विनायकी : दूर्वागणपतिव्रत (सौरपुराण)
हे व्रत श्रावण शु. चतुर्थीला करतात. ही चतुर्थी मध्याह् नव्यापिनी धरतात. जर ती दोन्ही दिवशी असेल तर अगर दोन्हीही दिवशी नसेल तर 'मातृविद्धा प्रशस्यते' या नियमाने पूर्वविद्धा धरावी. त्या दिवशी प्रात: स्नानादी कर्मे करून एकदंत, चतुर्भुज, गजानन, सुवर्णाच्या आसनावर बसलेली अशी श्रीगणेशाची मूर्ती करावी. दुर्वाही सोन्याची करावी. नंतर सर्वतोभद्र आसनावर मंडलावर कलश स्थापन करावा. त्यावर दूर्वा ठेवून गजाननाची स्थापना करावी. त्यास लाल वस्त्र वाहावे व अनेक प्रकारच्या सुगंधित पत्री, फुले, बेलपान, आघाडा, शमी, दूर्वा आणि तुळशीपत्र अर्पण करून पूजा करावी. नंतर आरती करून
'गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन ।
व्रतं संपूर्णतां यातु त्वत्प्रसादादिभानन ॥
अशी प्रार्थना करावी. याप्रमाणे ३ अगर ५ वर्षे केल्याने सर्व अभीष्टे सिद्ध होतात.