कर्मतत्व - प्रारब्ध तत्व

'कर्मतत्व' काव्यात वामनपंडितांनी कर्माचे महत्व भावपूर्णतेने सांगितले आहे.

आत्मा अलिप्त सुख दुःख तया न जेव्हां
प्रारब्धभोग घडती कवणासि तेव्हां
हा देह नित्य शव तो सुख - दुःख नेणें
या गोष्टिचा उकल एक हरीच जाणें ॥१॥
जों ज्ञानियासि जगदात्मकता कळेना
संसार - बंध त्दृदयांतुनि तों ढळेना
चैतन्य जें वळखिलें चिदचिद्विवेकें
तें तों फिरे जड - शरीर - पुरें अनेकें ॥२॥
चैतन्य केवळ शवासहि जें प्रकाशी
तें देखिल्यावरि नव्हे मग एकदेशी
त्यालागिं देखति तदात्मकते करोनी
त्याला न भोग जगदात्मक तें म्हणोनी ॥३॥
विश्वात्मता अनुभवी मग भोग त्याला
संसार - दुःख - सुख केविं घडेल बोला
प्रारब्ध - भोग तरि त्यासहि तो सुटेना
संदेह कृष्ण करुणेंविण हा फिटेना ॥४॥
विश्वात्मतेकरुनि दे स्व - जनासि मोक्ष
श्रीकृष्ण तो हरिल हा दृढ पूर्वपक्ष
विश्वात्मता हरिस बिंब - सुख - स्वरुपें
त्यालाचि जीवपन चितू - प्रतिबिंब - रुपें ॥५॥
जीवासि त्या प्रलय आणि सुषुप्ति - काळीं
बिवैंक्य केवळ न जीवपणें निराळीं
तीं वेगळीं प्रगटती उठतां उपाधी
कीं जागरीं नितळतां जळरुप - बुद्धी ॥६॥
बुद्धी अनेक उदकें घटरुप देहीं
भासे अनेकजळिं एकचि बिंब तेंही
बिंबीं मिळोनिहि पृथक् प्रतिबिंब होतें
प्रारब्ध - भोग सुख दुःख घडे तयातें ॥७॥
प्रारब्ध - भोग निज - पूर्विल पुण्य - पापें
आत्मत्व मीपण तई प्रतिबिंब - रुपें
बिंबात्मता अनुभवी सकळात्मयोगी
भोगासि तो प्रतिमुखात्मपणेंचि भोगी ॥८॥
सर्वा घटीं गगन तें सहसा न हाले
त्याचेंचि त्या घटजळीं प्रतिबिंब डोले
आत्मा असा द्विविध बुद्धि - जळांत देहीं
एकासि भोग - फळ सर्वगतासि नाहीं ॥९॥
आधीं जडाऽजड - विवेक कळे जयासी
चैतन्य हें द्विविधही उमजे तयासी
व्यापोनि मीपण असे प्रतिबिंब देहीं
सर्वत्र बिंबचि तसें प्रतिबिंब नाहीं ॥१०॥
बिंबात्मता गुरु - मुखें समजोनि योगी
होऊनि भोग - समयीं प्रतिबिंब भोगी
प्रारब्ध - वायु करि चंचल बुद्धि जेव्हां
पाण्यांत त्या डळमळी प्रतिबिंब तेव्हां ॥११॥
बिंबात्मता अनुभवि स्व - सुखांत जेव्हां
प्रारब्ध - दुःख - सुख - भोग न त्यास तेव्हां
चांचल्य बुद्धिस घडे सुख - दुःख - भोगें
तेव्हां सचेतनपणे प्रतिबिंब - योगें ॥१२॥
बुद्धीमधें प्रतिमुखें जगदादि काळीं
भोगानिमित्तचि जसीं निघती निराळीं
बिंबात्मबुद्धि - जळ चंचळ होय जेव्हां
भोगार्थ हें डळमळी प्रतिबिंब तेव्हां ॥१३॥
प्रारब्ध - वायु करि बुद्धि जळांत ऊर्मी
त्या मीपणीं गमतसे असुखी सुखी मी
नाहीच यद्यपि अहंकृति योगियाला
दुःखांत मीपण अवश्य दिसे तयाला ॥१४॥
वाटे न मीपण तया सुख भोग - रुपीं
पाहे सुखें सकळ ही स्व - सुख - स्वरुपीं
दुःखें मृषा परि न भॊग चुकेचि तें मी
दुःखी म्हणोनि करि बुद्धि - जळांस उर्मी ॥१५॥
वाटे सुखी म्हणुनि त्यास सुखी तथापी
पाहे सुखें सकळ आत्म - सुख - स्व - रुपीं
दुःखी सुखी म्हणुनि हे न चुके प्रतीती
नाहीं प्रतीति तरि भोगचि ते न होती ॥१६॥
भोगीं प्रतीति न चुकेचि अहंकृतीची
तेव्हां उठे अवचितें लहरी मतीची
त्या मीपणासि अवलंबुनि पूर्व - पापें
योई अहो अनुभवी प्रतिबिंबरुपें ॥१७॥
त्या मीपणेंकरुनि ज्या प्रतिबिंबरुपें
जन्मांऽतरीं रचियलीं बहु पुण्य - पापें
त्या मीपणें सकळ तें प्रतिबिंब भोगी
बिंबात्मते करुनि आतळती न योगी ॥१८॥
बिंबात्मता - अनुभवीं स्थिरता जयासी
आत्मा गमे न मग चित्प्रतिबिंब त्यासी
भोगोनि भोक्तृपण यास्तव त्यासि नाहीं
देहीं असोनिहि अखंडचि तो विदेही ॥१९॥
झालाचि बिंब मग हैं प्रतिबिंबरुपें
दुःखें सुखे अनुभवी जरि पूर्व - पापें
बिंबात्मतेतुनि निघे प्रतिबिंब जेव्हां
जो बिंब ईश्वर तयासहि भोग तेव्हां ॥२०॥
हा पूर्वपक्षहि उडे कळतां उपाधी
बिंबात्मता अनुभवी परि पूर्वबुद्धी
तो नित्य - मुक्त जगदीश उपाधि - भेदें
लिंपे कदापि न सुखें अथवा न खेदें ॥२१॥
ज्ञानासि भोक्तृपण भोग जडासि नाहीं
तो भोग त्यासहि उपाधिविना न कांहीं
जीवास त्यांतहि गुण त्रय भोग देती
शुद्धा उपाधिकरितांचि न भोग होती ॥२२॥
सत्वैकमात्र जगदीश उपाधि त्याला
कैसा घडे रजतमाविण भोग बोला
बिंबासि भोक्तृपण याकरितांचि नाहीं 
चैतन्य तों सहज केवळ होय तेंही ॥२३॥
सर्वज्ञ मात्र जगदीश उपाधि - सत्वें
तोही अचेतन सचेतन बिंब तेत्वें
त्याला रजोगुण - तमोगुण - योग नाहीं
या दोंविणें न म्हणवे जड भोग कांहीं ॥२४॥
चैतन्य तत्व परि वृत्ति न त्यासि कांहीं
सत्वेंचि वृत्ति परि चित्पण त्यासि नाहीं
वृत्तीस दोनहि सचेतनता करीती
शुद्धा तथापि जगदीश - उपाधि - वृत्ती ॥२५॥
विद्यामयें सकळ सात्विक - वृत्तिरुपें
बिंबें सचेतन अनंत - सुखस्वरुपें
आविधका त्रि - गुण - मिश्रित जीववृत्ती
तीचा प्रकाश करि चित्प्रतिबिंब चित्तीं ॥२६॥
विक्षेप आवरण दोंपरिंची अविद्या
ते नाशते प्रगटतां त्दृदयांत विद्या
विद्या - बळें अनुभवी निज - बिंब आत्मा
ते शुद्ध - सत्वमय - वृत्ति भवाऽब्धिसीमा ॥२७॥
विक्षेप इंद्रियगणें विषयांसि जाणे
तैसेंचि आवरण आपण कोण नेणे
ऐसे रजोगुण तमोगुण शुद्धसत्वें
टाकोनि बिंब धरिलें जगदात्मकत्वें ॥२८॥
विक्षेप - आवरण - रुप जरी अविद्या
गेली मनीं प्रगटतां परमात्मविद्या
देहेंद्रियें असति तत्कृत पुण्य - पापें
सत्वासि आतळति तीं फळ - भोग - रुपें ॥२९॥
सत्वासि जोंवरि विटाळ रजस्तमाचा
नाहींच तोंवरि कुभोग फळागमाचा
प्रारब्ध - वायु करि चंचळ मीपणासी
हे झोंबती मग गुण द्वय त्या गुणासी ॥३०॥
सत्वासिं मिश्रित गुण द्वय होति जेव्हां
तींही गुणीं डळमळी प्रतिबिंब तेव्हां
दुःखी सुखी म्हणुनि एक तनू प्रतीती
ते तों न सर्वगत बिंब न शुद्ध वृतीं ॥३१॥
ऐसीं न ईश्वर - उपाधिस पुण्य - पापें
जो कां सचेतन अनंत - सुख - स्वरुपें
ज्याला विटाळ न कदापि रजस्तमाचा
सूर्यास लेप न जसा रजनी - तमाचा ॥३२॥
झालाचि बिंबहि पुन्हा प्रतिबिंब - योगी
होऊनियां रजतमें सुख दुःख भोगी
पाण्यांत बिंब निघतां प्रतिबिंब नाहीं
बिंबात्मतेंतुनि दिसे प्रतिबिंब तेंही ॥३३॥
येथें म्हणाल जरि बिंब अनंत जेव्हां
बाहेर आंत निघणें रिघणें न तेव्हां
हें तों खरें परि अहो उपमेसि कांहीं
सर्वत्र साम्य निज घेउनि येत नाहीं ॥३४॥
ब्रम्हीं प्रपंच कलशादि - विकार जैसे
मातीमधें म्हणुनि बोलति वेद ऐसें
चैतन्य जें अचळ आणि अनंत त्याला
मातीसमानहि कसें वदवेल बोला ॥३५॥
मातीच सत्य कलशादि असत्यरुपीं
माती तथापिहि यथास्थित तत्सरुपीं
ब्रम्हीं प्रपंच - घडमोडि घडोनियांही
ब्रम्हत्व - हानि अणुमात्र तथापि नाहीं ॥३६॥
होऊनिही कलश हानि न मृत्पणाची
ब्रम्हत्वहानिहि असी न घडे प्रपंचीं
तें ब्रम्ह तों अचळ नित्य अनंत जेव्हां
दृष्टांतिही मग विलक्षणता न तेव्हां ॥३७॥
हें क्षुद्र बिंब रिघतें उदकांत जेव्हां
पाण्यामधें मग न तत्प्रतिबिंब तेव्हां
दृष्टांत एक पण - मात्र - निरुपणीं हा
दृष्टांत याउपरि आणिक एक पाहा ॥३८॥
जैशा विशाळ दरडी सरितादि - तीरीं
त्यांचें नदींत दिसतें प्रतिबिंब नीरीं
येऊनि पूर दरडीवरि जाय पाणी
तेव्हां नदे खतिजळीं प्रतिरुप कोणी ॥३९॥
तें ओहटोनि जळ ये सरितेंत जेव्हां
भासे पुन्हा दरडिचें प्रतिबिंब तेव्हां
पाणी नदीमधिल बुद्धि तसी शरीरीं
जीवात्मता - दरडिचें प्रतिबिंब नीरीं ॥४०॥
सर्वत्रही धरणि - बिंब अनंत जैसें
मिथ्या शरीर सरितादिकरुप तैसें
मातीच सत्य कलशादि असत्य रुपें
पृथ्वी खरी नदितदाक मृषा - स्वरुपें ॥४१॥
आधार एक धरणी उदकासि जैसी
चैतन्य भूम,इ उदकोपम बुद्धि तैसी
आधार होउनि जळीं प्रतिरुप रुपं
पृथ्वी तसी द्विविध बुद्धि सचित्स्वरुपें ॥४२॥
दृष्टांत येरिति तथापिहि एक देशी
चैतन्य सर्वगत बुद्धि - जळीं प्रकाशी
बिंबावरी प्रसरते शुभ बुद्धि जेव्हां
बिवैक्य पावत असे प्रतिबिंब तेव्हां ॥४३॥
देहावलंबन तिला सुख दुःख भोगी
भोगार्थ होय मग हा प्रतिबिंब योगी
भोगी तथापि मज भोग असें न मानी
बिंबात्मता वळखिली निज - राजधानी ॥४४॥
अज्ञान बाळ निज देश विदेश नेणे
देशांतरांत निज देश सुबुद्धि जाणे
भोगासि होउनि जरी प्रतिबिंब भोगी
बिंबात्मतेसि विसरे न तथापि योगी ॥४५॥
बुद्धीस जोंवरि विवेक असा कळेना
तों हें अभोक्तृपण केवळ आकळेना
बिंबास भोग न घडे प्रतिबिंब भोगी
देखे समाधि - समयांत तंदैक्य योगी ॥४६॥
चैतन्य भोगित असे म्हणवे न ऐसें
ते भोगणें मज जडास घडेल कैसें
चित्ब्रम्ह केवळचि भोगितसे म्हणावें
तेव्हां चिदैक्य सुख दुःख समान व्हावें ॥४७॥
एकासि जेसमयिं दुःख - सुख - प्रतीती
जीवेश्वरांस सकळांसहि भोग होती
नाना उपाधि तरि वस्त्र जळेल जेव्हां
मूर्ती तयावरिल वाचति केविं तेव्हां ॥४८॥
नासे व्रणें करुनि अंगुळिमात्र कांहीं
चैतन्य दुःखित तथापिहि सर्व - देहीं
चैतन्य एक असतें तरि एक देहा
होतांचि दुःख करितें जन सर्व हा हा ॥४९॥
त्याकारणें वदति वेद अनेक कुंभीं
एक प्रभाकर दिसे बहु भिन्न अंभीं
ज्या ज्या घटीं डळमळी जळ सूर्य तेथें
हाले न चंचळ दिसे घट भिन्न जेथें ॥५०॥
ऐसींच सत्व - उदकीं प्रतिबिंब - रुपें
तें ब्रम्ह केविं म्हणवेल निज - स्वरुपें
ब्रम्हात्मता कळलि याउपरीच योगी
प्रारब्ध - भोग मग तत्प्रतिबिंब भोगी ॥५२॥
बिंबास तों न म्हणवे सुख दुःख कांहीं
सर्वात्मता - अनुभवीं प्रतिबिंब नाहीं
ज्याला न भोक्तृपण शाश्वत तोचि आत्मा
ज्ञात्यासि भोग न अशा कळतांचि वर्मा ॥५३॥
भोग - प्रतीति - समयांत अभोक्तृता हें
योगेश्वरासिहि अहो म्हणणें न साहे
भोगीं नसोनिहि अभोक्तृपण - प्रतीती
भोगोनि भोगहि तयासि कसे न होती ॥५४॥
हा पूर्वपक्षहि हरीच हरील येथें
बोलेल केवळ पुढें निज - तत्त्व जेथें
हा भोक्तृतत्व म्हणवोनि चतुर्थ केला ॥५५॥
अध्याय वामन - मुखें प्रणिपात त्याला

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP