उद्धवहंसाख्यान - समर्थांचा ज्ञानोपदेश

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


समर्थ ह्मणती गा तुझ गुरु । कोठें गेला असे दुरु । कां खेद मांडिला अपारूं । तूं निर्विकारु असतां ॥१॥

तुझां तूंचि गुरु परिपूर्ण । तूंचि निजांगें ब्रह्मा आपण । ऐसें हें उपदेशाचें लक्षण । ऐकोनी बाळ प्रश्न करी ॥२॥

मी ब्रह्मा कैसा परिपूर्ण । आणि गुरु मी माझा कैसा आपण । असे तरी मज कां आलें वेगळेंपण । आणि वियोग कां वाटे ॥३॥

समर्थ ह्मणती त्वा बरें पुसिलें । याचें उत्तर पाहिजे ऐकिलें । अनुक्रमें बोलिजेल वहिलें । आरोप जाला असे जो ॥४॥

तूं ब्रह्मा एक परिपूर्ण । अखंड सच्चिदानंद घन । या माया विकरासी विहीन । नामरूपातीत ॥५॥

कांहीं उपाधि नसतां सधन । जैसें असे पा शुद्ध गगन । तैसा तूं अससी निरंजन । या सृष्टीच्या पुर्वीं ॥६॥

त्या तुझ्या ठायीं माया उद्धवली । ह्माणावी परी सर्वथा नाहीं जाली । अहंब्रह्मा स्फूर्ति जे उठली । तेचि माया परि मिथ्या ॥७॥

जेवी गगनीं आभाळा आलें । नाहीच परी भासूं लागलें । भासलें परी नाहीं स्पर्शलें । आकाशासी ॥८॥

त्या मायेंत जाणतें ज्ञान । समग्र स्वरुपा नेणें तें अज्ञान । हेंचि मायाअविद्येचें लक्षण । परी ब्रह्मा या वेगळें ॥९॥

जैसें प्रकाशें अभ्र आलें तें दिसतें । तेंचि अभ्र आच्छादी उष्णातें । हेंचि अंधार प्रकाश करी गगन तें । उभया ऐसें नाहीं जालें ॥१०॥

मायेंत ज्ञानासहित चैतन्य व्यापलें । तयासी प्रतिबिंबत्वें ईश्वर नाम आलें । जैसें मेघांत आकाश सांपडलें । परी त्या ऐसें नव्हे ॥११॥

तैसा तूं केवळ ब्रह्मा असतां । मायायोगें आली प्रतिबिंबता । तोचि ईश्वर परी तुज अनंता । विकारचि नाहीं ॥१२॥

अविद्या नेणिवेंत ब्रह्मा व्यापलें । तेंचि प्रतिबिंबत्वें जीव नाम पावलें । परी त्या विकारें ब्रह्मा नाहीं मळलें । त्यामाजीअसोनी ॥१३॥

धन घन निबिड अभ्रा आंत । गगन व्यापलें अंधारांत । परी त्या ऐसें कदा न होत । त्यामाजी असोनि जैसें ॥१४॥

त्या जीवेश्वरौपाधिपासुन । भूतभौतिकें जालीं निर्माण । तेवी चंचळ जड प्रकार दोन । परी ब्रह्मा चंचळ ना जड ॥१५॥

प्रकाश अंधकाररूप मेघापासुनी । गार पाणियाचे तुषार निघती दोनी । त्यामध्यें आकाश असतां व्यापुनी । परी घट्ट पातळ नोव्हे ॥१६॥

चारी खाणी जाल्या जडाचिया । चंचळ राहिलें माजी तया । तेचि स्थळ सूक्ष्म देह्मा । ओळखिलें पाहिजे ॥१७॥

पाणीच गोठून घट केला । पाणी भरोनि आकाशी ठेविला । घट दृष्टांत असे स्थुळाला । पाणिया ऐसें सूक्ष्म ॥१८॥

स्थूळ सूक्ष्म उभय प्रकाशून । राहिलें असे तें कूटस्थ चैतन्य । घटपाणीयांत व्यापलें गगन । जैसियापरी अलिप्त ॥१९॥

आत्मा साक्षी मात्र ज्ञानघन । न स्पर्शें देहकर्मालागून । घटाकाश नव्हेचि शीत उष्ण । घटाउपाधीसवें ॥२०॥

बुद्धि वृत्तीमाजीं प्रतिबिंबलें । तयासी जीव नांव हें ठेविलें । घटजळीं आकाश भासलें । प्रतिबिंबरूपें ॥२१॥

तो जीवचि असे अतिविकारी । उद्धवें नासे वृत्तिबरोबरी । उदकासवें नासे निर्धारी । प्रतिबिंब जैसें ॥२२॥

जीवासी अवस्था तीन । जागृति सुषुप्ति स्वप्न । चंचल सखोल लय होण । जलप्रतिबिंबासी ॥२३॥

चंचलत्व जलप्रतिबिबासी असे । तेवी जीव जागृतीं व्यापारतसे । जलप्रतिबिंब उगें सखोल भासे । तेवी स्वप्रावस्था जीवा ॥२४॥

जल सरतां प्रतिबिंब आटे । तेवी सुषुप्तिमाजी वृत्ति हे ओहटे । त्या वृत्तीसवें जीव हा भेटे । आत्मबिबासी ॥२५॥

एवं दृष्टांत द्राष्टांत सम सम । दोहीकडे दाविला उपक्रम । त्यांत ब्रह्मा आकाश निश्चल परम । येर दोहीकडे खोटें ॥२६॥

ऐसें असतां जीवासी अज्ञान । कीं जालें आपण ब्रह्मा हें विस्मरण । असंगत्व परिपूर्ण त्यागून । विकारिया मी ह्मणे ॥२७॥

स्थूल देहा मी ह्मणे जेव्हां । विश्वाभिमान नाम पावे तेव्हां । ज्या क्षणीं सूक्ष्माचा अभिमान घ्यावा तेव्हां । नांव तैजेस ॥२८॥

सुषुप्तिकाळीं ह्मणे मी नेणतां । अभिमान घरी असून जाणता । तोचि प्राज्ञाभिमान तत्त्वतां । कारणदेहीं ॥२९॥

ऐसें इतुकें केलें एका अज्ञानें । तिहीपरतें चवथें कांहीं नेणें । सोशितसे जन्म मरणें । बासना करूनी दृढ ॥३०॥

देहबुद्धि केली बळकट । हा मी हें माझें धरिलें अतूट । हाचि विश्वाभिमानी याचा पालट । कदा नव्हेचि ॥३१॥

मीच पापपुण्याचा कर्ता । तरी केल्या कर्माचा मीचि भोक्ता । ऐसा वाउगा अभिमान जो धर्ता । तोचि तैजस ओळखिजे ॥३२॥

मी किंचिज्ज्ञ मज कांहीं न कळे । ऐसा जो अभिमान खवळे । तोचि प्राज्ञ अज्ञानी आकळे । असंग असोनी ॥३३॥

तस्मात् निर्विकारत्व आपुलें । जैसें तैसें असे संचलें । विकारत्व वाउगेंचि घेतलें । मिथ्या अज्ञानें ॥३४॥

तरी विवेकियें ऐसें न करावें । आपुलें निजरूप ओळखावें । येर भासलें तितुकें सांडावें । असत्य असत्यत्वें ॥३५॥

तिन्ही देह अवस्था तिन्हीं । मी मी म्हणती जे तीन अभिमानी । हे सांडावे मिथ्या ह्माणोनी । घट पाणी जेवी आकाश नव्हे ॥३६॥

बुद्धिवृत्तीसी जेधवा त्यागिलें । त्याक्षणींच जीवत्वा अपरोक्षत्व आलें । जेवी घटजळ आटतां प्रतिबिंब नासलें । तें आकाश नव्हें ॥३७॥

घटा आंतबाहेरी आकाश । उरे जीवी घटाभावीं अविनाश । तेवी आत्मा स्वयंप्रकाश । देहा आंतबाहेरी ॥३८॥

तैसेंच मेघ आणि मेघाकाश । सांडोनी ओळखावें महदाकाश । तेवीच माया आणि ईश्वराभास । मिथ्यत्वें त्यागावा ॥३९॥

जें मेघा आंत बाहेरी सघन । तेंचि घटा आंत बाहेरी गगन । उपाधि दोनही जातां हरपून । गगन आंत ना बाहेरी ॥४०॥

तेवीं जीव आणि जिवाची उपाधि । ईश्वर आणि ईश्वरासंबंधी । हे उभयही त्यागून दृढबुद्धी । ब्रह्मा चिन्मात्र घ्यावें ॥४१॥

मेघाची जेव्हां उपाधि असे । तेव्हांचि गगना चलन नसे । तेवी माया अविद्या उपाधिवशें । चंचल नव्हें परब्रह्मा ॥४२॥

तस्मात् माया अविद्यादि मिथ्यत्वें पहावें । सत्य ब्रह्मा सत्यवें दृढ व्हावें । मिथ्यालागीं सत्यत्व न यावें ॥४३॥

देह अवस्था अभिमान । पिंडब्रह्मांडात्मक दोन । अवघेंचि मिथ्या ऐसें दृढ होणें । स्वप्नामाजीही ॥४४॥

मी स्थुल नव्हे जागृति कवणासी । व्यापारतां फिरणें नाहीं आत्मयांसी । तरी मी मी ह्मणणे हें मानसीं । घडेळ कैसें ॥४५॥

सत्रा तत्वें सूक्ष्माचें । तितूकेही व्यापार तयांचे । तेंचि स्वप्न परी आत्मयाचें । व्यापारतां काय गेलें ॥४६॥

या इतुकियाचाही जाणता । वेगळा असे निश्चळ ऐता । ऐसें विचारें दृढ होतां । मी कर्ता भोक्ता कोठें ॥४७॥

मी ब्रह्मा ऐसें जेव्हां दृढ जालें । तिही प्रतीतीं प्रत्यया आलें । मग जागृति स्वप्न दोनी देखिले । परि त्या नेणीव नसे ॥४८॥

आत्मा नेणिवेचा जाणता । सामान्यत्वें प्रत्यय दृढ होतां । तो झोपी जाय परी नेणिवता । न वाटे बुद्धी ॥४९॥

ऐसें कारण जें अज्ञान । निपटुन गेलें होतां ज्ञान । आणि सुषुप्ति प्राज्ञ अभिमान । निःशेष गेले ॥५०॥

कारण तरी निपटुन गेलें । परी देहद्वय मात्र मिथ्यत्वें उरलें । मग मिथ्यत्वें जरी व्यापरूं लागलें । तरी क्रियमाण नव्हे ॥५१॥

जैसें धान्यादि भाजितां । तें उगवेना जरी पेरितां । तैसें सूक्ष्म देह व्यापारतां । देहांतर नव्हें ॥५२॥

जेवीं जळालिये दोरीस पीळ दिसती । तेवी स्थूल देह आणि जागृति । होतसे परी कार्यासी न येती । कवणाचेही ॥५३॥

असो मी देह जैसें दृढ जालें । उच्चार न करितां बळकट बैसलें । ऐसा मी ब्रह्मा पाहिजे प्रत्यया आलें । नुच्चारितां या नांव ज्ञान ॥५४॥

जीव उपाधीहुन परतें । तेवी ईश्वर उपाधीसी भिन्न तें । परब्रह्मा ओळखावें निरूतें । मीच असे अपरोक्ष ॥५५॥

अगा उद्धवा त्वां पुशिलें होतें । मी अंगें ब्रह्मा कैसें निरुतें । तें सांगितलें उपाधीपरतें । तें अनुभवी अंतरीं ॥५६॥

आतां तुझा गुरु तूंच कैसा । अवधारीं गा बोलिजे कांहीसा । जेणें ज्ञानें भिन्नत्वाचा ठसा । नुमटे स्वप्नीं ॥५७॥

निश्चल ब्रह्मीं माय उद्धवली । तेचि दो रीती प्रतीतीस आली । चंचल ते प्रकृति बोलिली । जाणता तो पुरुष ॥५८॥

तोचि प्रकृतिपुरुषात्मक ईश्वर । तोचि अर्धनारिनटेश्वर । तोचि आदिनारायण निर्धार । आदि गुरु तूंचि ॥५९॥

तूंचि ब्रह्मादेव जालासी अंगें । त्वांचि आदिनारायणें बोधिलें वेगें । पुढें हंस होऊन कुमार उद्योगें । बोधिलें पुनः ॥६०॥

मग तूंचि ब्रह्मादेवकृपें । वसिष्ठा बोधिसी साक्षेपें । तेणें तूं वसिष्ठ ज्ञानदीपें । कडुन अति शोभसी ॥६१॥

श्रीराम जेधवा अवतरला । तेव्हा त्वांचि वसिष्ठें बोधिला । मग तूं रामचि रामरूपें पावला । अससी पुर्ण समाधान ॥६२॥

तोचि मी कलियुगीं प्रगटलों । तेव्हा तुवा श्रीरामें पूर्ण बोधिलों । तुं मी जाऊन पूर्ण निवालों । तो मीही तूंचि कीं ॥६३॥

आतां प्रस्तुत माझिया रूपें तुवां । तुझिया ठायीं लाविला दिवा । ऐसा आदिगुरु तूंचि गा उद्धवा । उद्धवपण सांडुनी ॥६४॥

अज्ञान नसून जें उद्धवलें । तयास्तव शिष्यत्व वाउगें आलें । तेंचि ज्ञानें निरसतां पावलें । गुरुत्व गुरूचें गुरुसी ॥६५॥

बहु कासया बोलावें । जेणें निजांगें ब्रह्मा व्हावें । तेथें गुरुशिष्याचें नांवें । शून्य पडे ॥६६॥

अज्ञानेंविण शिष्यत्व लोपे । शिष्यत्वावीण गुरुत्व हारपे । दोनही जातां जें सच्चिद्रुपें । अनिर्वाच्य ब्रह्मा ॥६७॥

तेवीच जीवशिवही मावळले । द्वैतद्वैत हे शब्द गेले । ऐसें निखळ कांही जें उरले । तें केवळ ब्रह्मा तूं ॥६८॥

तेंचि निजांगें मी निर्विकारी । हा निश्चय केलाचि करी । येर हीं मायादिदेहांत सारीं । मिथ्याचि मानीं ॥६९॥

तेही तुझ्या सद्‌रूपें असती । तुझिया चिद्रूपें दिसती वर्तती । तुझियाचि आनंदें सुखी होती । यासी तुजवेगळें रूप काय ॥७०॥

तूं सुवर्ण हे सर्व अलंकार । तरी तुजविण काय असे या आकार । तस्मात् नामरूपें सांडूनि दूर । तूं एकचि सर्वी अनुभवीं ॥७१॥

तया अनुभवमिषें त्रिपुटि उद्धवे । तस्मात् अनुभव हेंही बोलणें नव्हे । अनुभवेंवीण निजारों व्हावें । जालेपणेंवीण ॥७२॥

तो तूं अमुक अमुक तुझें लक्षण । हें वाणीसी नव्हेचि वर्णन । वेदें जेथे धरिलें मौन । विश्वीं निषेधरूपें ॥७३॥

आतां सांग कोठें अज्ञान । कोठें उरलें तरी ज्ञान । ऐसा जो केवळ सनातन । तो तूं खूण पावली कीं ॥७४॥

ते खूण असेल जरी बाणली । पूर्णपणे निश्चया आली । तेचि दृढता पाहिजे बोलिली । वाणीनें आम्हापुढें ॥७५॥

आतां समर्थाचें कृपेंकडुनी । अभेदनिश्चय जो अंतःकरणीं । जाला तो चिमणें बाळ वदनीं । पुढील प्रकरणी बोलेल ॥७६॥

इति श्रीमद्धंसगुरुपद्धति । ग्रंथरुपें ज्ञानभिव्यक्ति । उद्धवहंसाख्यान निगुती । पंचम प्रकरणी ॥५॥


References : N/A
Last Updated : May 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP