श्रीगणेशाय नमः ॥ श्रीपरशुरामाय नमः ॥
जय जया भ्रुगुकुळ टिळका भार्गव रामा क्षत्रियांतका गोब्राह्मण प्रतिपाळका भक्तरक्षका विश्वैकपते ॥१॥
तूं निर्गुण निरंजन भक्तालागीं होसी सगुण नाना प्रख्याती करुन चरित्रें निर्माण त्वां केलीं ॥२॥
महाशैव असुर तेथें कवळून ऋषी कन्येतें घेऊनि शूळ प्रचंड हस्तें उभा राहिला समरंगणी ॥३॥
ह्मणे त्वा मारुनि क्षत्रियांतें पृथ्वी दिधली ब्राह्मणांतें आतां माझिया वस्तूतें हरण करुं आलासी ॥४॥
तूं आपुले ठायीं भूमंडळा तपिया ह्मणविसी आगळा तरी माझिया लाभ काळा किमर्थ विघ्न मांडिलें ॥५॥
कपटी न देखों तुज ऐसा घडल्या तू तें राजहिंसा कुरंगातें पारधी जैसा वधी तैसा तूं एक ॥६॥
आतां करुनि प्राण रक्षणा जाय आपुल्या तपस्थाना सुखें करी सत्कर्मा चरणा जीवदान तुज दिधलें ॥७॥
ऐकूनि असुराची वाणी श्रीराम बोलती क्रोधवचनीं अरे दुष्टा येच क्षणीं व्यर्थ करिसी वलगना ॥८॥
रासभें ब्रीद बांधोन तुंबरा पुढें मांडिलें गायन मद्यपीयानें ब्रह्मज्ञान पंडिता सांगणें हें व्यर्थ ॥९॥
खंद्योत तेजाचा प्रकाश दावी आगळा भास्करास अजा रक्षक वाचस्पतीस सारांश सांगे शास्त्राचा ॥१०॥
तेवीं मूर्खा दुराचारी वर्तसी पातक पंजरीं आणि शास्त्राची भरोवरी सांगसी थोरवी मजपुढें ॥११॥
काम भोगाची ये आर्ती बळें झोंबसी कन्येप्रती तया पातका धारातीर्थी प्रायश्चित्त तुज देतों ॥१२॥
भार्गवाच्या वचनवातें, असुर त्हृदयीं क्रोधाग्नीचे ते शूळ कवळोनि प्रचंड हातें टाकी तेव्हां रामावरी ॥१३॥
शूळ येतांचि निर्धारें फरशें खंडिला फरशुधरें मग मुद्गल असुरें रामावरी प्रेरिला ॥१४॥
मुद्गल टाकिला तोडून तंव महाअसुर क्रोधायमान तो मरहातीं घेऊन बळें करुनि झोंकिला ॥१५॥
येतां तो मरतोडिला दैत्यकवळी प्रचंड मुसळा सोडूनि देतां तयेवेळां परशुरामें खंडिलें ॥१६॥
मग गदाते अवसरीं घेऊनि धांवे रामावरी रेणुकात्मजें निरधारीं घेत आपुले गदेतें ॥१७॥
दोघां मांडिलें गदा युद्ध एकमेकां हाणिती क्रोधें विरश्री मातली दोघांमध्यें महाशब्दें गर्जती ॥१८॥
गदेसी गदा आदळती ज्वाळा अग्नीच्या उमटती देव विमानीं पाहती युद्धगती दोघांची ॥१९॥
कार्तीक स्वामी तारकासुर समरंगणीं जेवीं अनिवार दक्ष आणि वीरभद्र भिडतां तेवीं भासती ॥२०॥
मागें सरोनि पुढें धांवती वर्म साधोनि गदा हाणिती येरयेरांचा भाविती प्राण घ्यावया परस्परें ॥२१॥
जैसे सुटले वन केसरी शस्त्रधायच पेटेभारीं नाद उमटे अंबरांतरीं गदा घायतयाचा ॥२२॥
यक्ष गंधर्व किन्नर सिद्ध चारण पादोदर अष्टादश ऋषेश्वर भयाभीत जाहले ॥२३॥
रणें गदेचे निघायें जर्जर झाले वीरराय परशुरामवीर होय रणमंडळीं आगळा ॥२४॥
सिंहनादें गर्जोनि थोर गदेनें हाणिला विमळासूर मूर्छागत धरणीवर एक मुहूर्त पडियेला ॥२५॥
सवेंचि मूर्छना सांवरोन असुर उठिला गर्जोन हातीं घेऊनि धनुष्यबाण उभा राहिला मागुती ॥२६॥
धनुष्या वाहोनियां गुण सोडिता जाहला अपार बाण भार्गव वीर देखोन शर कोदंडा चढविले ॥२७॥
मांडोनियां वज्रठाण सोडी बाणा पाठीं बाण घे घे शब्द ह्मणोन हाका देती परस्परें ॥२८॥
प्रचंड बाणांचे पूर दोघे सोडिती अनिवार बाणीं बाण समग्र एकमेकांचे तोडिती ॥२९॥
अचुक संधान भार्गवाचें ॥ खंडिलें धनुष्य असुराचें तीव्र बाणें तयाचें जर्जर केलें सर्वांग ॥३०॥
विमळ दैत्यें आवेशें घेतलें तेव्हां द्वितीय धनुष्य न लागतां अर्धनिमिष्य संधान भेदी रामाचें ॥३१॥
राक्षसें मंत्र जपोन सोडिता जाला अग्निबाण प्रदीप्त जाला प्रळयाग्न जाळीत जाय दशदिशा ॥३२॥
परशरामें मंत्र जपोन सोडी तेव्हां मेघास्त्र अग्नी सर्व विझवून पर्जन्य पूर दाटला ॥३३॥
विमळा सुरें जाणून सोडिता जाहला प्रभंजन रेणुका कुमरें लक्षून पर्वत आड घातले ॥३४॥
दैत्यें सोडूनियां वज्र पर्वत फोडिले समग्र हें जाणूनि फरशुधर माहेश्वर सोडिलें ॥३५॥
दैत्यें देखोनि ब्रह्मास्त्र सोडितां दचकलें अजस्त्र व्यापिलें विश्वचतुरस्त्र अस्त्रें सर्व विरालीं ॥३६॥
आश्चर्य करिती सुरवर गुप्त जाला ब्रह्मशर दोघे वीर अनिवार नाटोपती कळीकाळीं ॥३७॥
एक बाण सोडिती त्यापासोनि अनेक होती एकमेकां न दीसती ऐसे बाण दाटले ॥३८॥
गुण वाजती रुण झुणा सुटती बाण सण सणा प्रळय मेघांतूनि जाणा जेवीं चपला राबती ॥३९॥
बाणीं बाण आदळती फुलोरे अग्नीचे उसळती जैशा विजा कडकडती नादें घुमती दशदिशा ॥४०॥
धनुष्याचे टणत्कारें गर्जताती गिरिकंदरें धरणी कंप येकसरें प्रळय वाटे सकळांसी ॥४१॥
सप्तही सागर धुमती जळचरें प्राणत्यागिती कूर्मवराह फणिपती ॥ सांवरीती कुंभिनीतें ॥४२॥
जैसा युगांतींचा जलधर करी वर्षाव अतिखडतर ते बाणाचे संभार मंडपाकार दाटले ॥४३॥
अच्छादिला वासरमणी अंधःकार दाटला धरणीं नाठवे दिवस आणि रजनी नेणो अवनी बुडाली ॥४४॥
तैशां माजीं रेणुका सुत रणीं धांवोनि अकस्मात वज्रप्राय मुष्टिघात वोपिता जाहला दैत्यावरी ॥४५॥
तेणें आली गिरिगिरी मूर्छीत पडे धरणीवरी मागुतीं उठोनि झडकरी घे घे ह्मणोनि गर्जत ॥४६॥
वसंत काळाचे अवसरीं शुक फुलले पर्वतावरी रामबाणें तैशापरी रक्त वाहे दैत्याचें ॥४७॥
परी असुर न पावे मरण भार्गव धांवे फरशु घेऊन छेदितां त्याचे करचरण अंबरीं उडोनि जाय वेगीं ॥४८॥
ग्रासाया येई रामासी राहू जैसा चंद्रासी येतो गर्वें पर्वणीसी तेवीं झडप घालूं ह्मणे ॥४९॥
मग स्वरुप भूत शक्तीचा बाण काढू नियोजूनि वेचा येणेंचि प्राण घेऊं असुराचा हंसाचियापरी ॥५०॥
उगवले सहस्त्र मार्तेंड तेजें लोपलें विरंची अंड तैसा बाण अतिप्रचंड धनुष्यासी योजिला ॥५१॥
ऐसा बाण तेजःपुंज धनुष्या योजी भ्रुगुराज ह्मणे दैत्या आजि तुज मुक्ती देतों समरंगणीं ॥५२॥
तरी अंती सावधान होऊनि करी विचारण ऐसें ह्मणोनि आकर्ण वोढूनि बाण सोडिला ॥५३॥
कडकड प्रलय चपला तैसा गर्जत बाण चालिला देवेंद्र ह्मणे मांडला कल्पांत आतां भूमंडळीं ॥५४॥
दुमदुमिले सप्त पाताळ खळबळलें समुद्र जळ विमळा सुराचें कंठ नाळ बाणें तात्काळ छेदिलें ॥५५॥
बाण निवाला सागरीं शीर उडालें गगनोदरीं गरगरा भ्रमोनि चक्रापरी वैतरणी तिरीं पडियेलें ॥५६॥
भयंकर कलेवररण मंडळीं नाचे आनंदें पिटी टाळी मग उलथोनि भूमंडळीं शयन केलें पालथें ॥५७॥
कीं महावृक्ष उन्मळिला कीं मेरुचा कडा तडकला कीं सूर्य रथींचा खचला उच्चैश्रवा भूमीवरी ॥५८॥
जैसा पूर्वीं गयासुर पालथा पडला पृथ्वीवर कीं विष्णूनें लवणासुर जेवीं रणीं साधिला ॥५९॥
आतां विमळाचें शिरकमळ उत्तरे विराजे वेल्हाळ ॥ दक्षिण दिशेस चरणतळ लंबायमान पसरले ॥६०॥
देव संतोषती अंबरीं दुंदुभी नादाचिया गजरीं परमानंदें रामावरी वर्षाव करिती पुष्पांचा ॥६१॥
तंव पद्यभू ब्रह्मदेव रुद्रेंदिक गंधर्व भृग्वादि ऋषी सर्व स्तविती पुरुषोत्तमासी ॥६२॥
असो तें शिर हास्यवदन करोनि करी अपार स्तवन जय जय रामा रेणुका नंदन महाराज तपोनिधी ॥६३॥
जय जय वेद वंद्या वेद गर्भा अरुप रुपा तूं स्वयंप्रभा रणरंगीं विजय स्तंभा पद्मनाभा नमोस्तुते ॥६४॥
जय जया अवतारधारी नारायणा एक आनादी निरंजना माये शमाया प्रेरण करा निर्गुणा असुर हनना तुज नमो ॥६५॥
जय जय भार्गवा क्षत्रियांतका जगत्र वंद्या जगपाळका मुक्तिप्रद फलदायका जगव्यापका जगद्गुरु ॥६६॥
पुंडरीकाक्षा वासुदेवा ॥ वैकुंठपते कमलाधवा पावन करिता सकळ जीवा दयार्णवा नमोस्तुते ॥६७॥
तूं प्रणवादी मंगलकर तूं निर्विकल्प निर्विकार वेदशास्त्रां न कळे पार अगोचर ब्रह्मादिकां ॥६८॥
तुवां आधीं पद्म निर्मिलें तेथोनि जगदादि उद्भवलें तयापासोनि त्रिसर्ग उमगले पंचभेदात्मक ॥६९॥
तूं नानावतार धरोन करोनि दुष्टांचें मर्दन भक्तांसी कृपाळू होऊन मुक्तिपद त्यांसी देसी ॥७०॥
ऐसा तूं लाधवी देवा पूर्ण कळलें माझिया जिवा असुरा वेशें अहंभावा धरुनि वैर मांडिलें ॥७१॥
तरी त्यांतूनि जगदीशा तुवां मुक्त केलें पुराण पुरुषा कृपावंता भार्गवेशा परिक्षा जाणसी मनाची ॥७२॥
मानव जैसा पिशाचांतरी ॥ मुक्त करितो पंचाक्षरी तैसा तूं कैठभारी स्वभक्तांसी गती देतोसी ॥७३॥
ऐसें शिर कमळाचें स्तवन ऐकतां हंसे भ्रुगुनंदन ह्मणे तुष्टलों वरदान माग आतां अपेक्षित ॥७४॥
एवं भाषितां फरशधर शिरमागे अपेक्षित वर ह्मणे विश्वैक देवा करुणाकर विनंती सादर ऐकावी ॥७५॥
तुझे चरणीं मज मुक्ती देऊनि गाजवी अक्षय कीर्ती माझें शरीर धारातीर्थी पडलें असे तुज नमो ॥७६॥
एवं बोलोनि जाला मुक्त ॥ पुढें ईश्वर भाअ ठेवोनि अव्यक्त परी भक्तांसी सर्वदा व्यक्त मोहकारी असुरांचा ॥७७॥
तयाचे त्हृदय कमळावरी दिव्यलिंग स्थापना करी पुण्यक्षेत्र निरधारीं तया स्थानीं नमावें ॥७८॥
माझे नामाचें अद्भुत येथें असे विमळतीर्थ चंद्र सूर्य सरितानाथ पृथ्वीवरी जों असती ॥७९॥
तोंवरी आणी येथें महात्म्य निरंतर असो उत्तमोत्तम नाना तीर्थांचे उगम विमळांमाजीं समरसो ॥८०॥
तापी गोदा भागीरथी नर्मदा यमुना सरस्वती पाताळगंगा भोगावती विमळांमाजीं समरसो ॥८१॥
कावेरी कृष्णा गोमती क्षिप्रा विप्राचर मन्वती तुंग भद्रा वेदावती विमळांमाजीं समरसो ॥८२॥
शरयू गंडकी अर्जुनी पाराशरी आणि पयोष्णी स्वर्गां बुगंगा मंदाकिनी विमळांमाजीं समरसो ॥८३॥
काशी प्रयाग गया अद्भुत स्वर्ग पाताळादि समस्त एवं समुद्र वलयांकित विमळ तीर्थी एकवटोत ॥८४॥
ब्रह्मादि देव ऋषेश्वर यक्षगंधर्व किन्नर सित्ध चारण पादोदर विमळ तीर्थीं वास करोत् ॥८५॥
आणी जे पातकी जन विमळोदकीं करिती स्नान तात्काळ जाती उत्धरोन पुनः जन्मा न येती ॥८६॥
ऐसें मागणें विमळासुर पूर्वीं मागतां संतोषे फरशुधर ह्मणे धन्य धन्य तूं पवित्र सार्थक केलें जन्माचें ॥८७॥
तुझें पडलें जेथें कलेवर त्याणें प्रसित्ध विमळ सरोवर पृथ्वीचीं तीर्थें समग्र तेथें वसती सर्वदा ॥८८॥
सकळ देव ऋषी मुनी ॥ येथें बैसती जपध्यानीं त्द्याची कीर्ती त्रिभुवनीं जगा मुखीं गाजेल ॥८९॥
ब्रह्महत्या गोहत्या पूर्ण स्त्री बालहत्या दारुण गुरु तल्पगी सुरापान मार्गघ्न आणि मद्यपी ॥९०॥
वेदद्रोही शास्त्रद्रोही देवद्रोही साधुद्रोही मातृद्रोही पितृद्रोही ॥ मित्रद्रोही पतीत जे ॥९१॥
कन्याविक्रय गोविक्रय रसविक्रय हयविक्रय ग्रामदाहक सुवर्णस्तेय परस्त्री गमनीमदां धजे ॥९२॥
पैशून्य वादी अभक्षा भक्षक ॥ हिंसा कर्मी वृत्ति छेदक नष्ट कपटी परपीडक पुस्तक चोर अनाचारी ॥९३॥
ऐसीं महत्पातकें निश्चितीं विमळ देखतां भस्म होती स्नान करितां उत्तमगती पावती मुक्ती सायुज्यता ॥९४॥
ऐसी पूर्वीं ऐकतां वरदवाणी शिर हसे खदखद वदनीं तरलों तरलों ह्मणोनी मुख पसरिलें विशाळ ॥९५॥
जीव ज्योती निघाली ती भार्गव मुखीं प्रवेशली रामरुपीं पूर्ण जाली जेवीं जळीं जळचर ॥९६॥
चैतन्य चैतन्यीं जाहली भेटी ब्रह्मानंदें पडली मिठी विराली सकळ भवसृष्टी दुजीगोष्टी नाठवे ॥९७॥
धन्य भक्त विमळासुर आपुला करुनि उद्धार जना कारणें निरंतर पवित्र स्थळ निर्मिलें ॥९८॥
ऐसे जे कां उदार भक्त तयांचे नामें पापें जळत ज्यांचीं चरित्रें विख्यात विस्तारलीं भूमंडळीं ॥९९॥
वृत्र बळी बाणादिक यांच्या कीर्ती आमोलिक तैसा हा विमळ देख महाभागवत जालासे ॥१००॥
ऐकतां विमळाची कथा सकळ तीर्थांचें फळ ये हाता सूत विनवी समस्तां पुढील कथा परिसीजे ॥१०१॥
जेणें राम कथा सुधा प्याली तया काय करी तो दुर्धर कली तेणेंचि सुबुत्धी संपादिली उणें नाहीं इह परतयासीं ॥१०२॥
स्वस्तिश्री परशुरामविजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु द्वाविंशोऽध्याय गोड हा ॥२२॥
श्रीमहेंद्रवासिने नमः ॥ श्रीकंसांतकार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ इति श्री द्वितीयोंकः समाप्तः ॥ श्रीपरशुराम प्रसन्नोस्तु ॥श्रीरस्तु॥