उद्धवहंसाख्यान - जन्मदात्यांचा वृत्तान्त

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


श्रीसद्‌गुरु हंससमर्थ सज्जन । सज्जनगडनिवासी परिपूर्ण । त्याचें संकलित चरित्र केलें कथन । यथामति ॥१॥

आतां श्रीसद्‌गुरु उद्धवहंस । यांचा कोणे रीती असे इतिहास । संकेतमात्रें बोलिजे वाचेस । आठवेल तैसा ॥२॥

तरी श्रोती असावें सावधान । लोकोपकारार्थं जयाचें वर्तन । श्रवणमात्रें तुटती भवबंधन । अधिकारियाचें ॥३॥

पूर्वी समर्थ असतां जनस्थानीं । शतकोटी जप संपता क्षनीं । स्वलीला राहिले विचरती जनीं जगदुद्धारास्तव ॥४॥

ग्रामी पंचवटिकेसी कीं गंगातीरीं । किंवा कधीं वनांतरीं । विचरती परी ठावे नव्हे अंतरीं । कवणासी कीं हे साधु ॥५॥

ग्रामाच्या पश्चिमेस कीं गंगातटी । निर्जन स्थळी बैसती एका बेटी । तेथुन दिसतसे राहटी । सर्व जनांची ॥६॥

तेथेंचि प्रतिदिनीं बैसावें । आवडे तेव्हां उठोनि जावें । एके दिनीं वर्तमान जालें जें स्वभावें । तें ऐकावें श्रोतीं ॥७॥

तया जनस्थानां आंत । ब्राह्मण नामें सदाशिवपंत । उमा नाम्नी पत्‍नीसहित । रहात असे ॥८॥

तो संपन्न असे सधनकण । अल्पचि वय असतां तरूण । पोटी पुत्र नसतांचि निर्माण । मरण पावला ॥९॥

तंव ते उभा महापतिव्रता । सती जावें निश्चय करी चित्ता । ग्रामस्थ सर्व मिळोनि संभोवता । गंगातीरा आणिलें ॥१०॥

समर्थ जया बेटीं बैसती । तेथून सन्निध सर्व मिळती । साहित्य करोनि ते उमा सती । नमस्कारी निरवी सर्वां ॥११॥

निजपतीचें शिव घ्यावें । दाह्म सदनांत जाउनी बैसावें । स्वयें आग लाऊनि समर्पावें । शरीर हें जों पतीसह ॥१२॥

तंव एकाएकीं बेटाकडे । अवलोकिती जाली कोंडें । तों अकस्मात् सुंदर हंसाचें रूपडें । दृष्टी पडलें ॥१३॥

सर्वांसि ह्मणे तया साधूसी । करून येईन नमन चरणांसी । ऐसें बोलोनि आली वेगेसी । तया बेटावरी ॥१४॥

मस्तकीं मळवट असे चर्चिला । तैसा उभय पदीं माथा ठेविला । तंव समर्थ आशीर्वाद देती तिजला । अष्टपुत्रा सौभाग्यवती ॥१५॥

तें ऐकोनि जाली विस्मित । पुनः चरणीं मस्तक ठेवित । पुनः आशीर्वचन तैसेंचि निघत । समर्थाच्या मुखें ॥१६॥

आणिक मुखाकडे अवलोकून । तिसरियानें करी नमन । तंव बोलते जाले समर्थ सज्जन । कीं दशपुत्री होई ॥१७॥

तंव उमा बोले कर जोडुन । पति माझा पावला मरण । पुढिले जन्मी घडेल आशीर्वचन । मी सहगमना चालिलें ॥१८॥

ऐकतांचि बोलिले अट्टाहास्यें । राम माये गुरुवर्य डोळसे । तुझिये ब्रीदालागीं हंसदासें । लांछन लाविलें ॥१९॥

इतुकें बोलोनि तातडी पळाले । उमेनें येऊन पतिसे स्पर्शिलें । तंव तें प्रेत खडबडुन बैसलें । आश्चयें पाहती सकळ ॥२०॥

ह्मणतीं काय जालें हो विपरीत । तंव बोले सदाशिवपंत । मजसी चौघें पुरुष होते नेत । तेथें वानरें एकें सोडविलें ॥२१॥

तेव्हा उमेनें सर्व वृत्तांत सांगितला । समस्त ह्मणती उत्तम प्रकार जाला । आतां ग्रामामाजी उभयंता चला । तंव सदाशिवपंत बोले ॥२२॥

जया पुरुषें दिधलें आशीर्वचन । मज सोडविलें वानरवेष घेऊन । न घेतां तया प्रभूचें दर्शन । ग्रामीं न प्रवेशुं ॥२३॥

तेव्हां सर्वही गावांत गेले । हे उभयंतां वनीं शोधिते जाले । परी समर्थे दर्शन नाहीं दिधलें । एकवीस दिवस ॥२४॥

जयावरी गुरु कृपा करिती । तयाचा आरंभी अल्पसा अंत पाहती । कसीं उतरतां निश्चिती । अति दयाळु संत ॥२५॥

असो उभयांचें पाहून निर्वाण । समर्थ देती तयां दर्शन । मनकामना सर्व पुरवून । दशपुत्र तयां होती ॥२६॥

आपणचि धरूनि दुजी व्यक्ति । तयांचे ठायीं जनन पावती । आपणासी बोध आपण करिती । गुरु शिष्य एकरूप ॥२७॥

तेचि नामें उद्धवस्वामी । स्थापिले असती टाकळीग्रामीं । तेचि सुरस कथा अनुक्रमीं । चिमणें बाळ बोले ॥२८॥

इति श्रीमद्धंसगुरुपद्धति । ग्रंथरुपें ज्ञानभिव्यक्ति । उद्धवहंसाख्यान निगुती । प्रथम प्रकरणीं ॥१॥


References : N/A
Last Updated : May 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP