अध्याय नववा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


चकोराचे मुखीं अमृतधार ॥ वर्षें जैसा रोहिणीवर ॥ कीं धेनु पान्हा घाली सत्वर ॥ वत्सासी तृप्त व्हावया ॥१॥

कीं बाळकाचिया मुखांत ॥ माता स्तनपानें करी तृप्त ॥ कीं जलद बिंदु टाकी अकस्मात ॥ चातकमुखीं कृपेनें ॥२॥

ऐसीं अवदानें राम टाकित ॥ धूमे्रं नेत्र जाहले आरक्त ॥ यज्ञनारायण जाहला तृप्त ॥ राघवहस्तेंकरोनियां ॥३॥

जैसी गौतमी आणि भागीरथी ॥ तैसी कौसल्या आणि सुमित्रा सती ॥ विप्रांसी दानें अपार देती ॥ आनंद चित्तीं न समाये ॥४॥

दशरथासी विनवी लक्ष्मण ॥ मी श्रीरामसेवा करीन ॥ ऐकोन संतोषे अजनंदन ॥ कुरवाळी वदन सौमित्राचें ॥५॥

अयोध्यानगर वेष्टोनि जाणा ॥ उतरल्या राजयांच्या पृतना ॥ कोणी करी तयांची गणना ॥ पाहतां नयनां भुलवणी ॥६॥

श्रीराम बैसे राज्यपटीं ॥ तो सोहळा पहावया दृष्टीं ॥ सकळ सुरवरांच्या कोटी ॥ विमानारूढ पाहती ॥७॥

तंत वितंत घन सुस्वर ॥ चतुर्विध वाद्यांचा गजर ॥ नादें कोदलें अंबर॥ चिंतातुर सुर जाहले ॥८॥

निर्जर विनीविती कमलोद्भवा ॥ दशरथ राज्य समर्पी राघवा ॥ आमुचे बंदिसुटकेचा बरवा ॥ विचार कांहीं दिसेना ॥९॥

इंद्रपदातुल्य राज्य अपूर्व ॥ तें सोडोनियां सीताधव ॥ कासया येईल दशग्रीव ॥ वधावयाकारणें ॥११०॥

जरी तो मंगलभगिनीचा वर ॥ भक्तालागीं जाहला साकार ॥ तरी तपोवना येईल रघुवीर ॥ ऐसा विचार योजावा ॥११॥

मग विरिंचि सांगे विकल्पासीं ॥ तुवां सत्वर जावें अयोध्येसी ॥ प्रवेशावें कैकयीच्या मानसीं ॥ विघ्न राज्यासी करावें ॥१२॥

विकल्प म्हणे ते वेळां ॥ अयोध्येमाजी परम सोहळा ॥ दुःख द्यावयासी सकळां ॥ माझेनि तेथें न जाववे ॥१३॥

माझा प्रवेश होतां तेथ ॥ बहुतांसी होईल प्राणांत ॥ मांडेल एकचि अनर्थ ॥ माझेनि तेथें न जाववे ॥१४॥

शीतळ होईल वडवानळ ॥। मधुरता धरील हाळाहळ ॥ परी मज विकल्पाचें बळ ॥ क्षीण नव्हे कल्पांतीं ॥१५॥

देव म्हणती तुजविण ॥ हें कार्य साधील कवण ॥ आम्हां सोडवीं बंदींतून ॥ घेई पुण्य तूं एवढें ॥१६॥

ऐसें ऐकत चि वचन ॥ विकल्प निघाला तेथून ॥ जवळ केले अयोध्यापट्टण ॥ परी भीतरीं न जाववेचि ॥१७॥

अयोध्यावासी पुण्यशीळ ॥ सत्यवादी सात्विक प्रेमळ ॥ ज्यांकडे पाहों न शके काळ ॥ तेथें विकल्प प्रवेशेना ॥१८॥

ज्यांसी वेदाज्ञा वाटे प्रमाण ॥ नेणती परांचे दोष-गुण ॥ सदा सारासार विचार श्रवण ॥ तेथें विकल्प बाधीना ॥१९॥

जे निःसीम गुरुभक्त ॥ जे मातापित्यांसी भजत ॥ जे अनन्यब्राह्मणांसी वंदित ॥ तेथें विकल्प बाधीना ॥१२०॥

सदा आवडे हरिभजन ॥ श्रवण मनन हरिकीर्तन ॥ परद्रव्य ज्या तृणासमान ॥ तेथें विकल्प बाधीना ॥२१॥

दया उपजे देखतां दीन ॥ अंध पंगु वृद्ध क्षीण ॥ त्यांसी पाववी वस्त्र अन्न ॥ तेथें विकल्प बाधीना ॥२२॥

परललना मातृवत् ॥ जे वादप्रतिवादीं मुके होत ॥ जे ईश्र्वररूप पाहती संत ॥ तेथें विकल्प बाधीना ॥२३॥

सर्वांभूतीं एक रघुनाथ ॥ ऐशी जयांसी पूर्ण प्रचीत ॥ प्रपंचीं वर्ततां विरक्त ॥ तेथें विकल्प बाधीना ॥२४॥

जे ब्रह्मानंदीं पूर्ण धाले ॥ जे आपणा आपण विसरले ॥ तेथें विकल्पाचें बळ न चले ॥ कल्पांतींही सर्वथा ॥२५॥

असो पुण्यवंत अयोध्येचे जन ॥ त्यांसी विकल्प पळे देखतां दुरून ॥ प्रवेशावया अयोध्यापट्टण ॥ सामर्थ्य नव्हे सहसाहि ॥२६॥

तों कैकयीची दासी मंथरा ॥ ते पूर्वींच द्वेषी रघुवीरा ॥ परम पापिणी सीतावरा ॥ सर्वदाहि निंदितसे ॥२७॥

प्रातःकाळीं अहिल्योद्धार ॥ सेजेसीं असतां रामचंद्र ॥ झाडितां बळेंचि केर ॥ रामावरी घालित ॥२८॥

तो अंगावरी येतां केर ॥ दैवहत होईल वज्रधर ॥ म्हणोन ते दासी अपवित्र ॥ रामावरी रज उडवी ॥२९॥

प्रत्यहीं ऐसेंचि करित ॥ देखतां क्रोधावला जनकजामात ॥ म्हणे तूं कुब्जा होईं यथार्थ ॥ कुरूप वक्र सर्वांगीं ॥१३०॥

मग ते लागे श्रीरामापायीं ॥ म्हणे राघवा मज उश्शाप देई ॥ मग जगदानंदकंद ते समयीं ॥ काय बोलता जाहला ॥३१॥

म्हणे पुढील अवतारीं पूर्ण ॥ कंसावधार्थ मथुरे येईन ॥ तेव्हां तुज उद्धरीन ॥ दिव्य करीन रूप तुझें ॥३२॥

असो अयोध्येबाहेर दूर ॥ पुष्पवाटिका परम सुंदर ॥ सदा सुफळ तरुवर ॥ विकल्प सत्वर आला तेथें ॥३३॥

जो भुवनच्छेदक कुठार ॥ कीं स्नेहकर्पूरदाहक वैश्र्वानर ॥ कीं प्रीतिमेघविदारक समीर ॥ परम तीव्र स्वरूप ज्याचें ॥३४॥

हा भजनमार्गींचा मारक मांग ॥ परम द्वेषी विष्ठाभक्षक काग ॥ कीं द्वेषवारुळांतील भुजंग ॥ धुसधुसीत विकल्प हा ॥३५॥

तो मत्सरवनींचा वृक थोर ॥ कीं निर्दयसमुद्रींचा नक्र ॥ कीं परनिंदाजल्पक खर ॥ विकल्प साचार जाणिजे ॥३६॥

विकल्प नोहे तो श्र्वान ॥ धांवे भक्तांवरीं वसवसोन ॥ आनंदरसपात्र उलंडोन ॥ न लागतां क्षण टाकितो ॥३७॥

असो हिंवरवृक्षीं तो विकल्प ॥ बैसला असे सुखरूप ॥ तंव तेथें मंथरा पापरूप ॥ पुष्पें न्यावया पातली ॥३८॥

हिंवरछायेसी ते अवसरी ॥ मंथरा बैसली क्षणभरी ॥ विकल्प प्रवेशला तिच्या अंतरीं ॥ अत्यंत कुपात्र देखोनियां ॥३९॥

जो कां निर्दय आचारहीन ॥ नावडे हरिकथा पुराणश्रवण ॥ सदा जल्पत परदोषगण ॥ विकल्प येऊन राहे तेथें ॥१४०॥

साधु संत ब्राह्मण त्यांसी द्वेषी रात्रंदिन ॥ भूतदया नावडे मनांतून ॥ विकल्प येऊन राहे तेथें ॥४१॥

वेदाविरुद्ध जे वर्तत ॥ नसतेंचि वाढविती कुमत ॥ कोठें विश्र्वास न धरी चित्त ॥ विकल्प येऊन राहे तेथें ॥४२॥

असो मंथरेचे मनीं ॥ विकल्प संचरला ते क्षणीं ॥ तों पक्व काळिंगण देखोन नयनीं ॥ प्रीतीकरोनि भक्षित ॥४३॥

पुष्पें वेचितां कुश्र्चळ ॥ मनीं उठती द्वेषकल्लोळ ॥ गृहास परतली तात्काळ ॥ कलह प्रबल लावावया ॥४४॥

तों कैकयीचे गृहीं सोहळा होत ॥ मंडप उभविले नभचुंबित ॥ जन अवघे आनंदभरित ॥ चिंतारहित सर्वहि ॥४५॥

ऐसें मंथरेनें देखतां ॥ परम द्वेष वाटे चित्ता ॥ जैशा वसंतीं कोकिळा गर्जतां ॥ दुःख वायसां उपजे पैं ॥४६॥

आम्र येतां पाडास ॥ मुखरोग प्राप्त होय कागांस ॥ दृष्टीं देखतां राजहंस ॥ दुःख विशेष वाटे तयां ॥४७॥

कीं देखोन संतांच्या मूर्ती ॥ निंदक संतापती चित्तीं ॥ देखोन पंडितांची व्युत्पत्ती ॥ अयोग्या चित्तीं द्वेष वाटे ॥४८॥

कीं देखोन मृगेंद्राचा प्रताप ॥ श़ृगालासी चढे संताप ॥ कीं देखोनि श्रीमंताचें स्वरूप ॥ जेंवी दुर्जन चरफडती ॥४९॥

कीं देखोन धार्मिकाची लीला ॥ अपवित्रासी खेद आगळा ॥ कीं पतिव्रता देखोनि डोळां ॥ व्यभिचारिणी वीटती ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP