द्वारकाविजय - तृतीयसर्ग
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
यानंतरें नारद त्या अजला देखून कैसा कृतकार्य झाला
त्या आयका श्रीहरिच्या कथा रे तरेच येथें जरि चित्त थारे ॥१॥
सोळासहस्त्रांतहि पट्टराणी श्रीरुक्मिणी आदिरमा पुराणी
आठां स्त्रियांमाजिहि मुख्य दाराजे कां नसोडि क्षणत्वा उदारा ॥२॥
आधीं तिच्या नारद ये गृहातें तों घेउनी चामर दिव्य हातें
सेवा करी श्रीयदुनायकाची जी भोंवती दाटणि बायकांची ॥३॥
ती समान सखिया नग मोतें लेइल्या नवल कीं न गमो तें
हे विलास सकळां सदनाचे देखतां सुर - सभासद नाचे ॥४॥
रुपें गुणें वेष वयें समाना सख्या सहस्त्रावधि भासमाना
दासीं तया श्रीहरिची विभूती समात्मता सन्मति जेविं भूतीं ॥५॥
तदनिं त्या मुनि लंघुनि उंबरा निघतसे अजि तों कनकांऽबरा
स्व - जन - दर्शन - उत्सव पावला लगबगें उडि टाकुनि धांवला ॥६॥
उडी टाकिली श्रीपलंगावरुनी त्वरें उत्तरीयांऽबरा सांवरुनी
किरीटांऽकितें मस्तके विप्रपायीं नमी वंदिजे जो सुरेद्रें उपायी ॥७॥
जया वंदिजे ज्या विरिंच्यादि दासी जया वंदिजे भक्त - वृंदी - उदासीं
न साध्यांश ज्या सिद्धि - मुक्ति - प्रदासी परी वंदितो देव तो नारदासी ॥८॥
रमाकांत सोळा - सहस्त्रांऽगनाचा पती लाभ देत्यासि आलिंगनाचा
धरुनि स्व - हस्त - द्वयें भक्त - पाणी पलंगवरी बैसवी चक्रपाणी ॥९॥
पादोदकें जो त्रिजगास तारी अनंत - कल्याण - गुणाऽवतारी
स्वमस्तकीं क्षाळुनि देव तो या श्रीनारदाच्या धरि पाद - तोया ॥१०॥
पूजी यथाविधि म्हणे मग पूर्णकाम
स्वामी वदा किमपि जें मज योग्य काम
बोले मुनी नवल जी मज हो न वाटे
कीं लाविसी जन समस्तहि याच बोटे ॥११॥
देणार मागितलिया परमा गतीतें
नेघें तिला म्हणसिही जरि माग तीतें
मागेंन पाय अवलोकुनियां स्मृतीतें
आलों असें धरुनि निश्चय या मतीतें ॥१२॥
पद तुझे त्दृदयीं हरि रेखिले असति ते अजि दृष्टिस देखिले
स्मृति असीच असो त्दृदयांबुजी सरस हें घननीळ दयांबुजी ॥१३॥
तेथुनि गेला दुसर्या गृहातें तो कृष्ण फांसे उचलोनि हातें
गृहेश्वरीशीं निज - उद्धवासीं खेळे त्दृदंभोरुहश्रुद्ध - वासी ॥१४॥
पूजा यथापूर्वचि नारदाची करुनी त्या भक्ति - विशारदाची
म्हणे अपूर्नासहि पूर्णकाम स्वामी वदाजी मज योग्य काम ॥१५॥
हरि असा जरि मानहि दे वदे तरि न उत्तर तो क्षितिदेव दे
प्रतिगृहीं करि जो नव लक्षणें दिसति तींनव - मानव - लक्षणें ॥१६॥
आलेत केव्हां पुसतां द्विजाला तत्पूर्वपूजा गरुड ध्वजाला
जाणों नसे ठाउक त्या अजाला तेव्हां ऋषी विस्मित - चित्त जाला ॥१७॥
घरोघरीं नूतन भाव दावी माया हरीची किति ते वदावी
एवंच ये आणिखिया गृहातें धरुनि वीणा मुनिवर्य हातें ॥१८॥
तों लेंकुरें खेळवितो हरी तो जो मोह माया स्मरणें हरीतो
त्या बाळका लाडवि लोकरीती क्रीडा करी लोक जसे करीती ॥१९॥
बोबडी करुनि दाटुनि वाणी बोलतो परम - कौतुक - बाणी
बाळ बोलति तसेंच हरी तो बोलतो गृहिणि - चित्त हरीतो ॥२०॥
उचचि नावद - साकल खोबलें खजुल देउनि गाय बलें बलें
बसुनियां मग तूं गलुलावली मजपुलें उलबीं बलि वावली ॥२१॥
चालीलिया देइन गोल गोला गोलांबिया देइन फालफाला
मी ईहुनी आवलतों खलें कीं ऐसा हली खेलवि लेंकलें कीं ॥२२॥
हरि मुलांसह कंटुक खेळतो परि न लौकिक केवळ खेळ तो
स्वकरिं घेउनि कंदुक सीकवी गति पहा वदताति कसी कवी ॥२३॥
मुनि - मानस वृंदचि कंदुकसे यदुनंदन कंदुक तेचि कसे
करिं घेउनि नंदन खेळवि तो प्रभु तो मनिं चिज्जडखेळ वितो ॥२४॥
भनकंटुक ते करिचे पडती विषय क्षितितें तरी जडती
पडतांचि चिदंबरिं जे उडती हरितें अजि ते बहु आवडती ॥२५॥
मन - कंदुक ते कृत - कर्म - फळें विषय - क्षिति आफलि दैव - बळें
अधिकाधिक चिद्गगनीं कुशळें उडती मन - कंदुक इंदुकळें ॥२६॥
विषय क्षितिऊपरि त्याचि पडे मन मृन्मयपिंड न तों उपडे
निपटूनि तयास हि बाळ करीं धरिती परि आदर हा नकरीं ॥२७॥
प्रतिबिंब - चिदंशक बाळक ते निज - मानस - इंद्रिय - चाळकते
चिखलासमही मन खेळविती विषय प्रिय बंधक खेळवीती ॥२८॥
परि कंटुक - खेळचि बिंब हरी सिकवि प्रभु जो भवबंध हरी
मन - कर्दम - खेळ न तो सिकवी म्हणताति जगद्गुरु ज्यासि कवी
मुनि कौतुक दूरुनि पाहतसे स्वमनांत पहा तुम्हिं सर्व तसे
विषयक्षितिहूनि तंई उडती सुमनें प्रभुला मग आवडती ॥३०॥
इत्यादि लौकिक - रसांत अलोक रीती
दावी चरित्र हरि लोक जसें करीती
ऐसा लपोनि हरि दूरुनि देखिला हो
तैसाचि तो मुनिवरें मनि रेखिलाहो ॥३१॥
तेथूनिही अन्यगृहास जावें त्याही गृहीं येचिरितीं भजावें
म्हणूनि ये मेधतनू समोर पाहे तया जेविं घनास मोर ॥३२॥
करीं घेउनी वाजवी ब्रम्हवीणा तया देखतां भक्ति - योग - प्रवीणा
पुढें धावणें पूजनें पूर्वरीती करी आपणा देव जैसें करीती ॥३३॥
त्याहीं गृहीं प्रश्न नवाच केला त्या कौतुकाचाच ऋषी भुकेला
आलेति केव्हां पुसतो मुनीला जाणी नसे ठाउक मेघनीळा ॥३४॥
त्यास उत्तर नदेत मुनी तो जाय अन्य - सदना नमुनी तो
दाखवी स्वरसमा नवला हो दाखवी स्वमनिं मानवला हो ॥३५॥
कोणें गृहीं स्नान करी हरी तो नामें मनाचे मळ जो हरी तो
कोणे गृहीं अग्नि यथोक्त होमी कीं हे करीतों गृहधर्म हो मी ॥३६॥
N/A
References : N/A
Last Updated : June 29, 2009
TOP