शुकाष्टक - श्लोक ९

श्रीशुक्राचार्यांनीं स्वानंदस्थितीचे जे उद्‍गार काढले आहेत त्यावर ’ शुकाष्टक ’ही नाथांची प्राकृत टीका आहे.


सत्यं सत्यं परममृतं शांतिकल्याणरुपं ।

मायारण्योद्दहनममलं ज्ञाननिर्वाणदीपं ।

तेजो - रुपं निगमसदनं व्यासपुत्राष्टकं यः ।

प्रातः कले पठति मनसा याति निर्वाणमार्गम् ॥९॥

मागें श्लोकार्थयुक्त । बोलिलों सत्य सत्य । जें सकळ इंद्रियें सत्यातें । भोगुनी सत्यत्वें वदली ॥६६॥

भगवद्रूप सत्यरुप । तो सत्य भोगु इंद्रियें नित्य । यालागीं सत्यसत्य । द्वीवचनार्थ बोलिलें ॥६७॥

त्या इंद्रियांचा अनुभवु । नावेक प्रकट करुनि दाऊं । ह्नणतुसे जिवाचा जीऊ । शुकशार्दूळ ॥६८॥

सकळही गुप्त । सेउनी परमामृत । तो अनुभउ भोग गुप्त । परी प्रकट करुं ॥६९॥

पुढें पाहे अर्थे । तो तृप्त होये परमामृतें । मर्‍हाटें न ह्नणावें येथें । अनुभवकसवटी हे ॥३७०॥

तरी दृष्टी सत्यत्वें कैसे । जो जो पदार्थ आभासे । तो स्वदेहासकट दिसे । दृश्यातीत ॥७१॥

कां दृश्यदृष्टीचे मेळां । नहोनी दृश्यदृष्टी वेगळा । भोगवी सत्यसोहळा । चिदानंदु ॥७२॥

जैसें हेमचि आयितें । प्रिये करी अळंकारातें । तैसे नांवरुप दृश्यातें । आवडीवरी भेटे ॥७३॥

एवं दृश्यदृष्टी देखणा । अनुस्यूत होउनी जाणा । जो श्रुतीसीहि अप्रमाणा । तो परिमाणामाजी भेटे ॥७४॥

तरी ऐकावयाकारणें । श्रवणचि सत्य कर्णे । मग जे जे गिरा परिसणें । तें सत्यासिच ॥७५॥

कां श्राव्या श्रावक श्रुती । त्रिधा स्वात्म अनुस्मृती । सांगतां ऐकतां होती । गगनाचा पितामहो ॥७६॥

कां बोलासी बोलविता । त्यासी दृढ केली आप्तता । परी बोलकिया आंतौता । विरोनि जाये ॥७७॥

मग शब्दाआंत बाहेरा । निःशब्दाचाचि उभारा । याहेतु श्रवणद्वारा । सत्याचा भोगू ॥७८॥

घ्राणाचिया परिमळा । सुमन करुनियां लीळा । भोगु जाये तंव सावळा । भोग्यभोगुभोक्ता ॥७९॥

तो सुवासु वासाअंतरीं । घ्राणा आंतुबाहेरी । रिघाला भोगु करी । आपआपला ॥३८०॥

रसीं रसपणें । जिव्हे रस रसज्ञे । उभय ऐक्य येणें । रसभोग भोगी ॥८१॥

तो ग्रास घाली स्वमुखीं । तेणें जगदोदर पोखी । कीं विश्वंभरें सुखीं । तृप्तीस ये ॥८२॥

ग्रासु रसने रसामाजी । देखे अनुस्यूतता सहजीं । मग अक्ष आणि भोजी । भोगुनी अभोक्ता ॥८३॥

रसी रसपणें न देखे । दृष्टी विषयो । पारुषे । तेणें निर्विषयचि तोषे । नित्यतृप्त ॥८४॥

असो एवं तृप्ती जाली । तंव क्षुधा अधिक खवळली । रिती वाढी नाहीं उरली । परी अनुही न धाये ॥८५॥

ताट भोक्ता भोजन । अवघे जाला आपण । हातु न माखितां सर्वापोशन । केलें तेणें ॥८६॥

जो यापरी तृप्त जाला । सवेंचि संसारा अंचवला । सेखीं घाला ना भुकेला । नित्यतृप्त ॥८७॥

स्पर्श जो लागे । तो आंगींचेनि आंगें । पार्थीव टाकुनी मागें । विदेह भोगी ॥८८॥

मृदु कां कठीण । शीत कां उष्ण । परिणमुनी एके प्रमाणें । द्वंद्वातीत ॥८९॥

शय्या शयन सेजारीं । आपणचि तळींवरी । ऐसे मृदु आरुवारी । शून्य होउनी पहुडे ॥३९०॥

चालावया कारणें । आचरणीं आवेश हा नेणे । पृथ्वी अवलोकणें । सपाट करी ॥९१॥

मग निराळा होऊनी आगळी । सप्तपाताळांतळीं । वाट करी सोज्ज्वळी । चालावया ॥९२॥

एवं वर्ततां ऐसा होये । एरव्हीं चिन्मात्र पाहे । पाहातीहि विद्या जाये । निपटूनिया ॥९३॥

सर्व इंद्रियांसीं देही । सत्यत्व या स्थिती पाही । रोकडे ठायींच्या ठाई । प्रत्यक्ष जाली ॥९४॥

एवढा स्वप्रकाशु ठसा । पहिलें झाकवला होता कैसा । आतां देखतो हे दशा । कैंची ह्नणसी ॥९५॥

जरी जन्मलिया बाळा । उघडवितसे डोळा । परी ज्ञानाची कळा । अप्रत्यक्षा ॥९६॥

ज्ञान नाहीं तोचि प्रौढ वयसे । सर्व पदार्थी ज्ञाता दिसे । तेवीं अहंतेसि नाशे । सोहंता प्रत्यक्ष ॥९७॥

सर्वंद्रिय प्रवृत्ती । जनीं भोगु हा भोगिती । त्यासी सत्याची प्रतीति । हातवसे सिद्ध ॥९८॥

जें सत्याचें सत्य । सत्यपणें नित्य । तेंचि जाण सत्य । त्याचा भोगु ॥९९॥

सत्य असत्य दोन्ही । त्यजूनि बैसे समाधानीं । तेणें सत्याची राजधानी । भोगिजे जेणें भोगें ॥४००॥

हा सत्यस्वादु साचे । त्यासी अमृतहि न रुचे । अमृता गोडपण ज्याचें । तो सर्व इंद्रियीं भोगीं ॥१॥

ज्यालागीं अमृत आर्त । त्यासी ह्नणिजे परमामृत । प्रकट केलें गुप्त । होतें तें अष्टकामाजी ॥२॥

या अष्टकाच्या अर्थे । शांती विश्रांतीतें । आणुन कल्याणातें । प्राप्त करी ॥३॥

जे शांती कल्याणरुप । मोडी अविद्येची झोंप । स्वानंदसुख आमुप । प्राप्त अष्टकें येणें ॥४॥

शांतीचें कल्याण । तेंचि होयेम आपण । येणें अष्टकें जाण । अर्थितां तया ॥५॥

मायेचें भववन । वासनावळी कवळून । अहंकार कंटकीं पूर्ण । सावजेंसी ॥६॥

जेथें आशा आघवी व्याली । दुसरी तृष्णा आसवली । क्रोध अजगराची वळली । सदापुष्टी ॥७॥

उन्मत्त कामगजें । फळें कामनेनें केळिजे । मोहोनीडीं घुसिजें । असूयापरापती ॥८॥

जेथें इच्छेचीं कोल्हीं । कुकाती तोडें वरती केलीं । वनामाजी नाहीं चाली । मानवृश्चिकाभेणें ॥९॥

असत्याची आरांटी । अधर्माची बोरांटी । मदाचा घाट बेटीं । प्रमदामदें ॥४१०॥

तेथें कटाक्षाचे पाश । बाहुळिंगण लावी दास । वरी कुचपाषाणाचे घोस । ह्नणती धाये ॥११॥

विषयाचे उमाळे । दिसती वांजाफळे । त्यालागुनी गुंतले । जीवभ्रमर ॥१२॥

त्या वनाचे शेवटीं । संकल्पश्वानगोष्टी । बैसला भुंकत पाठी । लागतुसे ॥१३॥

त्या वनाचें दाहक । समुह हें अष्टक । जो येअर्थी निष्ठक । अभ्यास करी ॥१४॥

या अभ्यासाचेनि बळें । गुरुवाक्य आरणी मेळे । एकाएकीं ज्ञानानळें । प्रदीप्त होइजे ॥१५॥

तो प्रकटतांचि एकसरें । मायावनाचे फेरे । जाळितु भरे । ब्रह्मांडवरी ॥१६॥

तेथें श्वापदें वन विषम । जाळुनी केलें भस्म । मग चैतन्य अग्नि तेजोत्तम । स्वप्रकाशे ॥१७॥

वन अवघेंचि जळे । वन्ही अधिकचि प्रज्वळे । इंधन नाहीं परिबळें । आस्मासास ॥१८॥

ऐसा मायारण्यदाहकु । ये अष्टकींचा विवेकु । कीं शांतिदीपीचा दिपकु । सकळद्रष्टा ॥१९॥

जें सकळ क्षेम कल्याण । शांतीचें अधिष्ठान । तेथील प्रकाशितें जाण । अष्टक विवेकु ॥४२०॥

जें सकळाचें बीज । कीं सर्व तेजांचें तेज । प्रकाशाचे निज । स्वरुप उघडें ॥२१॥

तें अष्टकमिसे । हातां पावे अप्रयासें । शब्दा सांडूनी वेदु वसे । तें हें प्रमेये ॥२२॥

हें अष्टक नव्हे साचार । वेदवस्तीचें आग्रहार । शास्त्रवेवाद वोरीबार । संपविते ॥२३॥

यालागीं निगमाचें सदन । समस्तगुह्य ज्ञानवदन । अध्यात्मसमाधान । तें हें अष्टक ॥२४॥

जो वेदसरोवरींचा हंसु । द्विभुज जाला जगदीशु । अवतरला व्यासु । द्वैपायनु ॥२५॥

तो विवेकाचा उदधी । आनंदाचा मंगळनिधी । त्याचा पुत्र सदबुधी । शुक योगींद्र ॥२६॥

या शुक मुखाष्टकें पवित्रा । औट चरणी विचित्रा । वोविया नव्हती मात्रा । औटावी हे ॥२७॥

वोवी दाखवी विवेकातें । पावन करी औट हातें । एकदेशीं सरतें । व्यापकामाजी ॥२८॥

त्या व्यासपुत्राचें अष्टक । पढतां होये पाठक । यासी ज्ञानाचें सम्यक । तारुं लागे ॥२९॥

मां जो मनें निष्टंकु । विचारी हा विवेकु । त्यासी प्राप्तिदायकु । सेवा करी ॥४३०॥

ह्नणउनी या अष्टकाचें । मनन अध्ययन करी साचें । तरी प्राप्ती फळ तयाचें । ठेवणें होये ॥३१॥

जो निर्वाण अत्यंत असे । तो मार्गु तयाचें घर पुसे । प्राप्ति त्यापासी असे । आज्ञारुप ॥३२॥

जो प्रत्यहीं प्रातः काळीं । हे आठही मणी जपमाळीं । मनाच्या करमंडळी । प्रत्यावृत्तीं करी ॥३३॥

त्यासी सायं आणि माध्यान्हीं । हे गेली हारपोनी । आघवी उखाची उजळोनी । राहे ब्रह्म बाळ सूर्य ॥३४॥

ज्या सूर्याचेनि प्रकाशें । स्वयें नुरिजे भिन्नवसें । त्या सूर्याचेनि सौरसें । अष्टक केलें ॥३५॥

जो सकळ जन व्यापकु । जनार्दनु दाता येकु । त्याचेंनि एक एकू । भव भय पशु तुटला ॥३६॥

सायोज्य लग्न घटिका । घालूनियां अष्टका । ब्राह्म मुहूर्ती पाठका । सावधान नित्य ॥३७॥

पूर्वी भानुदास कृपा सौरसु । पितामहाचा पिता भानुदासु । त्यापासूनिया हा वंशु । जनार्दना प्रिये ॥३८॥

तो जनार्दना प्रिय एका । मूळ मार्गे श्रीशुका । लागोनी केली टीका । स्वात्मबोधें ॥३९॥

पढे पाहे परिसे । ते तिघे येती एकदशे । तळी वरी पंक्तीं जैसें । रस सेव्य एक ॥४४०॥

हें अष्टक नव्हे सायुज्य ताट । श्रीशुकालागी चोखट । केलें तेथें अवचट । शेष भागीं जालों ॥४१॥

हें अष्टक नव्हे अष्टशाखा झाड । अग्नीं शुक फळें सेवी गोड । तेणें एका एकही पाड । शुद्धदिध आठहि ॥४२॥

ऐसी कृपा श्रीशुका । उपजोनि दिधलें अष्टका । नित्यजनार्दन एका । एकपणें नांदवी ॥४३॥

एका जनार्दनीं । कीं जनार्दन एकपणीं । सागरी जैसें पाणी । तरंग जाले ॥४४॥

एका जनार्दनी पाही । तरी हें काहींचि नाही । रत्नमाळेसी कहीं । सापपण होतें ॥४५॥

एक जनार्दना शरण । शब्दाचें भेदपण । परी सायोज्याहोनी जाण । गुरुभक्ती गोड ॥४६॥

एक जनार्दन नामी । बोलतांचि गौप्य आह्मी । यालागी आत्मारामीं । संपूर्ण ग्रंथु ॥४४७॥

इतिश्रीशुकाष्टक एकाकारटीकायां संपूर्णमस्तु । श्लोक ॥११॥

ओवी ॥४४७॥

एवं ॥४५८॥

श्रीकृष्णार्पणमस्तु । शुभं भवतु ॥ श्रीराम ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP