ऐसा विचार सुचतां व्रजिंच्या जनाची
श्रीकृष्ण भक्ति मनिं आठवितां मनाची
शंका हरे त्वरित कीं हरि भक्ति जेथें
होती अवाधक असे अनुराग तेथें ॥१२१॥
तैसी न जोंवरि रमापति - भक्ति चित्तीं
तों गेह - देह - सुत - कामिनि - भोग - वित्तीं
ज्या आवडी करिति बंधन या जनांला
त्या बंधका नव्हति जो हरि भक्त झाला ॥१२२॥
चंद्रादि सर्व गगनीं ग्रह आणि तारा
दिप्ती तयांसिहि असोनि यथा प्रकारा
श्रीसूर्य त्यांत उगवे मग त्यां समस्तां
दिप्ती यथास्थित असोनिहि होति असा ॥१२३॥
खद्योत तेजें रविच्या प्रकाशें होती तशा या हरि भक्ति - लेशें
भावें अशा श्लोक विरिंचि आतां बोलेल तो हा सुख कारि संतां ॥१२४॥
कामादि चोर वय तों वरिची हरीती
काराग्रहासम गृहें हरि तोंचि होती
माझें तुझें म्हणुनि तोवरि मोहबेडी
कीं जोंवरी न तव दुर्लभ दास्य - गोडी ॥१२५॥
पुत्रादिकांचे अनुराग जेकां हे चोरटे नागविताति लोकां
ते तोंच कीं जों तय दास्य नाहीं जे दास त्यांचें हरिती न कांहीं ॥१२६॥
आयुष्यवेगीं हरि भक्ति जोडी तुटेल त्याची भवबंधबेडी
तो काळ नेतो विषयानुरागें कामादि हे चोर अशा प्रसंगें ॥१२७॥
आतां असोनि अनुराग कलत्र - वित्ती
श्रीकृष्ण - आवडि - ठसा बसला स्वचित्तीं
प्रेमें स्मरे हरिस चित्त अखंड ज्यांचें
पुत्रादि - राग हरिती वय केविं त्यांचें ॥१२८॥
देहें करुनि करितां स्व - गृहादि - कामें
चित्तीं मुकुंद वदनीं गुण - कर्म - नामें
पुत्रादि - आवडि असोनि यथाप्रकारें
त्याचें वृथा वय न जाय अशा विचारें ॥१२९॥
सर्वाहुनीही प्रिय कृष्ण जेव्हां भक्तीस येना व्यभिचार तेव्हां
हे चोरटे यास्तव तोंचि देवा कीं जों नलागे तव पादसेवा ॥१३०॥
कारागृहें केवळ बंदिशाळा गृहें जनांची सुरलोकपाळा
कीं बंदिशाळेंतुनिही पळाले कोणी गृहें टाकुनियां न गेले ॥१३१॥
दुःखें जरी अनुभवी पुरुष स्वदेहीं
नाहीं जयास सदनीं सुखलेश कांहीं
जाऊं सके न गृह टाकुनियां तथापी
दारिद्र्य भोगुनि करी बहु पाप पापी ॥१३२॥
कारागृहासम गृहें वरि तोंचि देवा
कीं जो गृहस्थ नकरी तव - पाद सेवा
जे कां तुतें भजति मुक्ति पुरी तयांची
होती गृहें स्मरति तूज मनें जयांचीं ॥१३३॥
टाकूनियां गृह - धनासि वनासि जावें
निःसंग होउनि रमापतिला भजावें
ऐसा विवेक उपजे न जया मनाला
मोहाख्य बंधन असेच तया जनाला ॥१३४॥
हें स्वप्नतुल्य गृहदारसुतादि कांहीं
देहाऽवसान - समयीं सह येत नाहीं
ऐसें विवेकमय शस्त्र करुनि बेडी
हें मोहलक्षण महा - जनहीन तोडी ॥१३५॥
हें मोहलक्षण गृहादिक तोंचि बेडी
लागे न जों तव - पदांबुज - युग्म - गोडी
टाकूनि सर्व वनिही तुजला भजावें
तें सर्व तूंचि तरि टाकुनि काय जावें ॥१३६॥
ऐसें गृहस्थ भजती हरि तूज चित्तें
प्रारब्ध येरिति असोनि कलत्र वित्तें
त्याला गृहादिक न बाधक होय तैसें
खद्योत - तेज रविच्या उदयीं न जैसें ॥१३७॥
खद्योत - तेजहि असे इतरांसि जेव्हां
नाहीं विरुद्ध भजनीं सुजनासि तेव्हां
जें सर्व कर्म हरि अर्पित ज्यां जनांचें
नाहीं गृहादिभय त्यांस विरुद्ध कैंचें ॥१३८॥
कांहीच ज्यांस भजनास विरुद्ध नाहीं
त्यांलागि तूं सुलभ हें न विचित्र कांहीं
जे सेविती तुज निमित्त जितां मुकुंदा
यांचा तसा तवनिमित्तचि सर्व धंदा ॥१३९॥
सन्यासियाहुनिहि या व्रजिंच्या जनाला
ऐसा तुझा अधिक लाभ समान झाला
जे त्यांसि मुक्ति हरि यांसहि तेचि देसी
उत्तीर्ण केविं तरि देउनि मुक्ति होसी ॥१४०॥
जैसें यतीस भजन - प्रतिकूळ कांहीं
नाहीं तसें व्रजजनासि असोनि नाहीं
प्रेमा यतीहुनिहि ज्यांस विशेष ऐसा
उत्तीर्ण मुक्तिफळ देउनि होसि कैसा ॥१४१॥
श्लोकांत हें पहिलिया वदला विरिंची
ऐसें तथापि परिशंकित बुद्धि त्याची
की मुक्ति मात्र यतिला परि कृष्ण जैसा
झाला व्रजीं सुलभ हा न यतीस तैसा ॥१४२॥
वत्सांसवें हरुनियां व्रज बाळ नेले
त्याचे पिते सकळही स्वपितेच केले
जे बाळ ते म्हणविले स्वसखे मुकुंदें
होती कृतार्थ नकरी मुनिवर्य - वृंदें ॥१४३॥
ज्या गोपिका वडिल त्या जननी स्वभावें
ज्या धाकट्या सहज त्यांस अनंगभावें
केलें कृतार्थ न यतीसहि हो विरक्तां
श्रीकृष्णलाभ सनकादिक जेविं मुक्तां ॥१४४॥
उत्तीर्ण काय हरि होइल येरितीनें
हें मानिलें त्दृदयिं भारतिच्या पतीने
तो आठवूनि अवतार - निमित्त कांहीं
बोलेल कीं हरिपदाविण मोक्ष नाहीं ॥१४५॥
तूं निष्प्रपंच तुज माय न बाप कांहीं
कोणी सखा न रिपु आणिक मित्र नाहीं
तो तूं असा किमपिही न जरी अपेक्षा
भक्तांसि उद्धरिसि केवळ अंबुजाक्षा ॥१४६॥
तूं तो अनादि - करुणामृत - पूर्ण सिंधू
दीनासि उद्धरिसि केवळ दीनबंधू
सर्वासि तारक कथा तुझिया पवित्रा
यालागिं वाटविसि केवळ या चरित्रा ॥१४७॥
लोकांसि आवडति केवळ लोकरीती
रुपें तुझीं तदनुसार कथा करीती
ते लोकरीतिच रितें करितां अनंता
संपादिसी जनक आणिक बंधु माता ॥१४८॥
कामातुरा प्रिय न बाप न माय कांहीं
स्त्री गोष्टि एक दुसरें प्रिय त्यासि नाहीं
या कारणें व्रज वधू - सुरतादि लीला
आरंभुनी निज - कथा - रुचि देसि त्यांला ॥१४९॥
तूं निष्प्रपंच परि वाटविसी प्रपंचा
कीं आयकोत जन कर्ण वदोत वाचा
जे कां प्रपन्न जन त्यांस सुखें अनंतें
संपादिसी तरि न तो उपकार यांतें ॥१५०॥
ऐसें म्हणोनि विधि शंकित - चित्त झाला
कीं मी अयुक्त म्हणतां जगदीश्वराला
उत्तीर्ण हो हरि न हो मज काय झालें
मी सापराध पण होइन याचि बोलें ॥१५१॥
ऐसेंच कीं हरुनि वत्सप वत्स नेतां
म्या मानिलें करिल काय म्हणोनि आतां
पाहों म्हणोनि मग वैभव तें पहातां
झालें मला कठिण हें स्मृतिही रहातां ॥१५२॥
ब्रम्हांड कोटि चतुरानन कोटी कोटी
देखोनियां मजहि विस्मय थोर पोटीं
बोलेल यास्तव विरिंचि तुझा पहातां
वाटे अगम्य महिमाहि तुझा अनंता ॥१५३॥
जाणों तुझा म्हणति जे महिमा अनंता
जाणोंत ते परि म्हणेन न मी अनंता
काया मनें करुनि आणिकही स्ववाचे
हे पार की नकळती तव - वैभवाचे ॥१५४॥
ऐशा स्तुती करुनियां विनवी विधाता
बोलेल दे मज निरोप म्हणोनि आतां
श्लोकामधें दुसरिया प्रणिपात त्या हो
ब्रम्हा करुनि भुवनाप्रति चालिला हो ॥१५५॥
कृष्णा निरोप मज दे बहु काय बोलों
अन्यायही करुनि मी कृतकृत्य झालों
कीं नाथ एक हरि तूं बुडतां जनांचा
हें आजि सत्य कळलेंच न अन्य साचा ॥१५६॥
तूं चित्स्वरुप जग आणिक तूजमाजी
हें देखिलें स्वनयनेंच आजी
कर्ता स्वयें मजचि मी म्हणवीत होतों
मी आजि किंकर तुझा स्वगृहासि जातों ॥१५७॥
श्रीकृष्ण तूं यदुकुळांऽबुज - सूर्य देवा
केलें कुळांस सकळां सुख वासुदेवा
गो - ब्राम्हणादि - सुर - सागर - वृद्धि - कारी
चिव्द्योमचंद्र दिससी मजला मुरारी ॥१५८॥
श्रीसूर्य तूज उपमा अजि वासुदेवा
कीं नाशिलें तम अधर्मक देवदेवा
जे दैत्य राक्षस निशाचर ते दडाले
हे हंस साधु सुखचिद्गगनीं उडाले ॥१५९॥
चमत्कारें येथें विधि करि नमस्कार हरिला
जगाचा मी ब्रम्हा म्हणुनि मनिंचा गर्व हरिला
म्हणें जों कल्पांत - प्रळय तुज तों हेंचि नमन
स्वयें मी ही वंद्य प्रभु नकरु हें चिंतन मन ॥१६०॥
नमस्कार आयुष्यपर्यंत ऐसा जयाचा तया मोह होईल कैसा
असा काळपर्यंतही वंदनाचा अभिप्राय गंभीर पद्मासनाच ॥१६१॥
ऐसा नमस्कार करुनि गेला कोणेरिती तें शुक बोलियेला
अंतीं स्तुतीच्या शुकउक्ति आतां श्लोकार्थ तोही वदिजेल संतीं ॥१६२॥
म्हणे शुकाचार्य असें अनंता प्रार्थूनि तो वंदूनियां विधाता
प्रदक्षिणा तीन करुनि पायीं तो वंदिला मागुति शेष शायी ॥१६३॥
घेऊनि आज्ञा हरिची स्वधामा गेला असा प्रार्थुनि पूर्ण कामा
ऐसी शुक्रें हे स्तुति संपवीली पुढें कथा येथुनि चालवीली ॥१६४॥
आज्ञा देउनियां विधीस हरिनें तेव्हां गडी आणिले
जैसे भोजन ते करीत बसले होते तसे मांडिलें
वत्सें आणुनि त्या समीप विधिच्या मायाभ्रमें काटिले
तों वत्सांसह कृष्णनाथ - वदन प्रेमें तिहीं देखिलें ॥१६५॥
तेव्हां जेउनियां स्वयें मग हरी आला व्रजा जेरिती
तैसा वामन गोकुळा प्रतिहि तो आला स्वयें श्रीपती
गोशब्दें मति - इंद्रियें व्रजतनू जेथें स्वयें श्रीहरी
नांदे वामन त्याचियाचि चरणीं हे अर्पितो वैखरी ॥१६६॥

N/A

References : N/A
Last Updated : July 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP