|
उ.क्रि. १ ( धान्य इ . सुपांत घालून हलके , बारीक , जड मोठे इ० दाणे निराळे करण्याकरितां ) इकडे तिकडे हलविणें ; हिंदळणें ; पाखडणें . २ ( दोन किंवा अधिक पदार्थांचें ) मिश्रण होण्याकरितां ताट , परात ; सूप इ० कांत घालून हलविणें ; खुंदळणें ; ढवळणें ; माखणें ; लेपणें . ऐक्यें घोळिली बुध्दि कैसी । मानु श्रोत्यांसी वाढविला । - एभा ९ . ४६३ . लाडवांच्या कळया पाकांत घोळून लाडू बांधावे . ३ जोरानें ओढणें व ढकलणें ; खुदळणें ; अपाय होईल अशा तर्हेनें ओढाताण , हिसकाहिसक करणें ; घोळसावणें . त्या मल्लानें दुसर्या गडयास एक तासभर घोळविलें . ४ ( गंजिफांचा खेळ ) गंजिफांची , पत्त्यांची गलत करणें ; पिसणें . ५ ( एखादी गोष्ट ) चिंतनाचा , वादाचा , चर्चेचा विषय करणें ; वाटाघाट करणें ; वादविवाद करणें ; विचार करणें ; ( एखादी गोष्ट ) पुन : पुन : मनांत आणून मनन करणें , घाटणें ; निमुटपणें वर पाहूं लागली म्हणजे असें वाटे कीं कांहीं तरी तिच्या मनांत घोळत आहे . - पाव्ह १८ . त्याच्या मनांत सर्वदा शास्त्र घोळत असतें . ६ त्रास देणें ; छळणें ; जेरीस आणणें ; सतावणें ; जांचणें ; कष्टविणें . यालागीं दुकाळा करितों मनन । आम्हाहि घोळिला बहुता परीनें । - मोद्रोण ३ . ८५ . त्या श्लोकानें मला चार घटका घोळलें तेव्हां त्याचा अर्थ लागला . घोडयानें मला दिवसभर घोळलें तेव्हां सांपडला . त्याला दुखण्यानें दोन महिने घोळलें . ७ ( सुतार - सोनारकाम ) तासून , घासून , घोटून , गुळगुळीत करणें . कुर्हाडीचा दांडा अमळसा घोळ , मग चांगला बसेल . ८ खोदून खोदून विचारणें ; उलट सुलट प्रश्न विचारणें ; चोरास जेव्हां घोळघोळून घेतलें तेव्हां कबूल झाला . ९ ( एखाद्या कामांत ) सरावणें ; वहिवाटणें ; राबत्यास पडणें . त्या कामांत मी नवशिका नाहीं , दोन वर्षे घोळलेला आहें . हा घोडा दोन चार दिवस घोळला म्हणजे बसावयास येईल . १० ( एखाद्या गोष्टीशीं , गोष्टीचा ) नेहमीं प्रसंग पडणें ; ( एखादि वस्तु उदा० रुपये , दागिने इ० ) हातांत खेळवणें ; इकडून तिकडे देणें , इकडून तिकडे ठेवणें . हातीं रुपये घोळवण्याजोगा प्रामाणिक माणूस कामावर ठेवावा . ११ चोळामोळा करणें ; वापरणें ; वरदळींत , वापरण्यांत येणें , आणणें . हा आंगरखा खडखडीत लागतो पण दोन दिवस घोळला म्हणजे मऊ होईल . १२ चाळविणें ; छकविणें ; भुलविणें . घातकी न देखो तैसा दुसरा । घोळितो नृपाला पेचुनी । - दावि ४५७ . [ सं . घुण - घूर्ण ; प्रा . घोल = घुमविणें ; हिं . घोलना ] घोळघोलून , घोळून घोळून - क्रिवि . १ आलटून पालटून ; बदल करून ; आळीपाळीनें ; एकामागून एक . ( क्रि० करणें , खाणें , घेणें , देणें ). नित्य एकाच ब्राह्मणास दान देतोस , हें काय ? घोळून घोळून सांगावे . २ वारंवार , पुन : पुन : घोळण्याची क्रिया करून ; पुन : पुन : इकडून तिकडे हलवून , ढकलून , घोळसून , चर्चा करून , मनांत आणून , उच्चारून , घोळणें याच्या त्या त्या अर्थी द्विरुक्तिनें क्रिया करून . हा मंत्र लोकांच्या तोंडीं आपोआप येतो व तोच घोळघोळून पाठ होऊन जातो . - सासं २ . ४०१ . [ घोळणें द्वि . ] घोळीव - वि . १ घोळलेला . घोळणें पहा . २ गुळगुळीत केलेला . सर्वांगानें गोल असा घोंळीव हिरा कोणी गिळल्यास त्यापासून इजा होत नाहीं - पदाव १ . ७० . ३ ( व . ) गाळीव ; निवडक . [ घोळणें ] घोळन - क्रिवि . ( गो . ) एक दिलानें ; श्रमविभागानें . घोळविणें , घोळवणें - सक्रि . घोळणें पहा . भूदेव पदरजांत स्वजनाकरवींहि देह घोळविले । - मोसभा २ . ४४ . [ घोळणें प्रयोजक ]
|