उद्धवहंसाख्यान - शक्ति व गुरुभक्ति

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


समर्थ सद्‌गुरुहंसाची वाणी । स्वानुभवें ठसावली अंतःकरणीं । तेधवां पूर्ण समाधान पावुनी । उद्धव हंस बोलती ॥१॥

धन्य धन्य सद्‌गुरुनाथा । वचनामात्रें निवविलें समर्था । अज्ञान ज्ञानही लागलें पंथा । मौनाचिये ॥२॥

तें समाधान ज्या रिती बाणर्ले । तें वाणीनें न जाय बोलिलें । परी बोलिलियार्वाण न जाय कळलें । तस्मात् जाली तृप्ती तें वर्णू ॥३॥

ढेंकरू येता तृप्ति कळे । तेवी बोलतां अनुभव निवळे । या हेतूस्तव बोलेन जें आकळे । बाणीमनासी ॥४॥

आपण निश्चयचि प्रति पादिला । कीं निश्चल नाहीं विकारला । तोचि निश्चय दृढ असे बाणला । संशयरहित ॥५॥

आकाशी वायु जेवी उठतां । त्यासवें गगनाची न जाय निश्चलता । तेवि सृष्टिकाळीं हें उप्तन्न होतां । ब्रह्मा चंचळ नव्हे ॥६॥

विकारी जालें जें चंचळ । तें तरी सत्यत्वें कोठें केवळ । सुर्यकिरणीं जेवी मृगजळ । दिसे परी मिथ्या ॥७॥

मिथ्या म्हणजे नाहीं जाले । रज्जूचें सर्प उगेंचि दिसलें । जड चंचळपणे जें जें भासलें । तें तरी व्यर्थ ॥८॥

माया अविद्याचि जाली नसतां । सहज जीवाशिवाची मिथ्या वार्ता । उभयाभावीं सर्वज्ञाकिचिज्ज्ञाता । भेद हा कोठें ॥९॥

एकचि पूर्ण ब्रह्मा परम । तेथें उद्धवलेंचि नाहीं रूप नाम । तरी त्या नामरूपजगाचें कर्म । मज निश्चलासि केवी ॥१०॥

जगदुपाधींत मी एकला । असुनि त्याचिया कर्मासी नाहीं स्पर्शला । तरी एकपिंड उपाधि मजला । बाधी केवी ॥११॥

यावत् माझें रूप मज नव्हतें कळलें । तों काल देहादि मीच होतें भोविलें । मग देहादिकांचे व्यापार घेतले । आपुलिये माथां ॥१२॥

ऐसें नाथिलें अज्ञान आलें होतें । तें समर्थें उपदेशून सारिलेंआ परतें । आतां मिया टळटळीत आपणातें । जाणिलें अपरोक्ष ॥१३॥

आतां मी देहादि हें स्वप्नीं वाटेना । जरी देहासी व्यापार होती नाना । हें ज्ञाना कदाहि नासेना । कवणेहि काळीं ॥१४॥

आतां ब्रह्मा अभेद केवळ । वेदांतशास्त्र बोले सकळ । तया प्रमाणासहित गुरु दयाळ । निश्चय बोध करिती ॥१५॥

ज्या रीती उभयें अर्थ प्रतिपादिला । त्या रिती प्रत्ययही बाणला । ऐसा त्रिविधा प्रतीतीनें बोध प्रगटला । तो नासे कैसा ॥१६॥

आतां स्थूळ देह वर्तो भलतैसा । कीं सुक्ष्म विचरो दाही दिशा । उप्तत्ति स्थिति कीं पावो नाशा । मज अविनाशा संबंध नाहीं ॥१७॥

वर्णाश्रमधर्म देहाचे । तिन्हीं अवस्था धर्म युद्धीचे । होतील ते सुखें होवोत वेचे । माझें काय तेथें ॥१८॥

मी जन्मलोंचि नाहीं मृत्यु कैचा । अवयवावीण मी कोण्या वर्णाचा । आश्रमधर्मादि जोजार देहाचा । मज संबंध काय ॥१९॥

मी देहचि स्वप्नी नुठतां । मग माझेपणाची कवणा वार्ता । देहसंबंधावीण येथें कोण कर्ता । तरी भोक्ताही कोण ॥२०॥

माझा मी परिपूर्ण आपण । ज्ञानें नाशी मूळ अज्ञान । नेणीव जातांचि निपटून । देहद्वयही मृगजळ ॥२१॥

ज्ञान होतां संचित जळालें । निरहंकृतीनें क्रियमाण आटलें । प्रारब्धभोग देहासी उरले । यास्तव मिथ्यत्वें दिसती ॥२२॥

ज्यारीती प्रारब्धता असे उद्‌गम । त्यारीती देहद्वया घडो अनुक्रम । पापपुण्य सुखदुःख समाविषम । प्रकार भलतैसा ॥२३॥

असेल तोंवरी हें सर्व असो । कीं प्रारब्ध सरतां एकदाचि नासो । मी जैसा असे तैसा असो । तिहीही काळीं ॥२४॥

या सर्व ब्रह्मांडा घडो उप्तत्ति । कीं भलत्यापारी असो स्थिति । एकदांचि लयातें पावती । परी तिही कालीं ब्रह्मा सम ॥२५॥

ब्रह्मा तें बंधमोक्ष अतीत । ब्रह्मा सिद्धसाधकत्वारहित । बद्ध कीं मुमुक्षूचा संकेत । उप्तन्नचि नाहीं ॥२६॥

तें ब्रह्मा मीपणेवीण । निजांगेंचि असो आपण । तेथें ज्ञान आणि अज्ञान । उद्भवलेंचि नाहीं ॥२७॥

ये रीती निवविलें मज । कृपाकटाक्षमात्रें सहज । तें बोलतांचि न ये महाराज । चारिहि वाचेनें ॥२८॥

तेव्हा कंठ जाला सद्‌गदित । नेत्रीं चालिले अश्रुपात । चरणासी सांष्टांगें नमित । तेवीच प्रदक्षिणा ॥२९॥

मारुती खुणावी कीं निर्घारी । हा कैसा असे उत्तम अधिकारी । एकदां उपदेशिता झडकरी । पूर्ण समाधान पावला ॥३०॥

मग समर्थें उद्धवहंसासी । आलिंगुनी बैसविलें अंकासीं । या रीती संपली ते निशी । सूर्योदय जाला ॥३१॥

नगरींत वर्तमान फुटलें । कीं बहुता दिवसा समर्थ आले । सर्व जन दर्शना पातले । सांष्टांगे नमिती ॥३२॥

सदाशिवपंत उमाबाई । चरणीं येऊन ठेविती डोई । बाळकाची वर्तणुक ते समयीं । सांगती सर्व ॥३३॥

सर्व करावा जगदुद्धार । मार्गी लावावे नारीनर । हाचि हेतू मूर्ति सुंदर । स्थापिली असे ॥३४॥

तरी समर्थें आज्ञा करावी आतां । कीं या उपदेशावें समस्तां । आपुलें आज्ञेवीण आम्हीं प्रार्थितां । नाहीं अंगिकारिलें ॥३५॥

तेव्हा समर्थ म्हणती गा उद्धवा । तुवां जगदुद्धार करावा । अधिकारी तो नुपेक्षावा । शरण आलिया ॥३६॥

आणि भाविक हे साबडे । तया साधनद्वारा मोक्ष जोडे । तरी उपदेशावें रोकडें । नाममंत्रेकडुनी ॥३७॥

ओमिति जी महाप्रसाद । तथास्तु मुखें धरी चरणारविंद । ऐसा तीन दिवस जाला आनंद । समर्थ तेथें असतां ॥३८॥

कित्येक समक्षचिक शरण आले । ते उद्धवाकरवी उपदेशिले । पुढेंही येती तया उपेक्षिले । न पाहिजे त्वा ॥३९॥

असा तुझा तूं अससी कींनिर्धारा । आह्मी जातों आतां कुष्णातीरा । तेथेंही कल्याणादि परिवारा । न पुसतां आलों रात्रीं ॥४०॥

तेही मज जरी क्षण न पाहती । तई प्राणचि आपुला वेंचिती तरी मज जाणें लागे सत्वरगती । तूं निवांत येथें राहे ॥४१॥

ऐकतांचिचरण दोन्हीं वंदोनी । बोलता जाला करुणावचनीं । जी टाकुनी गेलेती बाळपणीं । आतांही जाऊं पाहतां ॥४२॥

आत्मत्वीं तो नाही वियोग । परी देहप्रारब्धाचा विचित्र भोग । असो जैसा असेल तैसा पडो प्रसंग । परी एक मागणें स्वामीसी ॥४३॥

आत्मया आत्मत्व नाहीं दिधलें । हेंचि पाहिजें कीं विचारिलें । तरी तेंचि दाविलें । उपदेशमात्रें ॥४४॥

यांत मजला काय दिधलें । हेंचि पाहिजे कीं विचारिलें । तरी आतां सांगेन तयासी वंचिलें । न पाहिजे समर्थें ॥४५॥

बंधन नसतां कायशी मुक्ति । देहसंबंधी स्थिति गति । तरी मुक्तीवरील मज गुरुभक्ति । दिधली पाहिजे ॥४६॥

यावत् देहाचें प्रारब्ध । तों काल गुरुभक्ति घडावी शुद्ध । जाला जरी अभेद बोध । तरी तत्पर गुरुभजनीं ॥४७॥

वाणीनें गुरुनामाचें भजन । अंतरी गुरुमुर्तीचें ध्यान । कायेंनें सद्‌गुरुचें सेवन । यावीण दुजें नाचरे ॥४८॥

प्रस्तूत जगदुद्धारार्थ जावएं । प्रि मजला वारंवार भेटावें । अथवा समागमें मजसी न्यावें । येथें मज ठेवूं नका ॥४९॥

ऐसें बोलोनि वंदिलें चरण । प्रसन्नत्वें द्यावें वरदान । यारीती प्रार्थना ऐकून । गुरुमाय तुष्टली ॥५०॥

धन्य बापा तुझी वाणी । धन्य तुझी प्रसवली जननी । अभेद ज्ञानासी पावुती । वरुती गुरुभक्ति मागसी ॥५१॥

तरीतुझे प्रारब्धाचि ऐसें । अन्यामर्गीं नाचरसी मानसें । वर्तणुक देहाची जितकी होतसें । ते ते गुरुभजनरुप ॥५२॥

ऐसें जेंतुवां मागितलें । तेंआम्ही प्रसन्नत्वें दिधलें । कायावाचामन जरी वेव्हारिलें । तरी गुरुभजनीं ॥५३॥

त्वां जें मागितलेंअ तें तरी दिधलें । परी न मागतां आणिक देतसों वहिलें । तुझें चरणीं जे साधक रत जाले । ते उद्धरती उपदेशें ॥५४॥

ऐसें गुरुत्व दिधलें तुजसी प्रबोधशक्तिही तयासरिसी । कोणीही कल्पना घेता तैसी । करिसी निवारण ॥५५॥

प्रबोधशक्तिची अनंत द्वारें । तुज करतलामल होती सारे । आणी यशकीर्तिवैराग्यही खरे । आणि यशकीर्तिवैराग्यहीखरे हे षड्‌गुण वसती तुजपाशी ॥५६॥

आधींच ब्रह्मानुभवीं अभिन्न ज्ञान । त्यावरी प्रबोधशक्ति गहन । त्याहीवरी सत्क्रियाचरण । देहद्वय गुरुभजनीं ॥५७॥

ऐसें तुझें हे सौभाग्य । काय वर्णावें आम्हीं भाग्य । परमार्थ वाढेल यथायोग्य । येथें संदेह नाहीं ॥५८॥

आणि तुझिया परमार्थाप्रती । साह्म असे सखा मारुती । तुझा बाळपणापासुन प्रीती । सांभाळ केला जेणें ॥५९॥

ऐसें देह असतां घडेल सहज । मान्य होशील सर्वीं सतेज । देहापाठींही उरेल तेजःपुंज । सत्कीर्ति तुझी ॥६०॥

समागमें येऊं जे म्हणसी । तरी कोण करील जगदुद्धारासी । वृक्षातळवटीं दुजा वृक्षासी । वाढ नसे ॥६१॥

तरी तूं येथेंचि राहुनी । सुखे प्रवर्तावें गुरुभजनीं । तुझी सत्किया ज्ञान पाहुनी । जगासी उद्धार होय ॥६२॥

आम्हीही वारंवार येऊं । तुझी भेआटी अगत्य घेऊं । अथवा तुजलागीही तेथें नेवूं । सर्वांच्या भेटी ॥६३॥

परि आजी तुजसी नेतां । विलंब लागेल मार्गानें जातां । तिकडून आलों सर्वा न पुसतां । ते तरी प्राणचि त्यागिती ॥६४॥

तरी आम्हांसी द्यावा निरोप । तुवां स्वस्थ असावें । ऐसी आज्ञा होतां बोलावया अल्प । अवकाश उरला नाहीं ॥६५॥

वंदुनी ह्मणे जीं बहु बरवें । पुनः दर्शन अखंड असावें । मजला पदांचें विस्मरणं न पडावें । आणि बाळकाचें स्वामीसी ॥६६॥

तथासु म्हणोनि सद्‌गुरु हंस । मनोवेगें चालिले दक्षिणेस । आले सज्जनगड पर्वतास । आतां इकडील वृत्त ऐका ॥६७॥

कल्याणें उठोनी जंव पाहिलें । तंव समर्थ न दिसती होते जे निर्जले । प्रातः काळीं समुदायी मिळाले । सर्वही कष्टी होती ॥६८॥

कल्याण भोळाराम शिवाजी । वेणीं आदिकरुन फिरती वनामाजी । अनशन निद्राही न घेती शेजीं । म्हणती आम्हां उपेक्षिलें ॥६९॥

तुजवांचून आम्हां दीनासी । कोण्फ़ माउली अनार्थासी । अनन्या त्यागुन गेलीसी कैसी । कोण अपराध पाहिला ॥७०॥

ऐसें तीन दिवस पर्यंत । क्षुघातृषादि कांही न स्मरत । एकापुढें एक असती घुंडीत । पर्वत दर्‍या सर्व स्थळी ॥७१॥

ऐसें व्याकुळें हाका मारिती । तंब अकस्मात देखिली हंसमूर्ति । आलों रे अभय कर केला वरुती । सकळ घालिती साष्टांग ॥७२॥

सकळ बोलती सद्गदवाणी । आम्हां दीनातें गेला त्यागुनी । कोण कर्यार्थ कोणते स्थानीं । क्रमिलें दिन तीन ॥७३॥

तेव्हा समर्थ ते दीन पाहून । गळाली आहार निद्रे वांचून । तयालागीं आलिंगून । ह्मनती त्वरें आलों तुम्हास्तंव ॥७४॥

आतां भोजनें निद्रा आधीं करा । विश्राम पावून स्थिर व्हा अंतरा । मग सांगेन वृत्तांत सारा । कोण कार्यार्थ गेलों होतों ॥७५॥

तथास्तु म्हणुन चरण वंदिती । सर्वही स्नानभोजनें सारिती । निद्राही करुन विश्राम पावतीं । पुनः येती मिळोनि सर्व ॥७६॥

कल्याण भोळीराम वेअणी । वासुदेव गोसावी मुसळपाणी । बैसती शिवाजी आदि करुनी । हात जोडोनि सन्निध ॥७७॥

ह्मणती महाराज दिन तीन । काय जालें तें सांगा वर्तमान । बहु बरें म्हणोनि गंभीर वचन । बोलते जाले ॥७८॥

अरे मी जनस्थानाहून येथें आलों । तो पुनः मागुती नाहीं गेलों । यास्तव उद्धवें कळवळोनि स्तविलों । अति अटाहास्यें ॥७९॥

मारुतीसी निरविला होता । तो मारुतीच आला अवचिता । मज घेऊन गेला तत्त्वतां । उद्धवाचे भेटी ॥८०॥

ज्ञानासी पूर्ण अधिकार जाला । तो म्यां अभेदज्ञानें बोधिला । अत्यंत समाधान पावला । उपदेशमात्रें ॥८१॥

तो तुमचा गुरुबंधु ज्येष्ठ । उत्तमांत उत्तम ज्ञाता वरिष्ठ । त्याचें वर्तमान सांगतां स्पष्ट । आल्हाद होय सर्वांसी ॥८२॥

ज्ञान पाहतां जैसा शंकर । तेज पाहतां जेवी दिनकर । शीतल पाहतां निशीकर । आल्हाद करी नेत्रांसी ॥८३॥

वैराग्य पाहतां जेवी अग्नि । भस्मचि करी नामरुपालागुनी । जीवन मिष्ट जेवी सर्व जनीं । तेवीं आवडे सर्वत्रां ॥८४॥

बोलका जिअसा वाचस्पति । पर्वतासम अचल गुरुभक्ति । औदार्य पाहतां जीमूती । मेघचि दुजा ॥८५॥

बहु बोलणें तरी कासया । मीच तो असे व्यक्ति दुजिया । हा जगदुद्धार करावया । उद्धवनामें अवतरलों ॥८६॥

गेलों होतों तयाचे भेटी । तयाची आवडी मज मोठी । ऐसी समर्थ सांगतांचि गोष्टी । सप्रेमें सजल नयन ॥८७॥

ऐसिया विसंबलों आजवरी । काय मी निष्ठुर असे हो अंतरी । ऐसें बोलतां सर्वांच्या नेत्रीं । अश्रुधारा चालिल्या ॥८८॥

कल्याण ह्मणे जी महाराज । क्षणक्षण सांगत होता वोजा । तरी विसंबणे कोठें मोक्षध्वजा । असे समर्थासी ॥८९॥

आम्हीं काय अनंत जन्मी आचरलों । तया सुकृतें सद्‌गुरुपदीं जडलों । आतां जरी कवणें वेगळे केलों । तरी नव्हे कल्पांतें ॥९०॥

धन्य धन्य आमुचें भाग्य । वाटेकरी ब्रह्माही नव्हे योग्य । काय हो आमुचें सौभाग्य । आमुचें आम्हां वर्णवेना ॥९१॥

आपण सांगितलें वर्तमान । कीं करुन आलों ज्येष्ठांचें समाधान । तरी खंती कासया करण । संगें आणिलें कां नाहीं ॥९२॥

आह्मासीही बहु आवडी पोटीं । कीं कधीं होईल ज्येष्ठाची भेटी । तरी मागुती चला उठाउठी । आह्मा घेऊन जनस्थाना ॥९३॥

अथवा ज्येष्ठांसी येथें आणवावें । कांही काळ ठेवूनि घ्यावें । सदा संवादाचे सुख तें फावे । आह्मांलागीही ॥९४॥

ऐसी कल्याणाची प्रार्थना ऐकोनी । पोटिसी धरिला आलिंगुनी । बापहो तुम्हाऐसे अधिकारी मजलागुनी । अतितर दुर्लभ कीं ॥९५॥

जेवी सत्शिष्या सद्‌गुरु दुर्लक्ष । तेवी गुरुसी शिष्याचा अलभ्य लाभ । तुह्माकरितां मजसी सुलभ । प्रारब्ध देहाचें ॥९६॥

असो तया उद्धवाचें दर्शन । होईल तो कल्याणा सुदिन । आतां इकडील काय वर्तमान । चिमणें बाळ बोलेल ॥९७॥

इति श्रीमद्धंसगुरुपद्धति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । उद्धवहंसाख्यान निगुती । षष्ठ प्रकरणीं ॥६॥


References : N/A
Last Updated : May 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP