३४८६.
जगाचा जो पिता । म्हणसी ईश्वरु नियंता । त्यासी विद्या अविद्या दोघी कांता । एकी माथां अर्धांगी ॥१॥
पाहता ईश्वर करणी । माथां बैसविली राणी । हा महिमा वेदीं पुराणीं । गाती कीर्तनीं निरंतर ॥२॥
अविद्या आणि ईश्वर । दोहीं मांडिला घराचार । कैसी अनन्य भक्ति सधर । आवडी थोर पैं देखा ॥३॥
दोघां एकची नेसणें । दोघां एक सत्ता बैसणें । एकें अंगां दोनीपणें । संपादणी करिताती ॥४॥
दोघां एकची चाखणें । दोघा एकची देखणें । दोघां आनु माजी असणें । सावकाश सहजें ॥५॥
दोघां आवडी कैसा देख । येरयेरांविण नेघे उदक । दोघां मिळोनी एक सुख । अति संतोष येरयेरां ॥६॥
जैं उभयां मेळविलें । तैंचि शिवा शिवत्व कळे । प्रियानें देखतां सगळें । शिवत्वही सांडिजे ॥७॥
दोघा एकत्र बसणें । दोघा मिळोनी एक करणें । दोघे वर्तती एके प्राणें । दोनी दावणें एकपणी ॥८॥
शिवत्व लोपुनी शिवें । अंगावरी वाढविलें शांभवें । येरी पतिव्रता अहेवें । रुपें नांवें शिव पूजी ॥९॥
दोघांपासुनी जालें जग । परि न दिसे तिसरें अंग । न तुटे अनन्यमिळणी योग । भिन्न विभाग दाखवितां ॥१०॥
पतीविण जे पतिव्रता । अवघीच विरे पैं तत्वतां । जी विण असतुची नसतां । होये सर्वथा गोसावी ॥११॥
शिव नि:संगु जो पैं सदा । क्रिया करणेंविण नुसुधा । त्यासही सुखदु:खाची बाधा । या प्रमदा भोवविजे ॥१२॥
यापरी तो नोवरा । अविद्या गोंविला घराचारा । मग त्याचियाची शरीरा । अर्धांगीं बैसविली ॥१३॥
गंगे न देखवे दृष्टीं । सवतीमत्सरु उठिला पोटीं । सद्विभागें जटाजुटीं । होती मुकुटीं मौळली ॥१४॥
सविद्या गंगा मुकुटीं । वैराग्याचे प्रवाह लोटी । शिवाची उपरमली दृष्टी । न करी गोष्टी भोगाची ॥१५॥
अखंड वसे ते एकांतीं । प्रकृति न साहे पार्वती । सांडुनी अवघी हे प्रवृत्ति । मग अद्वैतीं रहिवासू ॥१६॥
ते संधी आला नारदमुनी । देखोनि शिव शंकला मनीं । मग बैसला तो ध्यानीं । म्हणे कळी हा झणीं लावा ॥१७॥
गुज सांगितलें प्रियेसी । वेगीं लावी ऋषीसी । हासें आलें नारदासी । मग कलहासी उत्पादी ॥१८॥
नारद नमी पार्वतीसी । सांगे शिव केवी गुंतले ध्यानासी । आवो तूं भोळी ऐसी कैसी । तो आणिकीसी रतला ॥१९॥
मी कळीलावा हें पुढें । माझें वचन मानिसी कुडें । पैल पाहें मुगुटाकडे । दिसे रुपडे सुरेख ॥२०॥
आधींच तंव ते उताविळ । वरी नारदें चेतविली प्रबळ । मज असतां कोण गे बरळ । मुकुटीं सर्व मोकाट ॥२१॥
येरी म्हणे बाई तुम्ही कां नेणा । शिव शिवप्रिया मी अंगना । मान राखो वडीलपणा । कोपू मना नाणावा ॥२२॥
पापें जया वसे पैं गा । तेणें आलिंगिजे गंगा । ते तूं जडली शिवा अंगा । नातळे लिंगा उधटे ॥२३॥
माझेनी अंगे पाप पळे । हें जाणिजे आश्वनिळे । विष निस्तारिजे माझेनी मेळे । द्वेष कुटिळे सांडी पां ॥२४॥
चढला कोपाचा बासटु । गंगे तुझा बहु गे नेटु । ठकारे भुलविला निळकुंठ । माझा विठु घालिसी ॥२५॥
अगे तूं गौतमें नेलीसी । निर्लज्जे मागुती आलिसी । येरी म्हणे शिव रावणा दिधलीसी । माझेनी बापें सोडविले ॥२६॥
गंगे तूं नुसुधें उदक । तुजमाजीं कई रमणीय सुख । येरी म्हणे जनीं त्र्यंबक । जेणें मस्तकें धरियलें ॥२७॥
अगे तुज जवळी भगवें । आणिक बोडिकें अवघें । जट्याळ गाट्याळ तुजसवें । तेथें काय शिवें भोगिजे ॥२८॥
गिरिजे नोळखिसी पायरी । मी मस्तकें तूं पायांवरी । तुझ्या अंगीं दोष भारी । परि नव्हेरी भोळा हा ॥२९॥
जैं गे झालें तुझें लग्न । भटा झालें वीर्यस्खलन । एव्हढें अंगीचे लक्षण । केवीं मस्तक इच्छिसी ॥३०॥
गंगे तूं वाजट गळदट । माथा वाहिलीसी धीट । कांहीन बोलसी नीट । विद्या उध्दट तुजमाजीं ॥३१॥
अगे तुं शिवें शापिलासी । तैं गे शांतनीनें नेलिसी । तैथें हिंवसुतें व्यालिसी । केवीं आलिसी मस्तका ॥३२॥
उमे भीतसों तुझिया कोपा । आगीं रिघोनी मारविलें बापा । नरसुरां आटूं पहा पां । सुधी संतापा पैं नाहीं ॥३३॥
दक्षा मारविलें यज्ञिष्टा । ब्रम्हहत्या तुझा वांटा । येव्हढा अंगीं दोष मोठा । झणे नीळकंठा आतळसी ॥३४॥
गंगे तुजमजीं खळाळ । तेणें तूं गर्जसी सबळ । शिवें सोसिजें खळखळ । माझें कपाळ उठिलें ॥३५॥
माझें लागतां खळाळ । तरले सुरनर सकळ । तुझेंचि कां कठीण कपाळ । द्वेषें छळण करितेसी ॥३६॥
गंगे तुज ऐसी ओंगळ । आन न देखें मी कुश्चिळ । मच्छ कच्छ विष्टा तें जळ । आणि शेवाळ सर्वांगीं ॥३७॥
ऐकोनि गंगे आलें हांसें । काय बोलसी वावसे । चराचर जें दिसतसे । तें तें असें मजमाजीं ॥३८॥
गंगे तूं जासी सागरा पोटीं । हें प्रत्यक्ष जगु देखें दिठी । पुराणी ही त्याची गोठी । गंगा सागरगामिनी ॥३९॥
उमे तुझा खोटा भावो । गिरिसागर माझा देवो । शिवावांचोनि पहाहो गमनागमन मज नाहीं ॥४०॥
गौरी गंगेतें म्हणें धांगडी । येरी म्हणे घर रिगालिसी आवडी । बापें बेल वहावया मिसें लाविली गोडी । तैसी फ़ुडी मी नव्हे ॥४१॥
वर्मे क्रोधे चढल्या क्रोधा । नारदु हांसतु खदखदां । भलिया मिनलों विनोदा । दोहीच्या शब्दा साक्षी तो ॥४२॥
तुज कुटिल जाणोनि मानसीं । शिरु तारकु ब्रम्ह उपदेशी । भावों नाहीं त्या वचनासी । छळूं जासी श्रीरामा ॥४३॥
देववचनीं नाहीं भावो । तंववरी न तुटे देहसंदेहो । कैसेनि राहे काम कलहो । न्याय अन्यायो न कळे ॥४४॥
तूं अविद्या सदा विन्मुख । यालागीं नेणसी निज सुख । जगाचे देखसी दोख । कामें सुख मानिसी ॥४५॥
आम्ही तंव शिववचनीं सन्मुख । अखंड आम्हां आत्मसुख । शिवावांचूनियां देख । आन नाहीं सर्वथा ॥४६॥
तुझा जावयासी द्वेष । कळे भांडण्याचें मिष । कलहो अंतीं उपजे सुख । परम निर्दोष त्या नांव ॥४७॥
पाहे पां मुळींच्या मिळणी । आम्ही तुम्ही एकी दोघीजणी । शिणलिसी माय गे बहिणी । द्वेषु मनीं न धरावा ॥४८॥
जें सांगितलें सदाशिवें । तें ह्रदयी धरावें निजभावें । तेणें द्वेषाद्वेष न संभवे । पालट पावे वृत्तीशीं ॥४९॥
त्याची वृत्ति परतोनी पाही । देहीं प्रगटेल विदेहीं । मग देह विदेह दोन्ही नाहीं । निजतत्व ठायीं होउनी ठासी ॥५०॥
ऐकतां गंगेचें वचन । गिरिजें चालिलें स्फ़ुदंन । धांवूनि दिधलें आलिंगन । समाधान पैं झालें ॥५१॥
ते वेळीं मिनले मनामन । उपनिषदां पडिलें मौन । देखणें ठेलें भिन्नाभिन्न । शिवचैतन्य अनुभवीं ॥५२॥
शिव तो निजरुप सकळ । गंगा सच्छक्ति निर्मळ । येरी अविद्या चपळ । नारदु केवळ निजबोधु ॥५३॥
दोहीं शक्तींचा फ़िटला भेदु । सकळीं सकळा शिवूचि श्रध्दु । एका जनार्दनीं बोधु । परमानंदु प्रगटला ॥५४॥