चंद्रहासाख्यान - चंद्रहासाख्यान

कीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.


श्रीगणेशाय नमः ॥

साकी-

वंदुनि गणपतिचरणा नमिलें सद्‌गुरु कृष्णपदासी ॥

श्रोत्यांतें कर जोडून कथितों प्रेमळ सच्चरितासी ॥१॥

कुरुवंशोत्तम भूप युधिष्ठिर तेणें हयमेधातें ॥

आरंभुनियां अश्व सोडिला पृथ्वी जिंकायातें ॥

श्रोते परिसावी, भक्तलीला ही बरवी ॥ध्रु०॥

दिंडी-

तयाचीया रक्षणा वीर पार्थ ॥ निघे सेना घेऊन असंख्यात ॥

श्यामकर्ण भ्रमत तो मही आला ॥ कुंतलाख्यापुरिनिकट नष्ट झाला ॥३॥

चंद्रहास तेथिंचा भूपराणा ॥ तया कुमरीं क्रीडतां तया जाणा ॥

धरुन नेला वाजतां त्रुटि न पाहीं ॥ पार्थसैनिक शोधिती दिशा दाही ॥४॥

ओंवी-

तंव नारद पातला अकस्मात ॥ त पार्थासि कथी वृत्तांत ॥

चंद्रहास नृप येथें वसत ॥ परिसे मूळ कथा तयाची ॥५॥

साकी-

प्रसोम नामें नृपवर होता केरलदेशाधिपती ॥

समरिम त्यातें वधितां रिपुनीं गेल्या सति त्या युवती ॥६॥

चंद्रहास या नामें तयासीं बालक दो महिन्याचें ॥

असतां रक्षण करितें कोणी उरलें नाहिं तयाचें ॥७॥

अनाथ उघडें दीन होउनी पडलें रुदन करी तें ॥

उपमाता मग घेउन त्यातें कुंतलपुरास ये ते ॥८॥

भिक्षा मागुन असतां येथें पावली माता मरण ॥

नगरामाजीं बालक हिंडे उघडें क्षुधितही दीनं ॥९॥

सुंदर बालक देखुनि जन त्या उचलुनि कडिये घेती ॥

लालनपालन करिती अवघे अन्नवस्त्र त्या देती ॥१०॥

दिंडी-

बिदीमाजीं क्रीडतां जाण त्याला ॥ शालिग्राम नरसिंह सांपडला ॥

त्यासि भावें अर्चुनि नित्याकाळीं ॥ मुखामाजीं आदरें प्रतीपाळी ॥११॥

ओंवी-

कुंतलेश्वर नृप तेथींचा ॥ दुष्टबुद्धि प्रधान तयाचा ॥

तेणें समुदाय द्विजांचा ॥ मेळविला भोजनासी ॥१२॥

बिदींत चंद्रहास खेळतां ॥ प्रधानें देखिला आवचितां ॥

दयायुक्त कडिये घेऊनि तत्वतां ॥ भोजना आणिला तात्काळीं ॥१३॥

येऊनि बैसला पात्रीं ॥ मुखींची काढून नृसिंहमूर्ती ॥

त्यातें नैवेद्य समर्पितां प्रीतीं ॥ आश्चर्य करिती लोक सर्व ॥१४॥

साकी-

भोजन पायके बछरा उठकर प्रधान अंकीं बैठा ॥

विप्रके मनमो वैसा आया की ये उनका बेटा ॥१५॥

छंद-

विप्र वोपिती मंत्र अक्षता ॥ करिल राज्य हें पुत्र तत्वतां ॥

वाक्य ऐकतां मंत्रि यापरी ॥ क्षोभुनि द्विजां घालि बाहेरी ॥१६॥

श्‍लोक-

नव्हे अन्यथा वाक्य तें ब्राह्मणांचें ॥

म्हणूनीं मनी वाढलें वैर साचें ॥

तदा आणुनी अंत्यजां प्राणघाती ॥

तयांसी म्हणे मारिजे बाळ युक्ति ॥१७॥

पदीं अंगुली बाळकाच्या सहावी ॥

खुणा आणुनी ते मला दाखवावी ॥

असें ऐकतांची निघे दुष्ट मेळा ॥

तिहीं लेंकरा काननामाजिं नेला ॥१८॥

छंद-

शस्त्र काढितां बाळ घाबरे ॥ देखुनी म्हणे ना दिसे बरें ॥

कंप सूटला पाहि चहूंकडे ॥ कंठ दाटुनी फार तो रडे ॥१९॥

ओंवी-

भवता विलोकुनी पाहे आस ॥ कोणी सोडवील ऐशा समयास ॥

मग केलें मनीं निश्चयास ॥ त्राता न आतां नृहरीविणें ॥२०॥

दिंडी-

दुर्जनांनीं वेष्टितां तया बाळा ॥ मुखांतिल काढुनि करी पूजी शीळा ॥

घाबरोनी झांकीति भयें दृष्टी ॥ नृसिंहातें सप्रेम घालि मीठी ॥२१॥

पद-

बा धांव सख्या नरहरी रे ॥ पाहतोसि अंतकाई रे ॥बा०॥ध्रु०॥

जननीये जठरीं त्वांची मजलागी पोषियेलें ॥

बाळपणापासुनियां त्वां सर्वस्वें रक्षियेलें ॥

सांप्रत या दुःखप्रवाहीं दीनाप्रति लोटीयेलें ॥

चाल-

निष्ठुरता धरुनी आजी ॥ उबगतोसि कां देवाजी ॥

टाकुनियां चिंतेमाजीं ॥ गुंतलासि कवणें ठायीं ॥बा धांव० ॥१॥

देईनाचि सागर पोटीं जरि थारा सरितेलागीं ॥

बाळातें माय उपेक्षा करुनियां काननिं त्यागी ॥

अंडजास पक्षिण विसरे सोडुनियां भलते जागीं ॥

चाल-

हे गोष्टी भासत तैशीं ॥ तरि याते करुं गत कैशी ॥

किंवा करुणा परिसुन ऐशी ॥ ये दास जनाची आई ॥बा धाव० ॥२२॥

साकी-

पंचाननरुप प्रगटुनि नरहरि रक्षितसे त्या बाळा ॥

ऐसें पाहुन सर्वही भ्याले कंप सुटे चांडाळा ॥२३॥

छेदुन सहावी अंगुलीं मग दाविति येऊन खूण ॥

म्हणति बाळक वधिला ऐकून तोषे दुष्ट प्रधान ॥२४॥

इकडे बाळक हिंडत रानीं दुःखें करि रुदनाला ॥

कुलिंद राजा मृगये आला होता त्याच वनाला ॥२५॥

मृगरुप धरुनि हरिनें त्यातें आणिलें बाळापाशीं ॥

रोदन शब्दा परिसुन ममता आली जाण नृपासी ॥२६॥

देखुनि सुंदर बालक राजा उचलुनि कडिये घे तें ॥

उदकें त्याचे लोचन पुशि तों निर्जरवाणी वदते ॥२७॥

राया तुजला पुत्र दिला हा घेऊन जाय घरासी ॥

ऐसें ऐकुन राव तोषला आणी निज नगरासी ॥२८॥

दिंडी-

पट्टराणी रायाची मेधावती ॥ स्तनपान देतसे तयाप्रती ॥

परमसौख्यें लोटतां सप्तवर्षें ॥ व्रतबंधा करितसे राव हर्षें ॥२९॥

वेदशास्त्रीं लागतां न श्रम त्याला ॥ धनुर्वेदीं शस्त्रास्त्रनिपुण झाला ॥

षोडशाब्दें होतांचि मही सर्व ॥ जिंकुनियां झाडिले वींरगर्व ॥३०॥

ओंवी-

रायें जाणून पराक्रम थोर ॥ दिधला त्यातें राज्यकारभार ॥

म्हणे आपुला स्वामी कुंतलेश्वर ॥ करभार दीजे त्यासी ॥३१॥

येरु म्हणे ऐक ताता ॥ बांधून आणितों त्यासीच आतां ॥

पिता म्हणे बा रे सर्वथा ॥ स्वामीद्रोह न करावा ॥३२॥

छंद-

सेवकाकरीं द्रव्य सत्वरा ॥ पाठवीतसे कुंतलेश्वरा ॥

दुष्टबुद्धि त्या ठेवुनी धना ॥ सेवकां चला म्हणत भोजना ॥३३॥

येरु बोलती आजि हरि-दिनी ॥ अन्न भक्षितां पाप हें जनीं ॥

शासना आम्हां करील भूपती ॥ ऐकतां असें क्षुब्ध दुर्मती ॥३४॥

श्लोक-

बांधूनि ते सेवक घालि बंदीं ॥

येऊनि राया मग दुष्ट वंदी ॥

बोले कुलिंदात्मज माजला हो ॥

दंडूनि येतों तरि त्याजला हो ॥३५॥

नृपवर मग बोले मालती कन्यका ही ।

उपवर बहु झाली अवधी ते न कांहीं ॥

तरि सुगुणि वरातें पाहुनि त्वां निजांगें ॥

त्वरित परत यावें घेउनी त्यास संगें ॥३६॥

मग नमुनि नृपातें पातला तो गृहासीं ॥

तंव वदत तयाची नंदिनी ते तयासी ॥

परिस वचन ताता योग्य मी सैंवरातें ॥

तरि मजसि पहा जी श्रेष्ठ ऐशा वरातें ॥३७॥

पाहे तो खळ कन्यकेसि वरुषें झालींच सोळा तदा ॥

द्यावी योजुन शंकरासि परि तो नांदे स्मशानीं सदां ॥

विष्णू तो परादारि नाटकि बहू कुल्लाल धाता असे ॥

शक्राचे तनुसी भगें नव ग्रही कोणी बरा ना दिसे ॥३८॥

ओंवी-

असो तो प्रधान सैन्य घेउनी ॥ चंदनावतीस आला धांवुनी ॥

कुलिंदें त्यातें सन्मानुनी ॥ निजपुत्रातें भेटविलें ॥३९॥

साकी-

चिन्ह देखतां सहज पदीचें प्रधान दचके हृदयीं ॥

अंत्यजिं यातें जीत सोडिलें आतां करुं तरि कायी ॥४०॥

आर्या-

दाखवितां न क्रोधा युक्तीनेंचि स्वकार्य-भागा या ॥

साधीन मग न लागे स्वांगें युद्धांत लेश भागाया ॥४१॥

साकी-

मधुरोक्ती मग रिपुशीं बोले जावें कुंतलपूरा ॥

नृपतीलागीं भेटुन यावें पत्र मी देतों कुमरा ॥४२॥

ओंवी-

सहस्त्रायु चिरंजीव मदना ॥ माझी तुजला हेचि आज्ञा ॥

चंद्रहासा पाठविलें सदना ॥ विष ययासी देइजे ॥४३॥

दिंडी-

चंद्रहास वंदुनी कुलिंदातें ॥ हयारुढ होउनी जात पंथें ॥

त्वरें आला कुंतलपुरापाशीं ॥ स्थिरावला आरामी विसांव्यासी ॥४४॥

आर्या-

सारुन संध्या स्नानहि केलें भोजन पूजन नरहरिला ॥

निद्रा करुनि घडिभरि पंथींचा श्रम समस्त तो हरिला ॥४५॥

तेथें आली होती मंत्रिसुता तैंच वनविहारातें ॥

पाहे नृपात्मजा ती खुडितां कुसुमांसि सुतनुहारातें ॥४६॥

ये एकटि त्या निकटीं अन्य स्थळीं धाडुनी सख्या सुमना ॥

शफरिध्वजसमरुपा पावुनि आल्हाद पावली सुमना ॥४७॥

छंद-

रुप देखतां रम्य तें अती ॥ होऊं प्राप्त हा म्हणतसे पती ॥

सुप्त देखुनी निकट पातली ॥ वस्त्रग्रंथिका नयनिं देखिली ॥४८॥

साकी-

सोडुनि ग्रंथी पत्र पाहतां देखे निजजनकाचें ॥

वाचुनि विप्रिय म्हणे तांतडी चुकलें अक्षर साचें ॥४९॥

नेत्रीचें मग काढुनि काजळ अक्षर तेथें लिहिते ॥

विषया दीजे ऐसें करुनी बांधि पुन्हां ग्रंथीतें ॥५०॥

ऐसें साधन करुनि गेली जागृत नृपसुत झाला ॥

होउनि अश्वारुढ सत्वरीं सचिवसदनिं तो आला ॥५१॥

भेटुन मदना पत्र दीधलें वाचुनियां तो पाहे ॥

जननीलागीं कळवुनि करितो साहित्या लवलाहें ॥५२॥

ओंवी-

ब्राह्मण पाचारिले बहुत ॥ वर्‍हाडीं मिळाले असंख्यात ॥

मदनस्त्रिया करवल्या होत ॥ चंद्रहास नृपाच्या ॥५३॥

यथासांग जाहलें लग्न ॥ विप्रां दिधलें अपार धन ॥

इकडे प्रधानें नगर लुटून ॥ कुलिंद बंदीं घातला ॥५४॥

आर्या-

येतां गृहासि पंथीं भेटुनि कथि वृत्त भोगि निज वदनें ॥

मी तो त्वद्धनरक्षक जातों हरिलेंचि सर्व या मदनें ॥५५॥

दिंडी-

पुढें येतां विप्र ते भेटताती ॥ धन्य तुमचा पुत्र हो बोलताती ॥

चंद्रहासा विषयेसि अर्पियेलें ॥ ऐकतां हें क्षोभला तये वेळे ॥५६॥

श्लोक-

ताडूनि ते द्विज बळें धन घे हिरुनी ॥

धांवूनि ये अहि तसा सदना निघूनी ॥

क्रोधें तदा निजसुता प्रति शब्द लावी ॥

आणूनि येरु मम पत्र पित्यास दावी ॥५७॥

आर्या-

निजपत्र देखतांची राहुन उगला म्हणे कशी भूल ॥

पडली मग नेत्रांसी कीं प्राक्तन जाहलेंचि प्रतिकूळ ॥५८॥

श्‍लोक-

पुत्रातें मग शब्द लावूनि म्हणे त्वां हें न केलें बरें ॥

रायातें तरि जाउनी कळविजे आतां अती सत्वरें ॥

सांगे तो मग वृत्त भूमिपतितें क्षोभे प्रभू ऐकतां ॥

वर्जूनी मम कन्यकेसि सचिवें केलें स्वकीया हिता ॥५९॥

साकी-

सेवक म्हणती त्याच वरासी चंपकमालति द्यावी ॥

मदनासंगें गज रथ शिबिका देउन वर तो अणवी ॥६०॥

इकडे तेव्हां दुष्टबुद्धिनें केली पातककरणी ॥

प्राणघातकी अंत्यज आणुनि सांगे त्यांचे कर्णीं ॥६१॥

नगराबाहिर जगदंबेच्या आलयिं प्रथमचि जाणा ॥

घेउनि पूजा येइल त्याच्या हरणें सत्वर प्राणा ॥६२॥

कलिंदपुत्रा मग तो दुर्जन पाठवि शक्तिपुजेसी ॥

पथिं येतां त्या मदन भेटुनि सांगे प्रभुवचनासी ॥६३॥

ओंवी-

मदन म्हणे मी जाईन ॥ येतों सत्वर अंबिका पुजून ॥

पापकर्माची गती गहन ॥ ब्रह्मादिकां नेणवे ॥६४॥

चंद्रहासा गजीं बसविलें ॥ मिरवित राजसदनिं आणिलें ॥

रायें तत्काळ लग्न लाविलें ॥ आंदण दिधलें सर्व राज्य ॥६५॥

श्‍लोक-

घेऊनि राजसूत चंपकमालतीसी ॥

आली वरात गजरें सचिवालयासी ॥

देखूनि लोचनि तयाप्रति मंत्रि म्याला ॥

धांवूनि शक्तिभुवनीं मग शीघ्र आला ॥६६॥

आर्या-

देखुनि प्रेत सुताचे मूर्छित होऊनि तो पडे धरणीं ॥

दुःखें प्राणासि त्यजि ज्याची त्यासचि फळास ये करणी ॥६७॥

याजवर गोष्ट-बैराग्याचें भजन "अपनी क्रिया आपकों तारक मारक" असें एका जारिणी स्त्रीनें ऐकून मनांत म्हणाली कीं, माझें कर्म जाणून माझी निंदा करीत हा घरोघर भिक्षा मागतो, यास्तव यास जिवें मारावें. असें योजून विषयुक्त अन्नाची भिक्षा त्यास घातली. तो मठांत गेल्यानंतर त्यास क्षुधा नव्हती; यास्तव अन्नाची झोळी खुंटीस लावून ठेविली. त्याच रात्रीं त्या स्त्रीचा बंधु व पुत्र गांवास गेले होते, ते घरीं येत असतां फार रात्र झाली, वेशी लागल्या, तेव्हां बैराग्यानें झोळींतील अन्न त्यांस भक्षावयास दिलें. तें त्यांनी सेवन करुन निजले असतां जागचेजागींच मृत झाले. प्रातःकाळीं ते मेल्याचें वर्तमान गांवांत कळल्यावर त्या बाईचे नवर्‍यानें त्यांस उचलून घरीं नेलें. रोजच्याप्रमाणें तो बैरागी गांवांत भिक्षेस येऊन घरोघर सवाल करीत चालला. ’आपनि क्रिया आपकों तारक मारक’ हा सवाल जारिणीनें जाराचे घरी गेली होती तेथें ऐकला, तेणेंकरुन परम विस्मय पावून बैरागी कसा वांचला हें आश्चर्य करीत घरीं आली, तो बंधु व पुत्र मृत झालेले पाहून बैराग्याचे सवालाचा अनुभव खरा आहे असें जाणून मोठा पश्चात्ताप पावून बैरागी यास अनन्य शरण जाऊन आपलें कपट त्यास सत्य सांगितलें. त्यावरुन त्या सत्पुरुषास दया आली, तेणेंकरुन तिचा पुत्र व बंधु यांस त्यानें जिवंत केलें. तात्पर्य-ज्यानें जसें कर्म करावें तसें त्यासच भोगावें लागतें. जामात चंद्रहासाचा घात दुष्टबुद्धीनें योजिला तो त्याचाच पुत्र मृत झाला. तें पाहून त्या दुःखानें त्यानेंही आपला प्राण तेथेंच दिला.

आर्या-

ज्याची त्यासच फळास ये करणी ॥

साकी-

साडे करुनी चंद्रहास तो घेऊन कांता दोनी ॥

राजमंदिरा येऊन गजरें बैसे सिंहासनीं ॥६८॥

दिंडी-

अन्य दिवशीं गुरव ते येऊनीयां ॥ चंद्रहासा सांगती वंदुनीयां ॥

दुष्टबुद्धीसहित तो मदन जाण ॥ शक्तिभुवनीं पडियला गतप्राण ॥६९॥

चंद्रहासें यापरी भाषणासी ॥ ऐकुनीयां पातला देउळासी ॥

पुजुनि प्रार्थितां भावयुक्त चंडी ॥ अनुष्ठाना करितसे शतचंडी ॥७०॥

पद-

आदिमाये शंभुप्रिये पाव त्वरें आतां ॥

तुजवीण दीनजनां नाहिं कोणी त्राता ॥आदि० ॥ध्रु०॥

हरुनियां दुःखभया देसि सौख्य भक्तां ॥

म्हणुनियां शरण आलों वारि शीघ्र चिंता ॥आदि० ॥१॥

गातां तुझे गुण : मुखें वेद मुकावले ॥

चरणांसी लागतांचि फार सुखावले ॥आदि० ॥२॥

धांवुनीयां वेगें आतां माये तूं न येसी ॥

दास म्हणे प्राण तरी जाइल निश्चयेंसी ॥आदि० ॥३॥७१॥

साकी-

प्रसन्न होऊन वरद अंबिका उठवी प्रधान-मदना ॥

जयजयकारें सर्व गर्जती वर्षति सुरगण सुमनां ॥७२॥

कथिती येउन दूत चंदनावतिच्या वृत्तांतासी ॥

दुष्टबुद्धिनें बंदिं घातलें कुलिंद नृपतीयासी ॥७३॥

ओंवी-

ऐसी पडतां वार्ता कर्णीं ॥ सद्गद झाला अंतःकरणीं ॥

सेवक धाडून गजरें आणी ॥ सपरिवार तया ॥७४॥

साकी-

घरीं बसवुनी दुष्टबुद्धितें प्रधान केला मदन ॥

प्रजा सर्वहि सुखें नांदती नाहीं कवणा दैन्य ॥७५॥

हयेमधीं हें चरित्र पावन नारद पार्था सांगे ॥

कृष्णदास म्हणें गातां प्रीती अगणित पुण्यहि लागे ॥

श्रोते परिसावी ॥ भक्तलीला ही बरवी ॥७६॥

सारांश, ज्यांहीं हृदयस्य भगवान् केला त्यांस जय आणि लाभ सहजीं अनायासें होतो.

श्लोक-

लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः ।

येषामिंदीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः ॥

त्या पुरुषास पराजय कोठुन होईल ? यास्तव तुकोबा म्हणतात.

’सांठविला हरि ॥ जेणें हृदयमंदिरीं’ ॥

शंकराचार्य म्हणतात.

चर्पटपंजरी-

पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननीजठरे शयनं ।

इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे ॥

भज गोविंद भज गोविंद भज गोपालं मूढमते ॥

प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुकृञ् करणे ॥

भज गोविंदं भज गोपालं ॥

अर्थ-

पुनः जन्मावें, पुनः मरावें, पुनः मातेच्या उदरीं यावें . अशा चौर्‍यायशीं लक्ष योनींतील येरझारा त्या पुरुषांच्या सुटतात, त्यांची सरली येरझार ॥ झाला सफळ व्यापार । यासाठीं साधुच्या वचनावर भरंवसा ठेऊन तदनुसार वर्तावें, आणि प्रभुजवळ हेंच मागणें मागावें., हेंचि दान देगा देवा ॥ तुझा विसर न व्हावा’ पुंडलीकवरदे० ॥ पार्वतीपते० ॥ जानकीजीवन० ॥ मंगल आरती ॥ समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP