अध्याय पंधरावा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


श्रीगणेशाय नमः ॥

भवाब्धि भरला परम तुंबळ ॥ द्वैतभावाचे तटाक सबळ ॥ कुबुद्धीचे कल्लोळ ॥ मोहजाळ असंभाव्य ॥१॥

मद मत्सर थोर आवर्त ॥ कामक्रोधादि मासे अद्भुत ॥ आशा तृष्णा भ्राति तेथ ॥ मगरी थोर तळपती ॥२॥

लोभ द्वेष नक्र थोर ॥ ममतेच्या लाटा अति दुस्तर ॥ दंभ आणि अहंकार ॥ विरोळे हे तळपती ॥३॥

अविवेक किरवे तत्वतां ॥ अविद्या भ्रांति जळदेवता ॥ पीडिती त्रिभुवनींच्या जीवां समस्तां ॥ इच्छा ममता कल्पना ॥४॥

ऐसा अगाद्य भवनिधी थोर ॥ तेथें रामकथाजहाज सुंदर ॥ शिल्पिकार वाल्मीक ऋषीश्र्वर ॥ तारूं तेणें निर्मिलें ॥५॥

नाना चरित्रें सुंदर ॥ याचि फळ्या दृढ थोर ॥ विवेकें जोडूनि समग्र ॥ अभेदत्व साधिलें ॥६॥

साहित्य लोह तगटबंध ॥ आनंदपदखिळे विविध ॥ दृष्टांतदोरे प्रसिद्ध ॥ ठायीं ठायीं आंवळिले ॥७॥

अर्थरस तेल निखिळ ॥ तेणें सांधे बुजिले सकळ ॥ रामप्रतापस्तंभ विशाळ ॥ कीर्तिशीड फडकतसे ॥८॥

सप्त कांडें सप्त खण ॥ लोटीत भावप्रभंजन ॥ निजबोध कर्णधार पूर्ण ॥ सकळ सुजाण देखणा ॥९॥

ज्ञान वैराग्य भक्ति ॥ हेचि आवले आवलिती ॥ या जहाजावरी तेचि बैसती ॥ अद्भुत ग्रंथी पुण्य ज्यांचें ॥१०॥

रामनामघोष थोर ॥ हेचि यंत्रांचे भडिमार ॥ नादें जलचरें समग्र ॥ भयभीत पळताती ॥११॥

ऐसें भवसागरीं तारूं थोर ॥ गुरुकृपेचें केणें अपार ॥ भरूनि मोक्षा द्वीपांतर ॥ लागवेगें पाविजे ॥१२॥

तरी तुम्हीं श्रोते सज्जन ॥ या जहाजावरी बैसोन ॥ भवाब्धि हा उल्लंघून ॥ निवृत्तितटा जाइंजे ॥१३॥

असो चौदावे अध्यायीं कथन ॥ वधिले त्रिशिरा खर दूषण ॥ शूर्पणखेनें वर्तमान ॥ दशकंठासी श्रुत केलें ॥१४॥

श्रीरामप्रताप अद्भुत ॥ ऐकतां सचिंत लंकानाथ ॥ सद्भक्ताची स्तुति ऐकोनि समस्त ॥ दुर्जन जैसे क्षोभती ॥१५॥

पतिव्रतेची ऐकोनि राहाटी ॥ जारिणी होती जेवी कष्टी ॥ कीं मृगेंद्रगर्जना ऐकतां पोटीं ॥ वारण जैसे दचकती ॥१६॥

कीं विष्णुमहिमा ऐकतां अद्भुत ॥ क्रोधावती जैसे दैत्य ॥ असो ते वेळे मयजाकांत ॥ मारीचगृहीं प्रवेशला ॥१७॥

मारीचानें सन्मान देऊनी ॥ रावणातें बैसविलें आसनीं ॥ याउपरी मधुरवचनीं ॥ दशकंठ बोलता जाहला ॥१८॥

म्हणे पंचवटीस आला रघुनंदन ॥ मारिले त्रिशिरा खर दूषण ॥ शूर्पणखा विटंबून ॥ शंबरीही मारिला ॥१९॥

शत्रु नाग कृशान ॥ हे म्हणों नयेत लहान ॥ क्षणें हरतील प्राण ॥ सावधान असावें ॥२०॥

यालागीं मातुळा परियेस ॥ तुवां धरावा मृगवेष ॥ पंचवटीस जाऊन राघवास ॥ भुलवोनियां नेइंजे ॥२१॥

राघव नेइंजे दूर वनीं ॥ मग पद्माक्षी आणीन काढूनि ॥ हें कार्य साधल्या तुजलागोनी ॥ गौरवीन बहुसाल ॥२२॥

जैसें मृढाचें वाग्जाळ ॥ पंडित छेदी तत्काळ ॥ तैसीं वचनें रसाळ ॥ बोले मातुळ रावणाचा ॥२३॥

पूर्वीं करितां यागरक्षण ॥ सुबाहु टाकिला मारून ॥ त्या बाणवातेंकरून ॥ मी पडलों सागरीं ॥२४॥

वीस कोटी मारिले पिशिताशन ॥ तो रामप्रताप आठवून ॥ मारीच मूर्च्छा येऊन ॥ करी रावण सावध तया ॥२५॥

मारीच म्हणे रावणा ॥ अभिलाषितां परांगना ॥ तो मुकला आपुलिया प्राणा ॥ सत्य जाण निर्धारें ॥२६॥

सद्विवेक हृदयीं धरोन ॥ अनुचित कर्मीं न घालीं मन ॥ सद्रुरु सांगे ते वचन ॥ अवश्य हृदयीं धरावें ॥२७॥

न करावें कोणाचें हेळण ॥ कदा न बोलिजे दुष्ट वचन ॥ पराची वेदना जाणून ॥ परोपकार करावा ॥२८॥

सर्वांभूतीं एक भगवंत ॥ हा वेदशास्त्रीं श्रेष्ठार्थ ॥ म्हणोनि द्वेष न करावा सत्य ॥ साधिजे परमार्थ अवश्य ॥२९॥

क्षणिक जाणोनि शरीर ॥ साधावा सारासारविचार ॥ मी भाग्यें ज्ञानें बहु थोर ॥ हा अभिमान न धरावा ॥३०॥

काम क्रोध मद मत्सर ॥ हे शत्रु जिंकावे अनिवार ॥ दशमुखा तूं सज्ञान थोर ॥ सखा रघुवीर करीं वेगें ॥३१॥

सखा करीतां चापपाणी ॥ मग सुखासी नाहीं वाणी ॥ जोंवरी शशी आणि तरणी ॥ तोंवरी सुखें नांदसी ॥३२॥

राम केवळ परम पुरुष ॥ आदिनारायण सर्वेश ॥ तुझे उरावरी पडलें धनुष्य ॥ सीतास्वयंवरीं आठवीं कां ॥३३॥

तुझे चालिले जेव्हां प्राण ॥ मग उठिला रामपंचानन ॥ चंडीशकोदंड भंगोन ॥ जीवदान तुज दिधलें ॥३४॥

तैं तुज रामें वांचविलें ॥ त्याचें काय हेंचि फळ जाहलें ॥ जेणें उपकार बहुत केले ॥ त्यासी मारिसी शस्त्र घेऊनि ॥३५॥

जेणें पाजिला सुधारस ॥ त्यासीच पाजिलें महाविष ॥ जेणें रणींहून सोडविलें निःशेष ॥ त्याचिया गृहास अग्नि लाविसी ॥३६॥

जन्मूनि जेणें केलें पाळण ॥ आपत्काळीं रक्षिलें पूर्ण ॥ तो निद्रिस्थ असतां पाषाण ॥ कैसा वरी घालावा ॥३७॥

नौका बुडतां कांसे लाविलें ॥ कीं जळत्या गृहींहून काढिलें ॥ कीं शिर छेदितां सोडविलें ॥ तो पितयातुल्य वेद म्हणे ॥३८॥

यालागीं दशकंठा तूं सुबुद्ध ॥ रामाशीं न करावा विरोध ॥ राम केवळ ब्रह्मानंद ॥ आनंदकंद जगद्रुरु ॥३९॥

तुझा स्वामी जो शंकर ॥ तोही रामभजनीं सादर ॥ ते रामभार्या तूं पामर ॥ हिरोनी आणूं इच्छितोसी ॥४०॥

ऐसीं मातुळाचीं वचनें ॥ सुधारसाहूनि गोड गहनें ॥ कीं विवेकवैरागरींची रत्नें ॥ रावणाहातीं दीधलीं ॥४१॥

परम मतिमंद कुल्लाळ देख ॥ परीक्षा नेणेंचि महामूर्ख ॥ रोगिष्ठापुढें अन्नें सुरेख ॥ व्यर्थ जैशीं वाढिलीं ॥४२॥

अवदान समर्पिलें भस्मांत ॥ कीं उकिरडां ओतिलें अमृत ॥ कीं जो मद्यपानी उन्मत्त ॥ त्यास परमार्थ कायसा ॥४३॥

असो परम क्रोधायमान ॥ रावण तेव्हां बोले तीक्ष्ण ॥ जैसें साधूचें छळण ॥ निंदक करी साक्षेपें ॥४४॥

माझिया प्रतापापुढें ॥ राम मनुष्य काय बापुडें ॥ मी केलीं चूर्ण देवांचीं हाडें ॥ तुज देखतां समरांगणीं ॥४५॥

त्याचा प्रताप तूं वानिसी ॥ तरी तुज वधीन निश्र्चयेंसीं ॥ म्हणोनि हस्त घातला शस्त्रासी ॥ मारीच मानसीं वीटला ॥४६॥

म्हणे अधम तूं परम दुर्जन ॥ होय माघारा न बोलें वचन ॥ मी आतां मृगवेष धरून ॥ जातों शरण राघवेंद्रा ॥४७॥

रामबाणें होतां मरण ॥ मी अक्षयसुख भोगीन ॥ तुझे हातेंकरून ॥ अधःपतन पतिता ॥४८॥

आतां पंचवटीस चला लौकरी ॥ मग दोघे बैसोनि रथावरी ॥ वायुवेगें ते अवसरीं ॥ जनस्थानासी पातले ॥४९॥

वनीं उभा गुप्त रावण ॥ मारीच निघे मृगवेष धरून ॥ अंतरीं करीत रामस्मरण ॥ म्हणे धन्य धन्य आजि मी ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP