लोकसंग्रह करण्यासाठी समर्थांनी आपल्या योगसिद्धीच्या बळावर अनेक ठिकाणी चमत्कार केले. पैठण क्षेत्रात समर्थांची रसाळ किर्तने सुरू झाली. असंख्य लोक त्यांचे कीर्तन ऐकावयास येत असत. त्यातच आंबड प्रांतातला नित्य येणारा एक ब्राह्मण समर्थांच्याकडे टक लावून पाहत असे. त्याला वाटे, यापूर्वी समर्थांना आपण कुठेतरी पाहिले आहे. आणि एक दिवस त्याच्या मनात शंका आली. लहानपणी लग्नमंडपातून पळून गेलेला सूर्याजीपंतांचा नारायण तोच हा असावा. कीर्तनानंतर त्याने समर्थांची भेट घेतली आणि शंका निरसन केली. तो समर्थांना म्हणाला, "आपण स्वधर्मासाठी हरिकीर्तन करीत गावोगाव फिरता, हे योग्य आहे. पण आपली वाट पाहून पाहून आपल्या मातोश्रींचे डोळे गेले. त्यांना आपण भेटावे." समर्थांनी दुसर्याच दिवशी आपल्या जन्मगावी जावयाचे ठरविले. गावात शिरताच मारुतिरायाचे दर्शन घेतले. आपल्या घराच्या अंगणात रामनामाचा जयजयकार केला. तो ऐकून श्रेष्ठपत्नी भिक्षा घालण्यासाठी बाहेर आल्या. तेवढ्यात समर्थ ओसरीवर आले होते. ते म्हणाले. "हा भिक्षा घेणारा गोसावी नाही." हे शब्द ऐकताच राणूबाई म्हणाल्या, "माझा नारोबा आला की काय?" समर्थांनी आईच्या डोळ्यांवरून हात फिरविला. त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि त्या म्हणाल्या, "ही काय रे भुतचेष्टा?" यावर समर्थ म्हणाले, "तेचि भूत गे माय."
होते वैकुंठीच्या कोनी
शिरले अयोध्या भुवनी
लागे कौसलेल्च्या स्तनी
तेचि भूत गे माय ॥ध्रु॥
आता कौशिक राउळी
अवलोकिता भयकाळी
ताटिका ते छळोनी मेली । तेचि० ॥१॥
मार्गी जाता वनांतरी
पाय पडता दगडावरी
पाषाणाची झाली नारी । तेचि० ॥२॥
जनकाचे अंगणी गेले ।
शिवाचे धनु भंगले ।
वैदेही अंगी संचरले । तेचि० ॥३॥
जेणे सहस्त्रार्जुन वधिला
तोहि तत्काळची भ्याला
धनू देऊनी देह रक्षिला ।तेचि० ॥४॥
पितयाचे भाकेशी
कैकयीचे वचनासी
मानुनि गेले अरण्यासी । तेचि० ॥५॥
चौदा संवत्सरे तपसी
अखंड हिंडे वनवासी
सांगाते भुजंग पोशी । तेचि० ॥६॥
सुग्रीवाचे पालन
वालीचे निर्दालन
तारी पाण्यावर पाषाण । तेचि० ॥७॥
रक्षी मरणी बिभीषण
मारी रावण कुंभकर्ण
तोडी अमराचे बंधन । तेचि० ॥८॥
वामांगी स्त्रियेला धरिले
धावुनी शरयूतीरा आले
तेथे भरतासी भेटले । तेचि० ॥९॥
सर्वा भूतांचे ह्रदय
नाम त्याचे रामराय
रामदास नित्य गाय । तेचि० ॥१०॥