॥ श्रीगणेशाय नमः ॥
मग ह्मणे पारिक्षिती ॥ वैशंपायना तूं वेदमूर्ती ॥
माझिये श्रवणांची तृप्ती ॥ केली तुवां ॥१॥
धन्यधन्य तुझें वचन ॥ मज वाटे अमृतासमान ॥
तरी पुढें कैसा जन्मला वामन ॥ तें सांगा जी ॥२॥
हर्षें ह्मणे वैशंपायन ॥ राया तूं श्रोता विचक्षण ॥
तुवां पुसिले पुसीचा प्रश्न ॥ ऐक आतां ॥३॥
देवीं ऐकोनि ब्रह्मवचन ॥ मग निघाले तिघेजण ॥
तंव अमरावतीसि घालोनि ठाण ॥ बैसला बळी ॥४॥
तो तरी असे महा धार्मिक ॥ देवां धर्मांचा प्रतिपाळक ॥
सुखी केला सकळ लोक ॥ अमरावतीचा ॥५॥
घरोघरीं वृंदावनें ॥ गीतपेखणी देवार्चनें ॥
नाहीं असत्य बोलणें ॥ कवणे काळीं ॥६॥
मग समस्त गंधर्वगण ॥ यक्ष किन्नर सिध्द चारण ॥
भोगांगना इंद्रजन ॥ वोळंगती बळीसी ॥७॥
तेथें गंगा मंदाकिनी ॥ जे तीर्थांची स्वामिणी ॥
सिध्द साधक उपवनीं ॥ शोभती लोक ॥८॥
ऐसें बळीसि राज्य करितां ॥ कंटक नाहीं पैं सर्वथा ॥
तंव पुसी आठवली बहुतां ॥ दिवसीं एक ॥९॥
मग बळी ह्मणे भृगूतें ॥ आह्मीं सदा असों अमरावतीतें ॥
ऐसा उपाय आमुतें ॥ सांगा काहीं ॥१०॥
तेव्हां बोले दैत्यगुरु ॥ येक असे जी विचारु ॥
शतयाग करितां निश्चळ इंद्रु ॥ होय अमरावतीचा ॥११॥
मग तया निर्भय सर्वथा ॥ कोणी तयासि न करी व्यथा ॥
पुण्यबळें सदैव भोगिता ॥ होय अमरावती हे ॥१२॥
तंव ह्मणे राजा बळी ॥ शतयाग मांडूं भूमंडळीं ॥
हाचि विचार ये काळीं ॥ करावा जी ॥१३॥
येवोनि रेवेचे उत्तरतीरीं ॥ मेळविली सर्व सामुग्री ॥
दीक्षित जाहला ब्रह्मचारी ॥ बळीराव ॥१४॥
बोलाविले ऋषिजन ॥ सुमुहूर्तें मांडिलें हवन ॥
ऐसें करितां अनुष्ठान ॥ गेलीं वर्षे सहस्त्र ॥१५॥
इकडे तया समुद्रतीरीं ॥ देवीं तप केलें सहस्त्रवरी ॥
इंद्र कश्यप आणि सुंदरी ॥ आदिती माता ॥१६॥
तंव कश्यप ह्मणे सुंदरी ॥ तूं पयोव्रत अंगिकारीं ॥
महामंत्र लक्षचारी ॥ नित्य जपावा ॥१७॥
ऐसी दिवस तेरावरी ॥ मंत्र जपे द्वादशाक्षरी ॥
ब्रह्मभोजन तृप्तीवरी ॥ केलीं दानें ॥१८॥
क्षीर घृत आणि शर्कारा ॥ भोजन दीधलें द्विजवरां ॥
होम तर्पण शारंगधरा ॥ करी मंत्रें ॥१९॥
ऐसें आरंभिलें व्रत ॥ हें भागवतींचें मत ॥
तंव वाचा जाहली अकल्पित ॥ अंतराळीं ॥२०॥
ह्मणे माग जाहलों प्रसन्न ॥ परि दृष्टीं न दिसे कवण ॥
तंव आठविलें वचन ॥ ब्रह्मयाचें ॥२१॥
कश्यप ह्मणे गा श्रीहरी ॥ आह्मां प्रसन्न झालासि जरी ॥
तरी त्वां यावें उदरीं ॥ अदितीच्या गा ॥२२॥
आणि ह्मणे तो सुरेश्वर ॥ माझा होईं गा सहोदर ॥
मज द्यावा जी अधिकार ॥ अमरावतीचा ॥२३॥
तों वाचा जाहली तथास्तु ॥ तुमचा पुरेल मनोरथु ॥
मी जिंकीन दैत्यनाथु ॥ क्षणामाजी ॥२४॥
आपुले पर्णशाळेप्रती ॥ अदिती देखे मंगळमूर्तीं ॥
चतुर्भुज महादीप्ती ॥ आयुधेंसीं ॥२५॥
गुदेंसिं देखिला गदाधर ॥ चक्रेंसिं देखिला महाउग्र ॥
सव्यस्थानीं द्विजवर ॥ पद्मनाभी कमळ ॥२६॥
कमळमाळा मिरवे कंठीं ॥ मेघश्याम गरुडपृष्ठीं ॥
चरणीं गंगा कटितटीं ॥ पीतांबर ॥२७॥
ऐसा तो सच्चिदानंदघन ॥ बाह्यअंतरीं परिपूर्ण ॥
तें दाविलें स्वरूपचिन्ह ॥ अदितीसी पैं ॥२८॥
वाचेचा न मानी विश्वास ॥ ह्मणोनि दाविला स्वयंप्रकाश ॥
तेचि नक्षत्रीं रात्रिदिवस ॥ राहिला गर्भ ॥२९॥
मग ह्मणे परिक्षितिपुत्र ॥ गदेनें कैसा गदाधर ॥
हा सांगावा विचार ॥ वैशंपायना ॥३०॥
हर्षें ह्मणे ऋषेश्वर ॥ भूमीं मर्दिला लवणासुर ॥
आणि तैसाचि गयासुर ॥ चेपिला भूमी ॥३१॥
त्या लवणासुराचा पुत्र ॥ गद नामें महा असुर ॥
तेणें मातेसि पुसिला विचार ॥ स्वपितयाचा ॥३२॥
मग माता ह्मणे तयासी ॥ तूं होतासि गर्भवासी ॥
तैं लवण मर्दिला हृषीकेशीं ॥ चरणातळीं ॥३३॥
तंव मातेसि बोले गद ॥ जेणें केला पित्याचा वध ॥
तो मारीन मी गोविंद ॥ सत्यजाण ॥३४॥
ह्मणोनि घातलें दृढासन ॥ करी रुद्राचें चिंतन ॥
सहस्त्रवर्षें धूम्रपान ॥ केलें तेणें ॥३५॥
रुद्र ह्मणे जाहलों प्रसन्न ॥ तंव येरु मागे वरदान ॥
जेणें घेतले पित्याचे प्राण ॥ तो जिंकावा म्यां ॥३६॥
देवा त्रिभुवनाहोनि थोर ॥ येवढें जो वाहील शस्त्र ॥
त्या वांचोनियां समग्र ॥ जिंकावे म्यां ॥३७॥
ऐसा तो लाधला वर ॥ मग गयेसि ऐके शारंगधर ॥
तेथें गेला वेगवत्तर ॥ गदासुर तो ॥३८॥
कोपें देवासि ह्मणे गद ॥ त्वां केला पित्याचा वध ॥
तोचि तूं अससी गोविंद ॥ वैरी आमुचा ॥३९॥
ह्मणोनि हाणितला त्रिशूळें ॥ घायें दुमदुमिलीं पाताळें ॥
त्रास मानिला गोपाळें ॥ त्या घायाचा ॥४०॥
ऐसा घायामागें घायो ॥ वर्षत असे महाबाहो ॥
परि विष्णुसि न घालवे घावो ॥ गदावरी ॥४१॥
जैसा सिंह मदोन्मत्त ॥ जाणों दुजा यमदूत ॥
तैसा सांपडला अनंत ॥ गदादृष्टीं ॥४२॥
मग विष्णु हाणे आपण ॥ परि तें त्याचे अंगीं जैसें सुमन ॥
मग उचलिलें सुदर्शन ॥ हाणावयासी ॥४३॥
तंव अंतरीं झाली वाचा ॥ नको नको गा हृषीकेशा ॥
सुदर्शनाचा भरंसा ॥ नधरीं यावरी ॥४४॥
हें संधान जाईल वृथा ॥ चक्रासि येईल शून्यता ॥
तेव्हां मनीं उपजली चिंता ॥ गोविंदासी ॥४५॥
तेथें होता चतुरानन ॥ तेणें ज्ञानीं पाहिलें विचारून ॥
कीं यासि असे प्रसन्न ॥ महादेव ॥४६॥
मग ते सकळ कर्मकथा ॥ ब्रह्म्यानें कथिली अनंता ॥
जे त्रिभुवन घातें लवणसुता ॥ आहे मरण ॥४७॥
तैं घेवोनि त्रिभुवनींचा भार ॥ कौमोदकीं प्रवेशला शारंगधर ॥
तेचि गदें करूनि असुर ॥ हाणितला मस्तकीं ॥४८॥
ऐसा तो वधिला असुर ॥ तेंचि गुणनाम गदाधर ॥
हा मार्कंडेयपुराणींचा विचार ॥ कौमोदकीचा ॥४९॥
कमळीं प्रवेशोनि श्रीहरी ॥ घायें मारिला सुरारी ॥
ऐसा असे पुराणांतरीं ॥ इतिहास देखा ॥५०॥
तरी गदेनें कैसा गदाधर ॥ हा त्वां पुसिला विचार ॥
तो सांगितला विस्तार ॥ जन्मेजया ॥५१॥
तो स्वयंप्रकाश स्वयंज्योती ॥ स्वरूप देखतसे अदिती ॥
तेंचि नक्षत्र गुणरातीं ॥ राहिला गर्भ ॥५२॥
ऐसा सहस्त्र वर्षेंवरी ॥ गर्भ राहिला तिचे उदरीं ॥
बळितपाची सामुग्री ॥ सरे तंव वरी ॥५३॥
गर्भीं आलिया श्रीहरी ॥ तंव देव द्विज ब्रह्मचारी ॥
फळीं पुष्पीं बहु मोहरीं ॥ दाटले वृक्ष ॥५४॥
वापी कूप सरोवर ॥ पूर्णजळें वाहती पाझर ॥
कोकिळा हंस मयूर ॥ करिती क्रीडा ॥५५॥
अवकाळीं न पडे घन ॥ सूर्य न तपे दारुण ॥
सहस्त्र वरुषें येकक्षण ॥ गेलीं तयां ॥५६॥
मग भाद्रपदशुध्द द्वादशी ॥ दिवस मध्यान्ह प्रदेशीं ॥
जन्मला तो हृषीकेशी ॥ वामन रूपें ॥५७॥
स्वर्गीं जाहला जयजयकार ॥ पुष्पें वर्षती सुरवर ॥
ब्रह्मा करी नमस्कार ॥ अनंतासी ॥५८॥
नादें दाटलें त्रिभुवन ॥ वाजती दुंदुभी निशाण ॥
आरतिया करिती आपण ॥ उमासावित्री ॥५९॥
मग कश्यप आणि अदिती ॥ पाहती पुत्राची आकृती ॥
तंव चतुर्भुज आद्यमूर्ती ॥ दाविलें रूप ॥६०॥
चौदा भुवनें देखती उदरीं ॥ समुद्र वनें महागिरी ॥
सोम सविता पृथुकाकारीं ॥ देखिलीं समस्तें ॥६१॥
ऐसें देखतां सुखस्वरूप ॥ तंव तयांचे हरले ताप ॥
सवेंचि दाविलें विरूप ॥ वामनवेषें ॥६२॥
तो स्वयंज्योती स्वयंप्रकाश ॥ स्वतःश्री ज्ञानी परमहंस ॥
स्वयें विद्या वेदाभ्यास ॥ संपूर्ण तो ॥६३॥
तंव वर्षे जाहलीं सात ॥ मांडिला व्रतबंध तेथ ॥
ऋषिजन आले समस्त ॥ चूडाकरणासी ॥६४॥
जाहलिया दिवसाचें मान ॥ मग मांडिलें मौंजीबंधन ॥
समस्त पाचारिले मुनिजन ॥ तये वेळीं ॥६५॥
ब्रह्म्यानें दीधलें कमंडला ॥ कश्यपें वाहिली मेखळा ॥
उमासावित्रीं भिक्षे बाळा ॥ घातले लाडू ॥६६॥
पृथ्वीनें दीधलें आसन ॥ ऋषींहीं मौंजी कृष्णाजिन ॥
दंड दीधला पशुवारण ॥ चंद्रदेवें ॥६७॥
कुबेरें दीधलें पात्र ॥ आणि इंद्रें दीधलें छत्र ॥
बृहस्पति वाही कंठसूत्र ॥ तया देवा ॥६८॥
पित्यानें उपदेशिला मंत्र ॥ जो त्रिपदीचा वेदविचार ॥
मग सकळीं केला नमस्कार ॥ मुंजा यासी ॥६९॥
ब्रह्मा गेला निजस्थाना ॥ ऋषि कश्यपासि मागोनि आज्ञा ॥
ह्मणती आह्मी जाऊं यज्ञा ॥ बळीचिया ॥७०॥
मग ते निघाले समस्त ॥ मुंजिया त्यांतें प्रार्थित ॥
मी येईन जी विनोदार्थ ॥ तुह्मांसवें ॥७१॥
वेगीं पावले यज्ञभूमिके ॥ तंव राया जाणविलें सेवकें ॥
पातले जी मंत्रघोषें ॥ समस्त ऋषी ॥७२॥
तंव देखिली वामनमूर्ती ॥ बळी बोलिला शुक्राप्रती ॥
कीं ऐसी अपूर्व आकृती ॥ देखिली नाहीम ॥७३॥
पाहतां दिसे अति खुजट ॥ परी वेदविदाम वरिष्ठ ॥
कैसा बोलतसे शांतिपाठ ॥ तिहीं स्वरांचा ॥७४॥
तेथेम जाणोनि शुक्राचार्या ॥ ब्रह्मचारी ह्मणे तया ॥
हे यागपध्दती बळिराया ॥ नव्हे ऐसी ॥७५॥
अग्नित्रयांची स्थापना ॥ विपरीत केली हो ब्राह्मणा ॥
हे रायासि महा विघ्ना ॥ कारणभूत ॥७६॥
त्वां ग्रह पूजिले उफराटे ॥ वेदबीज मंत्रभ्रष्टें ॥
हें रायासि उत्कंठें ॥ सांगे विघ्न ॥७७॥
हे नव्हेगा सांगपध्दती ॥ साक्षीस दावितसे श्रुती ॥
तो सकळशास्त्रांची युक्ती ॥ बोले खुजट ॥७८॥
ऐसें देखोनियां बळी ॥ बटूस बोलाविला जवळी ॥
ह्मणे तुह्मीं असतां कवणे स्थळीं ॥ मातापिता कवण ॥७९॥
तुमचा असे कोण देश ॥ कोठें केला विद्याभ्यास ॥
आणि तुमचा कवण वंश ॥ नाम कवण ॥८०॥
ऐसें बळीनें पुसिलें ॥ ऐकतां वामना हसूं आलें ॥
मग काय सहजीम बोलिले ॥ बळीप्रती ॥८१॥
आह्मां नाहीं येक स्थळ ॥ पिता पोषितो केवळ ॥
तुह्मी असा आमुचे सकळ ॥ बंधुवर्ग ॥८२॥
मज नाठवे मातापिता ॥ तेव्हाम नाम कैंचे दैत्यनाथा ॥
विद्याभ्यास तरी करितां ॥ स्वमुखीं केला ॥८३॥
मज नाठवे जातीकुळ ॥ मी परदेशी केवळ ॥
एकलाएक असें सकळ ॥ तुह्मी माझे ॥८४॥
मज यावयाचें कारण ॥ तुझें ऐकिलें महादान ॥
थोर राखिलें महिमान ॥ पूर्वजांचें ॥८५॥
तुझा आजा तो प्रल्हाद ॥ तो पवित्रपणें सर्ववंद्य ॥
आणि संग्रामींही निंद्य ॥ नसे कदा ॥८६॥
जेणें रणीं जिंकिला काळ ॥ हिराविला हातींचा त्रिशूळ ॥
देव संग्रामीं अतिप्रबळ ॥ बोलिजे जो ॥८७॥
तुझा पिता तरी विरोचन ॥ तो आमुचा अंगलग जाण ॥
ऐसें आप्तपण जाणून ॥ आलों येथें ॥८८॥
बळि विस्मित होय मनीं ॥ वय सप्तवरुषें जाणोनि ॥
परि देवगुरुची वाणी ॥ बोले खुजट ॥८९॥
मग रायाचे मानसीं ॥ सात्विक वाटलें जीवासी ॥
आजि धन्य मी ऐशियासी ॥ जाहली भेटी ॥९०॥
माझिये वंशींची कीर्ती ॥ येणें वानिली बहुतीं ॥
तरी विद्यापात्र कल्पांतीं ॥ न जोडे ऐसा ॥९१॥
यासि दीजे तितुकें थोडें ॥ ह्मणोनि बोलाविला पुढें ॥
ह्मणे काय पाहिजे तेवढें ॥ मागें मज ॥९२॥
बटु ह्मणे गा राया बळी ॥ द्या जी तीनपदें महीतळी ॥
मठ करोनि तुज जवळी ॥ राहेन सदा ॥९३॥
तंव बळि बोले वचन ॥ बुध्दी मोठी परि याचिलें न्यून ॥
देश दुर्गें रत्नें कांचन ॥ मागावे कीं ॥९४॥
बटु ह्मणेआह्मी ब्राह्मण ॥ आह्मां कासया देशधन ॥
आह्मी करूं वेदपठण ॥ तुमचे भुवनीं ॥९५॥
द्रव्यमदाचें कारण ॥ भक्तिहीन आचरण ॥
भुलवणीसि तिहीं लोकीं जाण ॥ जोडलें जगीं ॥९६॥
तें मेळविजे महाकष्टें ॥ राहतां तरी तंव तें तुटें ॥
आणि गेलिया हृदय फुटे ॥ प्राणियाचें ॥९७॥
पाहताम तरी असे चंचळ ॥ बंधमोक्षाचें हेतु केवळ ॥
हें जाणत नाहीं सकळ ॥ तुजवांचोनी ॥९८॥
पहा वेणु आणि पृथु प्रसिध्द ॥ पुरूरवा आणि रुक्मांगद ॥
तिहीं राज्यलक्ष्मीसंबंध ॥ त्यागिला अंतीं ॥९९॥
ह्मणोनि आह्मां ब्राह्मणां ॥ कासया जी अधिक तृष्णा ॥
माझिये त्रिपदें त्रिभुवना ॥ संतोषें मी ॥१००॥
बळीनें दीधलें तथास्तु ॥ येरु हात वोडवी ह्मणे स्वस्तु ॥
मग बटु झाला इच्छितु ॥ संकल्पातें ॥१॥
रायें हातीम घेतली झारी ॥ शुक्र ह्मणे राया अवधारीं ॥
हा छळावया दैत्यारी ॥ आला तुज ॥२॥
वराहरूपें हिरण्याक्षा ॥ हिरण्यकश्यप नृसिंहवेषा ॥
तोचि आला असे देखा ॥ बटुरूपें हा ॥३॥
जेणें वधिला विरोचन ॥ तोचि जाणीं हा रमारमण ॥
हा दैत्यारी मधुसूदन ॥ जाण बळी तूं ॥४॥
हातींचें सांडीं पां जीवन ॥ येरू ह्मणे मी बोलिलों वचन ॥
तें अन्यथा होतां पतन ॥ पूर्वजांसी ॥५॥
समुद्र मर्यादा उचंबळे ॥ कीं शेष सांडील महीतळें ॥
तरी बोलिला बोल न टळे ॥ मज बळीचा ॥६॥
यज्ञ दानें तपें व्रतें ॥ जया कारणें करावीम बहुतें ॥
तोचि पावलिया आणिकातें ॥ कां इच्छावें ॥७॥
या यज्ञाचे अवसरीं ॥ येवढें पात्र कैंचे अवधारीं ॥
माझें थोर भाग्य ह्मणोनि हरी ॥ मागता जाहला ॥८॥
तूं ह्मणसी हा पूर्ववैरी ॥ परि याचक झाला माझे द्वारीं ॥
या दोहीं माजीं कवण थोरी ॥ सांगें मज ॥९॥
जरी समईं चुकिजे उचिता ॥ तरि जाइजे अधःपाता ॥
आतां संकल्प करितां सर्वथा ॥ न वंचावें तुह्मीं ॥११०॥
बळि ह्मणे हो एकनयनी ॥ मृगराज पाहें विचारोनी ॥
विना दोषें पडला पतनीं ॥ धार्मिक जो ॥११॥
तो सुशीळ शांत उदार ॥ देव धार्मिक जैसा दिनकर ॥
परि सरड जाहला सहस्त्र ॥ वरुषें वरी ॥१२॥
मी तरी बोलिलों वचनीं ॥ कीं त्रिपदें देईन मेदिनी ॥
तरी लटिकें होतां पतनीं ॥ जाईन पूर्वजेंसी ॥१३॥
मग ह्मणे राजा भारत ॥ नृग नृप कां जाहला पतित ॥
तंव मुनि ह्मणे राया वृत्तांत ॥ ऐक आतां ॥१४॥
तो इक्ष्वाकूचा कुमर ॥ सूर्यवंशींचा नृपवर ॥
दानधर्मीं अति उदार ॥ राजा नृग ॥१५॥
हत्ती घोडे वसुमती ॥ जेथें तीर सरस्वती ॥
दासी कन्या सालंकृतीं ॥ दीधलीं दानें ॥१६॥
मेघांचिया पडती धारा ॥ गणीत होय स्वर्गतारां ॥
परि नृगें गाई दीधल्या विप्रा ॥ तयां गणती नाहीं ॥१७॥
सदक्षिणा आणि सालंकृता ॥ सांवळ्या तारुण्य नवप्रसूता ॥
बहुक्षीरा धर्मार्जिता ॥ दीधल्या धेनु ॥१८॥
त्यांत येक कपिला जाण ॥ विप्रा दीधली संकल्पून ॥
ते घरा आली पळोन ॥ कळपामाजी ॥१९॥
परि स्वयें त्या ब्राह्मणें ॥ घेतलीं होतीं अलंकार भूषणें ॥
ह्मणे हें इतुकें तरी कवणें ॥ देखिलें होतें ॥१२०॥
विप्रें धेनूची सांडिली आशा ॥ ऐसें क्रमिलें बहुत दिवसां ॥
तोचि ब्राह्मण यागीं परियेसा ॥ आला होता ॥२१॥
मग कोणे एके अवसरीं ॥ रायें मांडिली यागभूरी ॥
जया आवडे तेंचि ते धरी ॥ मग संकल्पी रावो ॥२२॥
ते पूर्वदिवशीची धेनु दान ॥ दीधली होती संकल्पोन ॥
तेचि घेवोनि गेला ब्राह्मण ॥ दुजा एक ॥२३॥
पहिलियें धरिला त्याचा कर ॥ दुजा ह्मणे रे तूं तस्कर ॥
हे धेनु गा निर्धार ॥ माझीच जाण ॥२४॥
पहिला ह्मणे गा अवधारीं ॥ हे मज दीधली उभयखुरीं ॥
दानाचिये अवसरीं ॥ नृगरायानें ॥२५॥
ऐसी करोनि महा कळी ॥ दोघे आले रायाजवळी ॥
होत केशधरणी ते वेळीं ॥ दोघांजणां ॥२६॥
त्यांची ऐकोनियां कथा ॥ रावो ह्मणे जी द्विजसुता ॥
हे गाई म्यां काल विहितां ॥ दिधली यासी ॥२७॥
तरी ऐके धेनुसाठीं ॥ शत धेनु देईन पालटी ॥
ऐसी तो बोलिला गोष्टी ॥ राव विप्रासी ॥२८॥
मग दुजयासि ह्मणे राजा ॥ हे गाय देईं गा या द्विजा ॥
तुज सहस्त्र गाई देईन वोजा ॥ सालंकृता ॥२९॥
ब्राह्मण ह्मणे गा भूपाळा ॥ म्यां बांधिला जीचा गळा ॥
हात नाहीं अद्यापि वाळला ॥ संकल्पाचा ॥१३०॥
रायें येराचे धरिले चरण ॥ ह्मणे धेनूचें नाहीं मज ज्ञान ॥
तरी क्षमा कीजे आपणा ॥ द्विजोत्तमा ॥३१॥
ऐसें ऐकोनि नृगवचन ॥ क्रोधें खवळला ब्राह्मण ॥
मग रायासि शापदान ॥ देता जाहला ॥३२॥
ह्मणे राया तूं दानभ्रष्ट ॥ करितोसि रे कीर्ती चावट ॥
तरी सहस्त्र वरुषें सरट ॥ होसील कूपीं ॥३३॥
मग सांवरोनि ह्मणे सात्विकीं ॥ तूं पडशील शून्यनरकीं ॥
स्पर्श झालिया आदिपुरुषीं ॥ तैं उध्दरण ॥३४॥
पुढें देहावसानाचे अंतीं ॥ यम बोले तयाप्रती ॥
तूं पातक कीं पुण्य भूपती ॥ भोगिसी आधीं ॥३५॥
राव ह्मणे अहा कटकटा ॥ शाप झालारे ओखटा ॥
मग कालांतरीं देशवटा ॥ सांडिला तेणें ॥३६॥
यम ह्मणे तूं सर्वांगीं सुशीळ ॥ परि शापाचा अमंगळ ॥
ब्राह्मणशाप अढळ हा मळ ॥ पातकाचा ॥३७॥
राव ह्मणे आचरलों दुष्कृत ॥ त्याचें पाप आहे किंचित ॥
तें भोगोनि आधीं समस्त ॥ मग पुण्य भोगूं ॥३८॥
मग कोरडा पाहोनि आड ॥ तेथें तो घातला सरड ॥
ऐसा सहस्त्र वर्षें दंड ॥ झाला तया ॥३९॥
तंव द्वापारीं गोपिनाथ ॥ जो जन्मला मुक्तिपंथ ॥
ऐसा राज्य करितां संकेत आला शापाचा ॥१४०॥
तंव त्या कृष्णाचे कुमर ॥ मदन भानु आदि समग्र ॥
जे समस्त सहोदर ॥ ते आले तेथें ॥४१॥
ते करिती क्रीडाकेली ॥ आले तया कूपाजवळी ॥
तंव भीतरीं देखिला सकळीं ॥ कृकलास तो ॥४२॥
मग तयासि लावोनि दोर ॥ बांधोनि वोढिती समग्र ॥
परि तो नढळे पदमात्र ॥ कवणाचेनी ॥४३॥
यादव होवोनि विस्मित ॥ कृष्णाप्रति सांगती मात ॥
कीं कूपामाजी अद्भुत ॥ सरड येक ॥४४॥
ऐसेम ऐकताम आला मुरारी ॥ जो भक्तजनांचा कैवांरी ॥
आणि वसतसे निरंतरीं ॥ शिवहृदयीं तो ॥४५॥
जवळी येवोनि पाहे गोपाळ ॥ तंव तो नृगराव सुशीळ ॥
हात लावितां अळुमाळ ॥ आला वरी ॥४६॥
मग त्यासि जाहलें ज्ञान ॥ नयनीं देखे चिदानंदघन ॥
प्रेमें धांवोनि धरिले चरण ॥ श्रीहरीचे ॥४७॥
त्याचें जाहलें दिव्य शरीर ॥ हरपला मनींचा विकार ॥
जैसे अभ्राचे विरती पदर ॥ पोकळीमाजी ॥४८॥
तेणें आपुली सर्व कथा ॥ श्रुत केली गोपिनाथा ॥
जयजया जी कैवल्यनाथा ॥ श्रीहरी तूं ॥४९॥
मग तेथें उतरलें विमान ॥ रायासि बैसविती हरिगण ॥
त्यांहीं नृग नेला तत्क्षण ॥ वैकुंठासी ॥१५०॥
तेव्हां कृष्ण ह्मणे सकळिकां ॥ ब्रह्मस्व हे विषाची कूपिका ॥
विष नाशी पुरुषा ऐका ॥ परि हे वंशछेदक ॥५१॥
दहा पूर्व दहा पर ॥ पूर्वज भोगिती अधोर ॥
जें दिधलें अग्रहार ॥ तेंन घ्यावें दान ॥५२॥
ब्राह्मण कुकर्म आचरत ॥ परि त्यासि करावा प्रणिपात ॥
कीं वेळ पडलियाही घात ॥ न करावा त्याचा ॥५३॥
ऐसें सांगोनि कृष्णनाथ ॥ त्वरें गेला द्वारके आंत ॥
उध्दरिला नृपनाथ ॥ नृगराव तो ॥५४॥
बळि ह्मणे जी गुरुवर्या ॥ ऐसी नृगरायाची चर्या ॥
मी तरी प्रत्यक्ष वचन तया ॥ बोलिलों असें ॥५५॥
हे कथा सविस्तर रामायणीं ॥ आणि भागवतीं व्यासवाणी ॥
मग कोपोनि शुक्रमुनी ॥ बोले बळीसी ॥५६॥
शुक्रें शापिला तेव्हां बळी ॥ कीं तुझी श्री जाईल सकळी ॥
मज वारितां तरी अंजुळीं ॥ घेतलें उदक ॥५७॥
आतां असो हे नृगकथा ॥ बळीनें पूजिलें श्रीअनंता ॥
तें सांगेन सकळ श्रोतां ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥५८॥
इति श्रीकथाकल्पतरू ॥ द्वितीयस्तबक मनोहरू ॥
वामनाआख्यानप्रकारू ॥ षष्ठोऽध्यायीं कथियेला ॥१५९॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥