युगादि, मन्वादि, संक्रांती, दर्श, प्रेतकर्म व पुनः संस्कारादि, यांविषयी नक्षत्रादिकांचा विचार करुं नये. गुरुशुक्रांचे अस्त, पौषमास, मलमास हीं असतां अतिक्रांत पितृकर्य गया व गोदावरी यांवांचून होत नाही. याप्रमाणें पुनः संस्काराचा काल सांगितला.
साग्निकाचा पर्णशरदाह केल्यावर त्याचें शरीर मिळाल्यास पर्णशरदहनाच्या अर्धदग्ध काष्ठांनीं त्या शरीराचें दहन करावें. तशीं काष्ठें न मिळाल्यास लौकिकाग्नीनें दहन करुन त्याच्या अस्थि मोठ्या उदकांत टाकाव्या. याप्रमाणें इतर निरग्निकांचाही पर्णशरदाह झाल्यावर शरीर मिळाल्यास किंवा अस्थि मिळाल्यास असाच निर्णय जाणावा. मृत नसतां मृत झाला अशी वार्ता श्रवण करुन ज्याचें अंत्यकर्म केलें त्यानें स्मृत्युक्त प्रायश्चित करुन अग्नयाधान करावें. याविषयी पुनःसंस्कारादिक प्रकार पूर्वार्धात सांगितला आहे. आधान केल्यावर आयुष्मतेष्टि करावी. अनाहिताग्नि असल्यास चरु करावा. भर्ता जिवंत असतांच मरणाची वार्ता ऐकून जर स्त्रियेनें सहगमन केलें तर तें अविधीच होय. ज्ञातमरण हेंच सहगमनास निमित्त आहे. केवल मरणाचें ज्ञान मात्र निमित्त नाहीं. म्हणून त्या स्त्रियेचे आत्महत्यादि दोषांचें प्रायश्चित्त तिच्या पुत्रादिकांनीं करुन नारायणबलिपूर्वक अंत्यकर्म करावें. भर्त्याचें तर दहनादिक अंत्यकर्म केलें म्हणून तन्निमित्तक सांगितलेलें पुनः संस्कारादिक करावे.
कधीं कधीं जीवंताचेंही अंत्यकर्म करावें असें सांगितलें आहे. उदाहरणार्थः-- प्रायश्चित्त घेण्याची इच्छा न करणार्या पतिताचा घटस्फोट केला असतां तो जिवंत असतांही त्याचें अंत्यकर्म करावें. तो घटस्फोटविधि असाः -- महापातकानें किंवा उपपातकानें पतित झालेला गृहस्थ जर प्रायश्चित्त करणार नाही तर गुरु, बांधव व राजा यांच्या समक्ष त्या पतितास बोलावून त्याचें पाप प्रकट करावें व त्यास पुनःपुनः उपदेश करावा. प्रायश्चित्त कर. आपला आचार ग्रहण कर. असा उपदेश केला असतांही जर तो त्याचा अंगिकार न करील, रिक्तादि निंद्य तिथींच्या दिवशीं सायंकाळीं सपिंडानीं व बांधवांनी एकत्र मिळून दासीच्या हातून आणविलेला अशुद्ध व कुत्सित जलानें भरलेला घट ( सर्वत्र दासी इत्यादिकांस स्पर्श करुन ) दास अथवा दासी यांतून कोणाएकाच्या डाव्या पायानें अग्रें तोडलेल्या दर्भावर उपडा करवावा, व प्राचीनावीति करुन शिखा विसर्जन करुन दासीसहित सर्वानी त्याचें नांव घेऊन ' अमुमनुदकं करोनि ' असें म्हणावें; नंतर अधिकारी कर्त्यानें दहन वर्ज्य करुन जिवंताच्याच उद्देशानें पिंड, उदकदान, इत्यादि ११ व्या दिवसापर्यंतची प्रेतकार्यं नांवांनींच करावीं. मिताक्षरेंत प्रेतकार्ये झाल्यावर घट न्यावा असें सांगितलें आहे. सर्वाना एक दिवस अशौच आहे. ज्याचा घटस्फोट केला त्याबरोबर संभाषण, स्पर्श इत्यादि संसर्ग कोणींही करुं नये. केल्यास तो पतिततुल्य होतो. घटस्फोटाचें कारण पूर्वार्धाच्या अंतीं सांगितलें आहे. घटस्फोट करण्याचा निश्चय झाल्यावर घटस्फोट दिवसाचे पूर्वी पतिताचे ज्ञातीस धर्मकार्यास अधिकार नाही, असें कोणी ग्रंथकार म्हणतो.
ज्याचा घटस्फोट केला त्यास पश्चात्ताप झाला असतां प्रायश्चित्त केल्यावर त्यास जातींत घेणाविषयींचा विधिः -- त्यांत प्रथम शुद्धीची परिक्षा -- प्रायश्चित्त करुन ज्ञातीच्या समक्ष तृणाचा भारा गाईस द्यावा. गायींनी तृण भक्षण केल्यास शुद्धि आहे. भक्षन न केल्यास पुनः प्रायश्चित्त करावे. याप्रमाणें शुद्धीचा निश्चय झाला असतां सुवर्णाचा किंवा मृत्तिकेचा नवीन घट शुद्ध उदकानें भरलेला आणावा. नंतर सपिंडांनीं त्या घटास स्पर्श करुन अभिमंत्रण करुन त्या उदकांनी पावमानी ऋचा, ' आपोहिष्ठा ' इत्यादि ऋचा, व तरत् समंदी ऋचा यांनी पाप्यावर अभिषेक करुन त्या पाप्यासह सर्वानी स्नान करावें व तो उदकाचा घट पाप्यास द्यावा. नंतर त्यानें ' शांता द्यौः शांता पृथिवी शांतं विश्रमंतरिक्षें योरोचनस्तमिह गृह्णामि ' या यजुमंत्रांनी तो घट घ्यावा. नंतर तें उदक त्या पाप्यासह सर्वानीं प्राशन करावें. यावर जातकर्मापासून मौंजीपर्यंत किंवा विवाहापर्यंत त्याचे सर्व संस्कार करावेत. असा विधि केल्यावर शुद्ध झालेला जो त्याच्याशीं संभोजन इत्यादि व्यवहार करावा. याप्रमाणें उपपातक व महापातक यांविषयी ज्याचा घटस्फोट केला त्याची शुद्धि जाणावी. अशा रीतीनें संक्षेपानें घटस्फोट केलेल्याची शुद्धि सांगितली.
ज्याचें आचरण साधूंस मान्य आहे अशा श्रीमत् अनंत नामक पित्याचे चरण व पातिव्रत्यादि सद्भुणांनीं संपूर्ण व वंदनास योग्य अशी अन्नपूर्णा नामक माता या उभयतांस मी नमस्कार करितो.