श्रीगणेशाय नमः
असो पांडवांचें दळ ॥ भीष्में पराभविलें सकळ ॥ तेणें रात्रीं सुटली तळमळ ॥ युधिष्ठिरासी ॥१॥
ह्नणे जेव्हांतेव्हां भीष्मदेव ॥ आमुचा करितो पराभव ॥ ह्नणोनि कृष्णासी मनोभाव ॥ पुसता जाहला ॥२॥
कीं हा भीष्म जिवंत असतां ॥ आह्मां जय नाहीं सर्वथा ॥ देवादानवां समस्तां ॥ अजेय हा ॥३॥
यासी आपण असों झुंजत ॥ हेंही करणें अयुक्त ॥ मज आज्ञा द्यावी यथार्थ ॥ जावया वनवासासी ॥४॥
सहजें इष्टमित्र आले ॥ ते आपणादेखतां मेले ॥ जे असती उरले सुरले ॥ तेही मरतील कीं ॥५॥
तरी याहूनि वन भलें ॥ ऐसें श्रीकृष्णें आयकिलें ॥ मग धर्मासि ह्नणितलें ॥ उत्साहार्थ ॥६॥
अगा भीष्म हा किंमात्र जाण ॥ मी ब्रह्मादिकां जिंकीन ॥ करोनि पार्थाचें संरक्षण ॥ पाहें कौतुक ॥७॥
ऐसें आश्वासन होतां भलें ॥ धर्मे कृष्णासि विनविलें ॥ ह्नणे तुवां हातीं धरिलें ॥ आह्मां अनाथांसी ॥८॥
परि त्वां होतां शस्त्रपाणी ॥ प्रतिज्ञेची होईल हानी ॥ यास्तव येतसे माझे मनीं ॥ तैसें कीजे ॥९॥
आपण सकळ समागमेंसीं ॥ जाऊं भीष्मदेवापाशीं ॥ मग प्रार्थोनियां तयासी ॥ मागों जय ॥१०॥
यावरी तो होवोनि कृपाळ ॥ सांगेल आपुलें निधनमूळ ॥ नातरी तो महाप्रबळ ॥ मरेल केवीं ॥११॥
हें श्रीकृष्णासी मानवलें ॥ मग शस्त्रें कवचें सांडोनि चालिले ॥ रात्रीं भीष्मशिबिरीं गेले ॥ धर्म आणि श्रीकृष्ण ॥१२॥
येरें स्वागत करोनि वहिलें ॥ आगमनकारण पुसिलें ॥ कीं तुमचें येणें जाहलें ॥ कवण कार्या ॥१३॥
धर्म ह्नणे जी गंगानंदना ॥ देवही नसाहती तवबाणा ॥ तरी कैसें साहवती नंदनां ॥ कुंतीचिये ॥१४॥
स्वामी पराक्रमें तुमचेनी ॥ आह्मी व्याकुळ जाहलों रणीं ॥ तरी पूर्ण कीजे निर्वाणी ॥ मनोरथ माझा ॥१५॥
हे संग्रामासि भूपती ॥ ससैन्य आले असती ॥ ते न मरतां राज्यप्राप्ती ॥ करावी मज ॥१६॥
तंव भीष्म ह्नणे धर्मातें ॥ मज वांचतां जय नाहीं तुह्मातें ॥ जेवीं आकाशपुष्प सर्वार्थे ॥ अप्राप्त सकळां ॥१७॥
तरी मज माराल जेव्हां ॥ जय प्राप्त होईल तेव्हां ॥ धर्म ह्नणे जी भीष्मदेवा ॥ तुह्मी काळासि अजिंक्य ॥१८॥
येरु ह्नणे स्त्रीरुपें जन्मला ॥ मग तयेचा पुरुष जाहला ॥ तो हा शिखंडी मजला ॥ मारणार ॥१९॥
तरी धर्मा त्यावरी जाण ॥ मज टाकणे नाहीं बाण ॥ यास्तव तो पुढें करोन ॥ मागोनि अर्जुनें विंधावें ॥२०॥
खडतरतील अर्जुनाचे बाण ॥ तेव्हां मज होईल मरण ॥ अथवा कृष्णहस्तें करुन ॥ नाहीं तिसरेयाचेनी ॥२१॥
ऐसें ऐकोनि धर्मकृष्ण ॥ शीघ्र स्वस्थळासि येवोन ॥ पांचही पांडव बैसोन ॥ करिती विचार ॥२२॥
पार्थ ह्नणे श्रीकृष्णासी ॥ भीष्म पितामह पूज्य आह्मासी ॥ पितयापरी बाळपणासी ॥ पोशिलें तेणें ॥२३॥
अगा स्नेह पोषण करी ॥ तो कैसा वधावा समरीं ॥ कृष्ण ह्नणे ययाउपरी ॥ ऐकें पार्था ॥२४॥
तुज गीतावाक्य उपदेशिलें ॥ तें मागुतें काय व्यर्थ जाहलें ॥ तरी ऐकें बृहस्पतीनें बोलिलें ॥ होतें इंद्रापती ॥ ॥२५॥
पिता अथवा गुरु ब्राह्मण ॥ समरीं आलिया शस्त्र घेऊन ॥ तो आतताई जाणोन ॥ त्यासी मारितां दोष नाहीं ॥२६॥
तरी युद्ध केलिया वांचोनी ॥ जय प्राप्त नाहीं निर्वाणी ॥ जयावांचोनि नाहीं जाणीं ॥ राज्य कीर्त्यादि ॥ ॥२७॥
ऐसियाउपरी अर्जुन ॥ श्रीकृष्णवाक्य अंगिकारोन ॥ शिखंडिया बोलावोन ॥ संवादलासे ॥२८॥
तंव जाहला प्रातःकाळ ॥ संसारलें पांडवदळ ॥ व्यूह रचिला उतावेळ ॥ शत्रुनिबर्हण ॥२९॥
पुढें शिखंडीसि करोनि वहिलें ॥ संग्रामासी चालिले ॥ तैसाचि व्यूह रचोनि चालिले ॥ कौरव देखा ॥३०॥
पुढां करोनि गंगानंदन ॥ संग्राम मांडिला दारुण ॥ भीमें कौरवसेना मारुन ॥ यमपुरीसी धाडिली ॥३१॥
तें दुःसह जाहलें भीष्मासी ॥ पराक्रम करोनि त्या दिवशीं ॥ वध केला पांडववीरांसी ॥ जेवीं अंतक प्रळयकाळीं ॥३२॥
भार दाहीदिशां पळविला ॥ तंव शिखंडी उठावला ॥ तेणें विषमप्रहार केला ॥ बाणीं भीष्मासी ॥३३॥
त्यासी भीष्म ह्नणे हांसोनी ॥ तूं विंधिसी अनंतबाणीं ॥ तथापि तुजवरी निर्वाणीं ॥ मी न टाकीं मार्गण ॥३४॥
तूं पूर्वी स्त्री होतासी ॥ तंव शिखंडी ह्नणे भीष्मासी ॥ तुवां जिंकिलें फरशधरासी ॥ समरंगणी ॥३५॥
तो तूं आजी मजसीं समरीं ॥ पराक्रमें युद्ध करीं ॥ ऐसेबोलोनि मर्मोत्तरीं ॥ बाण सोडिता जाहला ॥३६॥
तें देखोनि दुर्योधन ॥ भीष्माप्रति बोले वचन ॥ कीं हा दावानळ भीमसेन ॥ येणें सैन्यवन जाळिलें ॥३७॥
जेवीं मृगसमूहावरी ॥ उठावतसे केसरी ॥ तेवीं सैन्या केली बोहरी ॥ सौभद्रें आणि धृष्टद्युम्नें ॥३८॥
भीष्म ह्नणे म्यां पूर्वी तुजप्रती ॥ ऐसीं प्रतिज्ञा केली होती ॥ कीं दहासहस्त्र महारथी ॥ प्रतिदिवशीं मारीन ॥३९॥
हेंचि माझें आन्हिकपाहीं ॥ त्यासी अंतर पडलें नाहीं ॥ पांडव मारीन अथवा आजिही ॥ मी मरेन समरांत ॥४०॥
आजिचें उग्र कर्म ऐसें ॥ तुवां पहावें विशेषें ॥ यापरि बोलोनि आवेशें ॥ पडला पांडवसैन्यांत ॥४१॥
जैसा आकाशअंतर्गत ॥ माध्यान्हीं तपे आदित्य ॥ तैसा शोभे देवव्रत ॥ तये काळीं ॥४२॥
तेणें द्रुपदपुत्राचे वीर ॥ मारिले सातसहस्त्र ॥ जैसा सूर्य शोषी नीर ॥ स्वकिरणांहीं ॥४३॥
याउपरी तो धृष्टद्युम्न ॥ घेवोनि विराट अभिमन्य ॥ अपार दळ संसरोन ॥ उठावला भीष्मावरी ॥४४॥
तंव कांबोज राजा सुदक्षिण ॥ तेणें पराभविला अभिमन्य ॥ विराटरायासी ब्राह्मण ॥ अश्वत्थामा ॥४५॥
ऐसें असंख्यात वीरांसी ॥ युद्ध जाहलें ते दिवशी ॥ तंव अर्जुन शिखंडीसी ॥ ह्नणता जाहला ॥४६॥
कीं या भीष्मा तुजवांचोनी ॥ कोणी मारुं नशके रणीं ॥ तरी विलंब काय ह्नणोनी ॥ कीजत असे ॥४७॥
ऐकतां शिखंडी उठावला ॥ सवेंचि दळभार लोटला ॥ बाणीं भीष्म आच्छादिला ॥ तंव लोटले कौरव ॥४८॥
उभयां कदन वर्तलें थोर ॥ भूमी जाहली भयंकर ॥ चातुरंग पडलें अपार ॥ उभयकटकीं ॥४९॥
घारी गीध आणि ससाणे ॥ कोल्हे लांडगे आणि श्वानें ॥ ओढिती कबंधें मांसभक्षणें ॥ रक्तपानें करिताती ॥५०॥
भूतावळी खेतावळी ॥ क्षेत्रपाळ यक्षिणीची मंडपी ॥ तें बीभत्स वर्णिता सकळीं ॥ होईल बहुत विस्तार ॥५१॥
भीष्में समस्त शस्त्रघातीं ॥ रथी महारथी अतिरथी ॥ दूर उडाविले शीघ्रगती ॥ तृणवातन्यायें ॥ ॥५२॥
परि थोर खिन्न जाहला ॥ मनीं विचारुं लागला ॥ ह्नणे येके धनुष्यें सकळां ॥ मारितों या पांडवांसी ॥५३॥
परंतु यांचा श्रीहरीं ॥ जरी हा नसता साह्यकारी ॥ हें येक कारण भारी ॥ आणि दुसरा शिखंडी ॥५४॥
हा स्त्रीरुप ह्नणोनि समरीं ॥ बाण नटाकवे ययावरी ॥ या दोनी कारणीं समरीं ॥ न मारवती पांडव ॥५५॥
यांसी संग्राम करिजतो ॥ तो मज क्लेशमात्र होतो ॥ आयुष्यकाळ वृथा जातो ॥ तरी ऐसें करुं आतां ॥५६॥
पूर्वी मजलागीं तातें ॥ दोनी पदार्थ दीधले निरुते ॥ कीं युद्धीं इंद्रादिकांतें ॥ अजिंक्यपण ॥५७॥
हें येक असे वरदान ॥ आणि दुसरें स्वेच्छामरण ॥ तरी आतां परिज्ञान ॥ ऐसें होतसे ॥५८॥
म्रुत्युकाळ जाहला प्राप्त ॥ यास्तव पांडवांसी झुंजणें व्यर्थ ॥ ऐसें विचारी मनांत ॥ तंव नवल जाहलें ॥५९॥
आकाशस्थित वसु ऋषी ॥ त्यांहीं जाणोनि विचारासी ॥ ह्नणते जाहले भीष्मासी ॥ पूर्वसंबंधें ॥६०॥
अगा हेंचि रुचे आह्मालागोनी ॥ कीं निवर्तावें युद्धापासोनी ॥ तंव सुगंधवायु ते स्थानीं ॥ आला सुशीतळ ॥६१॥
देववाद्यें वाजिन्नलीं ॥ भीष्मावरी पुष्पवृष्टी जाहली ॥ वसुभीष्मेंसीं गोष्टी वर्तली ॥ ते नकळे कोणातें ॥६२॥
संजयो ह्नणे गा राया ॥ हें मी जाणें गांगेया ॥ असो देववाणी ऐकोनियां ॥ दुःखी जाहला गांगेय ॥६३॥
तंव बेगें तेचि वेळे ॥ बाण शिखंडीनें सोडिले ॥ अर्जुनेंही गुप्त प्रेरिले ॥ तेचि वेळे ॥६४॥
बाणवृष्टी थोर जाहली ॥ मर्मे भेदोनियां टाकिलीं ॥ भीष्मतनु बद्ध जाहली ॥ शरसंघातें ॥६५॥
पार्थे गुप्तबाणीं पाहीं ॥ भीष्म जर्जर केला ते समयीं ॥ राजे पळाले सर्वही ॥ टाकोनि भीष्मा ॥६६॥
भीष्मरथासमीप बहुधा ॥ पाडा घ्या मारा बांधा ॥ कापा तोडा ऐशा शब्दां ॥ जाहला आरंभ ॥६७॥
कांही उरला होता दिन ॥ तैं पार्थबाणें करुन ॥ जर्जर होवोनि गंगानंदन ॥ रथाखाली उलंडला ॥६८॥
तये वेळीं हाहाःकार ॥ येकचि वर्तला महाघोर ॥ शब्दें कंप सुटला थोर ॥ वसुंधरेसी ॥६९॥
जेवीं आकाशापासुनी ॥ इंद्रध्वज पडावा मेदिनी ॥ तैसा शब्द उठिला परि धरणी ॥ नाहीं स्पर्शला देवव्रत ॥७०॥
शरपंजरा माझारी ॥ देह राखिला झेलियापरी ॥ पुष्पवृष्टी केली सुरवरीं ॥ कंपितधरा ॥७१॥
तो दक्षिणायन अवधारीं ॥ ह्नणोनि कृष्णस्मरण करीं ॥ ऐशी वाणी ऐकोनि श्रोत्रीं ॥ पाहे होवोनि सावच ॥७३॥
जंव दक्षिणायन उत्तरायण ॥ प्रतीक्षा करी शंतनुनंदन ॥ तंव गंगेनें हंसरुपें देवोन ॥ ऋषी पाठविले त्याप्रती ॥७४॥
त्यांहीं भीष्मासि अवलोकिलें ॥ शरशय्ये शयन केलें ॥ मग तयाप्रति बोलिले ॥ कीं हें दक्षिणायन गा ॥७५॥
तरी प्राण न सांडणें ॥ यावरी येरु त्यांसि ह्नणे ॥ ऋषिहो मज स्वस्थळीं जाणें ॥ हें क्रमलिया दक्षिणायन ॥७६॥
ऐसें ऐकोनि देवव्रतास ॥ प्रदक्षिणा करोनि हंस ॥ स्वस्थानीं गेले स्वर्गास ॥ सांगावया गंगेतें ॥७७॥
तंव इकडे सूर्य मावळला ॥ सकळीं शस्त्रत्याग केला ॥ शरपंजरीं भीष्म देखिला ॥ कौरववीरीं ॥७८॥
मग सकळांहीं नमस्कारिलें ॥ तंव पांडवही निःशस्त्र आले ॥ भीष्मदेवा वंदिते जाहले ॥ येरें आश्वासिलें स्वागतां ॥७९॥
मग तयांसि ह्नणितलें ॥ माझें शिर शय्येखालीं पडलें ॥ तें लोबतें तरी वहिलें ॥ द्यारे उशीसी ॥८०॥
हें कौरवरायें ऐकोनिया ॥ मृदु कोमळा उशीशिया ॥ घातलिया आणोनियां ॥ मस्तकाखालीं ॥८१॥
तेणें भीष्ममन दुःखी जाहलें ॥ ते अप्रियत्वें निर्भर्त्सिले ॥ मग पार्थाकडे पाहिलें ॥ तेणें केले अश्रुपात ॥८२॥
गद्नदकंठें ह्नणे कौतेय ॥ स्वामी मी किंकर आहें ॥ आतां आज्ञा कीजे काय ॥ पाहिजे तें ॥८३॥
भीष्म ह्नणे तयासी ॥ या शरतल्पाचिये ऐशी ॥ वत्सा मज देई उशी ॥ लोंबतें शिर ॥८४॥
तंव पार्थे तिये क्षणीं ॥ स्वामी बरवें ह्नणोनि ॥ हातीं गांडिव घेवोनी ॥ अभिमंत्रिले सांयक ॥८५॥
मग त्यासी जाणवोनी ॥ लोंबतें मस्तक मार्गणीं ॥ उच्च केलें विंधोनी ॥ सकळां देखतां ॥ ॥८६॥
ययाउपरी तये वेळां ॥ भीष्म अंतरीं संतोषला ॥ ह्नणे गा पार्था भलाभला ॥ धनुर्धरामाजी ॥८७॥
तूं निपुण क्षत्रियधर्मासी ॥ आजि विशेषें शोभलासी ॥ जरी हें उसें न देतासी ॥ तरी करितों अपकार ॥८८॥
आजि येणें करितां पाहीं ॥ क्षत्रियधर्म तुझ्याठायीं ॥ मग सकळांसि तत्समई ॥ ह्नणता जाहला ॥८९॥
मी या शय्ये तंवपरियंत ॥ सुखें राहेन निद्रास्थित ॥ जंव उत्तरायणप्रवर्त ॥ होय सूर्यासी ॥९०॥
मग माझे हे प्रियप्राण ॥ उत्तरायणीं मी सोडीन ॥ तरी खंदक करा संपूर्ण ॥ माझिये शय्येभोंवता ॥९१॥
ऐसें करोनियां सकळीं ॥ तुह्मीं सुखें जावें स्वस्थळीं ॥ आजि युद्ध इये वेळीं ॥ राहों देया ॥९२॥
तंव अनेक वैद्य वहिले ॥ कौरवपतीनें आणविले ॥ ह्नणे उपचार करुं भले ॥ भीष्मदेवासी ॥९३॥
यावरी भीष्म त्यांसी ह्नणे ॥ इयेचि शय्ये सुंगती पावणें ॥ तरी औषधोपचार करणें ॥ व्यर्थ होय ॥९४॥
मग ह्नणे गांधारासी ॥ संतोषवीं या वैद्यांसी ॥ येरें मानोनि भीष्मवाक्यासी ॥ गेला करोनि खंदक ॥९५॥
पांडवही आज्ञा घेवोनी ॥ निघाले ससैन्य तत्क्षणीं ॥ तंव धर्मासि ह्नणे चक्रपाणी ॥ जात जातां ॥९६॥
हा तुझा बंधु बळिवंत ॥ येणें पाडिला गंगासुत ॥ जो देवां दैत्यां अजित ॥ त्रिशुद्धीसी ॥९७॥
धर्म ह्नणे जी देवदेवा ॥ हा तुझाचि उपकार आघवा ॥ तूंचि कर्ता हर्ता पांडवां ॥ लज्जारक्षक ॥९८॥
ऐसें परस्परें बोलोनी ॥ गेले आपुलाले स्थानीं ॥ विश्रांती गेलिया रजनी ॥ भानुउदय जाहला ॥९९॥
मग कौरव पांडवांदिक ॥ आदिकरोनि सकळिक ॥ भीष्माजवळी आले देख ॥ तंव जाहला नवलावो ॥१००॥
आकाशस्थ नितंबिनी ॥ आलिया लाजा घेउनी ॥ त्या भीष्मावरी विखुरोनी ॥ जाहला वाद्यगजर ॥१॥
बंदिजनीं स्तवन केलें ॥ महामंगळ वर्तलें ॥ ज्यांहीं भीष्मासि वंदिलें ॥ ते महापुरुष ॥२॥
असो भीष्मासमीप समग्र ॥ होवोनि पारके आप्त निर्वैर ॥ बैसले असती सानथोर ॥ वंदोनियां ॥३॥
ते इंद्रसभे समान ॥ सभा जाहली शोभायमान ॥ मांडिलें असे नृत्यकीर्तन ॥ वैष्णवांहीं ॥४॥
आशीर्वाद देती विप्र ॥ राजे करिती जयजयकार ॥ पुष्पवृष्टी होत अपार ॥ स्वर्गीहुनी ॥५॥
नानादुंदुभीचे नाद ॥ तेस्थळीं जाहले अगाध ॥ तेव्हां दुर्योधनादिकां शब्द ॥ बोलिला भीष्म ॥६॥
ह्नणे अर्जुनाच्या बाणीं ॥ विंधलों असें मर्मस्थानीं ॥ तेणें ताप अंतःकरणीं ॥ उपनलासे ॥७॥
तरी कंठओष्ठ पाहें ॥ शुष्क ताळु जाहली आहे ॥ आतां उदक मेळवीं लवलाहें ॥ तृषाशमनार्थ ॥८॥
तंव सर्व राजे धांवोनी ॥ पवित्रस्थळींचें पाणी ॥ घट आणिती भरोनी ॥ धरिले पुढें ॥९॥
ह्नणती स्वामी पवित्र नीर ॥ हें अंगिकारा जी शीघ्र ॥ तें देखतां विषाद थोर ॥ उपजला भीष्मासी ॥११०॥
मग ह्नणे इये अवसरीं ॥ आणि या शरतल्पकावरी ॥ हें जळ मी न स्वीकारीं ॥ अयोग्यपणें ॥११॥
याउपरी ह्नणे तयांतें ॥ मी पाहों इच्छितों पार्थातें ॥ ऐसें बोलिला तंव तेथें ॥ आला अर्जुन ॥ ॥१२।
तेणें साष्टांग प्रणाम केला ॥ कर जोडोनि उभा राहिला ॥ तैं देवव्रत संतोषला ॥ देखोनि त्यासी ॥१३॥
मग तो पार्थाप्रति ह्नणे ॥ अगा तुझे निर्वाणबाणें ॥ माझीं भेदलीं मर्मस्थानें ॥ तेणें जाहलों तृषार्त ॥१४॥
ओष्टप्रांत शोषले तेणें ॥ काहीं बोलवेना वचनें ॥ तरी हा दाह शमे जेणें ॥ ऐसें उदक पाजीं मज ॥१५॥
हें ऐकोनि धनुर्धरें ॥ ह्नणितलें जी स्वामी बरें ॥ मग जावोनियां त्वरें ॥ रथावरी बैसला ॥१६॥
गांडीव करीं घेतलें ॥ महाटणत्कारा केलें ॥ तेणें नादें कांपिन्नलें ॥ सकळ विश्व ॥१७॥
कौरवसैन्य खळबळलें ॥ ह्नणती अकस्मात काय मांडलें ॥ आश्वर्थ थोर उपनलें ॥ धर्मादिकांसी ॥१८॥
ह्नणती भीष्में काय कथिलें ॥ अर्जुनें काय आरंभिलें ॥ अवघे चिंतातुर जाहले ॥ पार्थे वंदिलें भीष्मासी ॥१९॥
मग त्यासी प्रदक्षिणा करोनी ॥ शय्ये दक्षिणभागीं येवोनी ॥ सर्वत्र दिशा पाहोनी ॥ जळदेवता नमियेल्या ॥१२०॥
पर्जन्यास्त्र लावोनि शितीं ॥ पार्थे बाणें विंधिली क्षिती ॥ तंव जळधारा शीघ्रगती ॥ आली आंतोनियां ॥२१॥
दिव्यगंधसुशीतळ ॥ अमृतप्राय स्वच्छ जळ ॥ उकळी चालिली निर्मळ ॥ उसळली वरती ॥२२॥
ते पडली भीष्ममुखीं ॥ आप्यायनें जाहला सुखी ॥ देखोनि भूपाळीं अनेकीं ॥ केला विस्मयो ॥२३॥
ह्नणती कर्म हें दारुण ॥ जाणे अर्जुनाचें अर्जुन ॥ भीष्म अंतरीं संतोषोन ॥ प्रशंसिता जाहला ॥२४॥
ह्नणे हें सामर्थ्य धनुर्धरा ॥ नव्हे इंद्रादिकां सुरवरां ॥ तूं महानुभाव चराचरा ॥ ख्यात नरनारायण ॥२५॥
हे विद्या हे चर्या ॥ तूंचि जाणसी धनंजया ॥ जयजयकार त्य समया ॥ जाहला अर्जुनासी ॥२६॥
नानावाद्यशब्द जाहले ॥ भीष्म पार्थालागिं बोले ॥ वत्सा धन्य तुझें जियाळें ॥ पावन केलें मजलागीं ॥२७॥
परि हा तुझा महिमा ॥ अपूर्व नव्हे वीरोत्तमा ॥ नारदें पूर्वकाळींच आह्मां ॥ कथिला होता ॥२८॥
जया साह्यकारी श्रीकृष्ण ॥ तो हा नररुप अर्जुन ॥ ख्याती करील दारुण ॥ जे कवणा न होय ॥२९॥
याचिकारणास्तव उदका ॥ म्यां मागीतलें देखा ॥ परि तें गांधार द्रोणादिकां ॥ नकळे पार्था ॥१३०॥
आणि नेणवे विदुरासी ॥ तथा नकळे बलरामासी ॥ हें ऐकोनि दुर्योधनासी ॥ परम दुःख वाटलें ॥३१॥
यावरी ह्नणे गंगासुत ॥ हें पार्थाचें कर्म अद्भुत ॥ दिव्यधारा पाताळगत ॥ काढिली बाणें ॥३२॥
मग दुर्योधनासि ह्नणे वचन ॥ आग्नेय सौम्य कीं वारुण ॥ वायव्य आणि वैष्णव जाण ॥ ऐंद्रपाशुपत ॥३३॥
ब्राह्म प्राजापत्यादिक ॥ ऐसे अस्त्रप्रयोग अनेक ॥ पार्थ जाणे कीं आणिक ॥ कृष्ण जाणे ॥३४॥
ठावो नाहीं तिसरेयासी ॥ ह्नणोनि या पांडवासीं ॥ युद्ध न करवे तुह्मांसी ॥ तरी करीं शिष्टाई ॥३५॥
जरी इच्छिसी बरवेयासी ॥ तरी इंद्रप्रस्थ द्या पांडवांसी ॥ नाश जाहला आह्मासी ॥ वैर येथचिपरियंत ॥३६॥
ऐसें वाक्य ऐकोनी ॥ तथा भीष्मवेदना देखोनी ॥ दुर्योधन जाहला मौनी ॥ उत्तर देतां ॥३७॥
असो कर्ण होता स्वस्थानीं ॥ तेणे भीष्मस्थिति आयकोनी ॥ मग येवोनि भीष्मचरणीं ॥ ठेविला माथा ॥३८॥
ह्नणे हा तुझा वैरीभूत ॥ कर्ण करितो दंडवत ॥ हें भीष्में ऐकतांचि त्वरित ॥ नेत्र उघडिले ॥३९॥
येकेहस्तें आलिंगन ॥ देवोनि बोलिला प्रिय वचन ॥ ह्नणे कर्णा देई अवधान ॥ तूं कुंतिपुत्र आहेसी ॥१४०॥
तरी सांडोनि वैरत्वासी ॥ सख्य करीं पांडवांसी ॥ येरु ह्नणे आजिवरी त्यांसी ॥ उपजविला क्रोध ॥४१॥
आतां दुर्योधनाचेनि कार्ये ॥ प्राण जाईल त्या उपायें ॥ करीन मी ऐसेंचि आहे ॥ भविष्य स्वामी ॥४२॥
यावरी भीष्म ह्नणे कर्णासि ॥ जरी युद्ध करितां जिंकिसी ॥ तरी भूमंडळराज्य पावसी ॥ होईल कीर्ती ॥४३॥
अथवा युद्धीं आलिया मरण ॥ तरी पावसी स्वर्गभुवन ॥ उभय अर्थी लाभ जाण ॥ परमपवित्रा ॥४४॥
ऐसें देवव्रत बोलिला ॥ मग कर्णे नमस्कारिला ॥ रथीं आरुढोनि गेला ॥ शिबिरीं आपुले ॥ ॥४५॥
पांडवांत गेला पार्थ ॥ स्वदळीं आला कौरवनाथ ॥ पुढां काय करील प्रवर्त ॥ तो ऐकावा द्रोणपर्वी ॥४६॥
हें भीष्मपर्व ऐकतां ॥ होय मुक्तीसायुज्यता ॥ पुढें सावधान द्यावें श्रोतां ॥ ह्नणे मधुकरकवी ॥४७॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ दशमस्तबक मनोहरु ॥ भीष्मयुद्धपतनप्रकार ॥ अष्टमाध्यायीं कथियेला ॥४८॥ शुभंभवतु ॥ ॥