श्री नवनाथ भक्तिसार पोथी - अध्याय ३२

श्रीनवनाथभक्तिसार ही पोथी अत्यंत श्रेष्ठ असून परमप्रासादिक आहे व साधकाला विधिपूर्वक वाचन केले असता दिव्य अनुभव मिळतो.


श्रीगणेशाय नमः

जयजय जगदुद्धारा ॥ जगदाश्रिता रुक्मिणीवरा ॥ दीनबंधो दयासागरा ॥ वीरा सुरवरा तूं एक ॥१॥

तरी ऐसा प्रभू समर्थ सर्वा ॥ सुरवरांप्रती जैसा मघवा ॥ तरी आतां कृपार्णवा ॥ ग्रंथादरीं येईं कां ॥२॥

मागिले अध्यायीं कथन ॥ चौरंगी बैसे तपाकारण ॥ उपरी गोरक्ष मच्छिंद्रनंदन ॥ गिरनारगिरीं पोचले ॥३॥

पोचले परी आनंदभरित ॥ प्रेमें वंदिला मच्छिंद्रनाथ ॥ पुढें पाहतांचि अत्रिसुत ॥ आनंदडोहीं बुडाला ॥४॥

मच्छिंद्रातें कवळूनि हदयीं ॥ म्हणे माझी आलीस गे आई ॥ चक्षु मीनले तुझे ठायीं ॥ मार्ग पाहें पाडसापरी ॥५॥

जैसें इंदूचें आगमन ॥ तिकडेचि हेलावे समुद्रजीवन ॥ तेवीं तुझे मार्गेकरुन ॥ चक्षू वेधले माझे बा ॥६॥

तरी आतां असो कैसें ॥ माझें मला भेटलें पाडसें ॥ तरी वत्सा सांडूनि आम्हांस ॥ जाऊ नको पुढारां ॥७॥

ऐसी धृति वृत्ति मती ॥ ऐक्य झाली उभयव्यक्ती ॥ जैसें जळ जळाप्रती ॥ ऐक्य होय मेळवितां ॥८॥

मग नाना गोष्टी विचारप्रसंग ॥ तीर्थगमनादि योगसंयोग ॥ दुःखसुखादि सकळ प्रयोग ॥ एकमेकां निवेदिले ॥९॥

आसन वसन भोजन शयनीं ॥ सदा सन्निध मच्छिंद्रमुनी ॥ जैसें अर्भका तान्हूले मनीं ॥ माय नातळती होईना ॥१०॥

ऐसे मोहाचिये परी ॥ षण्मास लोटले तैं गिरीं ॥ यापरी गोरक्ष सदनांतरीं ॥ तीर्थस्थानीं जल्पतसे ॥११॥

मग तो श्रीदत्ताकारण ॥ म्हणे महाराजा अत्रिनंदन ॥ तीर्थ केलें साधुदर्शन ॥ करावया महाराज ॥१२॥

तरी आम्हां आज्ञा द्यावी ॥ आतां लंघूनि येतों मही ॥ मही धुंडाळल्या संगमप्रवाहीं ॥ साधु मिरवती महाराजा ॥१३॥

तरी याचि निमित्ताकारणें ॥ आम्ही घेतला आहे जन्म ॥ सकळ जगाचें अज्ञानपण ॥ निवटावया महाराजा ॥१४॥

ऐसें बोलतां गौरसुत ॥ दत्त ग्रीवा तुकावीत ॥ आणि पुढील जाणूनि भविष्यार्थ ॥ अवश्य म्हणे पाडका ॥१५॥

मग परमप्रीतीं स्नेहेंकरुन ॥ बोळविता झाला उभयांकारण ॥ येरीं उभयें करुनि नमन ॥ पर्वताखाली उतरले ॥१६॥

मार्गी चालती उभय जण ॥ परी त्या पर्वता क्षणोक्षण ॥ पाहे मच्छिंद्रनंदन ॥ म्हणे प्राण अंतरला ॥१७॥

प्रेमाक्षु ढाळी नयनीं ॥ पुढें ठेवी पदालागुनी ॥ ऐसें चालतां तया अवनीं ॥ दुरदुरावा पडला असे ॥१८॥

मग मार्ग धरुनि काशीपुरी ॥ चालते झाले ते अवसरीं ॥ मुक्कामोमुक्काम लंघितां धरित्री ॥ प्रयागस्थानीं पातलें ॥१९॥

तों त्या गांवीं मूर्तिमंत ॥ औदार्यराशि प्रतापादित्य ॥ त्रिविक्रम नामें नृपनाथ ॥ धर्मप्राज्ञी नांदतसे ॥२०॥

गज वाजी रथ संगतीं ॥ जयाची सेना अपरिमिती ॥ तरी अधर्मनाशार्थ निगुतीं ॥ सैन्यसिंधू मिरवला ॥२१॥

भद्रासनी तो राजेश्वर ॥ जयाची संपत्ति औडंबर ॥ पाहूनि लाजती अमर ॥ हा एक प्रभू म्हणती ते ॥२२॥

ऐसियेपरी राजसंपत्ती ॥ परी उदरी नाहीं संतती ॥ तैशांत देहीं जरा निगुती ॥ प्राप्त झाली बळत्वें ॥२३॥

परी तो राजा सुगम प्राज्ञ ॥ परोपकारी अपार ज्ञान ॥ मूर्तिमंत जयाचें संधान ॥ पाळीत असे नेटका ॥२४॥

तयाचे राज्यांत बावन्न वर्ण ॥ कोणी न देखों अकिंचन ॥ संत आलिया करिती पूजन ॥ सकळ जगीं मिरवतसे ॥२५॥

चौदा विद्यांमाजी कुशल ॥ जैसा दुसरा मूषकपाळ ॥ हीनदीनांची माय कनवाळ ॥ आणि काळ तत्काळ शत्रुचा ॥२६॥

सकल गृहीं देशावर ॥ त्या राजाचा परोपकार ॥ त्यामुळे मिरवती सकळ नर ॥ चिंताविरहित सुखानें ॥२७॥

असो ऐसे तेजस्थिती ॥ तया देशीं पावले निगुती ॥ तेथें सकळ नारीनर क्षितीं ॥ विजयवचनीं गर्हिवरले ॥२८॥

यापरी तयाची गृहस्वामिनी ॥ जिये मिरवती ज्ञानखाणी ॥ पतिव्रता सौदामिनी ॥ षडर्णवगुणी गुणस्वी ॥२९॥

कीं राव तो उत्तम धवळार ॥ तैं दिसती ती स्तंभाकार ॥ कीं संसारमहीचा हांकणार ॥ अनंतरुपीं नटलासे ॥३०॥

ऐसेपरी राजयुती ॥ परी जरा पाहूनि रायाप्रती ॥ तेणें भयार्त होऊनि चित्तीं ॥ चिंतेमाजी पडली असे ॥३१॥

म्हणे रायाचे सकळ अवसान ॥ जिंकूनि नेलें आहे जरेनें ॥ नेणों दिवस येईल कोण ॥ संगतीसी सोडावया ॥३२॥

ऐसीं चिंता व्यापिली चिंत्तीं ॥ तों रायासी भरली आयुष्यभरती ॥ तप्त शरीरी पाहूनि वृत्ती ॥ गमन करी परत्र ॥३३॥

प्राण सांडूनि शरीरातें ॥ गेला असें निराळपंथें ॥ महीं उरलें असे प्रेत ॥ झाला आकांत राज्यांत ॥३४॥

पवित्रनामी रेवती ललना ॥ अट्टहास करी शोकरुदना ॥ तेचि रीतीं इतर जनां ॥ दुःखप्रवाह लोटला असे ॥३५॥

आठवूनि त्रिविक्रमरायाचे गुण ॥ परम आक्रंदती जन ॥ म्हणती पुनः या रायासमान ॥ होणार नाहीं दूसरा ॥३६॥

ऐसे अट्टहास्यें घरोघरीं जन ॥ नारीनरादि दुःखसंपन्न ॥ तये संधींत गांवी येऊन ॥ नाथ तेथें पातले ॥३७॥

तें क्षेत्र महान प्रयागस्थान ॥ उभय संचरती त्याकारण ॥ तो गृहोगृहीं दुःखनिमग्न ॥ शोकाकुलित मिरवले ॥३८॥

कोणी शरीर टाकीत अवनीं ॥ कोणी पडले मूर्च्छा येऊनी ॥ कोणी योजूनि हदयीं पाणी ॥ धबधबा पिटिती ते ॥३९॥

कोणी येऊनि पिशाचवत ॥ इकडून तिकडे धांव घेत ॥ अहां म्हणूनि शरीरातें ॥ धरणीवरी ओसंडिती ॥४०॥

कोणी धरणीवरी आपटिती भाळ ॥ रुधिरव्यक्त करुनि बंबाळ ॥ अहा त्रिविक्रमराव भूपाळ ॥ सोडूनि गेला म्हणताती ॥४१॥

ऐसियेपरी एकचि आकांत ॥ नारीनरादि बोलती समस्त ॥ तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ परमाचित्तीं कळवळला ॥४२॥

सहज चालतां तेथ पथ ॥ ठायीं ठायीं उभा राहात ॥ त्या रायाचे गुण समस्त ॥ आठवूनि रडताती ॥४३॥

धर्मज्ञानिक रायाचे गुण ॥ मोहकपणीं होतां श्रवण ॥ तंव ते वेळीं तो मच्छिंद्रनंदन ॥ मोहदरींत रिघतसे ॥४४॥

मनांत म्हणे धन्य पुरुष ॥ जयासाठीं जग पिसें ॥ जाहलें आहे तस्मात यास ॥ राव उपकारी वहिवाटला ॥४५॥

तरी हा ऐसा भलेपणीं ॥ राव मिरवला आहे अवनीं ॥ तरी यातें पुनः आणोनी ॥ देहंगत करावा ॥४६॥

ऐसें योजूनि स्वचित्तांत ॥ पाहें रायाचें आयुष्य भरत ॥ तंव तो राव तितुकियांत ॥ निरामयीं पोंचला ॥४७॥

राव नुरलासे जिवितपणीं ॥ मिळाला ऐक्यें ब्रह्मचैतन्यीं ॥ ऐसें देखतां अजीवितपणीं ॥ मग उपाय ते हरले ॥४८॥

कीं मुळींच बीजा नाहीं ठाव ॥ मग रुखपत्रीं केवीं हेलाव ॥ तेवीं जीवितपणीं राणीव ॥ नातुडपणीं उतलीसे ॥४९॥

मग स्तब्ध होऊनि मच्छिंद्रनंदन ॥ परतता झाला ग्रामातून ॥ परी मच्छिंद्राहूनि गौरनंदन ॥ कळवळला स्वचित्तांत ॥५०॥

राज्यभागीं जगाचें बोलणें ॥ ऐकूनियां गौरनंदनानें ॥ मोहें चित्तस्फोट होऊन ॥ अश्रु ढाळी नयनातें ॥५१॥

ऐसें स्थिती ग्रामांतून ॥ निघते झाले उभय जण ॥ तों ग्रामाबाहेर निवांत काननीं ॥ शिवालय देखिलें ॥५२॥

तें पाहूनि एकांतस्थान ॥ जाते झाले तयाकारण ॥ तों पलीकडे मोहक जन ॥ प्रेतसंस्कार मांडिला ॥५३॥

प्रेत स्कंधीं वाहूनि चतुर्थ ॥ येते झाले शिवालयांत ॥ सवें अपार जन वेष्टित ॥ शोकसिंधु उपासिती ॥५४॥

परी आकळीकपणें वंचना ॥ शोकसिंधूची दावी भावना ॥ परम आटूनि आपुल्या प्राणा ॥ प्रेतालागीं कवटाळिती ॥५५॥

यापरी गांवोगांवीचे जन ॥ तेही ऐकूनि वर्तमान ॥ धांव घेती आक्रोशपणें ॥ आप्तजनांसारिखे ॥५६॥

तें पाहूनियां गोरक्षनाथ ॥ परम कळवळूनियां चित्तांत ॥ बोलतां झाला मच्छिंद्रातें ॥ ऐशा पुरुषा उठवावें ॥५७॥

मच्छिंद्र ऐकून तयाची वाणी ॥ उगाचि बैसें म्हणे तयालागुनी ॥ परी स्थिर नोहे गोरक्षमुनी ॥ पुन्हां वागुत्तर देतसे ॥५८॥

म्हणे जरी तुम्ही न उठवाल यातें ॥ तरी मी उठवीन स्वसामर्थ्ये ॥ मच्छिंद्र म्हणे तुझें सामर्थ्य ॥ त्यास उठवावया नसे की ॥५९॥

ऐसें ऐकूनि गोरक्ष वदत ॥ म्हणे याच्यासाठी वेचीन जीवित ॥ परी सुखी करीन सकळ जनांते ॥ निश्चयेंसीं महाराजा ॥६०॥

जरी न उठवें माझेनि राजा ॥ तरी अग्नीत ओपीन शरीर ओजा ॥ हाचि सिद्धार्थ पण माझा ॥ निश्चयेंसीं वरिला असे ॥६१॥

जरी ऐसिया बोला संमत ॥ जरी माते न घडे नाथ ॥ तरी रौरव भोगीन कोटि वर्षांत ॥ कुंभीपाक महाराजा ॥६२॥

ऐसें बोलतां दृढोत्तरवचन ॥ मग बोलता झाला मच्छिंद्रनंदन ॥ अहा वत्सा शोधाविण ॥ व्यर्थ काय वदलासी ॥६३॥

सारोखपणे केलासी पण ॥ राव उतरला जीवित्वेंकरुन ॥ ब्रह्मरुपीं सनातन ॥ ऐक्यरुपीं मेळ झालासे ॥६४॥

ऐसें बोलतां वसुआत्मज ॥ मग तो गोरक्षमहाराज ॥ हदयीं शोधितां तेंचि ओज ॥ लक्षापरी भासलें ॥६५॥

मग म्लान करुनि आपुलें वदन ॥ म्हणे आतां अग्नि घेईन ॥ मग प्रत्योदक तेथूनि उठून ॥ काष्ठांलागीं मेळविलें ॥६६॥

तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ परम झाला भयभीत ॥ चित्तीं म्हणे हा प्राणातें ॥ चुकणार नाहीं द्यावया ॥६७॥

जेणें वडे आणायाकरितां ॥ चक्षु काढूनि आपुले हाता ॥ तोषविली विप्रदुहिता ॥ निबरगट्ट हा असे ॥६८॥

मग पाचारुनि गोरक्षातें ॥ बोलता झाली प्रांजळवत ॥ म्हणे बा रे सुखी करावें जनातें ॥ यालागीं वदलासी ॥६९॥

तरी जनांचे उपकारास ॥ उदार झालासी प्राणास ॥ चित्तीं तुझे समाधानास ॥ विचार एक ऐकावा ॥७०॥

मी याचे देहस्थित ॥ होतों रक्षाया तुझा हेत ॥ परी बा माझिया शरीरास ॥ द्वादश वर्षे सांभाळीं ॥७१॥

द्वादश वर्षे जाहलिया पूर्ण ॥ पुन्हां देहात देहांतर्गत होऊन ॥ सकळ जगाचें करुं कल्याण ॥ उपकारीं मिरवेन बा ॥७२॥

ऐसे बोलतां मच्छिंद्रनाथ ॥ अवश्य गोरक्षक म्हणत ॥ मग शीघ्र सांडूनि शरीरातें ॥ रायशरीरीं संचरला ॥७३॥

संचरला परी स्मशानहीं ॥ उठोनि बैसला राजदेहीं ॥ तें पाहोनियां लोक सर्वही ॥ आनंदसरिते मिरवले ॥७४॥

जैसा पक्षियें मांडिला ठाव ॥ मिरवे वृक्षा अन्य वाव तेवीं देहातें सांडूनि बरवें ॥ रावदेहीं संचरला ॥७५॥

लोक म्हणती आम्हां प्रजेकारण ॥ मोहें वेष्टिलें हरिहरांचे मन ॥ म्हणोनि होऊनि सुप्रसन्न ॥ रायालागीं जीवविलें ॥७६॥

एक म्हणती आयुष्य होतें ॥ काळें हरण केलें जीवंत ॥ चुकारपणीं समजूनि मागुतें ॥ जीवविलें रायातें ॥७७॥

असो ऐशा बहुधा प्रकरणीं ॥ आनंद वदतसे जगाची वाणी ॥ मग ते परम हर्षेकरुनी ॥ स्वस्थानातें पावले ॥७८॥

विधिवत् कनकाचा पुतळा करुन ॥ स्मशानक्रिया संपादून ॥ पाहते झाले आपुलें स्थान ॥ आप्तजनांसमवेत ॥७९॥

येरीकडे शिवालयांत ॥ सच्छिष्य महाराज गोरक्षनाथ ॥ रक्षावया गुरुचें प्रेत ॥ स्थानालागीं विचारी ॥८०॥

तों तितुक्यांत आली पूजारणी ॥ होती शैवगुरविणी ॥ तियेलागी पाचारुनी ॥ वृत्तांतातें निवेदी ॥८१॥

म्हणे माये रायाकरितां ॥ आणि प्रजेची धरुनि ममता ॥ मम गुरु मच्छिंद्र केला सरता ॥ राजदेहाकारणें ॥८२॥

तरी आतां श्रीगुरुचें प्रेत ॥ कवणा ठायीं रक्षूं यातें ॥ जरी तुजला आहे माहीत ॥ ठात मातें सांग कीं ॥८३॥

ठाव तरी म्हणसील कसा ॥ गुप्त जगांत न कळे लेशा ॥ पूर्ण झाली द्वादश वर्षे ॥ पुनः श्रीगुरु उठेल वो ॥८४॥

तरी तूं ठाव ऐसा मनांत ॥ सांगूनि दृढ रक्षीं प्रेत ॥ आणि स्वचित्तीं रक्षुनियां मात ॥ गुप्त जगीं वर्ते वो ॥८५॥

तरी या कर्मासी साक्षभूत ॥ तुझें माझें उभय चित्त ॥ ही गोष्ट कळतां जनांत ॥ परम परम विक्षेप वाटेल गे ॥८६॥

तरी आतां चिंतार्णवीं ॥ झालें कर्म वडवानलदेहीं ॥ धैर्यजळाचे प्रवाहडोहीं ॥ गुप्त यातें रक्षावें ॥८७॥

ऐसें बोलतां तपःप्राज्ञी ॥ अवश्य म्हणत शैवराणी ॥ मग त्या शिवालयामध्यें नेऊनी ॥ गुप्त गुहार दावीतसे ॥८८॥

तेंही गुप्त गुहार जगांत ॥ माहीत नव्हतें किंचितार्थ ॥ तें दावूनि गोरक्षनाथ ॥ तुष्ट केला स्वदेहीं ॥८९॥

मग तें गुहाग्रामींचें मुख ॥ मही विदारुनि पाहे देख ॥ उत्तम ठाव लक्षूनि तेथ ॥ प्रेत त्यांत ठेवीतसे ॥९०॥

प्रेत ठेवोनि गुहागृहांत ॥ मुख आच्छादिलें त्वरितात्वरित ॥ गृह लक्षूनि पुन्हां आलयांत ॥ येवोनियां बैसला ॥९१॥

बैसे परी शैवकांता ॥ म्हणे महाराजा गोरक्षनाथा ॥ द्वादश वर्षे रक्षीन प्रेता ॥ निश्चय त्वां केला असे ॥९२॥

केला परी बोलें शरीर ॥ कैसें राहील साचोकार ॥ एकदिन नव्हे संवत्सर ॥ द्वादश निश्चय केला असे ॥९३॥

ऐशी ऐकूनि तियेची वाणी ॥ गोरक्ष म्हणे वो शुभाननी ॥ चिरंजीवपद देहालागूनी ॥ मच्छिंद्रनाथ मिरवीतसे ॥९४॥

तरी हा देह नाशरहित ॥ आहे मायाप्रळयवंत ॥ परी ऐसी जगांत मात ॥ प्रविष्ट न करीं जननीये ॥९५॥

ऐसें उत्तर सांगूनि तीतें ॥ उभय चित्तीं मिरवले शांत ॥ तों इकडे नृपनाथ ॥ अंतःपुरीं पातला ॥९६॥

परी तो त्रिकाळज्ञानी ॥ चांचरा न घे प्रज्ञेलागुनी ॥ जेवीं माहितगार पूर्वीचें सदनीं ॥ राज्यभुवनीं वर्ततसे ॥९७॥

असो गेलिया अंतःपुरांत ॥ रेवती कांता प्रज्ञावंत ॥ मंचकीं नेवोनि आपुला नाथ ॥ प्रीतीं आदरें आदरिला ॥९८॥

स्नान भोजन झालियाउपरी ॥ राव बैसला मंचकावरी ॥ अंकीं बैसवोनि सदगुणालहरी ॥ अनंत वल्गने वदतसे ॥९९॥

परी जें कांता पुसे त्यातें ॥ तेंही प्राज्ञिक प्रांजळ सांगत ॥ गुप्त प्रगटला वृत्तांत ॥ उत्तरा उत्तर देतसे ॥१००॥

व्यंगरहित बोले वचन ॥ करी कांतेचें समाधान ॥ यावरी द्वितीय दिनीं मंगलस्नान ॥ करुनि सभे बैसला ॥१॥

तेथेंही राजवैभवाकारणें ॥ अचूक वर्ते सकळ प्रकरणीं ॥ मंत्रीं आणि सकळ जन ॥ भिन्न कांहीं दिसेना ॥२॥

न्यायनीतीं झाला वहिवाट ॥ माहितासमान वर्तती पाठ ॥ स्नेहक्रूरता समान लोट ॥ रायासमान वर्तती ॥३॥

यापरी नित्य चतुर्थ प्रहरीं ॥ सकळ वैभवें वना करी स्वारी ॥ शिवदर्शना ग्रामाबाहेरी ॥ त्याचि देवालय येतसे ॥४॥

प्रथम दिवशीं येतां राव ॥ शिवालयीं उमाधव ॥ वंदितां देखोनि गोरक्ष प्राज्ञ अतीव ॥ संपादणी पुसतसे ॥५॥

म्हने नाथ जी आदेशवंत ॥ किती दिवस आलां येथ ॥ कवण स्थळीं वास्तव्य करीत ॥ कवण नाम मिरवतसे ॥६॥

उभा राहोनि ऐसे नीतीं ॥ गोरक्षातें पुसे नृपती ॥ संपादणी ती जगाप्रती ॥ दृढा दावी महाराजा ॥७॥

परी तो चाणाक्ष गोरक्षनाथ ॥ संपादनीचें उत्तर देत ॥ मग उत्तराउत्तर करुनि महीतें ॥ शिवालयीं संचरले ॥८॥

संचरले परी गोरक्षकातें ॥ घेवोनि गेला स्वसांगातें ॥ शिवालयीं नेमिला एकांत ॥ राव पुसे गोरक्षनाथा ॥९॥

हस्तसंकेतें खुणेंकरुन ॥ म्हणे देहातें बंधनसाधन ॥ कैसे रीतीं केलें रक्षण ॥ ठाव लक्षोनि नेटका ॥११०॥

मग तो प्राज्ञिक गोरक्षनाथ ॥ बरबरभाषा सांगत ॥ सवें घेवोनि खूण दावीत ॥ गुहागृह रायातें ॥११॥

असो ऐसें केलियापाठीं ॥ गोरक्षें केलिया खूणदृष्टी ॥ मग क्षणें बैसोनि तळवटीं ॥ राव स्थाना पैं गेला ॥१२॥

गेला परी प्रतिदिनीं ॥ राव येतसे शिवभुवनीं ॥ आपुला शरीरठाव लक्षोनी ॥ शिवा नमोनि जातसे ॥१३॥

क्षण एक बैसोनि गोरक्षाजवळी ॥ दावीत भक्ती प्रेमनव्हाळी ॥ आणि चित्ताची संशयकाजळी ॥ फेडूनि जात स्वस्थाना ॥१४॥

ऐसियेपरी वहिवाटतां ॥ तीन मास लोटले पंथा ॥ यापरी एके दिवशीं बैसतां ॥ गोरक्षक पुसें रायातें ॥१५॥

आम्ही जातों तीर्थाटनासी ॥ आपण असावें योगक्षेमसीं ॥ दृष्टी ठेवोनि स्वहितासी ॥ स्वशरीरासी रक्षावें ॥१६॥

अवश्य त्यातें भूप म्हणत ॥ स्वधर्मे ठेवूं स्वशरीरातें ॥ आपण जावे स्वस्थचित्तें ॥ तीर्थाटनी गमावे ॥१७॥

ऐसें वदोनि गोरक्षकातें ॥ भूप पातला स्वस्थानात ॥ येरीकडे गोरक्षनाथ ॥ तीर्थस्थाना वहिवाटला ॥१८॥

साही लोटले षण्मास ॥ रेवती कांता रतिसुखास ॥ ऋतुमंधी रेतगर्मास ॥ गरोदर पै ते झाली ॥१९॥

दिवसेंदिवस नव मास ॥ लोटोनि गेले गर्भास सुदिनदिनीं प्रसूतीस ॥ रेवती कांता होतसे ॥१२०॥

प्रसूत झाल्या मदनाकृती ॥ बाळ पाहे माय रेवती ॥ बाळककर्णी तेजोत्पती ॥ बाळ दृष्टीं देखिला ॥२१॥

त्यासी लोटले द्वादश दिवस ॥ आनंदउत्सव पालखास ॥ बाळ पहुडोनि नाम त्यास ॥ धर्मनाथ ठेविलें ॥२२॥

त्यासही लोटली पांच वरुषें ॥ तों एके दिवशीं शिवालयास ॥ घेवोनि पूजेचे तबकास ॥ राजा राणी पातलीं ॥२३॥

सवे परिचारिका पंचशत ॥ लावण्यलतिका चपळवंत ॥ कीं राजार्णवींच्या लहरी अदभुत ॥ रेवतीसवें मिरवल्या ॥२४॥

असो रेवती दासीसहित ॥ संचरोनि शिवालयांत ॥ प्रेमें पूजीतसे उमाकांत ॥ शुद्धभावेंकरोनिया ॥२५॥

पूजा सांग जाहलियावरी ॥ शिवा प्रार्थीतसें वागुत्तरीं ॥ हे महाराज त्रिपुरारी ॥ उमापती महानुभावा ॥२६॥

तरी ऐसें करावें कृपानिधी ॥ श्रीराया त्रिविक्रमाआधीं ॥ मातें मरण देऊनि साधीं ॥ सुवासिनीत्व माझें हें ॥२७॥

ऐसें वदतां वाकसुगरिणी ॥ गदगदां हांसे शैवराणी ॥ तें रेवतीनें पाहोनिं ॥ तियेलागीं पुसतसे ॥२८॥

म्हणे माय वो शैवदारा ॥ तुज हांसूं कां आलें वागुत्तरा ॥ म्हणे हास्य तव उत्तरा ॥ सहज आननी आले वो ॥२९॥

रेवती म्हणे आश्चर्येविण ॥ न यावें विकासीपणा मन ॥ तरी तूं माये प्रांजळ वचन ॥ सांग संशय सोडोनी ॥१३०॥

तंव ती बोले शैवराणी ॥ म्हणे माय वो हास्यचिन्हीं ॥ तूतें वदतां कहाणी ॥ विपर्यास होईल गे ॥३१॥

तरी माये माझें चित्त ॥ वदावया होतें भयभीत ॥ नेणो कैसी पुढील मात ॥ घडोनि येईल कर्मातें ॥३२॥

आम्ही दुर्बळ तुम्ही समर्थ ॥ सहज कोपल्या होईल घात ॥ पतंग स्पर्शतां प्रळयानळांत ॥ जीवित्वातें उरेना ॥३३॥

कीं केसरीगृही अन्याय ॥ केलिया जंबुक जीवें जाय ॥ कीं नगर पेटतां कोणें वांचावें ॥ जीवित्वातें हे माते ॥३४॥

ऐसें बोलतां शैवराणी ॥ रेवती म्हणे माय बहिणी ॥ निर्भय होवोनि तुवां मनीं ॥ रहस्यार्थ निरोपीं ॥३५॥

राव आणि माझे कांहीं ॥ भय असेल तुझे देहीं ॥ तरी आम्ही सहसा कोपप्रवाहीं ॥ तुजवरी न करुं ॥३६॥

ऐसें बोलोनि करतळभावास ॥ रेवती देत शैवकांतेंस ॥ सकळ हरुनि संशयास ॥ म्हणे वार्ता वद आतां ॥३७॥

तरी ती प्रांजळ बोले वाणी ॥ मग परिचारिका बाहेर काढूनी ॥ म्हणे सांगेन वो एकांतभुवनी ॥ एकांतस्थानीं पैं गेल्या ॥३८॥

एकांतालया गेलियावरी ॥ बोलती झाली शैवनारी ॥ म्हणे माये तूं सुवासीण स्वदेही ॥ कांही नाहींस जाण पां ॥३९॥

राव त्रिविक्रम मृत्यु पावला ॥ तयाचे देही मच्छिंद्र संचरला ॥ आपला देह येथें सांडिला ॥ शिवालयामाझारीं ॥१४०॥

मग तयाचा शिष्य गोरक्षनाथ ॥ गुहागृहा ठेवूनि गेला प्रेत ॥ द्वादश वर्षे नेमस्त ॥ नेम केला उभयतांनीं ॥४१॥

द्वादश वर्षे सरल्या शेवटीं ॥ मच्छिंद्र वर्तेल स्वदेहराहाटी ॥ ऐसिये कथा माझिये दृष्टी ॥ झाली असे जननीये ॥४२॥

तरी तुज वैधव्यपण ॥ असोनि बोलसी सुवासिण ॥ म्हणोनि हास्य आलें मजलागून ॥ जाण जननी निश्चयें ॥४३॥

ऐसें ऐकुनि रेवती सती ॥ म्हणे दावीं कां मच्छिंद्रप्रेताप्रती ॥ येरी अवश्य म्हणोनि उक्ती ॥ गृहेमध्यें नेतसे ॥४४॥

म्हणे माय वो येचि ठायीं ॥ आच्छादिला मच्छिंद्रदेहीं ॥ तरी मही विदारुनि गुहागृहीं ॥ निजदृष्टीनें पाहें कां ॥४५॥

ऐसें बोलोनि दावोनि तीतें ॥ शिवालयीं गेली त्वरित ॥ येरीकडे संशयवंत ॥ रेवती स्थाना गेलीसे ॥४६॥

गेलीसे परी एकांतासीं ॥ विचार करी आपुले मानसीं ॥ चित्तीं म्हणे पतिव्रतानेमासी ॥ दैवेंकरुनि नांडिले ॥४७॥

नाहिसें परी संचितार्थ ॥ घडणार घडूनि आलें निश्चित ॥ परी पुढती आपुलें हित ॥ विलोकावें आपणचि ॥४८॥

पति निवर्तल्यापाठीं ॥ लाधली मच्छिंद्रवीर्यकोटी ॥ परी पाहतां पातकदृष्टीं ॥ वंशवेली दिसेना ॥४९॥

पूर्वी भरतवंश काढून ॥ व्यासवीर्ये केला उत्पन्न ॥ त्याही पुढें कुंतीरत्न ॥ त्याच नीतीं आचरली ॥१५०॥

पंचदेवाचें वीर्य घेवोन ॥ निर्माण केले पांचहि जण ॥ तस्मात् वंशवेलीकारणें ॥ शिष्टदेह अर्पावा ॥५१॥

तरी हा विचार पातकरहित ॥ घडोनि आला यत्नातीत ॥ परी द्वादश वर्षे होतां भरित ॥ पुन्हां अनर्थ होईल हा ॥५२॥

मच्छिंद्र जाईल स्वदेहाकारणें ॥ सुत धर्मनाथ अति सान ॥ राज्यवैभवीं आसरा धरोन ॥ कवण रतीं राहील कीं ॥५३॥

त्रिविक्रमदेहीं तपोबल ॥ आहे म्हणूनि विवतें बाळ ॥ तो गेलिया सावली शीतळ ॥ मजलागीं मिळेना ॥५४॥

तरी आतां करावें कैसें ॥ दृष्टीं पाहें मच्छिंद्रदेहास ॥ दृष्टीं पाहिल्यावरी विनाश ॥ करोनियां सांडावा ॥५५॥

देह झालिया छिन्नभिन्न ॥ मग कैसा संचरेल मच्छिंद्रनंदन ॥ मुळींच बीज केलिया भस्म ॥ बाहेर कांहीं उगवेना ॥५६॥

ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ एक परिचारिका घेवोनि सांगाती ॥ गांवाबाहेर मध्यरात्रीं ॥ येवोनियां पोंचली ॥५७॥

आणिक एक गुप्तराहाटी ॥ दोन सबळ घेतले होते कामाठी ॥ त्वरें येऊन्नि शिवालयापाठीं ॥ गुहाद्वार विदारिलें ॥५८॥

मोकळें केलें गुहाद्वार ॥ करिते झाले आंत संचार ॥ जातांचि तें कलेवर ॥ मच्छिंद्राचें देखिलें ॥५९॥

परी तें कलेवर तेजःपुंज ॥ कीं सजीवपणीं दिसे सहज ॥ माणिकवर्णी सविताराज ॥ तियेलागी भासलें ॥१६०॥

असो ऐसिये तेजोराशी ॥ मग शस्त्र घेवोनि अस्थिमांसासी ॥ रती रती छेदोनियां तयासी ॥ बाहेर तई काढिलें ॥६१॥

मग भाग टाकोनि कान नांत ॥ विखरुनि दिधले पृथक् पृथक् तेथ ॥ तरी समान रज समस्त ॥ ठाई ठाई टाकिले ॥६२॥

टाकिले परी पातळपणी ॥ रजरजाची होय मिळवणी ॥ ऐशापरी त्यासी करुनी ॥ स्वस्थानीं गेली ते ॥६३॥

गुहागृहाचें मुख आच्छादून ॥ जैसें होतें तैसे करुन ॥ येरी घडल्या कारण ॥ उमा जागृत झालीसे ॥६४॥

मग प्रत्यक्ष होऊनि बोलत ॥ म्हणे महाराजा कैलासनाथा ॥ जागृत व्हावें विपरीतपंथा ॥ अघटित झालें महाराजा ॥६५॥

तुमचा मच्छिंद्रनंदन ॥ गेला आहे स्वदेह सांडून ॥ परी रेवतीदारा येऊन ॥ विध्वंसिलें शरीरासी ॥६६॥

ऐसी ऐकतां उमेची मात ॥ खडबडूनि उठला कैलासनाथ ॥ हदयीं पाहे तों विपरीत ॥ मच्छिंद्रदेही वर्तलें ॥६७॥

मग अंबेसी बोलता झाला शिव वचन ॥ म्हणे माझा आज गेला प्राण ॥ परी उमे यक्षिणी बोलावून ॥ सकळ शरीर वेंचीं कां ॥६८॥

अस्थि त्वचा मांसासहित ॥ रती रती भाग वेंचूनि समस्त ॥ एकत्र करुनि कैलासांत ॥ यक्षिणीहस्तीं पाठवीं ॥६९॥

अवश्य म्हणूनि नगात्मजा ॥ यक्षिणी पाचारी विजयध्वजा ॥ कोटी चामुंडा विभागकाजा ॥ महीलागीं उतरल्या ॥१७०॥

त्यांतें पाहूनि माय भवानी ॥ येतांचि सांगे कार्यालागुनी ॥ मच्छिंद्रशरीर समस्त वेंचोनी ॥ स्वर्गा न्यावें म्हणतसे ॥७१॥

कैलासगिरी शिवगण बहुत ॥ त्यांत वीरभद्र मम सुत ॥ तयाहातीं ओपोनि समस्त प्रेत ॥ रक्षण दृढ सांगावें ॥७२॥

ऐसें सांगूनि क्षणिक वार्त ॥ महीं संचरल्या मांसशोधार्था ॥ सकळ शरीर वेंचूनि तत्त्वतां ॥ कैलासभुवनीं चालिल्या ॥७३॥

कोटी चामुंडा प्रतापवंत ॥ यक्षिणीसह झाल्या स्वर्गस्थित ॥ कैलासगिरीं मग जात ॥ वीरभद्रातें निवेदिलें ॥७४॥

म्हणती परम हर्षेकरुनी ॥ हे महाराज शिवगणी ॥ राजेश्वर भद्रासनी ॥ वृत्तांतातें ऐकावें ॥७५॥

आमचा तुमचा शत्रु पूर्ण ॥ अवचट पावला आहे मरण ॥ रती रती देहाचे भाग जमवून ॥ आम्हीं आणिले महाराजा ॥७६॥

तरी तो शत्रु म्हणशील कोण ॥ या भूमंडळा मच्छिंद्रनंदन ॥ त्यानें आम्हांसी नग्न करुन ॥ परम लज्जे विटंबिलें ॥७७॥

अष्टभैरव पाहोनि धरणीं ॥ विटंबिलें दशा करुनि ॥ रुधिरपूर लोटूनि अवनीं ॥ विगतकळा वरियेली ॥७८॥

आणि तुम्हांसवें घेतले कटक ॥ मौळीं पर्वत देऊनि देख ॥ वायुसुत करुनि आदिक ॥ विटंबिले महाराजा ॥७९॥

सकळ देवांचा शत्रु कुजात ॥ बरा दैवें पावला घात ॥ तरी आतां प्रतापवंत ॥ दृढोत्तरीं शरीर रक्षावें ॥१८०॥

या मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष ॥ तो परम प्रतापवंत दक्ष ॥ तो जिंकूनि नेईल शरीर प्रत्यक्ष ॥ तरी सावध राहावें ॥८१॥

सहजस्थितीतें दैवेंकरुन ॥ शत्रु पावला आहे मरण ॥ हालावांचूनि फेडविलें हर्षेकरुन ॥ तुम्हां आहां दैवानें ॥८२॥

ऐसें सांगूनि हर्षयुक्त ॥ परी वीरभद्र तोषला आपुले चित्तांत ॥ मग भैरवादि समस्त ॥ अहा अहा म्हणताती ॥८३॥

मग चौर्‍यायशी कोटी बहात्तर लक्ष ॥ शिवगण प्रतापी महादक्ष ॥ मच्छिंद्रशरीर वेष्टूनि प्रत्यक्ष ॥ रक्षणार्थ बैसविले ॥८४॥

कोटी यक्षिणी चामुंडांसहित ॥ डंखिनी शंखिनी पातल्या समस्त ॥ अस्त्रशस्त्रादि होऊनि उदित ॥ रक्षण करिती शरीराचें ॥८५॥

येरीकडे त्रिविक्त्रमदेहात ॥ प्रतापशीळ जो मच्छिंद्रनाथ ॥ नित्य येऊनि शिवालयांत ॥ गुहागृहीं लक्षीतसे ॥८६॥

परी तो ठाव जैसा तैसा ॥ दिसुनि येत दृष्टिभासा ॥ मग स्वस्थ भोगी संपत्तिविलासा ॥ राज्यासनीं बैसूनियां ॥८७॥

परी शरीरा झाला जो प्रयास ॥ हें माहीत नव्हतें कांहीं देहास ॥ सदा भोगी संपत्तिविलास ॥ राजभुवना जातसे ॥८८॥

ऐसे नित्य राजविलास ॥ लोटूनि गेलीं वर्षे द्वादश ॥ तों येरीकडे तीर्थाटनास ॥ गोरक्ष सावध झाला असे ॥८९॥

तरी तो गोरक्ष पुढील अध्यायीं ॥ काय करील तो प्रतापप्रवाहीं ॥ तरी श्रोते अवधान देहीं ॥ सिद्ध करा पुढारी ॥१९०॥

अवधान पाहूनि अर्थ बहुत ॥ कथा वदेल धुंडीसुत ॥ मालू नरहरीचा शरणागत ॥ दास संतांचा असे कीं ॥९१॥

स्वस्तिश्री ग्रंथ भक्तिसार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ द्वात्रिंशति अध्याय गोड हा ॥१९२॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय ॥३२॥ ओंव्या १९२॥

॥ नवनाथभक्तिसार द्वात्रिंशतिअध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP