कथाकल्पतरू - स्तबक १० - अध्याय १५

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

धृतराष्ट्र ह्नणे हो संजया ॥ अग्रकथा सांगें मांडोनियां ॥ येरु ह्नणे ऐक राया ॥ सावधानें ॥१॥

तृतीयांश उरली रात्री ॥ तेव्हां चंद्रप्रभेमाझारी ॥ युद्ध जाहलें घोरांदरीं ॥ तंव जाहला अरुणोदय ॥२॥

मग सर्व सैनिक ब्राह्मण ॥ स्त्रानसंध्यादि आटोपून ॥ द्विधा करोनियां सैन्य ॥ युद्धालागीं प्रवर्तलें ॥३॥

संग्राम भविन्नला अद्भुत ॥ बाणीं वरुषले भीमपार्थ ॥ वीरशिरांच्या लाखोल्या होत ॥ भूलिंगासी ॥४॥

द्रोणाचार्य समरंगणीं ॥ जैसा माध्यान्हींचा तरणी ॥ तैसा तप्त होवोनि बाणीं ॥ पांडवदळ संहारित ॥५॥

मत्स्य पांचाळ उठावले ॥ त्यांहीं द्रोणाचार्यासि भेदिलें ॥ परि कर्ण शकुनी दुःशासन आले ॥ द्रोणरक्षणार्थ ॥६॥

तंव धृष्टद्युम्ना ह्नणे भीमसेन ॥ आचार्य मारितो आपुलें सैन्य ॥ तरी पराक्रम दारुण ॥ करणें आजी ॥७॥

ऐसें बोलोनि चालिला ॥ परसैन्यांत प्रवेशला ॥ बाणीं वरुषता जाहला ॥ पळविलें दळ ॥८॥

येरीकडे धृष्टद्युम्नें वहिलें ॥ तैसेंचि शरजाळ सोडिलें ॥ तेणें वीर पळोनि गेले ॥ रथध्वजहीन ॥९॥

ऐसा घोर संग्राम जाहला ॥ तंव भास्कर माध्यान्हा आला ॥ अर्धदिन असे क्रमला ॥ ऐसियापरी ॥१०॥

मग ओसरोनि दोनी भारीं ॥ भोजनें केलीं मेळिकारीं ॥ पांचविये दिवशीं दुपारीं ॥ सन्नद्धले ॥११॥

परस्पर वाद्यांचे नाद ॥ अश्वगजनरांचे शब्द ॥ न ओळखवती विविध ॥ आपपरांतें ॥१२॥

धुरोळा उसळलासे गगनीं ॥ मांसकर्दम जाहला मेदिनीं ॥ पार्थद्रोणावांचोनी ॥ सर्वही मोह पावले ॥१३॥

नकुळ आणि सहदेवेंसीं ॥ गांधार झुंजे आवेशीं ॥ कर्णाभीमा द्रोणार्जुनेंसीं ॥ मांडलें घोरयुद्ध ॥१४॥

नकुळें चित्रमार्गणीं त्वरिता ॥ विमुख केलें कौरवनाथा ॥ मग तिष्ठतिष्ठ ह्नणता ॥ जाहला तेक्षणीं ॥ ॥१५॥

सहदेवो दुःशासनें ॥ पीडिला प्रखरमार्गणें ॥ येरें पांचबाणीं सत्राणें ॥ पाडिले अश्व सारथी ॥१६॥

इकडे भीमें सोडोनि बाण ॥ ताडिला हदयावरी कर्ण ॥ येरें सोडोनि दहा बाण ॥ भीमसेन विंधिला ॥१७॥

भीमें अष्टबाण मोकलिले ॥ त्याचे ध्वज धनुष्य छेदिलें ॥ आणि पार्थद्रोणा मांडलें ॥ घोरयुद्ध ॥१८॥

द्रोण जेंजें अस्त्र प्रेरी ॥ पार्थ तें तेंचि अस्त्रे निवारीं ॥ यावरी द्रोण सकलास्त्रीं ॥ वरुषला येकेचि वेळे ॥१९॥

ऐंद्र पाशुपत त्वाष्ट्र ॥ वायव्य आणि वारुणास्त्र ॥ हींही निवारिलीं शीघ्र ॥ स्वास्त्रीं अर्जुनें ॥२०॥

द्रोण विचारी अंतःकरणीं ॥ हा तंव अधिक मजहूनी ॥ ह्नणोनि झुंजल निर्वाणीं ॥ पार्थ निवारी तेतुलेंही ॥२१॥

तें पहावया अंतरिक्ष ॥ देव गंधर्व सिद्ध यक्ष ॥ अप्सरा राक्षस समक्ष ॥ मीनले देखा ॥२२॥

ते उभयां स्तविती सर्वहीं ॥ ह्नणती ऐसें युद्ध कहीं ॥ ब्रह्मादिकीं देखिलें नाहीं ॥ निश्वयपणें ॥२३॥

जरी द्विधा होवोनि रुद्र ॥ करील संग्राम घोरांदर ॥ तरी उपमेच बडिवार ॥ साजेल काहीं ॥२४॥

असो द्रोणें ब्रह्मास्त्र प्रेरिलें ॥ तेणें त्रिभुवन व्यापिन्नलें ॥ सैन्य सर्व आंदोळलें ॥ पार्थे निवारिलें ब्रह्मास्त्रें ॥२५॥

ऐसा हा संग्राम देखोन ॥ सुवर्णरथीं दुःशासन ॥ धृष्टद्युम्नेसि दारुण ॥ झुंजता जाहला ॥२६॥

धृष्टद्युम्नें बाणघातीं ॥ पाडिले रथ ध्वज सारथी ॥ येरु पराडमुख त्वरितीं ॥ होता जाहला ॥२७॥

इकडे युद्धीं कौरवनाथा ॥ सात्यकी जाहला पराभविता ॥ यावरी दुर्योधन बोलता ॥ जाहला त्यासी ॥२८॥

तूं माझा बाळमित्र असोनी ॥ युद्ध करिसी परहितकरणीं ॥ तरी बळ आचार बाणीं ॥ धिक् रे तुझीं ॥ ॥२९॥

बाळपणींचीं क्रीडावृत्तें ॥ काय स्मरत नाहीं तूतें ॥ येरु हांसोनि ह्नणे त्यातें ॥ अगा तो हा समय नसे ॥३०॥

ऐसें बोलोनि सक्रोध ॥ दोघीं केलें महायुद्ध ॥ बाण प्रेरिले प्रसिद्ध ॥ दहादहा प्रथमचि ॥३१॥

मग पन्नासपन्नास प्रेरित ॥ तदुपरि शत त्रिशत ॥ सात्यकीयें पीडिला बहुत ॥ दुर्योधन ॥३२॥

तें देखोनि कर्ण आला ॥ सात्यकीवरी बाणीं वरुषला ॥ शरधनु सारथी पाडिला ॥ तंव धांवला भीमसेन ॥३३॥

गदाघातें कर्णरथ ॥ ध्वज सारथी मोडित ॥ इतुक्यामध्यें धर्म बोलत ॥ भीमसेनासी ॥३४॥

ह्नणे अगा अर्जुनासवें ॥ पांचाळ मत्स्यादि आघवे ॥ गेले असती तेथ जावें ॥ तुवां सत्वर ॥३५॥

भीमें चतुर्धा सैन्य केलें ॥ तीनभाग तिकडे चालिलें ॥ समस्त द्रोणेंसी लागले ॥ युद्धकरुं ॥३६॥

जैस इंद्र दानवां संहारी ॥ तैसा द्रोण पांचाळां मारी ॥ परि त्या संकटीं महावीरीं ॥ साहिला तो ॥३७॥

तें पांचाळकदन देखोनी ॥ जयाशा सांडिली पांडवजनीं ॥ परि तेही त्रासविले बाणीं ॥ द्रोणाचार्ये ॥३८॥

देखोनि कृष्ण ह्नणे पार्था ॥ हा द्रोण जिंकवेना झुंजतां ॥ तरी उपावो रचूं आतां ॥ कापट्यपणें ॥३९॥

अश्वत्थामा जरी मरेल ॥ तरी हा प्राणत्याग करील ॥ परि नरुचे हा बोल ॥ अर्जुनासी ॥४०॥

परि तें रुचलें सर्ववीरां ॥ मग भीमें तया अवसरा ॥ सैन्यांत होता अवधारा ॥ अश्वत्थामा कुंजर ॥४१॥

तो मारोनि महाशब्द केला ॥ अश्वत्थामा मारिलामारिला ॥ द्रोणासि सांगावय गेला ॥ ह्नणे मेला अश्वत्थामा ॥४२॥

तें भीमोक्त आयकोन ॥ गलितगात्र जाहल द्रोण ॥ मनीं ह्नणे विचारोन ॥ तो तंव असे महावीर ॥४३॥

तो समस्तांचेनि अमर ॥ मग हस्तींचे टाकिले शर ॥ तंव पांचाळी बाणपूर ॥ मोकेलिले द्रोणावरी ॥४४॥

ते निवारोनि बाणें ॥ ब्रह्मास्त्र प्रेरिलें द्रोणें ॥ तेणें शिरें तत्क्षणें ॥ पाडिलीं पांचाळांची ॥४५॥

द्रोण उभा समरंगणीं ॥ जैसा धडाडीत वन्ही ॥ मारीतसे क्रोधेंकरोनी ॥ अपारवीरां ॥४६॥

ऐसा संतप्त देखोनी ॥ ऋषि हव्यवाह जमदग्नी ॥ विश्वामित्रादिक मुनी ॥ ऋषि गौतम ॥४७॥

भरद्वाज वसिष्ठ कश्यप ॥ गर्ग वालखिल्य सरीसृप ॥ आंगेरादि येवोनि समीप ॥ बोलते जाहले ॥४८॥

द्रोणा तुवां क्रूरकर्म ॥ केलें क्षात्रधर्मी सधर्म ॥ परि अतःपर संग्राम ॥ काळ नव्हे ॥४९॥

तूं सत्यवादी धर्मज्ञ ॥ चालें स्वर्गी शस्त्रें सांडोन ॥ तुझे मनोरथ संपूर्ण ॥ जाहले असती ॥५०॥

ऐसें तदुक्त आयकोनी ॥ पुढें भीमधृष्टद्युम्न देखोनी ॥ महादुःखिया होवोनी ॥ विचारिता जाहला ॥५१॥

ह्नणे धर्मासि पुसों विचार ॥ तो सत्यवक्ता युधिष्ठिर ॥ जरी मेल असेल पुत्र ॥ तरी सत्य सांगेल ॥५२॥

तें कळलें श्रीअनंता ॥ मग ह्नणे धर्मा पंडुसुता ॥ हा आजिचे दिवशीं समस्तां ॥ संहार करील ॥५३॥

तरी सत्यामाजी सरे ऐसें ॥ अनृत बोलावें विशेषें ॥ कीं इतुकिये ठायीं नसे ॥ असत्यीं पाप ॥५४॥

जीवनाशीं विवाहार्थ ॥ गाईब्राह्मणांचे निमित्त ॥ अनृत बोलिलें तरी ऋत ॥ शास्त्रज्ञ ह्नणती ॥५५॥

ऐसें बोले शारंगधर ॥ तंव येवोनि वृकोदर ॥ ह्नणे म्यां मारिला कुंजर ॥ अश्वत्थामा नामक ॥५६॥

तें सांगीतलें द्रोणासी ॥ परि सत्य न मानी मद्वचासी ॥ ह्नणोनि पुसेल तुह्मासी ॥ तरी मेला ऐसें सांगावें ॥५७॥

तें जाणोनि संकट प्राप्त ॥ बरवें ऐसें धर्म ह्नणत ॥ मग येवोनि द्रोण पुसत ॥ काय वृत्तांत पुत्राचा ॥५८॥

धर्म ह्नणे जी सद्भावा ॥ जाणों नरोवा कुंजरोवा ॥ अश्वत्थामा जाणावा ॥ कुंजरपुत्र ॥५९॥

परि तो मेला खरा अवधारीं ॥ तंव भूमीहूनि अंगुळें चारी ॥ उच्च रथ होते ते धरत्रीं ॥ लागले उभयतांचें ॥६०॥

धर्म आजन्म सत्यवंत ॥ असत्यास्तव खालावला रथ ॥ द्रोण दुःखें जड बहुत ॥ गेली शक्ति शरीरींची ॥६१॥

असो धर्मोक्त ऐकोनी ॥ आणि ऋषिवाक्य स्मरोनी ॥ धृष्टद्युम्न पुढां देखोनी ॥ आचार्य जीवनीं निराश जाहला ॥६२॥

ऐसा द्रोण देखोनि संतप्त ॥ धृष्टद्युम्न असे धांवत ॥ द्रोणा मारावयानिमित्त ॥ आला पुढां ॥६३॥

यज्ञांत अग्निपासोनु ॥ द्रुपद पावला होता धनु ॥ तें घेवोनियां बाणु ॥ सोडिता जाहला ॥६४॥

यमस्वरुप तें धनुष्य ॥ देखते जाहले सकळिक ॥ द्रोणें देखोनि विशेष ॥ सांडिली जीविताशा ॥६५॥

परि द्रोणेंही तिये वेळे ॥ आपातता युद्ध मांडिलें ॥ ध्वजधनुष्य छेदोनि पाडिलें ॥ धृष्टद्युम्नाचें ॥६६॥

येरु भ्रांत उदभ्रांत ॥ अविद्ध विद्ध प्लुताप्लुत ॥ सृत प्रसृत परिवृत्त ॥ निवृत्त देखा ॥६७॥

कौशिक पात संपात ॥ समुद्दीप आणि भारत ॥ ऐसें युद्धप्रकार बहुत ॥ दाविता जाहला ॥६८॥

दोहीं दळींचें वीर ॥ श्रीकृष्णादिक समग्र ॥ साधुशब्दें ॥ जयजयकार ॥ करिते जाहले ॥६९॥

परि गांधार ससैन्येंई ॥ क्रोधें आला झुंजावयासी ॥ तंव पांडववीर आवेशीं ॥ उठावले त्यावरी ॥७०॥

हातपाय धडशिरें ॥ धनुष्य छत्रें चामरें ॥ भग्न रथचक्र कलेवरें ॥ नृत्य करिताती ॥७१॥

तेव्हां धर्म सकळांसि ह्नणे ॥ हा धृष्टद्युम्न द्रोणाकारणें ॥ आतां मारील तरी होणें ॥ साहाय यासी ॥७२॥

मग सत्यसंध सृंजयादिक ॥ आले धृष्टद्युम्नापें सकळिक ॥ तेवेळीं मेदिनी सकंप ॥ जाहली देखा ॥७३॥

रुक्ष वायु वाजिन्नला ॥ द्रोण अत्यंत क्षोभला ॥ धृष्टद्युम्ना देखोनि मांडिला ॥ प्राणांतसंग्राम ॥७४॥

वृष्टी करोनि शरधारीं ॥ मारिले येकलक्ष क्षेत्री ॥ दिसे निर्धूम रणक्षेत्रीं ॥ वन्हि जैसा ॥७५॥

तेणें धृष्टद्युम्न विरथ केला ॥ विकळ देखोनि भीम आला ॥ रथीं वाहूनियां बोलिला ॥ अगा न धरीं भय काहीं ॥७६॥

द्रोणाचार्या तुजवांचोनी ॥ मारिता दुजा नाहीं कोणी ॥ येरें बहुत बरवें ह्नणूनी ॥ घेतलें शस्त्र ॥७७॥

तें प्रेरोनियं सत्वरें ॥ नाशिलीं द्रोणाची सर्वास्त्रें ॥ कौरवां बाल्हिकां शरें ॥ मारिता जाहला ॥७८॥

द्रोणेही तये अवसरीं ॥ पांडवदळ मारिलें भारी ॥ चातुरंगधडमुंडीं धरत्री ॥ अगम्य केली ॥७९॥

हें देखोनि भीम ह्नणे ॥ हे क्षुद्रवीर वृथा मारणें ॥ एकापुत्रा कारणें ॥ हें युक्त नाहीं ॥८०॥

स्वकर्मस्थ अकर्मस्थ ॥ इच्छूनि धनदारा सुत ॥ मारणें तरी क्षुद्र जंत ॥ उचित नव्हे ॥८१॥

तंव द्रोण ह्नणे गा कर्णा ॥ कृपाचार्या दुर्योधना ॥ तुह्मी संग्राम करा जाणा ॥ मी शस्त्रें टाकितों ॥८२॥

पांडवांसी हो कल्याण ॥ ह्नणोनि केलें शस्त्रविसर्जन ॥ तें छिद्र पाहोनि धृष्टद्युम्न ॥ खङ्ग घेवोनि धांवला ॥८३॥

तंव हाहाःकार करोनी ॥ हे धिक् ह्नणती सर्व प्राणी ॥ परि तो आला धांवोनी ॥ तैं द्रोण ध्यानीं निमग्न ।८४॥

योगें ज्योतिस्वरुप होवोनी ॥ प्रणव उच्चारी अंतःकरणीं ॥ जपत असतां शिव ध्यानीं ॥ स्वर्गी चालिला ॥८५॥

तेव्हां क्षणमात्र गगन ॥ जालें ज्योतिरुप शोभायमान ॥ तें रुप मी कीं कृष्णार्जुन ॥ कृपादिकीं देखिलें ॥८६॥

आणिक न देखती कवणी ॥ असो द्रोण विगतप्राण रणीं ॥ तंव त्याचें शिर ह्नणोनी ॥ पाडिलें धृष्टद्युम्नें ॥८७॥

मग सिंहनाद केला ॥ परि सैनिकीं धिक्कारिला ॥ ह्नणती अचेतन देहाला ॥ येणें केलें छिन्नशिर ॥८८॥

तेणें बळेंचि वधिलें ॥ त्याचेनि रक्तें अंग आपुलें ॥ सर्व माखोनियां घेतलें ॥ दिसे कृतांतवन ॥८९॥

मग त्याचें शिर घेवोनी ॥ दीधलें कौरवांत टाकोनी ॥ तंव ते सैनिक तत्क्षणी ॥ पळों लागले ॥९०॥

परम भयभीत महावीर ॥ पळाले दशदिशां समग्र ॥ धृष्टद्युम्ना वृकोदर ॥ आलिंगोनि बोलत ॥९१॥

ह्नणे तूंचि केला जय ॥ मी तुज आहें साहाय्य ॥ ऐसें ह्नणोनियां बाह्ये ॥ थापटिता जाहला ॥९२॥

तेणें त्रासें सकळ ॥ भय पावलें कौरवदळ ॥ पुढें ऐकावी कथा रसाळ ॥ ह्नणे मधुकरकवी ॥९३॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ दशमस्तबक मनोहरु ॥ द्रोणवधकथनप्रकारु ॥ पंचदशाध्यायीं कथियेला ॥९४॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP