एकनाथी भागवत - श्लोक ६ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


स्वमूर्त्या लोकलावण्यनिर्मुक्‍त्या लोचनं नृणाम् ।

गीर्भिंस्ताः स्मरतां चित्तं पदैस्तानीक्षतां क्रिया ॥६॥

जो सकळ मंगळां मंगळ पूर्ण । जो कां गोकुळीं कामिनीरमण ।

मोक्षाचें तारुं स्वयें श्रीकृष्ण । ज्याचें बरवेपण अलोलिक ॥३९॥

जो भक्तकामकल्पद्रुम । मनोहर मेघश्याम ।

ज्याचें त्रिलोकीं दाटुगें नाम । स्वयें पुरुषोत्तम शोभतु ॥२४०॥;

श्रीकृष्णाचिया सौंदर्यापुढें । लक्ष्मी भुलोनि झाली वेडें ।

मदन पोटा आलें बापुडें । तेथ कोणीकडे इंद्र चंद्र ॥४१॥

ज्याचें त्रैलोक्यपावन नाम । जो करी असुरांतें भस्म ।

तो बोलिजे अवाप्तकाम । भक्तां सुगम सर्वदा ॥४२॥

त्रिलोकींचें बरवेपण । भुलोनि कृष्णापाशीं आलें जाण ।

ना कृष्णलेशें बरवेपण । शोभे संपूर्ण तिहीं लोकीं ॥४३॥

जो सकल सौंदर्याची शोभा । जो लावण्याचा अतिवालभा ।

ज्याचिया अंगसंगप्रभा । आणिली शोभा जगासी ॥४४॥

जो हरिखाचा सोलींव हरिख । कीं सुख सुखावतें परमसुख ।

ज्याचेनि विश्रांतीसि देख । होय आत्यंतिक विसांवा ॥४५॥

तो अमूर्त मूर्तिधारण । कीं सकललोकलावण्य ।

शोभा शोभवी श्रीकृष्ण । सौभाग्य संपूर्ण साजिरा ॥४६॥

घृत थिजलें कीं विघुरलें । परी घृतपणा नाहीं मुकलें ।

तेवीं अमूर्त मूर्ती मुसावलें । परी तें संचलें परब्रह्म ॥४७॥

तयासि देखिलियाचि पुरे । देखादेखीं देखणेंचि सरे ।

पहाणें पाहातेनिसीं माघारें । लाजोनि वोसरे सलज्ज ॥४८॥

दृष्टी धाली दे ढेंकर । आपण आपुलें शेजार ।

होवोनियां परात्पर । सुखावे साचार श्रीकृष्णरुपीं ॥४९॥

श्रीकृष्णाची चाखिल्या गोडी । रसस्वादु रसना सोडी ।

जाये चाखणेपणाची आवडी । चाखतें दवडी चाखोनि ॥२५०॥

नवल तेथींचें गोडपण । अमृतही फिकें केलें जाण ।

यापरी रसना आपण । हरिरसीं संपूर्ण सुखावे ॥५१॥

लागतां श्रीकृष्णसुवावो । अवघा संसारुचि होय वावो ।

सेवितां श्रीकृष्णसुगंधवावो । घ्राणासि पहा वो आन नावडे ॥५२॥

वासु सुवासु सुमन । घ्रेय घ्राता आणि घ्राण ।

कृष्णमकरंदें जाण । विश्रामा संपूर्ण स्वयें येती ॥५३॥

जयाचेनि अंगस्पर्शें । देह-देही-देहपण नासे ।

अंगचि अंगातें कैसें । विसरे आपैसें देहबुद्धि ॥५४॥

कठिणाचें कठिणपण गेलें । मृदूचें मृदुपणही नेलें ।

कृष्णस्पर्शें ऐसें केलें । स्पर्शाचें ठेलें स्पर्शत्व ॥५५॥

तयाचेनि पठणें वाचा । ठावो वाच्यवाचकांचा ।

नेतिशब्दें पुसोनि साचा । करी शब्दाचा निःशब्दु ॥५६॥

बोलु बोलणेंचि ठेलें । बोलतें नेणों काय झालें ।

कृष्णशब्दें ऐसें केलें । वाच्यानें नेलें वाचिक ॥५७॥

चित्त चिंतितांच पाये । चित्तपणा विसरोनि जाये ।

मग निश्चितपणें पाहे । कृष्णचरणीं राहे निवांत ॥५८॥

चित्त चिंता चिंतन । तिहींची नुरे आठवण ।

चिंतितांचि श्रीकृष्णचरण । ब्रह्मपरिपूर्ण निजचित्त ॥५९॥

नवल तयाचा पदक्रम । पाहतां पारुषे कर्माकर्म ।

मग कर्म कर्ता क्रियाभ्रम । करी निर्भ्रम पदरजें ॥२६०॥

पहातां पाउलांचा माग । तुटती कर्माकर्मांचे लाग ।

कर्माचें मुख्य माया अंग । तिचा विभाग उरों नेदी ॥६१॥

गाईमागिल कृष्णपाउलें । पाहतां कर्म कर्तेनिसीं गेलें ।

अकर्म म्हणणें नाहीं उरलें । ऐसें कर्म केलें निष्कर्म ॥६२॥

जयाचेनि कीर्तिश्रवणें । श्रोता नुरे श्रोतेपणें ।

वक्ता पारुषे वक्तेपणें । श्रवणें पावणें परब्रह्म ॥६३॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP