पवित्रार्पण विधी :
श्रावण शु. एकादशीला देवाला पवित्रक अर्पण करतात. जरी सामान्यत: बाजारात मिळणार्या सुताचे वा रेशमाचे पवित्रक करतात, तरी शास्त्रात त्याचे वेगळे विधान आहे. त्याप्रमाणे मणी, रत्न, सोने, चांदी, तांबे, रेशीम, सूत, त्रिसर, पद्मसूत्र, कुशा, मुंज, कापूस अगर अन्य प्रकारापासून पवित्र करावे अगर सुवासिनी स्त्रीकडून सूत कातवून त्याच्या तीन दोर्यांचा त्रिगुणाने करून त्यापासून बनवावे. रेशमाचे पवित्रक असेल तर त्यात आंगठ्याच्या पेराप्रमाणे यथाशक्ती ३६०, २७०, १८०, १०८, ५४ , अगर २७ गाठी घालाव्यात. त्याची लांबी गुडघा, मांडी अगर बेंबीपर्यंत ठेवून त्यावर पंचगव्य प्रोक्षण करून त्याला स्वच्छ पाण्याने धुवावे. नंतर
'ॐ' नमो नारायणाय'
चा १०८ वेळा जप करून शंखोदक शिंपडावे आणि रात्रभर ठेवून व्रताच्या दुसर्या दिवशी धारण करावा. त्यावेळी तुपाने भिजलेल्या दोन वाती अगर कापूर पेटवून आरती करावी. आणि
'मणि -विद्रुममालाभिर्मंन्दारकुसुमदिभि: । इयं संवत्सरी पूजा तवास्तु गरूडध्वज ॥' 'वनमाला यया देव कौस्तुभं सततं ह्रदि । पवित्रमस्तु ते तद्वत्पूजां च ह्रदये वह ॥'
असा श्लोक म्हणून नमस्कार करावा. सत्ययुगात रत्नांचे, त्रेतायुगात सोन्याचे, द्वापार युगात रेशमाचे व कलियुगात सुताचे पवित्र धारण करणे योग्य होय.
* शुक्लैकादशी : पुत्रदा एकादशी-
श्रावण शु. एकादशी पवित्रा, पुत्रदा व पापनाशिनी असते. यासाठी आदले दिवशी दुपारी हविष्यान्न एकवेळ घ्यावे (एकभुक्त) एकादशी दिवशी प्रात:स्नानादी कर्मे झाल्यावर
'मम समस्त दुरितक्षयपूर्वकं श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं श्रावण शुक्लैकदशीव्रतमहं करिष्ये ।'
असा संकल्प सोडून भक्तिभावपुर्वक व यथाविधी परमेश्वराची पूजा करावी. अनेक प्रकारची फुले, फळे पत्री आणि नैवेद्य देऊन आरती करावी. त्यानंतर रात्रीच्या वेळी गायन, वादन, नर्तन, कीर्तन आणि कथाश्रवण यांत रात्रभर जागरण करावे. दुसरे दिवशी पारणे करून यथाशक्ती ब्राह्मणभोजन घालून मग स्वत: जेवावे. यामुळे पापाचा नाश होऊन पुत्रादी प्राप्ती होते.