अध्याय एकवीसावा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


श्रीगणेशाय नमः ॥

क्षीराब्धितटीं बैसला सर्वकाळ ॥ त्यासी क्षुधा कासया बाधील ॥ दीपाची चिंता कां लागेल ॥ दिनमणि समीप असतां पैं ॥१॥

राहतां कल्पतरुतळीं ॥ कां डंखील कामनाव्याळी ॥ गंगाजळीं शेज केली ॥ त्यासी वणवा करील काय ॥२॥

वारणाविदारकाचे संगतीं ॥ जो बैसला अहोरात्रीं ॥ त्यासी जंबूक बाधा करिती ॥ हें कल्पांतींही घडेना ॥३॥

जो नित्य करी सुधारसपान ॥ त्यासी विष बाधील काय दारुण ॥ स्वरूपीं जो सदा सावधान ॥ दुष्कृतें कैंचीं त्यापाशीं ॥४॥

कामधेनु घरीं असतां ॥ कल्पना न बाधी तत्वतां ॥ हुताशन तेज धडकतां ॥ शीत कैंचें उरेल ॥५॥

तैसी रघुवीरकृपा ज्यासी पूर्ण ॥ त्यासी न बाधी विषयहुताशन ॥ रामचरित्रीं गुंतलें मन ॥ इतर श्रवण नावडे तया ॥६॥

असो विसावा अध्याय संपतां तेथें ॥ आसाळी विदारिली हनुमंतें ॥ यावरी इंद्रजितासी लंकानाथें ॥ आज्ञा केली सत्वर ॥७॥

तों नग्न कुमारी शिंके पाठीसी ॥ रावण शकुन पुसे ब्रह्मयासी ॥ विधी म्हणे दोघांतून एकासी ॥ अपयश येईल दिसतसे ॥८॥

रावण पाहे क्रोधायुक्त ॥ विधी म्हणे वानर होईल हस्तगत ॥ तैसाचि चालला इंद्रजित ॥ अशोकवना ते वेळे ॥९॥

सवें घेऊनि चतुरंग सेना ॥ शक्रारि निघाला अशोकवना ॥ शयशीं अयुतें गज जाणा ॥ रथतुरंगमां गणना नाहीं ॥१०॥

देव बैसोनी विमानीं ॥ कौतुक पाहती तेच क्षणीं ॥ अशोकवनांत रावणी ॥ निजभारेंसी पातला ॥११॥

तों पाठमोरा हनुमंत ॥ बैसलासे फळें झेलित ॥ असुर गर्जती बहुत ॥ परी तो तिकडे न पाहे ॥१२॥

क्षणक्षणां पाठी कुरवाळित ॥ मागें परतोन वांकुल्या दावित ॥ राक्षस शस्त्रें असंख्यात ॥ वर्षते जाहले कपीवरी ॥१३॥

इंद्रजितें शर टाकिले ॥ हनुमंतें वरचेवर झेलिले ॥ मुष्टीमाजी जमा केले ॥ बहुसाल तेधवां ॥१४॥

अकस्मात पुच्छ सोडिलें ॥ रावणाचे धनुष्य हरिलें ॥ हनुमंतें आकर्ण ओढिलें ॥ बाण लावून ते समयीं ॥१५॥

अचुक मारुतीचें संधान ॥ सोडिता जाहला असंख्यात बाण ॥ जैसे शब्दामागें शब्द पूर्ण ॥ मुखांतून निघती पैं ॥१६॥

तों विमानरूढ सुधापानी ॥ पुष्पें वर्षती क्षणक्षणीं ॥ म्हणती मारुति धन्य अंजनी ॥ तुजचि एक प्रसवली ॥१७॥

राक्षसांची शिरें ते काळीं ॥ हनुमंतें असंभाव्य उडविलीं ॥ रावणीचा मुकुट तळीं ॥ छेदोनियां पाडिला ॥१८॥

बाण सरले तये वेळां ॥ सवेंच घेतली लोहार्गळा ॥ वायुवेगें धांविन्नला ॥ शक्रारीचे रथापाशीं ॥१९॥

अर्गळा घालोनि ते वेळां ॥ अश्र्वांसहित रथ भंगिला ॥ इंद्रजित विरथ जाहला ॥ घाबरला पहातसे ॥२०॥

लोहार्गळेचे घाय सबळ ॥ झोडिलें इंद्रजिताचें दळ ॥ वाहती रक्ताचे खळाळ ॥ समुद्रा जाती भेटावया ॥२१॥

जैसें अलातचक्र फिरे ॥ तैसा हनुमंत असुरांत वावरे ॥ रावणीस अर्गळाप्रहारें ॥ झोडिता जाहला तेधवां ॥२२॥

रावणात्मजें ते अवसरीं ॥ पाश टाकिला हनुमंतावरी ॥ तों मारुति होय मोहरी ॥ उडोनि जाय एकीकडे ॥२३॥

मागुती लहान पाश करून ॥ कपीवरी टाकी आणून ॥ पर्वतकार सीताशोकहरण ॥ होऊन पाश तोडितसे ॥२४॥

शस्त्रास्त्रें बहुसाल ॥ टाकितां नाटोपि कपि सबळ ॥ यावरी अंजनीचा बाळ ॥ इंद्रजितावरी लोटला ॥२५॥

मल्लयुद्धासी प्रवर्तला ॥ इंद्रजित बळें आपटिला ॥ नग्न करून भिकाविला ॥ चरणीं धरून हनुमंतें ॥२६॥

इंद्रजित तेव्हां रडत ॥ म्हणे मज आला काय मृत्य ॥ दळही संहारिलें समस्त ॥ न दिसे येथें कोणीही ॥२७॥

म्हणे मज निराहारियाचे हातें मरण ॥ हा तों करी फळभक्षण ॥ परी रामापाशीं नेईल धरून ॥ विटंबील नाना परी ॥२८॥

सुटे जों जनकनंदिनी ॥ तों मज घालील बंदिखानीं ॥ जैसें रावणासी धरूनि ॥ पांच पाट काढिले ॥२९॥

मग नग्न इंद्रजित पळाला ॥ विवरामाजी तो दडाला ॥ कपीनें द्वारीं पाषाण लाविला ॥ विवरीं कोंडिला राक्षस ॥३०॥

इंद्रजित कासावीस होये ॥ म्हणे कां मरण मज नये ॥ शस्त्र जवळी नाहीं करूं काय ॥ प्राणत्याग करावा ॥३१॥

विवरीं कोंडिला इंद्रजित ॥ हें दशकंठासी जाहलें श्रुत ॥ परम जाहला भयभीत ॥ विनवीतसे विरंचीतें ॥३२॥

म्हणे तुझे वचन साचार ॥ हस्तगत नव्हे कां वानर ॥ तरी तुवां जाऊनि सत्वर ॥ धरून कपि देईं आम्हां ॥३३॥

तरी तूं तेथवरी जाऊन ॥ मज द्यावें पुत्रदान ॥ काळरूप तो वानर जाण ॥ तुजविण कोणा नाटोपे ॥३४॥

मग कमलोद्भव पातला तेथ ॥ तंव तो नग्नचि इंद्रजित ॥ दडला असे विवरांत ॥ भयभीत मुसमुसी ॥३५॥

मग रावणी बोले करुणा वचन ॥ आतां मज सोडवीं येथून ॥ त्या वानरासी धरिल्याविण ॥ मी विवराबाहेर न येंचि ॥३६॥

कमळासन म्हणे ते अवसरीं ॥ आतां निघें विवराबाहेरी ॥ ब्रह्मपाश घालोनि झडकरी ॥ कपिबळिया धरावा ॥३७॥

रावणी देत प्रत्युत्तर ॥ ब्रह्मपाशास नावरे वानर ॥ विरिंचि म्हणे तूं अपवित्र ॥ तुज अस्त्र हें न चाले ॥३८॥

मग विष्णुसुतें ते वेळीं ॥ राघवप्रियाची स्तुति केली ॥ तूं वज्रशरीरी महाबळी ॥ निशाचर कांपती तूतें ॥३९॥

आमुचे वचन साचे करावें ॥ ब्रह्मपाशी त्वां सांपडावें ॥ सभेपर्यंत उगेंचि यावें ॥ मग दावावें पराक्रमा ॥४०॥

ऐसें कमलोद्भवें विनविलें ॥ समीरात्मजें मान्य केलें ॥ मग विरिंचीनें पाश पेरिले ॥ माजी बांधीलें हनुमंता ॥४१॥

हनुमंत बांधिला पाशीं ॥ शक्रारि धांवला वेगेंसी ॥ दृढ बांधितां जाहला कपीसी ॥ निजहस्तेंकरूनियां ॥४२॥

एक तृणवेंटीनें पाय बांधिती ॥ एक वृक्षसालीनें आंवळिती ॥ एक दोर आणावया धांवती ॥ नगरामाजी सत्वर ॥४३॥

हनुमंत दिसे बांधिला ॥ परी तो सर्वदाही मोकळा ॥ जैसा ज्ञानी संसारीं गुंतला ॥ परी तो सर्वदाही मुक्त असे ॥४४॥

नलिनीपत्र जळीं खेळे ॥ परी त्यावरी बिंदु नातळे ॥ कीं शीतोष्ण धुळीनें न मळे ॥ निराळ जैसें सर्वदा ॥४५॥

कीं समीर सर्वांवरून जात ॥ परी कोठेंचि नव्हे लिप्त ॥ तैसाचि वीर हनुमंत ॥ बंधमोक्षातीत जो ॥४६॥

असो परमेष्ठी आणि इंद्रजित ॥ सभेंसी आणिती हनुमंत ॥ वाटेसी राक्षस टोंचित ॥ नाना शस्त्रें घेऊनियां ॥४७॥

शस्त्रें भंगली समग्न ॥ वज्रशरीरी तो वानर ॥ असुरीं उचलोनी तो सत्वर ॥ सभेसमोर आणिला ॥४८॥

दृष्टीं देखतां हनुमंत ॥ रावण करकरां दांत खात ॥ याउपरी रघुनाथदूत ॥ काय करिता जाहला ॥४९॥

बंधनें तोडूनि समस्त ॥ पुच्छासनीं बैसला हनुमंत ॥ रावणाहून एक हस्त ॥ उंच आसन मारुतीचें ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP