१ उभय नवमी :
एक तिथिव्रत. पौष मासातल्या शु. व . नवमीस भगवतीची त्रिकाल पूजा. देवीची मूर्ती पिठाची करतात. ती चतुर्भज व शूलधारिणी असावी, असे सांगितले आहे. तिला घृताने स्नान घालतात. खीरभाताचा नैवेद्य दाखवतात. कुमारीला भोजन घालतात. अशा प्रकारे प्रत्येक महिन्यांच्या उभय नवमीस दुर्गेची विविध रूपे बनवून पूजा करतात.
फल- दुर्गानिवास.
२ ध्वजनवमी :
पौष शु. नवमीस हे नाव आहे. या तिथीला शाकंभरी असे म्हणतात. या दिवशी चंडिकेच्या पूजेचे विशेष महत्व आहे. पताकांनी देवीचे देऊळ सुशोभित करणे, कुमारिकांना भोजन घालणे आणि उपवास किंवा एकभुक्त करणे असा या व्रताचा विधी आहे.
फल- आरोग्य, शक्ती व संपत्ती यांची प्राप्ती.
३ शाकंभरी नवरात्र:
पौष शु. नवमीस नवरात्र स्थापन करतात. सर्व विधान देवीनवरात्राप्रमाणेच असते. शाकंभरीस बनशंकरी असेही नाव आहे. बादामी येथे बनशंकरीदेवीचे मंदिर आहे. ही अनेक लोकांची कुलदेवता आहे. ही नवसाला पावते. या वेळी मोठा रथोत्सव असतो. नवरात्रसमाप्ती पौर्णिमेस होते.