पांडुरंगरावांना तीन मुली होत्या. सुस्वरुप, गृहकर्तव्यदक्ष अशा त्या मुलीमध्ये एकच व्यंग होते. त्या तिघीही मुली बोबड्या होत्या. यांचे विवाह कसे होणार, या एकाच चिंतेने पांडुरंगला अस्वस्थ केले होते. एकदा या तिघींना पाहायला तीन मुले येणार होती. म्हणून पांडुरंगने त्या तिघींना ताकीद दिलेली होती की, पाहुण्यासमोर कुणीही बोलायचे नाही.
ठरल्याप्रमाणे पाहुणे आले. चहा - फराळाचे पदार्थ दिले गेले. त्यांचा आस्वाद घेत वधूपरीक्षा सुरु झाली. काहीतरी बोलायचे म्हणून त्या मुलांसोबत आलेले गृहस्थ म्हणाले, वा ! पदार्थ फारच छान झालेत. तुमच्यापैकी कोणी केलेत हे ? यावर थोरली मुलगी लाजत - लाजत म्हणाली, आईने केये नाईट, आमीट केये.
धाकटी मुलगी तिच्यावर रागावून म्हणाली, अगो बाबांनी काय शांगिटले ? बोलायचे नाही म्हणून. यावर मधली म्हणते कशी, ही बोबयी. तू पण बोबयी. पण मीच नाही बोबयी. तिघींच्या संभाषणावरुन त्यांना बघायला आलेल्या वरमंडळींना त्यांच्या व्यंगाबाबतचे गुपित आपोआपच समजले आणि त्यांनी ठरवलेले सर्वकाही उघडकीस आले. पांडुरंगाची तर त्रेधातिरपीट उडाली. वर पक्षाच्या मंडळींनी तर आपोआपच काढता पाय घेतला.