अध्याय पाचवा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


अवतरतांच श्रीराम ॥ निःशेष गेले क्रोध काम ॥ अयोध्यावासियां सुकाळ परम ॥ स्वानंदाचा जाहला ॥५१॥

गृहीं प्रकाशतां प्रभाकर ॥ मग कैंचा उरे अंधकार ॥ गृहस्वामी येतां तस्कर ॥ पळोनि जाती चहूंकडे ॥५२॥

कीं बोलतां ज्ञानी वेदांत ॥ सुकळ मतें होती कुंठित ॥ कीं सद्विवेक होतां पळती ॥ तैसा अवतरतां रघुपति ॥ दोष दुष्काळ निमाले ॥५४॥

असो दशरथ सुत ॥ एकामागें एक रांगत ॥ कौसल्या आणि दशरथ ॥ संतोषती पाहतां ॥५५॥

पाचुबंद अंगणांत ॥ हळूहळू चौघे चालत ॥ एकासी एक पाहून हांसत ॥ बाळभावेंकरोनियां ॥५६॥

कौसल्या उभी राहोनियां ॥ चौघांसी बोलावी जेवावया ॥ तंव ते दूर जाती पळोनियां ॥ धांवोनि माय धरी मागें ॥५७॥

चौघांची मुखें धुवोनी ॥ भोजनासी बैसवी दटावुनी ॥ संतोष वाटे दशरथाचे मनीं ॥ चारी मूर्ति पाहतां ॥५८॥

म्हणे कोण पुण्याचे पर्वत ॥ मी पूर्वी आचरलों बहुत ॥ तरीच हे चौघे आदित्य ॥ अवतरले माझें पोटीं ॥५९॥

चिमण्या मूर्ति चिमणे ठाण ॥ चिमणीं धनुष्यें चिमणे बाण ॥ चिमणीं नूपुरें रुणझुण ॥ पायीं गर्जती चौघांचे ॥६०॥

जाहले अष्टवर्षांचे सुंदर ॥ चौघांस समान वस्त्रअलंकार ॥ चिमणीं धनुष्य परिकर ॥ चिमणे शर सोडिती ॥६१॥

चिमणा पीतांबर कटिमेखळा ॥ चिमणीं पदकें मुक्तमाळा ॥ चिमण्या सेवकांचा पाळा ॥ रामाभोंवता शोभतसे ॥६२॥

उन्हांत खेळतां रघुपति ॥ सेवक मित्रपत्रें धरिती ॥ एक चामरें वरी ढाळिती ॥ राजनीतीकरोनियां ॥६३॥

श्रीराम आधीं सोडी बाण ॥ सवेंचि शर सोडी लक्ष्मण ॥ त्यामागें भरत शत्रुघ्न ॥ भेदित संधान तैसेंचि ॥६४॥

दुरून पाहे दशरथ वीर ॥ चौघे एकदांच टाकिती शर ॥ असुरप्रतिमा करोनि थोर ॥ शिर त्यांचें उडविती ॥६५॥

वेदांतींच्या दिव्य श्रुती ॥ सर्वांवरिष्ठ जेंवी गर्जती ॥ तैसे बाण सोडी रघुपती ॥ अचुक आणि चपळत्वें ॥६६॥

असो चौघांचें मौंजीबंधन ॥ गुरु वसिष्ठातें पुसोन ॥ मेळवूनि अपार ब्राह्मण ॥ अजनंदन करिता जाहला ॥६७॥

श्रीरामाचा व्रतबंधन होत ॥ अष्अमा सिद्धि तेथें राबत ॥ चारी दिवसपर्यंत ॥ न्यून पदार्थ नसे कांहीं ॥६८॥

यज्ञभोक्ता रघुनाथ ॥ त्यांस ब्राह्मण घालिती यज्ञोपवीत ॥ गायत्री मंत्र श्रीराम जपत ॥ वेदवंद्य महाराज जो ॥६९॥

ऐसें जाहलिया व्रतबंधन ॥ वसिष्ठापाशीं अनुदिन ॥ चहूं वेदांचें अध्ययन ॥ केलें संपूर्ण चौघांहीं ॥७०॥

ज्यासी वर्णितां वेद झाले वेडे ॥ तो श्रीराम गुरूपाशीं वेद पढे ॥ अध्ययन सांगतां सांकडे ॥ गुरूसी न पडे सर्वथा ॥७१॥

यापरी द्वादश वर्षे तत्वतां ॥ संपूर्ण जाहलीं रघुनाथा ॥ मग पुसोनि वसिष्ठदशरथां ॥ श्रीराम तीर्था निघाला ॥७२॥

ब्रह्मचर्य तीर्थाटन ॥ करावें हें शास्त्रप्रमाण ॥ हें जाणोनि रघुनंदन ॥ तीर्थाटणासी निघाला ॥७३॥

तीर्थाटण चौघेजण ॥ निघालें सवें अपार सैन्य ॥ सवें दीधला सुमंत प्रधान ॥ असंख्य धन वांटावया ॥७४॥

सवत्स गायींचे भार ॥ नानावस्त्रें अलंकार ॥ तीर्थी वांटी श्रीरघुवीर ॥ याचकांसी सन्मानें ॥७५॥

ज्या तीर्थाचा महिमा जैसा पूर्ण ॥ श्रीराम करी तैसेंच विधान ॥ ज्याचेनि यकळ तीर्थें पावन ॥ तो रघुनंदन तीर्थे हिंडे ॥७६॥

लोकसंग्रहा कारण ॥ तीर्थें हिंडे रघुनंदन ॥ तीं तीर्थें करा श्रवण ॥ संत श्रोते सर्वही ॥७७॥

काशीविश्र्वेश्र्वर निर्मळ ॥ त्र्यंबक उज्जनी महाकाळ ॥ ओंकार महाबळेश्र्वर जाश्र्वनीळ ॥ बदरीकेदार घृष्णेश्र्वर पैं ॥७८॥

नागनाथ वैजनाथ थोर ॥ मल्लिकार्जुन भीमाशंकर ॥ सोमनाथ रामेश्र्वर ॥ ज्योतिर्लिंगे द्वादश हीं ॥७९॥

अयोध्या मथुरा हरिद्वार ॥ काशी कांची अवंतिका नगर ॥ द्वारावती गोमतीतीर ॥ सप्त पुऱ्या अनुक्रमें ॥८०॥

तीर्थराज मुख्य त्रिवेणी ॥ पंचप्रयाग पुण्यखाणी ॥ ब्रह्म प्रयाग कर्णप्रयाग अघहरणी ॥ गुप्तप्रयाग समर्थ ॥८१॥

देवप्रयाग शिवप्रयाग पापहरण ॥ नैमिषारण्य धर्मारण्य पंचकारण्य ॥ ब्रह्मारण्य वेदारण्य ॥ बदरिकाश्रम पावन तो ॥८२॥

यमुना सरस्वती भागीरथी ॥ गौतमी कृष्णा भीमरथी ॥ तापी नर्मदा भोगावती ॥ प्रवरा पुण्यवती मंदाकिनी ॥८३॥

आनंदवर्धिनी पयोष्णी ॥ पिनाकी तुंगा कल्मषनाशिनी ॥ कृतमाळा कावेरी पयस्विनी ॥ सुवर्णमुखी सुमाळा ॥८४॥

कपिला ताम्रपर्णी शरावती ॥ तुंगभद्रा सोमवती ॥ सावित्री रेवा कुंकुमवती ॥ वेण्या वेदवती मलप्रहरा ॥८५॥

घटप्रहरानंदिनी नलिनी ॥ गंडकी शरयु वैतरणी ॥ सोमनद शिवनद तापहरणी ॥ सोमभद्र नदेश्र्वर ॥८६॥

अरुणा वरुणा प्राची पुरंदरी ॥ वेत्रवती सप्तउरगा कर्णकुमरी ॥ स्वामिकार्तिकी पंचघृताची पृथ्वीवरी ॥ विख्यात प्रवाह ज्यांचे ॥८७॥

वज्रकाळिका श्रमहारिणी ॥ महेंद्रकाळी त्रिशूळ मंत्रवर्धिनी ॥ नीरावती सुरनदी शंखोद्धारिणी ॥ जयंती आणि अहिर्णवी ॥८८॥

नाटकी आणि अलकनंदा ॥ फल्गु सर्वांतका त्रिपदा ॥ शांता बाणनदी सुखदा ॥ अनुक्रमें नद्या सर्वही ॥८९॥

शेषाद्रि आणि ब्रह्माद्रि ॥ मूळपीठ पर्वत सिंहाद्रि ॥ विंध्याद्रि आणि हेमाद्रि ॥ मानससरोवरीं स्नान दान ॥९०॥

अरुणाचळ आनंदवन ॥ कमलालया चिदंबरी पूर्ण ॥ अगस्त्याश्रम पावन ॥ श्रीरंगपट्टण शोभिवंत ॥९१॥

जनार्दन कन्याकुमारी ॥ शिवकांचि विष्णुकांचि सुंदरी ॥ मत्स्यतीर्थ पक्षितीर्थ पृथ्वीवरी ॥ शंखोद्धार वेदोद्धार ॥९२॥

हिरण्यनदी संव्यावट ॥ ब्रह्मावर्त धर्मस्तंभ सुभट ॥ ब्रह्मयोनि पृथूदक वरिष्ठ ॥ कुरुक्षेत्र बिंदुतीर्थ पैं ॥९३॥

धर्मालय कलापग्राम ॥ गंगासागर सिंधुसंगम ॥ कौंडण्यपुर अंबिका परम ॥ प्रेमपूर मार्तंड ॥९४॥

बाळकल्होळ कमलेश्र्वरी ॥ विराटस्वरूपिणी रक्तांबरी ॥ भ्रमरांबिका ज्वाळामुखी सुंदरी ॥ पीतांबरी महाशक्ति ॥९५॥

जोगलादेवी भैरवी ॥ करवीरवासिनी शांभवी ॥ सप्तश़ृंगी महारुद्रा देवी ॥ हिंगुळजा आणि कमळजा ॥९६॥

चांगदेव मोरेश्र्वर ॥ गुप्तकेदार वटेश्र्वर ॥ अक्षय वट कुशतीर्थ पवित्र ॥ त्रिकूटाचळ सुंदर पैं ॥९७॥

हरिहरेश्र्वर नृसिंहपूर ॥ मूळमाधव ज्ञानेश्र्वर ॥ चक्रपाणि कदंब भुलेश्र्वर ॥ जुनाट नागेंद्र गौतमेश्र्वर तो ॥९८॥

सप्तयोजनें कोटेश्र्वर ॥ सिद्धवट धूतपाप रामेश्र्वर ॥ दक्षिणप्रयाग माधवेश्र्वर ॥ पूर्वसागर तीर्थराज ॥९९॥

वैराट पुष्कर महाबळेश्र्वर ॥ धूळखेटक शंकर नारायणपुर ॥ मलयेश्र्वर पांचाळेश्र्वर ॥ सत्यनाथ पूर्णालय ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP