१ चित्रा पौर्णिमी :
दक्षिण भारतात चैत्र पौर्णिमेस म्हणजेच चित्रानक्षत्रावर जो उत्सव केला जातो, त्याला चित्रा पौर्णमी म्हणतात. या उत्सवात शिव व चित्रगुप्त यांची पूजा करतात.
२ चैत्री पौर्णिमा :
प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला पूर्णचंद्राचे, तत्प्रकाशक सूर्याचे आणि विष्णुरूपी सत्यनारायणाचे व्रत केले जाते. त्यासाठी चंद्रोदयव्यापिनी पौर्णिमा ग्राह्य मानतात. या व्रतात देवपूजन , दानपुण्य, तीर्थस्नान आणि पुराणश्रवणादी विधी केल्याने पूर्ण फळ मिळते. त्या दिवशी चित्रानक्षत्र असेल तर चित्रमय वस्त्राचे दान करावे म्हणजे सौभाग्यवृद्धी होते.
३ चंद्रनक्षत्र :
चैत्र पौर्णिमेस सोमवार आला असता हे व्रत करतात. यात चंद्राची पूजा, चंद्राच्या रौप्यमूर्तीचे दान, तूप आणि तीळ यांचे हवन करावयाचे असते.
फल- चंद्रलोकाची प्राप्ती.
४ महाचैत्री -
चैत्र पौर्णिमेला गुरु व चंद्र यांची युती चित्रानक्षत्रात झाली तर तिला महाचैत्री असे म्हणतात. ही दानादी कृत्यांना विशेष पुण्यप्रद असते.
५ वैशाख स्नान :
चैत्र शु. पौर्णिमेपासून वैशाख शु. पौर्णिमेपर्यंत प्रातःकाळी सूर्योदयापूर्वी कोठेही तीर्थक्षेत्री, अथवा नदी, विहीर, आड,तुळे किंवा सरोवर किंवा स्वतःच्या घरीदेखील शुद्ध थंड पाण्याने स्नान करावे आणि नित्य आन्हिक झाल्यावर 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' किंवा 'हरे राम हरे राम' या मंत्राचा यथाशक्ती जप करुन एकच वेळ भोजन करावे. एकतीस दिवसापर्यंत असा क्रम ठेवल्यास अनेक प्रकारचे रोग व दोष दुर होतात व त्याचा प्रभाव आणि पुण्य वाढतात.
६ हनुमानजयंतीचे व्रत :
हनुमानजयंती हे व्रत आहे. ज्या पंचांगाच्या आधाराने या व्रताचा निर्णय घेतला जातो, त्यापैंकी काहींच्या मते हनुमानजन्मतिथी अश्विन व. चतुर्दशी आहे, तर काहींच्या मते ती चैत्र शु. पौर्णिमा आहे. कोणत्याही देवतेची जन्मतिथी ही एकच असते; फक्त हनुमानाच्याच बाबतीत असे दुमत आहे. हे याचे एक वैशिष्ट्य होय. याविषयीच्या ग्रंथात दोन्ही तिथींचे उल्लेख आहेत, परंतु त्यांमधील आशयात फरक आहे. पहिला दिवस 'जन्मदिवस' म्हणून व दुसरा 'विजयाभिनंदनाचा महोत्सव-दिवस' सांगितला आहे.
'उत्सवसिंधु' नामक ग्रंथात लिहीले आहे, अश्विन व. चतुर्दशी, मंगळवार, स्वातिनक्षत्र, मेषलग्न या सुमुहूर्तावर प्रत्यक्ष शिवशंकरांनी अंजनीच्या उदरी हनुमानाच्या रूपाने जन्म घेतला. 'व्रतरत्नाकर' मध्येही असेच म्हटले आहे की, अश्विन व भूततिथीला (चतुर्दशीला) मंगळवारी रात्री (महानिशा) अंजनीच्या उदरी हनुमानाचा जन्म झाला. पुर्वोक्त ग्रंथात स्वाती नक्षत्र व मेषलग्न हे अतिरिक्त उल्लेख आहेत. परंतु कार्तिक पौर्णिमेस कृत्तिका नक्षत्र असल्यामुळे व. चतुर्दशीला चित्रा किंवा स्वाती नक्षत्र असेल ही गोष्ट संभवनीय नाही.
याच्या उलट 'हनुमदुपासनाकल्पद्रुम' नामक ग्रंथात- हा एका महाविद्वान पंडिताने लिहिलेला संकलन-ग्रंथ आहे. चैत्र शु. पौर्णिमेला मंगळवारी मूंजगवती मेखला असलेल्या, कौपिन वस्त्रधारी आणि यज्ञोपवीत धारण केलेल्या हनुमानाचा जन्म झाला, असा उल्लेख आहे. त्याचबरोबर असेही लिहीले आहे की, (पुत्रकामेष्टी) यज्ञप्रसाद म्हणून कैकेयीला मिळलेल्या पिंडाचा अंश घारीमार्फत अंजनीला मिळाला. तो भक्षण केल्यामुळे तिच्या उदरी हनुमंताचा जन्म झाला. हा भाग असंबद्ध वाटतो. कारण स्कंदादी पुराणांतील अनेक कथांवरुन असे दिसते की, हनुमानाचा जन्म रामाच्या बर्याच अगोदर झाला असला पाहिजे.
रामचरित्राच्या संशोधनाच्या दृष्टीने वाल्मीकी रामायण अधिक मान्य समजले जाते. रामायणाच्या किष्किंधा कांडाच्या ६६ व्या सर्गात हनुमानजन्मकथा आहे. त्यावरुन एक गोष्ट कळून येते की, अंजनीच्या उअदरी हनुमानाचा जन्म झाला. जन्म पावताच क्षुधाग्रस्त झालेल्या हनुमंताने आकाशात झेप घेतली आणि उगवता सूर्य हे एक पक्व फळ आहे, असे समजून त्याकडे उड्डाण केले. त्या दिवशी पर्वतिथी (अमावस्या) असल्यामुळे सूर्याला ग्रासण्यासाठी राहू आला होता. परंतु सूर्याच्या दिशेने उड्डाण करीत येणारा हनुमान हा दुसरा राहू आहे, असे समजून इंद्राने त्याच्यावर वज्रप्रहार केला. त्यामुळे त्याची हनुवटी छाटली गेली. म्हणून त्याला हनुमान असे नाव पडले. या कथाभागात चैत्र किंवा कार्तिक या महिन्यांचा नामनिर्देश नाही. इतर ग्रंथात कल्पनाभेदामुळे अथवा अपसमजुतीने चैत्र मासाचा उल्लेख केला गेला असावा.
हनुमानाचे एक जन्मटिपणही आहे. त्यात चतुर्दशी तिथी, मंगळवार, चित्रानक्षत्र यांचा उल्लेख आहे. पण महिन्याचे नाव नाही. कुंडलीमध्ये सूर्य, मंगळ, गुरु, भृग आणि शनी हे उच्चीचे ग्रह असून ते अनुक्रमे ४, १, ७, ३, आणि १० या स्थानी आहेत. ही स्थिती पाहता, हनुमंताचा जन्म अश्विन व. चतुर्दशीला रात्री झाला असावा, असे अनुमान निघते आणि चैत्र शु. पौर्णिमेला सीताशोध, राक्षसांचे उपमर्दन, लंकादहन, समुद्रोल्लंघन आदी गोष्टीत विजय मिळवून हनुमान निर्विघ्नपणे परत आल्याबद्दल वानरांनी मोठ्या आनंदाने विजयोत्सव साजरा केला होता आणि सर्व नर-वानर सुखी झाले होते. म्हणून या दोन्ही दिवशी व्रतोत्सव केल्यास 'अधिकस्य अधिकं फलम् ।'
या व्रतासाठी तात्कालीक किंवा रात्रिव्यापिनी तिथी ग्राह्य समजतात. ही तिथी दुपक असेल तर, व्रत दुसर्या दिवशी करावे. व्रत करणाराने हनुमानजयंतीच्या व्रतानिमित्त धनत्रयोदशीच्या रात्री रामसीता आणि हनुमंताचे स्मरण करीत भूमिशयन करावे व रूपचतुर्दशीला अरुणोदयापूर्वी उठून रामसीता आणि हनुमान यांचे पुन्हा स्मरण करून प्रातःस्नानादी नित्यकर्मे लवकर उरकावी. नंतर हातामध्ये उदक घेऊन
ममाखिलानिष्टनिरसनपूर्वकसकलाभीष्टसिद्धये
तेजोबलबुद्धिविद्याधनधान्यसमृद्धयायुरारोग्यादिवृद्धये
च हनुमद्व्रतं तदङ्गीभूतपूजनं च करिष्ये ॥
असा संकल्प करावा. हनुमानाच्या पूर्वीच प्रतिष्ठापित प्रतिमेसमीप पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसावे आणि अत्यंत विनीत भावाने
अतुलितबलधामं स्वर्णशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम् ।
सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिवरदूतं वातजातं नमामि ॥
अशी प्रार्थना करावी आणि यथाविधी षोडशोपचार पूजा करावी. स्नानासाठी जवळ उपलब्ध असेल तर नदीचे पाणी घ्यावे, नाहीतर श्रीजलमिश्रित विहिरीचे पाणी घ्यावे. वस्त्र म्हणून लाल कौपीन किंवा पीतांबर, गंध म्हणून केशरमिश्रित चंदन घ्यावे. मूंज गवताचे यज्ञोपवीत अर्पण करावे. फुले म्हणून शतपत्रे (हजार), केवड्याची पाने, कण्हेरी किंवा अन्य पिवळी फुले घ्यावी. धूप म्हणून अगरु, तगरादि घ्यावा. तुपाची वात दीप म्हणून लावावी. तुपात तळलेले अनरसे किंवा तुपात तळलेले गुळमिश्रित उकडीचे मोदक किंवा केळी वगैरे फळे नैवेद्यास घ्यावी. आरती, नमस्कार, पुष्पांजली आणि प्रदक्षिणा झाल्यावर
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शिरसा नमामि ॥
अशी प्रार्थना करुन प्रसाद वाटावा आणि शक्य असेल तर ब्राह्मणभोजन घालून स्वतः जेवावे. दिपोत्सव, स्तोत्रपाठ, गायन, वादन, कीर्तन वगैरे गोष्टी यथासंभव करुन रात्र जागवावी.
एखाद्या कार्यसिद्धिच्या उद्देशाने व्रत करावयाचे असेल तर मार्गशीष शु. त्रयोदशीला प्रातःस्नान वगैरे उरकून एका वेदीवर अक्षतांच्या पुंजीची तेरा कमळे काढावी. त्यावर यथाविधी पूजा केलेला जलपूर्ण कलश स्थापन करावा. त्यावर पिवळे वस्त्र घालावे. त्यावर १३ कमळांच्या १३ गाठी घातलेला नऊ पदरी पिवळा दोरा ठेवावा. नंतर वेदीची पुजा करावी. उपरोक्त विधीनुसार हनुमंताची पूजा, जप, ध्यान, उपासना आदी गोष्टी कराव्यात. ब्राह्मणभोजन घालून स्वतः भोजन केले असता व्रताची पूर्तता व इष्ट मनोरथ पूर्ण होतात.