|
अ.क्रि. केलें जाणें ; घडून येणें ; सिद्ध होणें ; साधलें , संपादलें जाणें ; अनुकूल होणें . गतवर्षी घर बांधणार होतों पण साहित्य मिळालें नाहीं म्हणून बनलें नाहीं . फुरसत मिळणें . ( भांडण वगैरे ) जुंपणें ; पेटणें . एखाद्या स्थितींत येणें ; केलें - उतरलें जाणें , होणें . त्याचा रंग चांगला बनला . लठ्ठ व बळकट होणें ; द्रव्यवान , भाग्यवान होणें . जुळणें ; जमणें ; पटणें . ह्याचें बाहेरचे माणसाशीं बनतें पण घरचे माणसाशीं बनत नाहीं . नटणें ; शृंगारणें . असी चट्टी पट्टी करुन बनून कोणीकडे गे चाललीस . खांदा बदलणें ( हमाल , गडी यानीं ). घटनेस येणें ; योग्य स्वरुपांत , स्थितींत येणें ( व्यापार , चाकरी , हातीं घेतलेलें काम , चालू बाब ). ( ल . ) फसणें . [ सं . बन किंवा भूत ; प्रा . भन ; हिं . बनाना ] ( वाप्र . ) बनीं बनणें - सजणें . सज्ज होणें ; कंबर बांधून तयार असणें ( चाकरीस , कामास ). बनून ठनून चालणें - उंची व घवघवीत पोषाखानें मिरविणें . बनून राहणें - वि . होऊन राहणें . त्यांतील प्रत्येकजण केवळ धर्ममूर्ति बनून राहिला आहे . - नि ६२९ . बनेल - वि . ( ना . ) स्वयंसिद्ध ; उघड ; स्पष्ट ; कायम टिकणारा . बनेल तेथपर्यंत - क्रिवि . होईल तेथपर्यंत . बनेल तेव्हां - क्रिवि . फावेल त्या वेळीं . बनाव - पु . परस्परांचा चांगला समज ; ऐकमत्य ; मेळ ; जम . संघटितपणा ; अनुकूलभाव ; सख्य ( मनुष्य , गोष्टी , गुण यांचा ). आणि अत : पर बासवाडेकराचा त्याचा बनाव बसत नाहीं . - वाडबाबा १ . २८ . भव्य रचना ; थाटमाटाची मांडणी ; सुसंघटितपणा . प्रसंग . तहाचें बोलणें . [ हिं . ] बनावट , बनोट - स्त्री . मांडणी ; रचना ; घाट ; बांधणी ; धाटणी ( इमारतीची , कवितांची इ० ). कवनीं ज्यांच्या बंद बनोटे । - ऐपो २२७ . सूत ; वीण ; पोत ( कापडाचा ). रचना ; मांडणी ; ठेवण ; मांडण्याची पद्धत , व्यवस्था ; करण्याचा अनुक्रम ( जागा , काम , विधि , उत्सव यांचा ). बनावणी ; सजवणूक ; नटणें ; भव्य पोशाखानें निघणें . वक्तृत्वाच्या डौलानें व अलंकारिक रीतीनें कथन करणें . ( ल . ) कुभांड ; थोतांड ; कृत्रिम , बनाऊ गोष्ट . - वि . बनाऊ ; नकली ; खोटी ; रचलेली ; कृत्रिम . ( समासांत ) बनावट - अर्जी - साक्षी - साक्षीदार - मुद्दा - वही - जमा - खर्च इ० बनावट सबब सांगून माझा घात केला . [ हिं . ] बनावणी - स्त्री . बनविण्याची क्रिया ; अलंकृत करणें इ० बनावट अर्थ ४ पहा . [ बनाविणें ] बनाविणें , बनविणें , बनावणें - सक्रि . शोभविणें ; सजविणें ; नटविणें . तयार करणें ; नमुनेदार घडणें , वळविणें . थाटानें मांडणें , निघणें . प्रशस्त शब्दविस्तारानें , पुष्कळ अलंकार व अर्थवादयुक्त असें सांगणें . गोष्ट जरी नीरस असली तरी बनवून सांगितली म्हणजे गोड लागत्ये . फसविणें . हे लोक आपल्याला बनविताहेत . [ बनाव ] बनाऊलेख , बनावट लेख , बनीव - - पुवि . खोटी सही किंवा मोहर करुन दस्त करणें , खर्या दस्तांत लबाडीनें फेरफार करणें , किंवा वेड्या , अंमल चढलेल्या माणसाची सही घेऊन दस्त करणें . ( इं . ) फोर्जर्ड डीड ; केलेला ; रचलेला ; घडलेला . ( ल . ) खोटी रचलेली ; पदरची ( गोष्ट ). बनावट ; कृत्रिम . थाटलेला ; नटलेला . परिष्कृत भाषापद्धतीनें व मोहक अभिनयानें अलंकृत ( दंतकथा , व्याख्या , निवेदन , भाषण ). [ बनणें , बनविणेचें धातुसाधित नाम ]
|