या देवतांस पूर्वी पर्युक्षणादि करून हविर्दानाने अगोदर तृप्त करावे व त्यानंतर यथाशास्त्र अन्नादिकांच्या योगाने पितरांस तृप्त करावे. ॥११॥
अग्नि नसल्यास ब्राह्मणाच्या हातावरच तीन आहुत्या द्याव्या. कारण जो अग्नि तोच ब्राह्मण होय असे वेदवेत्त्या ब्राह्मणांनी म्हटले आहे. ॥१२॥
क्रोधशून्य व ज्यांची मुखे प्रसन्न आहेत अशा या प्रवाहरूपाने अनादि असलेल्या व (७६ व्या श्लोकात सांगितलेल्या न्यायाने) लोकांच्या वृद्ध्यर्थ उद्युक्त झालेल्या या ब्राह्मणास मन्वादि मुनि श्राधांची पात्रे असे म्हणतात. ॥१३॥
अग्नौकरण होमाचा सांग विधि दक्षिणसंस्थ करून त्यानंतर दक्षिण हस्ताने पिंडाच्या आधारभूत अशा भूमीवर उदक शिंपडावे ॥१४॥
त्या अग्निहोमा करिता घेतलेल्या अन्नातून होमानंतर राहिलेल्या अन्नाचे तीन पिंड करून दक्षिणेकडे तोंड करून उदक विधीनेच एकाग्रचित्त होऊन द्यावे. ॥१५॥
सारांश, शुद्धचित्त होऊन आपल्या गृह्यामध्ये सांगितलेल्या विधानाने दर्भावर ते तीन पिंड देऊन त्या दर्भावर मूलप्रदेशी पणजाचा पिता, पितामह व प्रपितामह या तिघा लेपभाग पितरांच्या तृप्यर्थ हात निर्लेप करावा (म्हणजे धुवावा) ॥१६॥
त्यानंतर आचमन करून उत्तरेकडे तोंड करून यथाशक्ति तीन प्राणायाम करून "वसंताय नमः तुभ्यं" इत्यादि मंत्रांनी सहा ऋतूंस व "नमो वः पितर" इत्यादि मंत्रांनी पितरांस दक्षिणाभिमुख होऊन नमस्कार करावे. ॥१७॥
पिंडदानाच्या पूर्वी पिंडाधार भूमीवर उदक शिंपडल्यावर त्यातील जे जल राहिले असेल ते प्रत्येक पिंडाजवळ क्रमाने पुनरपि सोडावे व त्या पिंडास ज्या क्रमाने दिले असेल त्याच क्रमाने एकाग्रचित्ताने हुंगावे. ॥१८॥
पिंडातील अन्नाचा अल्पसा भाग पिंड क्रमानेच घेऊन त्या अन्नभागानेच पिता, पितामह इत्यादिकांच्या स्थानी बैसलेल्या ब्राह्मणांस भोजनापूर्वी भोजन द्यावे. (म्हणजे पित्यास उद्देशून दिलेल्या पिंडातील काही अन्न पित्याच्यास्थानी बसलेल्या ब्राह्मणास खावयास द्यावे व असेच क्रमाने सर्व पितरांस अन्न द्यावे) ॥१९॥
पिता जिवंत असल्यास मरण पावलेल्या-पितामह, प्रपितामह व वृद्ध प्रपितामह अशा तिघांस उद्देशून श्राद्ध करावे. अथवा पित्याच्या ब्राह्मणाच्या स्थानी स्वतः आपल्या पित्यासच भोजन घालावे (आणि पितामह व प्रपितामह यांच्या स्थानी ब्राह्मण बसवावे. पिंड दोनच घालावे.) ॥२०॥
ज्याचा पिता मृत झाला असेल व पितामह जीवंत असेल त्याने पिता व प्रपितामह यास उद्देशून श्राद्ध करावे. (म्हणजे उच्चारसमयी पित्याचे नाव घेतल्यावर प्रपितामहाचा उच्चार करावा) ॥२१॥
किंवा जसे पित्यास भोजन घालावे असे वर २० व्या श्लोकात सांगितले आहे तसेच येथे जीवंत असलेल्या पितामहास ब्राह्मणाच्या जागी भोजन घालावे. आणि पिता व प्रपितामह यांस पिंड द्यावे किंवा जीवंत असलेल्या पितामहाने तुला वाटेल ते कर असे सांगितले असता कर्त्याने आपल्या रूचीप्रमाणे पिता व प्रपितामह यांस उद्देशून दोन श्राद्धे करावी. अथवा पिता, प्रपितामह व वृद्धप्रपितामह यांस उद्देशून तीन श्राद्धे करावी. किंवा वर सांगितल्याप्रमाणे स्वतः पितामहासच श्राद्धामध्ये भोजन घालावे. ॥२२॥
(पिंडातील अन्न ब्राह्मणास द्यावे असे जे वर सांगितले आहे त्याचा काल व विधान आता सांगतात.) ब्राह्मणांच्या हातांवर दर्भयुक्त तिलोदक देऊन पूर्वोक्त पिंडान्न 'पित्रेस्वधा' 'पितामहाय स्वधा' 'प्रपितामहायस्वधा' असे म्हणून ब्राह्मणास क्रमाने द्यावे. ॥२३॥
अन्नाने भरलेली स्थाली स्वतः आपल्या दोन्ही हातांनी उचलून पितरांचे चिंतन करीत स्वयंपाक गृहातून सावकास आणून ब्राह्मणांच्या जवळ वाढण्याकरिता ठेवावी. ॥२४॥
दोन्ही हातांनी न धरिलेले जे अन्न ब्राह्मणाजवळ आणून ठेविले जाते त्याचे दुष्टबुद्धि असुर एकाएकी हरण करितात. (यास्तव, एका हाताने आणून अन्न वाढू नये.) ॥२५॥
चटण्या कोशिंबिरी इत्यादि व्यंजने, कढी, भाज्या इत्यादि तोंडी लावणी,दूध, दही, तूप, मध इत्यादि पदार्थ अस्ताव्यस्त न होतील अशा रीतीने शुचि व समाहित होऊन भूमीवरच पात्रस्थानी ठेवावे. ॥२६॥
कठिण व स्वच्छ असे खाद्य पदार्थ पायसादि पेय पदार्थ, नानाप्रकारची फळे व मुळे, मनोरम मांसे व सुवासिक पिण्याचे पदार्थ भूमीवरच ठेवावे. (पाटावर किंवा दुसर्या कशावर न ठेविता पात्रात घालून भूमीवर ठेवावे असा याचा स्पष्ट अर्थ आहे.) ॥२७॥
हे सर्व अन्नादिक ब्राह्मणाजवळ आणून शुद्ध व अनन्य चित्त होऊन हळु हळु व क्रमाने वाढावे. व हे मधुर आहे; हे आंबट आहे अशा रीतीने त्याचे गुण सांगावे. ॥२८॥
श्राद्धसमयी केव्हाही रडू नये; रागावू नये; व असत्य भाषण करू नये. अन्नास पाय लावू नये. व तसेच अन्न पुनः पुनः हालवून किंवा झेलून पात्रात घालू नये. ॥२९॥
कारण अश्रु गाळल्यास ते अश्रु श्राद्धान्न प्रेतास पोचवितात, कोप श्राद्धान्न शत्रूकडे पोचवितो, असत्य भाषण अन्न कुत्र्यास पोचविते, पादस्पर्श केलेले अन राक्षसास मिळते व हालविलेले किंवा झेललेले अन्न पापकर्त्यास मिळते. ॥२३०॥
ब्राह्मणास जे जे आवडेल ते ते त्यास मत्सर न करता द्यावे व परमात्म्याचे निरूपण करणार्या कथा सांगाव्या कारण पितर त्यांची अपेक्षा करीत असतात. ॥३१॥
श्राद्धप्रसंगी ब्राह्मणांकडून वेद, मनुस्मृती, याज्ञवल्यक्यस्मृति इत्यादि धर्मशास्त्रे, गरुडसंबंधी, वाल्मीकीसंबंधी आख्याने, महाभारतादि इतिहास, ब्राह्मादि पुराणे, श्रीसूक्त, शिवसंकल्प इत्यादि खिले ऐकवावी. ॥३२॥
स्वतः प्रसन्नचित्त होऊन प्रिय वचनादिकांनी ब्राह्मणास संतुष्ट करावे. त्वरा न करिता त्यांच्याकडून सावकाश भोजन करवावे " ही क्षीर फार उत्तम झाली आहे, हा मोदक फारच मनोहर आहे" इत्यादि बोलून त्यास पदार्थ घेण्याविषयी आग्रह करावा. ॥३३॥
कन्येचा पुत्र व्रतस्थ म्हणजे ब्रह्मचारी जरी असला तरी त्यास श्राद्धामध्ये प्रयत्नपूर्वक भोजन घालावे. नेपाळ कंबळ त्यास बसावयास द्यावे व जेथे श्राद्ध करावायचे असेल त्या भूमीवर तिळ टाकावे. ॥३४॥
कारण, श्राद्धामध्ये कन्यापुत्र, नेपाळ कंबळ व तिळ हे तीन पदार्थ पवित्र आहेत. आणि शौच, अक्रोध व अत्वरा (घाई न करणे) ह्या तिन्हीचीच त्यात प्रशंसा करितात. ॥३५॥
सर्व अन्न अति उष्ण असावे. व ब्राह्मणांनी वाणीचे नियमन करून ते खावे. दात्याने विचारिले तरी ब्राह्मणांनी पदार्थांचे गूण सांगू नयेत. (फळे, मूळे पाणी ही ऊन असणे शक्य नाही; यास्तव त्यावाचून बाकीचे शिजविलेले पदार्थ ऊन असावे असे याचे तात्पर्य समजावे) ॥३६॥
जोपर्यंत अन्न उष्ण असते; जोपर्यंत ब्राह्मण वाणीचे नियमन करून भोजन करीत असतास व जोपर्यंत अन्नाचे गुणदोष ब्राह्मण सांगत नाहीत तोपर्यंत पितर भोजन करितात. ॥३७॥
मस्तकास वस्त्रादि बांधून भोजन केल्यास, दक्षिणेकडे तोंड करून भोजन केल्यास व पायात पादुका घालून भोजन केल्यास ते भोजन राक्षसांस प्राप्त होते (त्याच्या योगाने पितर तृप्त होत नाहीत.) ॥३८॥
भोजन करणार्या ब्राह्मणांस चांडाल, वराह, कोंबडे, कुत्रे, रजस्वला व षंढ यांनी पाहू नये. ॥३९॥
कारण अग्निहोत्रादि होमामध्ये, गाय, सुवर्ण इत्यादि दानामध्ये, आपल्या अभ्युदयार्थ केलेल्या ब्राह्मणभोजनामध्ये, दर्शपौर्णमासादि देवसंबंधी हवीमध्ये व श्राद्धादिकामध्ये जे केले जाणारे कर्म हे पाहतात ते सर्व व्यर्थ होते. ॥२४०॥
सूकर अन्नादिकांचा वास घेऊन त्यास व्यर्थ करितो. कोंबडे आपल्या पंख्याच्या वायूने ते कर्म निष्फळ करिते. कुत्रे आपल्या दृष्टिपाताने त्यास निरर्थक करिते व शूद्र आपल्या स्पर्शाने त्यास निष्फळ करितो. ॥४१॥
दात्याच्या दासादिकापैकीही जरी कोणी पांगळा, काणा किंवा कमी अधिक अवयवाने युक्त असला तरी त्यास अशा प्रसंगी एकीकडे जाण्यास सांगावे. ॥४२॥
अतिथिरूप किंवा असाच दूसरा एखादा भिक्षुक ब्राह्मण जर भोजनाकरिता त्यावेळी आला तर श्राद्धाच्या पात्री बसलेल्या ब्राह्मणांच्या आज्ञेने त्यास यथाशक्ति भोजन व भिक्षा देऊन त्याचा सत्कार करावा. ॥४३॥
सर्व प्रकारचे अन्नादि एकेठिकाणी कालवून व ते जलाने भिजवून ज्याचे भोजन झाले आहे अशा ब्राह्मणांच्या पुढे भूमीवर दर्भ ठेवून त्यावर सोडावे. ॥४४॥
संस्कारास योग्य नसलेले नसे बालकादिक मरण पावलेले असतात व निरपराधी कुलस्त्रियांचा जे त्याग करितात त्यांचा-पात्रातील ब्राह्मणांचे उच्छिष्ट व हे दर्भावर दिलेले विकरान्न - हाच भाग होय. ॥४५॥
भूमीवर पडलेले जे ब्राह्मणांचे उच्छिष्ट अन्न ते आळसी नसलेल्या व निष्कपट अशा दासवर्गाचे श्राद्धकर्मातील भागधेय होय. (असे मन्वादि मुनि सांगतात) ॥४६॥
मेलेल्या द्विजाचे सपिंडीकरण श्राद्धापर्यंत जे कर्म करावयाचे असते ते विश्वेदेवाच्या ब्राह्मणभोजनावाचून करावे. म्हणजे देवस्थानी ब्राह्मण न बसविता केवळ पितृस्थानी ब्राह्मण बसवून त्यास भोजन घालावे व एक पिंड द्यावा. ॥४७॥
पण त्याची सपिंडीक्रिया यथाविधि झाली असता त्यानंतर त्याच्या पुत्रांनी वर सांगितलेल्या अमावास्या श्राद्ध पद्धतीने (पार्वणविधीने) श्राद्ध करावे. ॥४८॥
श्राद्धामध्ये भोजन करून राहिलेले उच्छिष्ट जो शूद्रास देतो तो मूर्ख, ज्याचे डोके खाली व पाय वर आहेत असा होत्साता कालसूत्र नामक नरकात पडतो. ॥४९॥
श्राद्धामध्ये भोजन करून जो त्या अहोरात्रीमध्ये स्त्री संयोग करितो त्याचे पितर एक महिनाभर तिच्या विष्ठेमध्ये राहतात. ॥२५०॥
ब्राह्मण तृप्त झाले आहेत असे समजून घेऊन "येथेच्छ भोजन झालेना" असा त्यास प्रश्न करावा व नंतर त्यांच्याकडून आपोशन घेववावे. मुखप्रक्षालनादि झाल्यावर ज्यांनी आचमन केले आहे अशा त्यास "अहो महाराज, येथे किंवा आपल्या घरी आता आपण स्वस्थ बसावे." असे सांगावे. ॥५१॥
कर्त्याने अशी अनुज्ञा दिली असता ब्राह्मणांनी "स्वधास्तु" असा आशीर्वाद द्यावा. कारण, सर्व पितृकर्मामध्ये स्वधाकार हा सर्वोत्कृष्ट आशीर्वाद आहे. ॥५२॥
त्यानंतर ज्यांनी भोजन केले आहे अशा त्या ब्राह्मणास "काही अन्न राहिले आहे" असे म्हणुन ते त्यास निवेदन करावे व ते त्याचा जसा विनियोग करावयास सांगतील तसा करावा. ॥५३॥
ज्यामध्ये माता, पिता, देवता इत्यादिकांची अपेक्षा नसते अशा एकोद्दिष्ट श्राद्धामध्ये "स्वदितं" म्हणजे "यथेच्छ भोजन झालेना?" असा तृप्ति प्रश्न करावा. गोठ्यामध्ये जे होणरे गोष्ठिश्राद्ध "त्यात सुश्रुत" म्हणजे "चांगले ऐकलेत ना" असा तृप्तिप्रश्न करावा. वृद्धिश्राद्धामध्ये "संपन्न" म्हणजे "झाले" असा प्रश्न करावा व देवतांच्या उद्देशाने केलेल्या श्राद्धामध्ये "रुचितम" "रुचले का" असे विचारावे ॥५४॥
अपराह्णकाल, दर्भ, गोमयादिकांनी भूमीची शुद्धि करणे, तिल, कार्पण्य सोडून उदारपणे अन्नादि वाढणे, अन्नादिकांचा विशेष संस्कार, व पंक्तिपावन ब्राह्मण, ही श्राद्धकर्मातील संपत्ति होय. ॥५५॥
दर्भ, मंत्र, पूर्वाह्णकाल, हविष्यान्ने व वरच्या श्लोकात सांगितलेले पवित्र भूमिशुद्धि इत्यादि देवकर्मातील संपत्ति आहे. ॥५६॥
वानप्रस्थ मुनींची देवभात, सांबे इत्यादि अन्ने, दूध, सोमरस, विकार न पावलेले अर्थात दुर्गंधादिरहित मांस व अकृत्रिम लवण (सैंधवमीठ) यांस मन्वादिकांनी स्वभावतः हर्विर्द्रव्ये असे म्हटले आहे. ॥५७॥
त्या ब्राह्मणांस जाण्याविषयी अनुज्ञा देऊन मौनी, अनन्य चित्त व पवित्र होऊन दक्षिणदिशेकडे पाहणार्या पुरुषाने हे इष्ट मनोरथ पितरांजवळ मागावे. ॥५८॥
आमच्या कुलात दात्या पुरुषांची वृद्धि होवो. अध्यायन, अध्यापन, वेदार्थ ज्ञान, यागादि अनुष्ठान इत्यादिकांच्या द्वारा वेदांचीही वृद्धि होवो. पुत्रपौत्रादि संतति वाढो. वेदार्थविशयांची श्रद्धाही आमच्या कुलातून नष्ट न होवो. व देण्यासारिखे धनादिक आम्हांस पुष्कळ प्राप्त होवो. ॥५९॥
याप्रमाणे पिंड प्रदान करून प्रस्तुत वर मागितल्यावर ते पिंड गाय, ब्राह्मण किंवा मेष यास खाऊ घालावे. किंवा अग्नीमध्ये अथवा जलामध्ये फेकावे. ॥६०॥
काही आचार्य पिंडप्रदान ब्राह्मण भोजनानंतर करवितात. दुसरे कित्येक पक्ष्यांकडून पिंड खाववितात अथवा अग्नि व जल यामध्ये टाकतात. ॥६१॥
मन, वाणी व शरीर यांच्यायोगाने होणार्या कर्मांनी तिन्ही पुरुषार्थामध्ये मला पतीचीच सेवा कर्तव्य आहे असे जिचे व्रत आहे तिला पतिव्रता म्हणतात. अशा ज्या प्रथम विवाहित सवर्ण धर्मपत्नीस व पितृपूजनांमध्ये तत्पर असलेल्या पतिव्रतेस पुत्राची इच्छा असेल तिने त्या पिंडातील मधला पिंड खावा. ॥६२॥
असे केल्याने तिला दीर्घायुशी, कीर्तिमान, धारणाशक्तिसंपन्न, धनवान, पुत्रवान, सात्विक व धार्मिक पुत्र होतो. ॥६३॥
त्यानंतर हात धुवून आपल्या ज्ञातीच्या लोकांस भोजन घालावे. त्यास सत्कारपूर्वक अन्न देऊन मातृपक्षीय लोकांसही पूजनासह भोजन घालावे. ॥६४॥
ब्राह्मणाचे विसर्जन करीपर्यंत त्यांची उष्टी काढू नये. नंतर श्राद्धकर्म संपन्न झाले असता वैश्वदेव बलिहरण, नित्य श्राद्ध, अतिथि भोजन इत्यादि करावे. ॥६५॥
कोणकोणता हवि पितरांस यथाविधि दिला असता अक्षय तृप्ति देतो तो ते मी आता संपूर्णपणे सांगतो. ॥६६॥
तिळ, व्रीहि, यव, माष, (उडिद), जल, मूळे, व फळे यातील कोणताही पदार्थ यथाशास्त्र दिला असता मनुष्यांच्या महिनाभर पितर तृप्त होतात. ॥६७॥
मत्स्यांच्या मासाने दोन महिने पितर तृप्त होतात. हरिणांच्या मांसाने तीन महिने, मेंढ्याच्या मांसाने पाच महिने. ॥६८॥
बकर्याच्या मांसाने सहा महिने, चित्रमृगाच्या मांसाने सात महिने, एणसंज्ञक मृगाच्या मांसाने आठ महिने, रुरुनामक हरिणाच्या मासाने नऊ महिने ॥६९॥
रानडुक्कर व रानरेडा यांच्या मांसाने दहा महिने व ससा व कासव यांच्या मांसाने अकरा महिने पितर तृप्त होतात. ॥२७०॥
गायीच्या दुधाने व त्याच्या क्षिरीने ते एक वर्षपर्यंत तृप्त होऊन रहातात. वार्धीणसाच्या मांसाने पितरांची बारा वर्षे तृप्ति होते. (ज्या शुभ्रवर्ण वृद्ध बोकडाचे दोन कान व जिव्हा ही नद्यादि जलाशयात तो पाणी पिऊ लागला असता पाण्यास लागतात व ज्याचे इंद्रिय निर्बल झालेले असते त्यास वार्धीणस म्हणतात.) ॥७१॥
काळा चाखवत, महाशल्कनामक एकप्रकारचा मत्स्य, गेंडा, व रक्तवर बकरा यांचे मांस, मध व मुनींची देवभातादि सर्व अन्ने यांच्या योगाने पितरांची अक्षय तृप्ति होत असते. ॥७२॥
श्राद्धकर्ता वर्षासमयी मघा त्रयोदशीस जे काही मधयुक्त देतो तेही अक्षय फलदायी होते. ॥७३॥
वर्षर्तूतील मघायुक्त त्रयोदशीस व हस्तीची छाया पूर्व दिशेस गेली असता दुसर्याही तिथीस जो आम्हांस घृत व मध यांनी युक्त असलेले पायस (खीर) देईल असा एकादा पुत्र आमच्या कुलात होईल काय? अशी पितर आशा करीत असतात. ॥७४॥
जे शास्त्राने निषिद्ध मानलेले अन्न यथाविधि श्रद्धेने पितरांस दिले जाते ते अक्षय व परलोकी दीर्घकाल पितरांची तृप्ति करणारे होते. ॥७५॥
कृष्ण पक्षातील चतुर्दशीस सोडून बाकीच्या दशमीपासून ज्या तिथि आहेत त्या जशा श्राद्धामध्ये श्रेष्ठ आहेत तशा इतर म्हणजे प्रतिपदादि नाहीत. ॥७६॥
द्वितीया, चतुर्थी इत्यादी युग्म तिथीस व भरणी, रोहिणी, इत्यादि युग्म (सम) नक्षत्र असेल तेव्हा श्राद्ध करणारा सर्व मनोरथांस प्राप्त होतो. व प्रतिपदा, तृतीया इत्यादि अयुग्म (विषम) तिथींस व अश्विनी, भरणी, इत्यादि अयुग्म नक्षत्र असेल तेव्हा जो श्राद्धाच्या योगाने पितरांस तृप्त करितो त्यास धन, विद्या इत्यादिकांनी संपन्न अशी संतति प्राप्त होतो. ॥७७॥
जसा मांसाचा अपर म्हणजे कृष्णपक्ष शुक्लपक्षाहून श्राद्धामध्ये अधिक फल देणारा असतो तसाच पूर्वार्धाहून दिवसाचा उत्तरार्ध श्राद्धाचे अधिक फल देतो. ॥७८॥
यज्ञोपवीत दक्षिणस्कंधावर व डाव्या हाताखालून घेऊन आळस सोडून हातात दर्भ घेऊन, पितृतीथाने सर्व पितृसंबंधी कर्म समाप्तीपर्यंत यथाशास्त्र करावे. ॥७९॥
रात्री श्राद्ध करू नये. कारण रात्र राक्षसी आहे असे मन्वादिकांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे दोन्ही संध्यासमयी व सहा घटिका दिवस येईपर्यंत श्राद्ध करू नयेत. ॥८०॥
प्रतिमासी श्राद्ध न करिता आल्यास या विधीने वर्षातून तीन वेळ म्हणजे हेमंत, ग्रीष्म व वर्षा या तीन ऋतूंत श्राद्ध करावे. (अर्थात, कुंभ, वृष व कन्या या राशीमध्ये सुर्य असताना ते करणे उचित होय) व पंचमहायज्ञान्तर्गत श्राद्ध तर रोज करणे अवश्य आहे. ॥८१॥
अग्नि, सोमं व यम यांस उद्देशून पूर्वी सांगितलेला होम श्रौतस्मार्तातिरिक्त लौकिक अग्नीमध्ये करण्याविषयी शास्त्राने कोठेही सांगितलेले नाही. (पण जो निरग्नि असेल त्याने लौकिक अग्नि व ब्राह्मणांचा हात यावर होम करावा.) जो आहिताग्नि ब्राह्मण असेल त्याने अमावास्येवाचून दुसर्या कोणत्याही तिथीस श्राद्ध करण्याविषयी कोठे विधान नाही. (मृत तिथीस श्राद्ध करणे अवश्य असल्यामुळे ते मात्र त्याने कृष्णपक्षातही योग्य तिथीस करावे.) ॥८२॥
(पंचयज्ञान्तर्गत श्राद्ध होणे शक्य नसल्यास काय करणे इष्ट आहे ते सांगतातः-) स्नानानंतर द्विज जे उदकतर्पण करितो त्यानेच त्यास नित्यश्राद्धाचे फल प्राप्त होते. ॥८३॥
मन्वादि ज्ञानी पितरांस वसु म्हणतात, पितामहास रुद्र म्हणतात व प्रपितामहास आदित्य म्हणतात व अशा प्रकारची सनातन श्रुतिही आहे (यास्तव. श्राद्धांत पिता, पितामह व प्रपितामह यांचे क्रमाने वसु, रुद्र व आदित्य या रूपाने ध्यान करावे.) ॥८४॥
सदा विघससंज्ञक अन्नाचे भोजन करावे अथवा नित्य अमृतनामक अन्नाचे भोजन करावे. ब्राह्मणादिकांच्या भोजनानंतर राहिलेले जे अन्न ते विघस व दर्शपौर्णिमासादि यज्ञातून राहिलेले जे अन्न ते अमृत होय. ॥८५॥
हे पंचयज्ञसंबंधी सर्व विधान मी तुम्हांस सांगितले. आता द्विजांतील मुख्य जे ब्राह्मण त्यांच्या ऋतादि वृत्तींचे अनुष्ठान ऐका. ॥२८६॥
ह्याप्रमाणे मानव धर्मशास्त्राच्या भृगुप्रोक्ताच्या संहितेच्या तिसर्या अध्यायाचा श्रीशंकराचार्यभक्त विष्णुकृत प्राकृत अनुवाद समाप्त झाला. ॥३॥ श्रीकृष्णार्पणमस्तुः