गोरक्षनाथ आणि कानिफनाथ या उभयतांनी बारा वर्षै बदरिकाश्रमास तपश्चर्या केली. ती पूर्ण झाल्यानंतर ते दोघे आपापल्या गुरूंचा शोध करावयाकरिता निघाले. पण कोठेहि शोध न लागल्यामुळे ते दोघेहि माशाप्रमाणे तडफडत होते व गुरूच्या वियोगामुळे त्यांच्या डोळ्यातून टपटपा पाणी पडत होते. अशा स्थितीमध्ये ते देशोदेशी फिरत होते.
गोरक्षनाथ फिरत फिरत गौडबंगाल्यात गेल्यावर हेलापट्टणास आला व तेथील शिवेशी येऊन स्वस्थ बसला. तेथे गावचे जे रक्षक होते त्यांनी त्यास नमस्कार केला. तेव्हा त्यांच्याजवळ गोरक्षनाथ मच्छिंद्राविषयी विचारपूस करू लागला. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही म्हणता तो गोसावी येथे आला नव्हता, पण जालंदरनाथ या नावाचा एक गोसावी आला होता. तो सूर्यासारखा मोठा तेजस्वी असून आधाराशिवाय त्याच्या डोक्याच्या वर गवताचा भारा राहात असे. तो ते गवत रानातून आणत गावातील लोकांच्या गायींना घाली. तो येथे सुमारे एक वर्षपर्यंत राहिला होता, पण पुढे तो कोठे व केव्हा गेला ह्याची माहिती कोणास नाह. ह्या गोष्टीस आज सुमारे दहा वर्षे होत आली. ते भाषण ऐकल्यानंतर, मी तप सोडून त्याचा शोध करीत हिंडेन म्हणून गुरूने नाव पालटले असावे, अशा अनेक कल्पना त्याच्या मनात येऊन त्याला अतोनात दुःख झाले त्या समयी ईश्वरकृपेने गुरूची व तुझी भेट होईल तू काही काळजी करू नकोस, अशी ते त्याची समजूत करीत होते.
पुढे तो अंमळसा विवेक करून गावात भिक्षेस गेला. तो घरोघर भिक्षा मागावयास फिरत असता, तेथे जालंदरास पुरले होते तेथे गेला व त्याने 'अलख' शब्द करताच आतून जालंदरनाथाने 'आदेश' केला तेव्हा गोरक्षनाथाने 'आदेश' करून आपले नाव काय, म्हणून विचारिले. त्यावरून त्याने मला जालंदरनाथ म्हणतात असे आतून उत्तर दिले व तसेच त्याने त्यासहि तुझे नाव काय व तुझा गुरु कोण म्हणून विचारिले. तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की, माझा गुरु मच्छिंद्रनाथ होय व या देहास गोरक्ष असे म्हणतात. मग तुमची ही अशी अवस्था कशी झाली, वगैरे गोरक्षनाथाने विचारल्यावर जालंदराने सविस्तर मजकूर त्यास सांगितला. तो ऐकताच गोरक्षनाथ रागावून गोपीचंद राजाचे समूळ वाटोळे करून टाकण्याकरिता जालंदरापाशी आज्ञा मागू लागला. पण पुढील भविष्य जाणून त्याने त्यास ह्या कामात हात घालण्याची मनाई केली. तो म्हणाला, तूर्त तू ह्या भरीस पडू नको व ही गोष्ट कोणाजवळ बोलू नको. तुझा व माझा शिष्य कानिफ ह्याची जेव्हा भेट होईल तेव्हा त्यास मात्र तू हे सर्व कच्चे वर्तमान सांग; म्हणजे तो येथे येऊन हरयुक्तीने नाथपंथाचा उत्कर्ष होण्यासाठी राजास बचावून मला खांचेतून बाहेर काढील. आता ही गोष्ट नीट लक्षात ठेवून तू तीर्थयात्रेस जा. मग गोरक्षनाथ 'आदेश' करून तेथून निघाला. तो फिरत फिरत जगन्नाथास गेला.
इकडे कानिफा गावगन्ना उपदेश करीत चालला होता. पुष्कळ लोकहि त्याचे हौशीने शिष्य होत. त्याचा समागमे सातशे शिष्य निरंतर असत. ते फिरत फिरत स्त्रीराज्याच्या आसपास गेले. त्या राज्यात पुरुष वाचत नाही, हे सर्वांना ऐकून ठाऊक होते; म्हणून पुढे जाण्यास कोणी धजेना. पण कानिफाचाच स्त्रीराज्यात प्रवेश करण्याचा रोख दिसल्यावरून शिष्यमंडळीत मोठी गडबड उडून गेली. तरी त्यातून कितीएक असेहि म्हणू लागले की, गुरुचे पाय मनापासून धरिल्यानंतर जिवाचे भय कसले आहे ! तशातून तन, मन, धन इत्यादि सर्व आपण पूर्वीच ह्यास अर्पण केले आहे; तर आता जिवाची आशा धरून व्रतभंग करणे अनुचित कर्म होय.
हा त्यांच्या मनसुब्याचा सर्व प्रकार कानिफाच्या लक्षात आला म्हणून त्याने स्पर्शास्त्रमंत्र म्हणून भस्म तिन्ही दिशांकडे फेकिले आणि स्त्रीराज्याचा मार्ग मोकळा ठेवून त्याशिवाय बाकीच्या सर्व दिशा भारून टाकिल्या. त्याला असे करण्यास दोन कारणे होती. शिष्य पळून जाऊ नयेत हे एक आणि मारुतीचा भुभुःकार त्या ठिकाणी पोचू नये हा दुसरा. ह्याप्रमाणे व्यवस्था करून त्याने आपल्या शिष्यास जवळ बोलावून सांगितले की, मला आता स्त्रीराज्यात जावयाचे आहे; परंतु तो देश मोठा कठीण आहे. त्या ठिकाणी मारुती भुभःकार करीत असतो, त्यामुळे तेथे पुरुष वाचत नाही. असे पुढचे देश मोठे कठीण आहेत व त्या देशांच्या यात्रा करून येण्याचा माझा मानस आहे. जर जालंदरनाथ गुरूच्या चरणी माझा खरा विश्वास असेल तर दंग्याधोक्याशिवाय मनात धरिलेल्या यात्रा करून सुरक्षित माघारा येईन. कदाचित जिवावर प्रसंग येऊन प्राणहानि झाली तरी पुरविली. परंतु मनात आले आहे त्यापेक्षा तिकडे जाऊन यावयाचे खचित ! तर आता तुमचा विचार कसा आहे तो कळवा. ज्यांची गुरूच्या चरणी पूर्ण निष्ठा असेल, त्यांनी माझी संगत धरावी आणि ज्यांना जिवाची आशा असेल त्यांनी परत घरी जावे.
कानिफाने असे सांगितल्यानंतर त्याच्या सातशे शिष्यांपैकी अवघे सात जण तेथे त्याच्याजवळ राहिले आणि बाकीचे सर्व परत चालले. आपण होऊन विचारल्याशिवाय जाणार होते, पण तेणेकरून मूर्खत्व मात्र पदरी आले असते, त्यापेक्षा गुरुजीनी आपण होऊन राजीखुशीने जावयास परवानगी दिली, ही गोष्ट फार चांगली झाली, हाच हर्श मानून ते आनंदाने परत जाऊ लागले. ते गावच्या सीमेपर्यंत सुमारे एक कोस लांब गेले. परंतु तेथे स्पर्शस्त्राने त्यास चिकटून धरिले. जागच्या जागी खिळून टाकिल्याने त्यास हालता चालता येईना. मग हात जमिनीवर ठेवून त्यांच्या नेटाने ते पाय सोडावयास पहात होते; पण हातसुद्धा जमिनीस चिकटून ते सर्व ओणवे होऊन राहिले.
इकडे कानिफनाथाने राहिलेल्या सात शिष्यात विभक्त अस्त्रविभूति लावून सांगितले की, तुम्ही तिकडे जाऊन दुसरे शिष्य ओणवे होऊन राहिले आहेत, त्यांच्या पाठीवरून एकएक दगड ठेवा. अशी आज्ञा होताच ते सात जण त्यांचा शोध काढीत तेथे गेले. ह्या सातांना पाहाताच बाकीचे सर्व शिष्य लज्जित झाले. मग त्यांची चांगली खरडपट्टी काढून गुरूने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पाठीवर दगड ठेविले. ते दगड देखील त्यांच्या पाठीस चिकटून गेले. मग ते शिष्य रडून त्या दुःखापासून सोडविण्यासाठी प्रार्थना करू लागले. तेव्हा ते सात शिष्य म्हणले, जिवाची आशा धरून येथे खुशाल असा, गुरुजी देश पाहून आल्यानंतर तुम्हास सोडवून नेऊ. संकटापासून सोडविण्यासाठीच तर गुरु करावयाचा असतो परंतु विश्वास धरणारास तो मात्र फलद्रूप होतो. तेव्हा आपला अन्याय क्षमा करून स्त्रीराज्यात समागमे घेऊन जाण्यासाठी त्यांनी या सात जणांचे पुष्कळ प्रकारांनी आर्जव केले व आमचा भ्रम उडून गुरूचा प्रताप समजला, असेहि त्यांनी बोलून दाखविले.
मग ते सातहिजण परत गुरूकडे येऊन जोडीदारांची स्थिति सांगून मुक्तता करण्यासाठी मध्यस्थी करू लागले. गुरूला दया येण्याजोगे त्यांनी बरेच मार्मिक भाषण केले. तेव्हा गुरू कानिफाचे अंतःकरण द्रवले व त्याने विभक्तास्त्र मंत्र म्हणून भस्म दिले; ते एका शिष्याने जाऊन त्यास लाविताच ते मोकळे झाले. मग ते सर्वजण येऊन लीनतेने गुरूच्या पाया पडले. पुढे सर्व शिष्यांसह वर्तमान कानिफा स्त्रीराज्यात जावयास निघाला. तो नगराच्या सीमेवर जाऊन तळ देऊन राहिला.
नंतर असा चमत्कार झाला की, भुभुःकार करण्यासाठी मारुती सेतुबंधरामेश्वराहून रात्रीस स्त्रीराज्यांत तो जात असता तो कानिफाच्या स्पर्शास्त्राच्या सपाट्यात सापडला गेला; पण महाप्रबळ वीर असल्यामुळे त्याने त्या अस्त्रास दाद दिली नाही. तो त्यांच्या तळापर्यंत येऊन पोचला, त्या वेळी स्पर्शास्त्राने हरकत केल्याची कल्पना त्याच्या मनात आल्यावरून येथे कोणी तरी प्रतापी असला पाहिजे, असेहि त्याच्या मनात बिंबले. इतक्यात सीमेजवळ येताच त्यास नाथपंथाचे लोक दिसले. त्या वेळी मारुतीस असे वाटले की, आपण महाप्रयत्नाने स्त्रीराज्यात पाठविलेल्या मच्छिंद्रनाथास हे लोक जाऊन उपद्रव देतील व बोध करून त्याचे मन वळवितील. मग तोहि ह्यांच्या समागमे स्वदेशाला गेला तर केलेले श्रम फुकट जाऊन राणीचा मुखचंद्र उतरेल व तिचे हेतु जागच्या जागी राहून जातील. ह्यास्तव त्यांना दुर्बल करून परत लावण्यासाठी मारुतीने अतिविशाल असे भीमरूप प्रगट केले आणि भुभुःकार केला. तेव्हा सर्व शिष्य घाबरून गुरुजीच्या आड दडून बसले व रक्षण करण्याकरिता गुरूस विनंति करू लागले. त्यांचे अवसान गळून गेले असे पाहून कानिफाने त्यांस पुष्कळ धीर देऊन सांगितले की, पुढे काय चमत्कार होतो तो धैर्य धरून तुम्ही पाहा; ह्यांच्यापासून तुम्हांस मुळीच धक्का बसणार नाही.
नंतर कानिफाने वज्रास्त्र सिद्ध करून भस्म मंत्रून फेकिले. ते कृत्य मारुतीच्या लक्षात आले. त्या क्षणीच तो आवेशाने मोठमोठे प्रचंड पर्वत कानिफाच्या अंगावर फेकू लागला. परंतु वज्रास्त्राच्या योगाने दगडांचे चूर्ण होऊन जाई, म्हणून मारुतीने वज्रमुष्टीचा प्रहार करताच वज्रास्त्र क्षीण झाले. ते पाहून कानिफनाथाने, कालिकास्त्र, अग्न्यस्त्र, वासवास्त्र, वाय्वास्त्र अशी वरच्यावर सोडिली. तेव्हा अग्न्यास्त्रास वाय्यास्त्राचे पुष्कळ पाठबळ मिळाल्याने त्याने प्रळय उडवून दिला. त्या वेळी मारुतीने सर्व इलाज केले, पण त्याचे काही चालले नाही. तो अगदी जेरीस येऊन गेला. मग, मी तुझा मुलगा असता, माझा तू प्राण घेऊ पाहात आहेस, तर मुलाची दुर्दशा पाहून कोणत्या तरी बापास सुख वाटणार आहे काय? अशा मतलबाची मारुतीने आपला पिता जो वायु त्याची बरीच स्तुति केली. तेव्हा पुत्राच्या ममतेस्तव वातास्त्र क्षीण झाले. मग कानिफाने मोहिनी योजना केली. त्याने मारुतीस काहीसे भ्रमिष्ट केले; तरी त्याने अग्न्यास्त्र समुद्रात झुगारून दिले. त्या तापाने समुद्राचे उदक कढू लागले. मग तो (समुद्र) मूर्तिमंत येऊन पाहू लागला असता कानिफा व मारुती ह्यांचे युद्ध चाललेले दिसले. मारुती आपल्याकडून करवेल तितके उपाय योजून कानिफाचा पाडाव करावयास पाहात होता, परंतु त्याचे वर्चस्व कमी झाले नाही; उलट मारुतीच जर्जर होऊन मूर्च्छना येऊन जमिनीवर पडला.
मग मूर्तिमंत वायु पुत्रमोहास्तव मारुतीजवळ गेला. इतक्यात मारुती सावध होऊन पुनः युद्धाची धामधूम करण्याच्या बेतात आहे असे पाहून वायूने त्याचा हात धरून सांगितले की, हे नाथ मोठे प्रबळ आहेत. पूर्वी मच्छिंद्रनाथाने तुझी कशी दुर्दशा करून सोडिली होती ह्याची आठवण कर ! वाताकर्षणविद्या ह्यांच्या जवळ पक्क्या वसत आहेत. यास्तव यांच्याशी सख्य करून तुझे कार्य साधून घे. सख्यत्वासारखी दुसरी योग्य युक्ति मलासुद्धा दिसत नाही, असा समुद्राचाहि अभिप्राय पडला. मग ते मारुतीला घेऊन कानिफाजवळ गेले व त्यास परम प्रीतीने भेटले. कानिफानेहि वायू व समुद्र यांस प्रेमाने नमस्कार केला आणि युद्ध का सोडलेस म्हणून मारुतीला विचारिले. पण युद्ध करण्याचे कारण कोणते असे वायूने कानिफास विचारल्यावर त्याने उत्तर दिले की, मारुतीने काय कारणास्तव युद्धास आरंभ केला हे मला माहीत नाही, त्याला विचारले असता तो सांगेल. तेव्हा मारुती म्हणाला, मी मोठ्या प्रयत्नाने मच्छिंद्रनाथास स्त्रीराज्यात पाठविले. हे त्याचे जातवाले असल्यामुळे, युक्ति प्रयुक्तिने त्यास बोध करून तेथून आपल्या देशास घेऊन जातील तसे ह्यांनी करू नये म्हणून मी ही खटपट केली, दुसरा काही मतलब नव्हता. मच्छिंद्रनाथास ह्यांचा उपद्रव होणार नाही, असे माझी खात्री पटण्यासाठी मला वचन देऊन त्यांनी खुशाल स्त्रीराज्यात गमन करावे. मग मारुतीचे म्हणने कानिफाने मान्य करून त्यास वचन दिले. मग अग्नि, वायु व मारुती संतुष्ट होऊन आपापल्या ठिकाणी गेले.
मग प्रातःकाळी कानिफा आपल्या शिष्यांसहवर्तमान निघून स्त्रीराज्यात गेला. तेथे तीर्थे करीत राजधानीचे मुख्य शहर जे श्रृंगाल मुरुडी येथे ते दाखल झाले. तेथे मैनाकिनी राणी मच्छिंद्रनाथास घेऊन सभेमध्ये सिंहासनावर विराजमान झाली होती. कानिफ आपल्या शिष्यांसह एका राजवाड्यात गेला. तेव्हा द्वारपाळांनी तपास करून सातशे शिष्यांसह कानिफनाथ या नावाचा जती आल्याचे वर्तमान मच्छिंद्रनाथास कळविले. ते ऐकून गोरक्षनाथ आपले नाव बदलून मला न्यावयास आला असावा, असे वाटून त्यास फार वाईट वाटले. आता आपण ह्या विषयविलासाच्या अनुपम सुखास अंतरणार ! हाच विचार त्याच्या मस्तकात भरून गेला; तेणेकरून तो दिलगीर झाला. मग त्यांना परभारे गावात न्यावे असे मनात आणून मच्छिंद्रनाथ मोठ्या समारंभाने पालखीत बसून त्यास भेटावयास गेला. उभयतांच्या मोठ्या आनंदाने भेटी झाल्या. भरजरी गालिचे पसरून त्यावर सर्व मंडळी बसविली. मग एकमेकांच्या हकीगतीची विचारपूस झाली. त्या वेळेस खरा प्रकार बाहेर पडला. ओळख पटल्यानंतर उभयतांचे पुष्कळ बोलणे झाले. मग त्यास मच्छिंद्रनाथाने हत्तीवर बसवून मोठ्या थाटाने गावातून आणिले आणि एक महिना राहवून घेतले.