३४८५.
हेमवंताच्या पोटीं एक जन्मली गोरटी । तये त्या धूर्जटी वरियलें ॥१॥
मंडपाच्या द्वारीं आला जंव नोवरा । अवगुणाचा म्हातारा रुप नाहीं ॥२॥
नांवा येव्हडिया बाळा अति नोवरा । कुवारीच्या संसारा शून्य जालें ॥३॥
येणें जाणें ठेलें भोगणें खुंटलें । नारदाचेनी बोलें ऐसी दशा ॥४॥
काय कुमारी तया दिधली हे बाळा । इचिया कपाळीं कवण जाणे ॥५॥
शकुनालागीं दासी उभ्या पूर्ण कळसासी । पांच मुखें वरासी तिन्ही डोळे ॥६॥
दारा वरु आला मुद पैं वोवाळी । साजुकासी घाली माळ गळां ॥७॥
सासू म्हणे कवणीं दिधली दुर्बुध्दी । विकल्याचा नंदी गोमाशा लावी ॥८॥
लग्नघडी आली अंतरपाटू धरा । अतिशयें नोवरा उंच देखा ॥९॥
डोळ्यासी पुरे ऐसा नव्हे नोवरा । अंतरपाटू पुढा काय धरुं ॥१०॥
कन्यादान वरा गोत्र पैं उच्चारा । वृध्द परंपरा आहे वेगीं ॥११॥
बापु तो नाठवे माय ते मी नेणें । कूळ गोत्र लाहणें नाहीं आम्हां ॥१२॥
बहुला वधुवरें संभ्रम सोहळा । अक्षवाणें बाळा करुं आल्या ॥१३॥
तंव कंठीचा वासुकी दीपा फ़णु करी । धुधु:कारें नारी पळालिया ॥१४॥
प्रात:काळ जालीया काढिला भस्मारा । विभूती शरीरां लावियेली ॥१५॥
अगे हा काळाचाही काळु नव्हे धारी जाणा । संसारी लाहाणा जांवई नव्हे ॥१६॥
लग्ना येरे दिसीं उटणें मांडलें । धवळ आरभिलें संभ्रमेशी ॥१७॥
धवळामाजीं गाणीं गाईलें रामानाम । ऐकोनियां प्रेम वरा आलें ॥१८॥
रामनाम ध्वनी ऐकतांच कानीं । स्वेदु कंपु नयनीं अश्रु आले ॥१९॥
उन्मळिता दृष्टी बाष्पु दाटे कंठीं । मूर्च्छा पूर्ण सृष्टी विकळ पडे ॥२०॥
वरा पायरवूं रक्षा पैं कपाळा । त्रितीय नेत्रीं ज्वाळा उठलिया ॥२१॥
नोवरा हा नव्हे संसारु विवसी । देहभावें कवणासी नेदी उरो ॥२२॥
वेगीं वधुवरा चौक न्हाणें करा । उकलिती सुंदरा जटाभारु ॥२३॥
वराचिया माथां सोज्वळ सुंदरी । येरी म्हणे नोवरी मी महेशाची ॥२४॥
गौरी ते अर्धांगीं सवती बैसे माथां । ऐसी याची कांता उमा गेली ॥२५॥
हा अकुळी अती वृध्द कां केला समंधु । जिवेसी विरोधु पडिला साचें ॥२६॥
जेथें वडिलाधारें नाहीं तेथें बोळवण काई । कुंवारी कवणे ठायीं दिधली देखा ॥२७॥
जेथें संघात अभाव तेथें येव जावो । जिण्यामरणा ठावो नुरेची ईसी ॥२८॥
विवेकेंसी जेथें परतलिया श्रुति । गौरी त्याचे हाता लावियेली ॥२९॥
माया माहेर खुंटलें संकल्पें तुटलें । ममत्व विटलें आजिचेनी ॥३०॥
बहु काळा जुनाट त्यासी शेषपाटु । संसारा शेवटु जाला माये ॥३१॥
एका जनार्दनीं प्रकृति प्राणेश्वरें । मिरवती बोहरें एकपणें ॥३२॥