शशांक देखतां विटती तस्कर ॥ दिवाभीतां नावडे दिनकर ॥ कीं हिंसकांस तत्त्वविचार ॥ मनींहून नावडे ॥५१॥
तैसा सोहळा देखोन मानसीं ॥ परम संतापली ते दासी ॥ रामनिधानासी विवसी ॥ आड आली साक्षेपें ॥५२॥
ते कलहपीठींची देवता ॥ कीं ते दुःखकल्लोळप्रवाहसरिता ॥ गृहांत अग्नि लागे अवचिता ॥ तैशी आंत प्रवेशली ॥५३॥
आंगणीं शरीर टाकी तात्काळ ॥ धबधबां पिटी वक्षःस्थळ ॥ कैकयीस म्हणे तूं केवळ ॥ अभागीण सर्वस्वें ॥५४॥
अगे बुद्धिहीन सर्वांत ॥ तुझें तुज न कळे हित ॥ मातुळगृहीं पाठविले तुझे सुत ॥ राज्यीं रघुनाथ स्थापिती ॥५५॥
तुज अवदशा आली यथार्थ ॥ सौभाग्य गेलें वाहात ॥ देशधडी केला भरत ॥ तुज अनर्थ समजेना ॥५६॥
राज्यीं बैसतां रघुनंदन ॥ तुझे पुत्र टाकील वधोन ॥ कैकयी तुज शिकवील कोण ॥ मजवांचून बुद्धि आतां ॥५७॥
मग तिजप्रति कैकयी बोलत ॥ मज भारत तैसाच रघुनाथ ॥ तूं हा खेद न करी यथार्थ ॥ कदा अनर्थ करूं नये ॥५८॥
ऐसें बोलोनि सत्वर ॥ कंठींचें पदक आणि हार ॥ तिच्या गळ्यांत घाली परिकर ॥ दासी आपुली म्हणोनि ॥५९॥
पदक आणि मुक्तामाळा ॥ मंथरेनें तोडून टाकिल्या ॥ तोंड घेतलें ते वेळां ॥ राज्य बुडालें म्हणोनी ॥१६०॥
स्नेहें धांवोनि कैकयी ॥ तीस धरती झाली हृदयीं ॥ विकल्प प्रवेशला ते समयीं ॥ चित्तगृहीं कैकयीच्या ॥६१॥
कैकयी तीस म्हणे ते समयीं बरी युक्ति योजलीस लवलाहीं तूं माझी प्राणसखी होसी पाहीं ॥ करूं कायी सांग आतां ॥६२॥
भरत तो नाहीं जवळी ॥ रामासी राज्य देती प्रातःकाळीं ॥ अयोध्यावासी लोक सकळी ॥ श्रीरामाकडे मुरडले ॥६३॥
वसिष्ठ आणि दशरथ ॥ यांसी प्राणाहून आवडे रघुनाथ ॥ ते तों माझा वचनार्थ ॥ न मानिती कदाही ॥६४॥
मंथरा म्हणे ऐक साचार ॥ पूर्वींचे मागें दोन वर ॥ तुवां रथ सांवरिला घालोनि कर ॥ शक्राचे युद्धसमयीं पै ॥६५॥
ऐसें गांठीस असतां शस्त्र ॥ तुज भय नाहीं अणुमात्र ॥ राज्यीं स्थापून तुझा पुत्र ॥ रामचंद्र वना धाडीं ॥६६॥
मनुसंख्या संवत्सर ॥ वनासी धाडीं रघुवीर ॥ चतुर्दश वर्षात तुझा पुत्र ॥ चवदा भुवनें जिंकील पैं ॥६७॥
वना निघतां रामचंद्र ॥ समागमें जाईल सौमित्र ॥ काननीं राक्षस परम दुर्धर ॥ रामलक्ष्मणां भक्षितील ॥६८॥
राक्षसें भक्षिल्या रघुनंदन ॥ भरतासी सहजचि कल्याण ॥ यालागीं वर दोनी घे मागून ॥ रायापाशीं आतांचि ॥६९॥
वनासी निघतां रघुनाथ ॥ प्राण त्यागील दशरथ ॥ तेहि गोष्टीचें तुजला हित ॥ राज्यीं भरत स्थापावया ॥१७०॥
रामाचे आवडते भक्त ॥ तेहि बाहेर घालूं समस्त ॥ आतां येईल दशरथ ॥ करीं अनर्थ येथेंचि ॥७१॥
ऐसीं ते दासीचीं वचनें ॥ हृदयीं धरिलीं कैकयीनें ॥ जैसें वमन होतांचि श्र्वानें ॥ उचलोनियां घेइंजे ॥७२॥
कीं शिंदीवृक्षापासून ॥ किंचित निघतां मद्यजीवन ॥ मद्यपी जैसा वोढवी वदन ॥ तैसेंचि वचन मानलें ॥७३॥
मर्कटासी मदिरारस पाजिला ॥ त्यांत वृश्र्चिकें दंश केला ॥ त्यामाजीं भूतसंचार झाला कैकयीस जाहलें तैसेंचि ॥७४॥
अलंकार काढिले झडकरीं ॥ तोडून टाकिली गळसरी ॥ केशमुक्त उर्वीवरी ॥ निद्रा करी सक्रोधें ॥७५॥
तंव ते भोगसमयाची वेळ ॥ कैकयीगृहा आला भूपाळ ॥ राजा मंथरेसि पुसे उतावेळ ॥ राीण आमुची कोठें पैं ॥७६॥
तंव ते बोले पापखाणी ॥ पैल ते पडली तुमची राणी ॥ काय आहे तिचे मनीं ॥ तें तो न कळेचि आम्हांतें ॥७७॥
मग कैकयीजवळी येऊन ॥ करें कुरवाळी राजा वदन ॥ दिधलें दशरथासी लोटून ॥ झिडकारून एकीकडे ॥७८॥
म्हणे परता होईं नृपा नष्टा ॥ असत्यवादिया क्रियाभ्रष्टा ॥ तुझे अंतरींचा भाव खोटा ॥ सर्वही म्यां ओळखिला ॥७९॥
ऐसे शब्द ऐकतां तीव्र ॥ धगधगिलें रायाचें अंतर ॥ चरण तिचे धरी सत्वर ॥ येरी लोटी परतेंचि ॥१८०॥
राजा म्हणे संभ्रम होत ॥ राज्यीं स्थापितों रघुनाथ ॥ तूं विघ्न न करीं येथ ॥ शरणागत तुझा मी ॥८१॥
वस्त्रें भूषणें अलंकार ॥ अपेक्षित देईन समग्र ॥ तुझ्या वचनालागीं निर्धार ॥ प्राण वेंचीन जाणपां ॥८२॥
मी असतां गळसरी ॥ तोडून टाकिली महीवरी । मागुता जावोनि चरण धरी ॥ लोटी निजकरीं कैकयी ॥८३॥
स्त्रीलोभाचिये आवडी ॥ प्राणी नाडिले लक्षकोडी ॥ जन्म मरणांचिया ओढी ॥ माजी पडिले बहुतचि ॥८४॥
स्त्रीलोभ परम दारुण ॥ पूर्वीं नाडले बहुतजण ॥ मूर्तिमंत भव्यव्याधि कामिन ॥ भुलवि सज्ञान जाणते ॥८५॥
संसारअनर्थास मूळ ॥ तो स्त्रीसंबंध जाण केवळ ॥ स्त्रीलोभें पापें सकळ ॥ आंगीं येऊन झगटती ॥८६॥
असो तो राजा दशरथ ॥ स्त्रीलोभें जाहला भ्रांत ॥ कैकयीस म्हणे माग इच्छित ॥ तें मी यथार्थ पुरवीन ॥८७॥
कैकयीस संकेत दावी मंथरा ॥ सांडूं नको पूर्वील निर्धारा ॥ मागून घेईं दोहीं वरां ॥ वना रघुवीरा पाठवीं ॥८८॥
कैकयी म्हणे नृपनायका ॥ माझ्या स्वर्गीच्या दोन्ही भाका ॥ न द्याल तरी उणें देखा ॥ येईल वंशा तूमच्या ॥८९॥
राजा म्हणे माग सत्वर ॥ तुज दीधले अपेक्षित वर ॥ मग म्हणे वना धाडीं रघुवीर ॥ राज्य भरतासी समर्पीं ॥१९०॥
जवळीं असतां रघुनायक ॥ त्याकडे होतील सकळ लोक ॥ यालागीं दूर वनासी देख ॥ आतांचि शीघ्र पाठवावें ॥९१॥
मनुसंख्यासंवत्सर ॥ राज्य करील माझा पुत्र ॥ मग तुम्ही आणावा रघुवीर ॥ अथवा तिकडेच ठेविजे ॥९२॥
ऐसें ऐकतांचि वचन ॥ गजबजलें रायाचें मन ॥ वाटे विद्यल्लता येऊन ॥ अंगावरी पडियेली ॥९३॥
कीं शरीर अग्नींत पडलें ॥ कीं काळिजीं कर्वत घातले ॥ कीं पर्वताचे कडे कोसळले ॥ आंगावरी अकस्मात ॥९४॥
कैकयीवचन प्रळयाग्न ॥ जाळीत चालिला आयुष्यकानन ॥ मग तिचे धांवोन धरी चरण ॥ पदर पसरून मागतसे ॥९५॥
जो जो मागसील पदार्थ ॥ तो तो पुरवीन समस्त ॥ परी सुकुमार माझा रघुनाथ ॥ वनाप्रति धाडूं नको ॥९६॥
मी पृथ्वीपति राजा दशरथ ॥ परी तुझा असें शरणागत ॥ सुकुमार माझा रघुनाथ ॥ वनाप्रति धाडूं नको ॥९७॥
पट्टराणिया समस्त ॥ तुझ्या सेवेसी लावीन यथार्थ ॥ परी सुकुमार माझा रघुनाथ ॥ वनाप्रति धाडूं नको ॥९८॥
जो लावण्यामृतसागर ॥ उदार धीर गुणगंभीर ॥ कोमळगात्र रघुवीर ॥ वनाप्रति धाडूं नको ॥९९॥
काय रघुत्तमें अन्याय केला ॥ एवढा त्यावरी कोप धरिला ॥ डोळस तमालनील सांवळा ॥ वनाप्रति धाडूं नको ॥२००॥