अध्याय एकवीसावा - श्लोक १५१ ते २१९

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


ब्रह्मायाची आज्ञा घेऊनी ॥ प्रवेशला अशोकवनीं ॥ साष्टांगेंसीं जनकनंदिनी ॥ सद्रद होऊनि नमियेली ॥५१॥

मग बोले जनकबाळा ॥ आतां कधीं येशील वेल्हाळा ॥ विमळांबुधारा ते वेळां ॥ नेत्रीं आल्या जानकीच्या ॥५२॥

जो दशरथाचा महापुण्यमेरू ॥ जो ब्रह्मांडनायक जगद्रुरु ॥ जो भक्तमंदिरांगणमांदारू ॥ तयाचे दर्शना जातों मी ॥५३॥

हनुमंत म्हणे जगन्माते ॥ राघववल्लभे गुणसरिते ॥ कमळप्रिये कमलो द्भूते ॥ चिंता न करी सर्वथा ॥५४॥

माते उदयिक जाण दोनप्रहरां ॥ राघव आणितों समुद्रतीरा ॥ तो राक्षसांसहित दैत्येंद्रा ॥ वधून तुज सोडवील ॥५५॥

मज कांही खूण द्यावी यथार्थ ॥ जेणें मज धन्य म्हणेल रघुनाथ ॥ मग वेणींचा मणी दैदीप्यवंत ॥ मारुतीचे हातीं ओपिला ॥५६॥

मागुती अंजनीहृदयरत्न ॥ म्हणे कांहीं सांग अंतरखूण ॥ तो ताटिकांतक मखपाळण ॥ जेणेंकरूनि संतोषे ॥५७॥

जानकी म्हणे चित्रकूटपर्वतीं ॥ आम्ही काळ क्रमिला जैं मारुती ॥ सुमित्रात्मज वनाप्रति ॥ गेला होतां एकदां ॥५८॥

एकांतींचे अवसरीं ॥ रघुपतीच्या अंकावरी ॥ शिर ठेवूनि निर्धारीं ॥ हनुमंता मी निजल्यें पैं ॥५९॥

प्रीतीकरून तमालनील ॥ परम सुवास जो मनसीळ ॥ तो उगाळून स्वकरें तत्काळ ॥ टिळक रेखिला भाळीं माझे ॥१६०॥

हे गोष्टी जाणे रघुनंदन ॥ मारुती सांग हे अंतरखूण ॥ ऐसें ऐकतां वायुनंदन ॥ परम हर्ष पावला ॥६१॥

जानकी म्हणे समुद्रजळ ॥ शतयोजनें भरलें तुंबळ ॥ असंख्यात वानरदळ ॥ कैसें येईल ऐलतीरा ॥६२॥

येरू म्हणे राघव शरीं ॥ सेतु बांधील समुद्रावरी ॥ अथवा माझिया पुच्छेंकरी ॥ सेतु बांधील अभंग ॥६३॥

ना तरी राघवबाण ॥ वडवानळ ॥ शोषून टाकील समुद्रजळ ॥ अथवा उड्डाण करून सकळ ॥ सुवेळेसी पैं येऊं ॥६४॥

जेणें स्तंभाविणें धरिलें नभ ॥ जीवनावरी पृथ्वी ठेवी स्ययंभ ॥ तो जानकी तुझा वल्लभ ॥ काय एक करूं न शके ॥६५॥

जननीचें जठरकुहरीं ॥ प्राणी वसे नवमासवरी ॥ तेथें रक्षी नानापरी ॥ तो काय एक करूं न शके ॥६६॥

बाहेर उजजतांच अवधारा ॥ मातेचें स्तनीं दुग्धधारा ॥ लावितो परात्पर सोयरा ॥ तो काय एक करूं न शके ॥६७॥

क्षणें एवढें ब्रह्मांड दावी ॥ सवेंच मागुतें लपवी ॥ तो राम त्रिभुवनगोसावी ॥ काय एक करूं न शके ॥६८॥

जैसा गगनीं एकचि मित्र ॥ परी प्रकाश करी सर्वत्र ॥ तैसा जगद्य्वापक रघुवीर ॥ काय एक करूं न शके ॥६९॥

वपु नवच्छिद्रमय भग्न ॥ परी मर्यादेवेगळा न जाय प्राण ॥ तैसा अयोध्यानाथ जगन्मोहन ॥ काय एक करूं न शके ॥१७०॥

गोष्टी असोत बहुत आतां ॥ वेद शिणले कीर्ति गातां ॥ उदयिक दोनप्रहरां रघुनाथा ॥ समुद्रतीरा आणितों ॥७१॥

तुज मी आतांच नेतों माते ॥ परी शुद्धि सांगितली रघुनाथें ॥ पुढील भविष्याची मतें ॥ ठाऊन नसती जननीये ॥७२॥

असो सीतेची आज्ञा घेऊन ॥ साष्टांगें नमी वायुनंदन ॥ यशस्वी रघुनाथ म्हणोन ॥ गगनपंथें उडाला ॥७३॥

सकळ देव म्हणती हनुमंता ॥ त्वरितगतीं आणावें रघुनाथा ॥ तूं आमुचा प्राणदाता ॥ सोडवीं येथून आम्हांसी ॥७४॥

हनुमंत म्हणे देवांसी ॥ नका चिंता करूं मानसीं ॥ उदयिक राम समुद्रतीरासी ॥ निर्धारेंसी आणितों ॥७५॥

यावरी लंकागिरीशिखरीं ॥ उभा राहिला वानरकेसरी ॥ भुभुःकार केला ऐलतीरीं ॥ सकळ वानरीं ऐकिला ॥७६॥

लंकागिरीहूनि उडाला ॥ योजनद्वय पाठार दडपिला ॥ उड्डाणासरसा समुद्र भ्याला ॥ मारुती आला ऐलतीरा ॥७७॥

निशांतीं उगवे चंडकिरण ॥ कीं वैकुंठींहून उतरे सुपर्ण ॥ कीं मानसतीर लक्षून ॥ राजहंस उतरला ॥७८॥

महेंद्रपर्वतावरी हनुमंत ॥ उभा ठाकला अकस्मात ॥ जांबुवंतादि वानर समस्त ॥ भेटावया धांविन्नले ॥७९॥

थोर थोर वानर भेटती ॥ एक जघनासी आलिंगिती ॥ एक जानु जंधा कवळिती ॥ एक लागती पायांतें ॥१८०॥

एक पुच्छासी देती आलिंगन ॥ एक पुच्छाग्रीं देती चुंबन ॥ एक मान घुलकावून ॥ वांकुल्या दाविती ऊर्ध्वपंथें ॥८१॥

एक टाळिया वाजवून कोंडें ॥ नृत्य करिती मारुतीपुढें ॥ एक चक्राकार उडे ॥ वर्णिती पवाडे श्रीरामाचे ॥८२॥

एक करिती थोर भुभुःकार ॥ एक साष्टांग घालिती नमस्कार ॥ एक म्हणती श्रीरामचंद्र ॥ तेथें सत्वर जाऊं चला ॥८३॥

पुष्पें आणुनी ते अवसरीं ॥ हनुमंत पूजिला वानरीं ॥ जैसा सकळ सुरवरीं ॥ अपर्णावर पूजियेला ॥८४॥

मारुतीचे आंगावरील मळ ॥ देखोन कपी पुसती सकळ ॥ लंकेत प्रताप केला समूळ ॥ सांग आम्हा हनुमंता ॥८५॥

परी कदा न सांगे मारुती ॥ ब्रह्मलिखित देत हातीं ॥ परी ते वानर न उकलिती ॥ विरिंचिमुद्रांकित जें ॥८६॥

मग म्हणती वानर ॥ कळेल किष्किंधेसी समाचार ॥ एथें उकलूनि पाहतां पत्र ॥ तरी चतुर हांसती ॥८७॥

असो मारुतीसह वानरगण ॥ किष्किंधेसी आले न लागतां क्षण ॥ सुग्रीवाचें मधुवन ॥ मोडिलें तेव्हां क्षणमात्रें ॥८८॥

सुग्रीवासी सांगती वानरगण ॥ वानरांसह आला वायुनंदन ॥ तुझें आवडतें क्रीडास्थान ॥ तें मधुवन मोडिलें ॥८९॥

ऐकतां सीतापति तारापति ॥ म्हणती विजयी झाला मारुति ॥ तरीच मधुवन मोडिती ॥ वानर आनंदेंकरूनियां ॥१९०॥

असो मधुवनींहून ॥ अंजनीसुत ॥ वानरांसह उडाला अकस्मात ॥ पंपासरोवरावरी असे रघुनाथ ॥ आला तेथें स्वानंदें ॥९१॥

सपक्ष उतरला पर्वत ॥ कीं भूमीवरी आला आदित्य ॥ कीं मायाचक्र निरसोनि पावत ॥ योगी जैसा स्वरूपातें ॥९२॥

लंकेमाजीं विजयी जाहला ॥ म्हणून दक्षिणबाहू उभारिला ॥ रघुनाथें हनुमंत देखिला ॥ प्रसन्नवदन ते काळीं ॥९३॥

साधक साधूनी महानिधान ॥ दिसे जैसा सुप्रसन्न ॥ कीं सुधारस हरिलिया सुपर्ण ॥ विराजमाल परत जैसा ॥९४॥

कीं अमृतसंजीवनी अद्भुत ॥ साधूनि आला गुरुसुत ॥ सहस्राक्ष जैसा आनंदत ॥ सीतानाथ तोषला तैसा ॥९५॥

अयोध्यापति किष्किंधापती ॥ आसन सोडून पुढें धांवती ॥ तों लोटांगण घाली मारुति ॥ ब्रह्मानंदेंकरूनियां ॥९६॥

परम स्नेहाळू रघुनंदन ॥ मारुतीतें हस्तें उचलोन ॥ देता जाहला क्षेमालिंगन ॥ भरलें गगन आनंदें ॥९७॥

प्राणसखा हनुमंत ॥ हृदयीं धरी रघुनाथ ॥ पुढतीं सोडावा हा हेत ॥ मनामाजी उपजेना ॥९८॥

असो हनुमंतासी क्षेम देऊनी ॥ सकळ कपींसी भेटे चापपाणी ॥ जांबुवंत अंगद प्रीतीकरूनी ॥ हृदयीं धरिलें रघुत्तमें ॥९९॥

सुग्रीवें धांवोनियां प्रीतीं ॥ हृदयीं धरिला मारुती ॥ कीं इंद्रासी भेटला बृहस्पती ॥ आलिंगन शोभलें तैसें ॥२००॥

मग राजाधिराज समर्थ ॥ सभा करूनि बैसला रघुनाथ ॥ तेव्हां मणि आणि ब्रह्मलिखित ॥ पुढें ठेविलें हनुमंतें ॥१॥

मग आनंदें सकळ वर्तमान ॥ दंडी ऋृषिपुत्रापसून ॥ पुढें सुप्रभेचें उद्धरण ॥ तेंही कथिलें तेधवां ॥२॥

पुढें समुद्रतीरपर्यंत ॥ अंगदें कथिलें समस्त ॥ शुद्धि नव्हे म्हणोनि अद्भुत ॥ अग्न चेतविला वानरीं ॥३॥

प्राण देतां अग्नीमाझारी ॥ हनुमंतें रक्षिलें ते अवसरीं ॥ मग संपाती भेटला समुद्रतीरीं ॥ तेणें शुद्धि सांगितली ॥४॥

याउपरी वायुकुमर ॥ शतयोजनें उडाला सागर ॥ पुढें लंकेत झाला जो समाचार ॥ तो हनुमंत न सांगेचि ॥५॥

मग रामें हनुमंताकडे पाहिलें ॥ तंव येरू म्हणे जे वर्तमान जाहलें ॥ तें विरिंचीनें असे पत्रीं लिहिलें ॥ निजहस्तें करूनियां ॥६॥

जगद्वंद्या अयोध्यापति ॥ सुखरूप आहे सीता सती ॥ मणि खूण दिधला माझे हातीं ॥ परम सद्रद होऊनियां ॥७॥

अंतरखूण सांगितली ॥ मनसीळ लाविला माझिये भाळीं ॥ रघूत्तमें ऐकतां हृदयकमळीं ॥ तये काळीं गहिंवरला ॥८॥

मणि हृदयीं धरून रघुनाथ ॥ अत्यंत जाहला शोकाकुलित ॥ अहा सीता म्हणोनि बोलत ॥ देखतां अर्कज गहिंवरला ॥९॥

हनुमंत म्हणे रघुराजा ॥ सुखी आहे जनकात्मजा ॥ परी तुझ्या वियोगें भरताग्रजा ॥ अत्यंत कृश जाहली असे ॥२१०॥

म्यां मुद्रिका दिधली नेऊन ते मनगटीं खेळे जैसें कंकण ॥ मग म्हणे रघुनंदन ॥ केंवी प्राण उरला असे ॥११॥

रघुपति तुझें नामामृत ॥ तेणें जानकी वांचली सत्य ॥ जैसा शशांक राहुग्रस्त ॥ चिंतेनें तैसी झांकिली ॥१२॥

मग बोले तमालनीळ ॥ कैसा तरलासी समुद्रजळ ॥ यावरी अंजनीचा बाळ ॥ काय बोलता जाहला ॥१३॥

तुझिये मुद्रिकेचें अद्भुत बळ ॥ क्षणें जिंकवेल कळिकाळ ॥ नखाग्रीं समुद्रजळ ॥ सांठविजेल सर्वही ॥१४॥

मग विरिंचीचें लिखित पत्र ॥ सौमित्राजवळी देत राजीवनेत्र ॥ वाचिता जाहला भोगींद्र ॥ सावधान वानर ऐकती ॥१५॥

स्थिर राहिला समीर ॥ ऐकावया विरिंचिपत्र ॥ सौमित्रें उकलिलें साचार ॥ जेवीं चंद्र पौर्णिमेचा ॥१६॥

जो सरस्वतीचा जनिता ॥ त्याचिया अक्षराची कौशल्यता ॥ कोणासी न वर्णवे तत्वतां ॥ तें श्रोतीं आतां परिसावें ॥१७॥

परब्रह्म केवळ रघुवीर ॥ त्यासी ब्रह्मदेवें लिहिलें पत्र ॥ तें ब्रह्मांनंदकृपें श्रीधर ॥ अति पवित्र वर्णींल पैं ॥१८॥

स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ एकविंशतिंतमाध्याय गोड हा ॥२१९॥

अध्याय ॥२१॥

॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP