* भीमद्वादशी व्रत
हे व्रत माघ शु. द्वादशीलाच असते. या व्रताला ब्रह्मार्पण करून ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि पारणे करावे. एकादशीप्रमाणेच बाकीचा विधी आहे.
हे व्रत वासुदेवाने प्रथम भीमाला सांगितले, म्हणून त्याला भीमाचे नाव प्राप्त झाले. शु. दशमीला शरीराला तूप लावून स्नान. 'ॐ नमो नारायणाय' या मंत्राने विष्णुची पूजा. त्याबरोबर गरुड - गणेशाची पूजा. एकादशीला पूर्ण उपवास. द्वादशीला नदीमध्ये स्नान करून घरापुढे मांडव घालावा. एका तोरणाला पाण्याने भरलेले पात्र टांगावे. त्या पात्राच्या तळाला एक छिद्र पाडावे. त्यातून झिरपणारे थेंब मस्तकावर घ्यावे. नंतर ऋग्वेदी पुरोहिताकडून होम, यजुर्वेदी पुरोहिताकडून रुद्रावर्तन आणि सामवेदी पुरोहिताकडून सामगायन करवावे. पुरोहितांना वस्त्रालंकार देऊन त्यांच सन्मान करावा. हे व्रत करणारा पापमुक्त होतो. या व्रताचे माहात्म्य वाजपेय आणि अतिरात्र या यागापेक्षाही मोठे आहे, असे सांगितले आहे.
फल - विष्णुलोकप्राप्ती.