चैत्र शु. त्रयोदशी
Chaitra shuddha Trayodashi
१ कामत्रयोदशी :
चैत्र शु. त्रयोदशीस मदनाचा प्रतिनिधी म्हणून दमन वृक्षाची पूजा करतात.
२ चैत्रावली :
हा एक प्राचीन उत्सव आहे. याला मदनभंजी असेही नाव आहे. यात चैत्र शु. त्रयोदशीच्या रात्री एका उद्यानात मदन आणि रती यांची स्थापना करीत व चतुर्दशीला त्यांची पूजा करीत. हा उत्सव गीतगायन, वाद्यवादन व अश्लील शब्दांचा प्रयोग यांनी साजरा होत असे. दुसर्या दिवशी सकाळी चिखलफेकीचा खेळ खेळत.
३ प्रदोषव्रत :
अत्यंत प्रंशसनीय व सर्वांनी करावे असे हे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीस हे करतात. या व्रताचे एक वैषिष्ट्य असे की, संततिप्राप्तीसाठी 'शनिप्रदोष' ऋणमुक्तीसाठी 'भौमप्रदोष' आणि शांतिरक्षणासाठी 'सोमप्रदोष' अशी व्रते अधिक फलदायी म्हणून प्रख्यात आहेत. याशिवाय आयुरारोग्यवृद्धीसाठी 'अर्कप्रदोष' अधिक उत्तम होय. हे व्रत करणाराने त्या दिवशी सूर्यास्ताच्या समयी पुन्हा स्नान करावे. नंतर शंकराची पूजा करावी आणि
भवाय भवनाशाय महादेवाय धीमते ।
रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे ।
ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥
अशी प्रार्थना करुन भोजन करावे.
कृ. पक्षातील प्रदोष जर शनिवार रोजी आला तर विशेष फलदायी असतो.
४ मदनोत्सव :
हे तिथिव्रत आहे. चैत्र शु. त्रयोदशीला हे व्रत करतात. यात कामदेवाच्या मूर्तीची किंवा त्याच्या चित्राची समंत्र पूजा करतात. नंतर दोन गाई दान देतात. त्याच दिवशी पत्नी आपल्या पतीला कामदेव मानून त्याची पूजा करतात. रात्री नृत्य, नाट्य करुन जागर करतात. फल-दुःख, रोग यांतून मुक्ती व कीर्ती आणि संपत्ती यांचा लाभ. या व्रताचा कालावधी अनेक वर्षे आहे. या तिथीलाच मदनाचा पुनर्जन्म झाला, अशी कथा आहे.
५ मदनपूजा :
हे व्रत चैत्र शु. त्रयोदशीला करतात.या दिवशी स्नान करुन उंची वस्त्रावर मदनदेवाची मोहक मूर्ती स्थापन करुन गंधपुष्पांनी पूजा करावी.
नमो रामाय कामाय कामदेवस्य मूर्तये ।
ब्रह्माविष्णुशिवेंद्राणां नमः क्षेमकराय वै ।
असा मंत्र म्हणून तुपात तळलेल्या मोदकांचा नैवेद्य दाखवावा. रात्री जागर करून दुसरे दिवशी पारणे करावे. असे केल्याने पतिपुत्रादिकांचे अखंड सुख प्राप्त होते.
N/A
N/A
Last Updated : December 09, 2007
TOP