वत्सलाहरण - वत्सलाहरण

कीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.


श्रीमन्महागणाधिपतये नमः ।

आर्या-

श्रोतीं सादरचित्तें सेवावें हरिकथामृत श्रवणें ॥

जें सुखदायक जगिं या भवभय विलयास पाववी श्रवणें ॥१॥

ओंवी-

सुभद्रादेवी कृष्णभगिनी । जे अर्जुनाची प्रियभामिनी ।

तिच्या उदरी अभिमन्यु गुणी । प्रतापवंत जन्मला ॥२॥

ते माहेरीं द्वारकेस असतां । श्रीकृष्ण बोले भावी वार्ता ।

बलिरामदादाची दुहिता । वत्सला तुझी स्नुषा हे ॥३॥

दिंडी-

तयालागीं लोटतां काळ कांहीं । पांडवातें पातलीं दशा पाहीं ।

कौरवांहीं कापटयद्यूत जाणा । खेळुनीयां जिंकिला धर्मराणा ॥४॥

आर्या-

धाडुनि वनवासातें हारविलें सर्व संपदेतें हो ।

दुर्व्यसन दुस्तरचि बहु सुज्ञासहि फार कंप देतें हो ॥५॥

श्लोक-

द्रुपदकुमरि संगे घेउनी काननातें ।

कुरुकुलवर गेले वेष्टुनी वल्कलांतें ।

विदुरसदनिं माता ठेविली जाण त्यांहीं ।

सुतसहित सुभद्रा तेहि तेथेंचि पाहीं ॥६॥

आर्या-

सौभद्रा खेद मनीं वाटे पाहूनि वैभवा अरिच्या ।

करिच्या मदयुत चेष्टा देखवती केविं बाळका हरिच्या ॥७॥

विदुर मनीं तें जाणुन घेउन सर्वांस ये हरिद्वारा ।

सन्निध दुःख सदां तें कलहाच्या लावुनी हरि द्वारा ॥८॥

श्लोक-

खळें मातुलें काढिली एक युक्ती ।

समस्तांस ते मानली दिव्य युक्ती ।

असे कृष्णजी साह्य या पांडवांसीं ।

तरी जोडणें राम तो आपणांसी ॥९॥

हलधर-दुहिता जे वत्सला रुपराशी ॥

उपवर नवरी ती मागणें लक्ष्मणासी ।

नविनचि मग होतां योग्य साह्यासनातें ।

हरिहि सहज तेणें जोडला आपणातें ॥१०॥

छंद-

द्वारके तदा शकुनि पातला । हलधराप्रती शीघ्र भेटला ।

रंजवूनियां वदत नेटका । कुरुवरात्मजा द्यावि कन्यका ॥११॥

घडवितां यथा योग्य हें असें । न्यूनता सुते लेशही नसे ।

हलिसहीत त्या रेवतीप्रती । रुचलि अंतरीं गोष्ट ती अती ॥१२॥

दिंडी-

सांगतां तें हलि वृत्त माधवातें । येरु बोले वाक्य तैं अग्रजातें ।

शब्द माझा गुंतला सुभद्रेसी । स्नुषा तूझी वत्सला निश्चयेंसी ॥१३॥

पांडवांच्या सम नाहीं श्रेष्ठ कोण । पिढीजादे सोयरे आप्त पूर्ण ।

राम बोले सांगसी वाढवूनी ॥ परी रानीं हिंडती दैन्यवाणी ॥१४॥

साकी-

कृष्ण म्हणे तरी तुमच्या चित्ता बरवें तेंचि करा हो ।

माझें भाषण मजपाशिंच तें वदलें सर्वहि राहो ॥१५॥

आर्या-

ईश्वरसूत्र असें वो मिथ्या कोणास सांग करवेल ।

तरवेल अंबुधीही परि लेखन भाळिंचें न फिरवेल ॥१६॥

साकी-

शकुनी तेव्हां बलरामातें बोले प्रार्थुन कायी ।

ज्याचें हित तें त्यानें पहावें कन्या कळकळ नाहीं ॥१७॥

आर्या-

अर्जुन हंसवरातें मुक्ता दुहिता न अर्पणें कागा ॥

सांगा समजुन अनुजा भ्रमला हो त्याचिया वचा कां गा ॥१८॥

ओंवी-

मग संकर्षण विचार करुनी । होय म्हणतां निघाला शकुनी ।

हर्षें गजपुरातें येऊनी । कथिलें साकल्य सुयोधनातें ॥१९॥

पांडवां न कळतां सवेग । साधून घ्यावा कार्यभाग ।

मग सिद्धता केली लगबग । मुहूर्त संनिध धरियेला ॥२०॥

कटाव-

कौरवेंद्र दुर्योधनराजा । निघता झाला विवाहकाजा ।

ज्याचा महिवरी थोर अगाजा । संगें चालति अपार फौजा ॥

अग्नीं धांवति थाट रथांचे । दाट गजांचे थवे मागुनी ।

किंकाट तयांचे शब्द ऊठती ॥ अचाट उष्ट्रें मागें त्यांची ।

वाट रिघेना ऐसी दाटी । कोतवाल हय त्यांचे पाठीं ॥

थै थै नाचति वाटोवाटीं । तयामागुनी स्वार कचाटी ।

वारुंत काटींत गाजि धांवती । अजी चलाजी हांजी म्हणती ।

डंका नौबती मागुनि येती । ढोल तुतार्‍या अमित वाजती ।

चौघडे वाजे बहुत गर्जती । तासे मर्फे मृदंगाचा ।

किलकिलाट बहु वाजंत्र्यांचा । नाद नभीं तो न माय त्यांचा ।

त्याचे मागून पायदळाचा । थाट चालला वाट दिसेना ।

अचाट सेना पाय धसेना ॥ भाट किती बोभाट करिती ।

दंडपाणी सन्मुख धांवती । नरयानांची नव्हेच गणती ।

चोपदार कनकदंड घेउनी । उदंड चालती मार्ग कसूनी ।

प्रचंड गज हय मानव यांनीं । असंख्य कामिनी जाति बसोनि ।

यापरी द्वारकेतें पातले, कौरव जन ते ॥ध्रु०॥२१॥

दिंडी-

लग्न जातां विदुरास द्वारकेतें । आणुं दूताम धाडिलें शीघ्र होतें ।

हरिद्वारा येऊनी जाण त्यांहीं । कथियेलें साकल्य वृत्त पाहीं ॥२२॥

सुभद्रेच्या येतांचि मात कानीं ॥ आणि दुःखें लोचनीं तदा पाणी ।

म्हणें केलें काय हें बंधुराया । दिली मजला दुबळीस भाक वायां ॥२३॥

अंजनीगीत-

दैवें वनवासचि आम्हांसी । आला घडुनी भोगूं त्यासी ।

तूंही निष्ठुर जाहलासी । आजिच बा कैसा ॥२४॥

प्राक्तन होतां प्रतिकूळ । उपेक्षिती आप्तहि सकळ ।

परि त्यां ऐसें तुझें शील । नसतां हें घडलें ॥२५॥

ऐशी शोक करीत असतां । मृगयेहून तो अवचीता ।

आत्मज येऊनि झाला पुसता । रडशी कां माते ॥२६॥

श्लोक-

तयालागीं ते सांगतां वृत्त माता ।

मनीं येरु आवेशला शत्रुघाता ।

म्हणें हो न जातां घडी एक तेही ।

अरी मर्दुनी वस्तु आणीन गेहीं ॥२७॥

मग विदुररथीं तो बाळ आरुढला हो ।

म्हणत जननि चित्तीं ईश्वराला भला हो ।

सकळहि समराची सिद्धि सामग्री संगें ।

भरुन रथिं कराया जाय सारथ्य अंगें ॥२८॥

विदूराची आज्ञा त्वरित मग घेऊनि निघती ।

पथिं जातां लागे वन बिकट घोरोदर अती ।

थवे शार्दूलांचे विचरति मृगेंद्रादिक महा ।

अशा आरण्यातें क्रमि निजबळें निर्भय पहा ॥२९॥

वृक्षाची बहु दाटि मार्ग न चले तैं दिव्य एका शरें ।

नाना वृक्ष समूळ ते उडवुनी केलें सुपंथा त्वरें ।

फोडूनी नग मार्गणें सरळशा पंथें तदा चालती ।

तों त्या काननिं अस्त्रपीं अडविलें जातां त्वरीता गती ॥३०॥

तेथें असे स्थान घटोत्कचाचें । सुरासुरांहि भय फार ज्याचें ।

विध्वंसिलें कानन पाहुनीयां । आले बहु राक्षस धावुनीयां ॥३१॥

साकी-

अस्त्रप लोचनिं पाहती सुरथीं बालक आणि स्त्रियेतें ।

म्हणती दैवें आमिष धाडून दिधलं भक्षण अमुतें ॥३२॥

वदती त्यातें वन हें मूर्खा विध्वंसीलें कायी ।

रक्षत आम्ही घटोत्कचाचे मारुं तुज या ठायीं ॥३३॥

ऐसें ऐकून अभिमन्यु तैं तीक्ष्णचि सायक सोडी ।

सकळांचेही सव्य हस्त ते क्षणमात्रेंचि तोडी ॥३४॥

छंद-

दश दिशा भयें पळति तेथुनी । प्रति घटोत्कचा कथिति येउनी ।

पातला महा वीर तो अरी । घेउनी पळा प्राण सत्वरी ॥३५॥

आर्या-

हेडिंबीचा सुत तैं परिसुन वृत्तांत क्रुद्ध बहु झाला ।

दशकोटी क्रव्यादा घेउन संगें तया स्थलीं आला ॥३६॥

देउन हांक भयंकर म्हणे उभा प्राण वांचवीं राहें ।

करिसी अर्भकचेष्टा न सहे परि मज कदापि वीरा हें ॥३७॥

दिंडी-

अशा वाक्या ऐकुनी कृष्णभाचा ॥

सिंहनादें गर्जुनी वदे वाचा ॥

म्हणे आतां दुर्जना साही बाणा ।

क्षणे एकचि हरिल तुझ्या प्राणा ॥३८॥

ओंवी-

आला देखून तीक्ष्ण शर । घाबरला बहु राक्षसेश्वर ।

मग अंबरीं उडून वरचेवर । वर्षाव करी शिळांचा ॥३९॥

त्याचें शरें पिष्ट करुनी । अभिमन्यूनें प्रेरिली गदा गगनीं ।

तेणें घटोत्कचा घेरी येउनी । महीवरी आपटला ॥४०॥

मग शस्त्रास्त्रें युद्ध करिती । परी एकमेकां नाटोपती ।

अभिमन्यूनें सहा कोटी गणती । राक्षस समरांत पाडिले ॥४१॥

श्‍लोक-

किती एक ते बाणवातें उडाले ।

किती एक ते प्राणधाकें दडाले ।

असें देखतां नाथ रात्रिंचरांचा ।

अति क्षोभुनी घात इच्छी तयाचा ॥४२॥

गगनिं मग उडूनी टाकिली दिव्य शक्ति ।

क्षणहि न लगतांची आकळी प्राणशक्ति ।

जननि सुत अवस्था पाहुनी फार भ्याली ।

धरुनि हृदयीं वत्सा दुःखडोहीं बुडाली ॥४३॥

दिंडी-

रिपू गेला बाळका मारुनीयां ।

करी शोका काननीं पार्थजाया ।

मुखीं वदना ठेवुनी भाषणासी ।

वदे बाळा टाकुनी कसा जाशी ॥४४॥

करुं कैसी बा गती काय आतां ।

नुठतां तूं करिन रे प्राणघाता ।

दुःखें वदुनी यापरी अनीवारीं ।

हंबरडे फोडूनी रडे भारी ॥४५॥

साकी-

विलाप यापरि करुनि सुभद्रा दुःखें रोदत भारी ।

कुलदेवीतें स्तवून प्रार्थी अंबे दुःख निवारीं ॥४६॥

पद-

येई येईवो जगदंबे । माते विश्वकदंबे ।

धांवून उडी घाली अविलंबे । दीनाप्रति न विसंबे ॥येई येई० ॥ध्रु०॥

कौरवीं हारविलें राज्यासी । छळिलें द्रौपदीसि ।

दुःखा भोगितसों वनवासी । नयनीं कैसें पहासी ।येई येई० ॥१॥

माझें बाळ हें एकुलतें । वधिलें राक्षसीं यातें ।

आतां करुं कायी दुःखातें ॥ निरसूनि मारी यातें ॥येई येई० ॥२॥

तूं तव दिनाची माउली । जशि वत्सा गाउली ।

धांवून उचलत ये पाउलीं । करि करुणासाउली ॥येई येई वो०॥३॥४७॥

साकी-

ऐसी ऐकुनि करुणा श्रीपति शक्तिरुप धरि अंगें ।

प्रगट होउनी दोन वरांतें देता झाला वेगें ॥४८॥

सव्य करें तूं त्यास स्पर्शतां होईल सुत सप्राण ।

महाप्रसंगीं अणिक एकदां उठविसी मृतास जाण ॥४९॥

छंद-

शक्ति ते अशा देउनी वरा । गुप्त जाहली जाण सत्वरा ।

येरि येउनी स्पर्शतां सुता । सजिव जाहला क्षण न लागतां ॥५०॥

ओंवी-

उभा उभा रे यातुधाना । उठला हेचि करीत गर्जना ।

तों माता हृदयीं धरुनि जाणा । साकल्य वृत्ता निवेदी ॥५१॥

घटोत्कचा सांगती राक्षस । शत्रु उठला वाहे रणास ।

येरु सिद्ध होउनी कंदनास । निघतां गुज कथी मातेसी ॥५२॥

जैं द्वारींचे ताडवृक्ष पडती । तैं प्राणांत माझा निश्चिती ।

ऐसें सांगून हिडिंबीप्रती । रणभूमीसी पातला ॥५३॥

आर्या-

झुंजति निकरें क्षोभून परस्परांच्याहि जीव हननातें ॥

नकळे दोघांसहि परि बंधुत्वाचें असे गहन नातें ॥५४॥

क्रोधें पार्थात्मज तैं दे उसणे प्राणबाण गा उशिरा ॥

घेतों न लावितां मी ऐसें बोलून छेदि भा उशिरा ॥५५॥

तालद्रुम उन्मळतां कळविती हिडिंबी ती त्वरें आली ॥

जाणुनि पुत्रा विपरित धांवत रोदत रणांत ते आली ॥५६॥

करुनी विलाप बोलत भीमा धर्मार्जुनासि धांवा हो ॥

असतां शिरिं पद तुमचें पुत्र रिपूनें कसा वधावा हो ॥५७॥

दिंडी-

सुभद्रा ते यापरि ऐकतांची ॥ पुसे कोण सांग तूं पांडवांची ॥

येरि बोले भीम तो पती माझा ॥ ऐकुनीयां शंकीत पार्थाभाजा ॥५८॥

अगे माझा भीम तो दीर बाई ॥ मग स्नेहें भेटती दोघि त्याही ॥

म्हणे झालें तें बरें असो आतां ॥ धीर धरी वारील देव चिंता ॥५९॥

दुज्या शक्तीच्या वरें भीमपुत्रा ॥ जीववोनीं कथि तया सकल वृत्ता ॥

भीमपुत्रें भेटुनी बांधवासी ॥ म्हणे आतां त्यागणें काळजीशीं ॥६०॥

श्लोक-

पाचरितां त्या निज मातुलाला ॥

घेऊनि सेना शतकोटि आला ॥

द्वारावतीतें मग ऊर्ध्व मार्गें ॥

आले निशीमाजिं अती सवेगें ॥६१॥

आर्या-

भीमात्मज घेउनियां संगें निज मातुलाप्रति निघाला ॥

एकांतिं वृत्त कळवी भेटुनियां रक्षि त्यासि त्रिजगाला ॥६२॥

कृष्ण म्हणे निर्भय जा युक्तीनें कार्य शीघ्र साधा कीं ॥

नाकीं चुना खळांच्या लावा माझ्या न लक्ष द्या धाकीं ॥६३॥

श्‍लोक-

कृष्णाज्ञा मग घेउनी वसविलें तेथें महा आपणा ॥

नाना वस्तु अमूल्हही परिजना ते देति स्वल्पा धना ॥

झाले सर्व पदार्थही पशु चिरें शस्त्रें सुधान्यें फळें ॥

कर्तें विक्रय वैश्य आदि करुनी क्रव्याद मायाबळें ॥६४॥

छंद-

लोक भाविती तेथिंचे मनीं ॥ हाट आणिला सोयरे जनीं ॥

कौरवांस तें भासलें असें ॥ हाट हा नवा सैंवरी वसे ॥६५॥

श्लोक-

घेती यादव कौरवकडिलही सैनीक शस्त्रें बरीं ॥

वाजी वारण भूषणें बहु चिरें किंचिद्धनें साजिरी ॥

देऊनी जवळील घेति बदला जें चौगुणी चांगलें ॥

ऐसें राक्षसिं फार तें भुलवुनी लोकां बहू नाडलें ॥६६॥

ओंवी-

मामा भाचे म्हणती सत्वरीं ॥ आधीं हस्तगत करावी नवरी ॥

स्त्रीरुपें मग ते अवसरीं ॥ नटते झाले मनोहर ॥६७॥

अमूल्य वस्त्रालंकारें । भासती देवांगना निर्धारें ॥

राममंदिरीं पश्चिमद्वारें । शिरतां रेवती चकीत ॥६८॥

म्हणे भासती आल्या विहिणी ॥ पुसे अत्यादरें सन्मानुनी ॥

येरी वदती सुयोधन कामिनी ॥ तिच्या दासी असों ॥६९॥

साकी-

जडित भूषणें घडित कोंदणीं अमूल्य रत्‍नें जडणें ॥

न्यूनाधिक तें होतां व्यर्थचि पुनरपि येईल घडणें ॥७०॥

यास्तव आपणाकडे धाडिलें क्षणभरि नवरी द्या जी ॥

आंगिं नेटकी पाहून सत्वर आणितों असिच पहा जी ॥७१॥

ऐशीं मंजूळ सत्य भाषणें मानून नवरी दिधली ॥

घेउन कडिये आणुन तीतें देति सुभद्रेजवळी ॥७२॥

छंद-

त्या दिनींच तैं वधुवरांप्रती ॥ उत्तमोत्तमा लाधली तिथी ॥

तेधवा गुहांमाजिं जे ऋषी ॥ आणिले बहू तेच राक्षसीं ॥७३॥

श्लोक-

सुभद्रात्मजा वत्सले लग्न त्यांहीं ॥

विधीयुक्त तें लाविलें शीघ्र पाहीं ॥

तयां दक्षिणा देउनी द्रव्यराशी ॥

पुन्हां नेउनी पोंचवीलें स्थळासी ॥७४॥

हरीमंदिरीं नारदें लग्नटाळी ॥

पिटोनी म्हणे ऐक कांतारमाळी ॥

अभीमन्युशीं वत्सले लग्न झालें ॥

हरीलागुनी ऐकतां हास्य आलें ॥७५॥

मायावी नटला घटोत्कच तदां त्या वत्सलेच्या सरीं ॥

दासीरुप धरुनि रामसदनीं ने मातुला सत्वरीं ॥

बोले ती मृदु रेवतीस वचनें सांभाळिजे मुल ही ॥

दैवाची दिसते म्हणून पडली येऊन थोरा गृहीं ॥

आर्या-

लग्न घडी त्या दिवशीं अति उत्तम नेमलीच गणकांहीं ॥

झाले सिद्ध वर्‍हाडीं दोहींकडेही न आवधीं कांहीं ॥७७॥

बोले कन्या आई लागली मजसी क्षुधा अनेकगुण ॥

जाणो किती भक्षावें न कळे त्या सासुचाचि दृष्टिगुण ॥७८॥

नेवोनि पाकशाळे जननी तिजलागिं अंतरीं सोडी ॥

सेवक दूर करोनि सांगे भक्षीं पदार्थि ज्या गोडी ॥७९॥

कोणी नसेचि सन्निध पाहुनियां भक्षि पाक साराही ॥

तृषित अगस्ति ऋषीच्या पानीं नद शेष तो कसा राही ॥८०॥

दिंडी-

मुख प्रक्षालुनि येइ वत्सला ती ॥ पाककर्ते जाउनि पाहताति ॥

दिसेनाचि लेशही अन्न कोठें ॥ नवल चित्तीं मानिती फार मोठें ॥८१॥

रेवतीसी सांगती भीत भीत ॥ येरि होती तेधवां धांदलींत ॥

म्हणें क्रोधें काय हें सांगतां रे ॥ करा न्यून पूर्ण तें झटुनि सारे ॥८२॥

ओंवी-

कृष्ण रुसला नयेचि लग्नी ॥ समजावूं मग म्हणे शकुनि ॥

मुहूर्त घटिका समीप जाणूनी ॥ मंडपीं वर उभा केला ॥८३॥

अंतरपट धरोनि त्वरित ॥ वधू आणून उभी करीत ॥

मंगलाष्टकें भूदेव गर्जत ॥ घटोत्कचें विघ्न मांडिलें ॥८४॥

श्लोक-

वरा लक्ष्मणाचे बळें पाय पायें ॥

बहु चेंगरी सोशितो नीरुपायें ॥

करा लांबवोनी नखें बोचकारी ॥

तदा आरडे पावुनी दुःख भारी ॥८५॥

तदा दापिती वृद्ध ते स्तब्ध राहे ॥

कुलस्वामिणीतें कथीती स्मरा हे ॥

पुनः ते वधू तोंड विक्राळ वासी ॥

सुटे कंप तेणें भयें लक्ष्मणासी ॥८६॥

नसे हे वधू जाणिजे राक्षसातें ॥

धरा हो धरा भक्षुं पाहेच मातें ॥

असें बोलतां भैमि तो शीघ्र साडी ॥

करें फेडुनी हांक विक्राळ फोडी ॥८७॥

ओंवी-

राक्षस जाणुनी बलाद्भुत ॥ कौरव वीर धांवले समस्त ॥

म्हणती एकला असे मारा त्वरित ॥ तों संगती अपार प्रगटले ॥८८॥

शस्त्रें वस्त्रें अलंकार ॥ गज तुरगादिक साचार ॥

नटले होते रात्रिंचर ॥ ते म्हणतां चला धांवले ॥८९॥

छंद-

उठुनि अश्व तो राउता धरी ॥ नागरोहिया मारितो करी ॥

कंठभूषणें कंठ छेदिती ॥ हस्तभूषणें हस्त बांधिती ॥९०॥

अशस्त्र जाहले ठरति ना कदा ॥ पाठि लागती राक्षसू तदां ॥

वस्त्र हरपतां नग्न धांवती ॥ धरुनियां तदां पाठ काढिती ॥९१॥

ओंवी-

हतवीर्य कौरवजन ॥ करिते झाले पलायन ॥

हलधर अत्यंत क्रोधायमान ॥ नचले उपाय परी कांहीं ॥९२॥

रुसोन बैसला चक्रपाणी ॥ बलदेव जाय तया स्थानीं ॥

अनर्थ केला राक्षसांनीं ॥ न कळे झाली काय कन्या ॥९३॥

सस्मित मुखें मदनतात ॥ म्हणे अघटित ईश्वरी सूत्र ॥

अभिमन्यू झाला जामात ॥ नारदमुखें ऐकतों ॥९४॥

साकी-

राम म्हणें हें तुझेंच कृष्णा अवघें कृत्य मी जाणें ॥

असो तयासी आतां येथें आणावें सन्मानें ॥९५॥

कृष्णासह मग सन्मुख जाऊन त्यातें सहपरिवारी ॥

आणून मोठा सोहळा केला हरुषें दिन ते चारी ॥९६॥

अघटित घटना इच्चामात्रें घडवी मेघःश्याम ॥

कृष्णदास म्हणे भक्तजनाचे पुरवी सर्वहि काम ॥९७॥

या प्रकारें पांडवांच्या चित्तीं भगवान वसतो, त्या पांडवांची संगति सुभद्रेस झाल्यामुळें तिची मनकामना पूर्ण होऊन अभिमन्यू व तसाच घटोत्कच यांस यश प्राप्त झालें. शकुनि दुर्जनाची संगत राजा दुर्योधन यानें केली. त्यास नफा कांहींच न होतां अपयश आणि दुःख मात्र प्राप्त झालें. यास्तव मानपूरी साधु म्हणतात. दुर्जनापासून दूर असावें. पूर्वींचें

पद-

क्या नफा दुर्जनके संगत ॥ दुरसे दूर रहिये ॥

संगत साधनसों करिये ॥ कपटी लोकनसों डारये ॥संगत सा०॥

कोणापासून भयानें किती दूर असावें याविषयीं बुधजन सांगतात.

श्‍लोक-

शकटं पंचहस्तेषु दशहस्तेषु वाजिनः ॥

हस्ती हस्तसहस्त्रेषु देशत्यागोऽपि दुर्जने ॥

अर्थ-

शकटापासून पांच हात, घोडयापासून दहा हात हत्तीपासून सहस्त्र हात दूर असावें आणि दुर्जन असेल तो देश टाकून दूर जावें. यासाठी मानपुरी म्हणतात, कपटी जनास भिऊन असावें आणि साधूची संगती करावी यास्तव तुकोबा हेंच देवाजवळ मागतात. देव वसे ज्याच्या चित्तीं ॥ साधूच्या वचनानुसार आपणही प्रभूजवळ हेंच मागावें ॥ हेंचि दान देगा देवा ॥ तुझा विसर न व्हावा ॥१॥ मंगलारती ॥ वत्सलाहरणाख्यान समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP