अध्याय पंधरावा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


श्रीराम म्हणे लक्ष्मणा ॥ कां सीता टाकोनि आलासी वना ॥ येरू म्हणे रघुनंदना माझा वध करीं वेगीं ॥१॥

ऐसें वाटे माझे मनीं ॥ देह समर्पावा रामचरणीं ॥ रामें हृदयीं आलिंगूनी ॥ कायसा मनीं खेद सांगें ॥२॥

सौमित्र सद्रदित होऊनि बोले ॥ सीतेनें वाग्बाण सोडिले ॥ तेणें सर्वांग माझें खोचलें ॥ तें बोलिलें नवजाय ॥३॥

मग बहुत प्रकारेंकरून ॥ समाधान करी रघुनंदन ॥ तैसेच परतले दोघेजण ॥ आश्रमपंथ लक्षोनियां ॥४॥

इकडे कथानक काय जाहलें ॥ मागें दशग्रीवें काय केलें ॥ रूप अतिथाचें धरिलें ॥ कापट्य करोनि ते वेळे ॥५॥

जानकी चंद्रमंडळ सुंदर ॥ तेथें राहू आला दशकंधर ॥ उभा राहिला रेखेबाहेर ॥ दुराचार पापात्मा ॥६॥

कीं हरिणी देखोनि सुकुमार ॥ न्यावया झेंपावें जेवीं व्याघ्र ॥ तैसा राक्षस रेखेबाहेर ॥ अतीथवेषें उभा असे ॥७॥

रावण परम भयभीत ॥ रेखा नुल्लंघवे यथार्थ ॥ जैसा वडवानळ अद्भुत ॥ शलभ ओलांडूं शकेना ॥८॥

पुढें उभा दशमुख ॥ परी जानकी निर्भय निःशंक ॥ जैसा महेशापुढें मशक ॥ तैसा दशमुख उभा असे ॥९॥

इंद्रापुढें जैसा रंक ॥ ज्ञानियापुढें महामूर्ख ॥ कीं केसरीपुढें जंबुक ॥ कीं सूर्यापुढें खद्योत पैं ॥११०॥

कीं अग्नीपुढें पतंग ॥ कीं खगेंद्रापुढें उरग ॥ कीं राजहंसासमोर काग ॥ तैसा उभा खळ तेथें ॥११॥

कीं नामापुढें पाप देख ॥ कीं वेदापुढें चार्वाक ॥ कीं शंकरापुढें मशक ॥ मीनकेतन जेवीं दिसे ॥१२॥

कीं पंडितापुढें अजापाळक ॥ कीं श्रोतियापुढें हिंसक ॥ कीं वासुकीपुढें मंडूक ॥ लक्षण पाहूं पातला ॥१३॥

कीं अग्नीपुढें जैसें तृण ॥ कीं ज्ञानापुढें अज्ञान ॥ कीं महावातापुढें जाण ॥ जलदजाळ जैसें कां ॥१४॥

तैसा सीतेपुढें रावण ॥ न्याहाळोनि पाहे तिचें वदन ॥ मनीं म्हणे ऐसें निधान ॥ त्रिभुवनामाजीं दिसेना ॥१५॥

जगन्माता आदिशक्ती ॥ तिचा अभिलाष धरितां चित्तीं ॥ अवदसा आली रावणाप्रती ॥ झोळी हातीं घेतली ॥१६॥

कामधेनु अभिलाषितां जाण ॥ क्षय पावला सहस्रार्जुन ॥ जालंदर पार्वतीलागून ॥ अभिलाषितां भस्म जाहला ॥१७॥

तृणाचे वळईमाजी देखा ॥ कैसी उगी राहे दीपकलिका ॥ तैसें वाटे दशमुखा ॥ स्पर्श कदा न करवे ॥१८॥

कापुराचा पुतळा ॥ केंवीं गिळील अग्निज्वाळा ॥ तैसे न स्पर्शवे जनकबाळा ॥ रावणाचेनि सर्वथा ॥१९॥

सीतेप्रति पुसतसे रावण ॥ ये वनीं तूं कोणाची कोण ॥ कां सेविलें घोर विपिन ॥ काय कारण पुढे असे ॥१२०॥

मग जगन्माता बोले वचन ॥ अयोध्याप्रभु रघुनंदन ॥ मी त्याची ललना पूर्ण ॥ कन्यका जाण जनकाची ॥२१॥

चंडीश कोदंड दारुण ॥ रामें भंगिलें न लागतां क्षण ॥ जो रावणबळदर्पहरण ॥ मखरक्षण ताटिकांतक ॥२२॥

पाळावया पितृवचन ॥ वनासी आले रघुनंदन ॥ शूर्पणखेसी विटंबून ॥ त्रिशिरा खर दूषण मारिले ॥२३॥

आतां रावण आणि कुंभकर्ण ॥ या दोघां दुष्टांतें वधून ॥ बंदीचे वृंदारक सोडवून ॥ अयोध्येसी मग जाऊं ॥२४॥

वना गेले रामलक्ष्मण ॥ ते आतां येतील न लागतां क्षण ॥ तोंवरी बेसावें आपण ॥ स्वस्थ मन करोनियां ॥२५॥

स्वहस्तेंकरूनि जाण ॥ तुम्हांसी पूजिती रघुनंदन ॥ नावेक बैसावें म्हणोन ॥ तृणासन घातलें ॥२६॥

भयभीत लंकानाथ ॥ प्रवेश न करवे गुंफेआंत ॥ सीता बाहेर न ये सत्य ॥ चापरेखा उल्लंघोनी ॥२७॥

अतीथ म्हणे हें राक्षसवन ॥ तूं एकली येथें कामिन ॥ बहुतेक आहेस राक्षसीण ॥ आंत नेऊन गिळीसी मज ॥२८॥

त्वां आसन घातलें गुंफेत ॥ तरी मी आंत न ये यथार्थ ॥ मज तूं खासी हे निश्र्चित ॥ कळलें मत सर्व तुझें ॥२९॥

सीता म्हणे शिर हर हर ॥ आम्ही राक्षस नव्हे जी साचार ॥ असों अतीथाचे किंकर ॥ सत्य निर्धार जाणपां ॥१३०॥

रावण विचारीं अंतरीं ॥ ही नयेचि गुंफेबाहेरी ॥ मग मूर्च्छा येऊन उर्वीवरी ॥ लटिकाची पडियेला ॥३१॥

म्हणे आतां फलाहाराविण ॥ माझा जातो येथें प्राण ॥ तूं गुंफेबाहेर येऊन ॥ वदनीं माझ्या फळ घालीं ॥३२॥

तों गुप्तरूपें देव समस्त ॥ जगन्मातेचें स्तवन करित ॥ तूं लंकेस जाऊन त्वरीत ॥ बंधमुक्त करी आम्हां ॥३३॥

तुज स्पर्शतांचि रावण ॥ भस्म होईल न लागतां क्षण ॥ मग आम्हांस बंदीहून ॥ सर्वथा कोणी न सोडवी ॥३४॥

तुझें करोनि निमित्त ॥ लंकेस येईल रघुनाथ ॥ तरी मुख्यरूप अग्नींत ॥ करीं गुप्त जननीये ॥३५॥

तुझें प्रतिबिंब स्वरूप जाण ॥ स्वयें नटेल हुताशन ॥ रावणवंश भस्म करून ॥ कार्यसिद्धि करील तो ॥३६॥

तरी मुख्यरूप गुप्त व्हावें ॥ छायारूप तेथें जावें ॥ ऐसें देव विनविती आघवे ॥ अवश्य म्हणे जानकी ॥३७॥

असो इकडे रावण ॥ म्हणे धांव धांव जातो प्राण ॥ मग जगन्माता फळें घेऊन ॥ रेखेजवळ पातली ॥३८॥

भिक्षा घालावयासी कर ॥ सीतेनें केला रेखेबाहेर ॥ तैसीच ओढोनियां सत्वर ॥ निशाचरें उचलिली ॥३९॥

आपलें स्वरूप लंकेश ॥ दाविता झाला जानकीस ॥ म्हणे म्यां बंदीं घातले त्रिदश ॥ वरीं निःशंक मज आतां ॥१४०॥

सीतेलागीं आलिंगीन ॥ ऐसें मनीं भावी रावण ॥ सीता म्हणे जाशील भस्म होऊन ॥ न लागतां क्षण आतांचि ॥४१॥

अग्नीस ओळंबा केवीं लागे ॥ पतंग नुरे दीपासंगें ॥ तुझा मृत्यु जवळी वेगें ॥ आला जाण राक्षसा ॥४२॥

रामपंचाननाची वस्तु पूर्ण ॥ जंबुका तूं नेतोसी चोरून ॥ जैसें अन्नसदनीं रिघे श्र्वान ॥ तैसा जाण तूं दशमुखा ॥४३॥

खदिरांगारासी वृश्र्चिक ॥ पुच्छ हाणूं जातां देख ॥ तैसा तूं भस्म होसी निःशंक ॥ सोडी मज राक्षसा ॥४४॥

परी न सोडीच रावण ॥ घातली रथावरी नेऊन ॥ गुंफेभोंवतीचें ब्राह्मण ॥ ते भयेंकरून पळाले ॥४५॥

गृहस्थासी पडतां विषमकाळ ॥ आश्रित पळती जैसे सकळ ॥ तैसे ब्राह्मण रानोमाळ ॥ भयेकरून पळताती ॥४६॥

सीता जाहली दीनवदन ॥ म्हणे कोठें रामलक्ष्मण ॥ करुणास्वरे हांक फोडून ॥ धांवा करी राघवाचा ॥४७॥

तों निराळमार्गें रथ ॥ पळवीत जाय लंकानाथ ॥ दीर्घस्वरें आक्रंदत ॥ जनकदुहिता ते काळीं ॥४८॥

नानावृक्षवनरांप्रति ॥ हांक फोडून सीता सती ॥ म्हणे सत्वर सांगा रघुपती ॥ राक्षस नेतो म्हणोनियां ॥४९॥

सीतेची करुणा देखोन ॥ पशु पक्षी करिती रुदन ॥ वृक्ष आणि पाषाण ॥ दुःखेंकरून उलताती ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP