दृष्ट्वा वेद्यं प्रमथनपदं स्वात्मबोधस्वरुपं ।
बुध्वात्मानं सकलवपुषामेकमंतर्बहिस्थं ।
भूत्वा नित्यं समुदिततया स्वप्रकाशस्वरुपं ।
निस्त्रैगुण्ये पथि विचारतां को विधिः को निषेधः ॥६॥
तो ज्ञानदृष्टी ईक्षणा । भेदीं अभेद देखणा । जाणोनि पूर्णपणा । योग्यजाला ॥५७॥
अधमोत्तम पाउटी । नपडे त्याचिये दृष्टी । यालागीं वेद्यत्वाचिये उठी । नवचे सळु ॥५८॥
यानंतरें उत्कट । परमपद परु । प्रकृतीसी अनावरु । मृगजळीं मेरु । विरेना कहीं ॥२६०॥
वासना तुटे जाळीं । नभ नुकडे ज्वाळीं । चित्रींच्या साबळीं । न खोमे मही ॥६१॥
शुक्तिकेचा रजताकारु । झाराही भिन्न करुं । नसके, तेवीं अनावरु । प्रकृती तो ॥६२॥
कैचें अप्रमाणीं प्रमाण । तेथें कारणही अकारण । तें परमपद चिदधन । स्वबोधें जाला ॥६३॥
नाहीं द्वैतसौरस । हे वपु हा पुरुष । स्वात्मत्वाचा विलास । तें हें विश्व ॥६४॥
भूतादिभूताच्या ठायीं । स्वयें आपणावांचूनि नाहीं । सबाह्याभ्यंतर पाही । दुजें न कोणी ॥६५॥
बोलावें बाह्यांतरी । वेगळें असावें जरी । तेंचि नाही मां परी । सबाह्यें कैचें ॥६६॥
तंव बाह्य प्रकाशील कायी । जंव अंतरीं प्रकाशिलें नाहीं । ह्नणोनि जाणावें स्वदेही । तरी जाणितलें जगीं ॥६७॥
सविद्य स्यास्वतः सर्व ० । याचेनि यावरी भासत । तें स्वात्मपद समस्त । आत्मत्वें जाला ॥६८॥
ऐसा चालतां सूक्ष्म मार्गे । टणकला बोध मागें । राहिला यावरी आंगें । भक्त होउनी ॥६९॥
तो बोध बोधातीतु । विषय भोगी भोगितु । देहीं असोनि देहातीतु । गुणी गुणातीतु स्वयें जाला ॥२७०॥
स्वयें स्वप्नीं निमाला । तो जागृती स्वयें मीनला । तेवीं अनित्यका आला । ब्रह्मभूत तो ॥७१॥
मिथ्या प्रपंचाजवळी । वृत्ती परतोनि भ्रांती मेळी । न मेळे कोण काळीं । यालागीं नित्य ॥७२॥
चराचर सर्व । मज अरुपाचे आवेव । ऐसा अकृत्रिम स्वभाव । ते नित्यता म्हणिजे ॥७३॥
लवभरी विस्मरण । जालेपणीं जाणपण । नव्हेचि या नांव नित्यपण । नित्यत्वाचें ॥७४॥
नवल तो सदोदितु । अदृश्य उदोअस्तु । जें तो स्वप्रकाशी नित्यु प्रकाशमान ॥७५॥
ईश्वरीचें वैभव । ते ह्नणे माझे स्वभाव । पूर्ण परिपूर्णं सर्व । ते सदोदित स्वयें ॥७६॥
रवी सकळांतें प्रकाशवी । तो काय प्रकाशिजे दिवी । तैसा प्रकृतिस्वभावीं । अन्य प्रकाशरहित ॥७७॥
समस्त आत्मत्वें प्रकाशे । ज्याचेनि प्रकाशें प्रकाशिलें दिसे । स्वप्रकाश ऐसें । यालागीं नांव ॥७८॥
स्वरुपें सगळा । प्रकाशाचा उमाळा । जेवीं मंडणेंविण स्वलीळा । नभोमय सूर्यो ॥७९॥
तो तो प्रकाशुचि स्वादु । स्वादुचि सुगंधु । तो स्वरुपाचा आनंदु । जें स्वरुप ॥२८०॥
त्याचेनि स्वानंदसुखें । कडूपण अमृतीं ठाके । यापरी स्वसुखें प्रकाशला ॥८१॥
ऐसा जो प्रकाशी । कैंचा त्रिगुण वृक्ष त्याच्या देशीं । जो विधि निषेध चौपासीं । लसलसितु ॥८२॥
जयासी अविद्येचें आळें । तरी सूक्ष्म अनंत मुळें । संकल्पाचेनि जळें । सबळ जो कां ॥८३॥
अहतेचें बिंड । पांच खांदिया प्रचंड । चौप्रकारी उदंड । विस्तारिला ॥८४॥
पालवी मद्यमानें । विचित्र तृष्णेची सुमनें । विकाशलीं कामानें । जीवभ्रमर ॥८५॥
दों फळभारें फळला । अग्रें उतरतीं तळां । तो फळभोगु सोहळा । सेवी तयासी ॥८६॥
सर्वांगी निरंतरा । विषयरसाचिया धारा । उलोनि मदभारा । स्रवतु असे ॥८७॥
माझारी अवचितया । शोकाचिया पारंबिया । निगती आणिआळिया । संधिभागीं ॥८८॥
तेथ स्वर्गादिका कांमाणे । कामी कामिकां अति गोडपणें । दीक्षित ज्याकारणें । यजित याग ॥८९॥
ऐसा विपरीत भववृक्षु । देखोनि जो मुमुक्षु । छेदूनि दक्षु । अनाळसें जाला ॥२९०॥
संदेहयुक्तीचा दांती । खरमरा सहजस्थिती । ऐसी विद्याकर्वत हातीं । ऐक्यवृत्तीचा ॥९१॥
अहंचिन्मयाचे साहणें । प्रत्यावृत्ती खरमरपणें । शस्त्राचें सज्जणें । सिद्ध केलें ॥९२॥
स्वदेहा आणि शस्त्रां । ऐक्यतेचा उभारा । करुनिया तरुवरा । निवटूं लागे ॥९३॥
तंव घालितां धावो । तरुवरा अभावो । मृगजळींचा हेलावो । संनिधी जैसा ॥९४॥
ऐसिये त्रैगुण्यमार्गी । विचरतां राजयोगी । तयासी विधिनिषेध जगीं । वस्तुत्वा वेगळा कैंचा ॥९५॥
तें चिन्मया चिन्मय । आनंदा आनंदमय । विस्मया विस्मय । गिळूनि ठेला ॥९६॥