रुद्रारामहंसाख्यान - काशीकडे प्रयाण

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


जय जय सदगुरुहंस पूर्णपणी । मायादिकांसी नातळूनि । व्यक्ति धरिसी अनंत जनीं । जगदुद्वारास्त्व ॥१॥

शिष्यासी गुरुत्त्व जेधवां आलें । तेधवांचि गुरुसी वाटे कार्य सिध्दिस गेलें । ऐसें न होतां शिष्यत्वचि उरलें । तेणें गुरु तुष्टेना ॥२॥

ऐसाचि माधवहंस असतां इंदुरी । विचार करिते जाले अंतरीं । म्हणती शिष्य जाले बहुतापरी । परी गुरुत्त्व न ये कोणा ॥३॥

तरी हे आपुलें गुरुत्त्व कवणा द्यावें । ऐसा अधिकारी कोण संभवे । तस्मात आपणचि अवतरावें । दुजी व्यक्ति धरोनी ॥४॥

तरीच पुढें चालेल पध्दति । ज्ञानलोप नव्हेल जगतीं । आपुली जों काळ असेल हे व्यक्ति । तों काळचि दुजी स्वीकारुं ॥५॥

एक मुख्य आहे जों दिवा । तोंवरीच दुजा लावूनि ठेवावा । विझलियावरी शीण पडे सर्वां । ऐसें न करावें ॥६॥

तस्मात तूर्तचि अवतरावें । शिष्यत्त्व पहिलें स्वीकारावें । मग आपण आपणां बोधित व्हावें । गुरुरुप निजांगे ॥७॥

ऐसें अंतरीं संकल्पिलें । पुढें कैसें कैसें होतें जालें । तेंचि सावधान पाहिजे ऐकिलें । इतिहासासी ॥८॥

गोमतीचे दक्षिणतीरीं । दुरी चारपांच योजनांवरी । सलगर नामें एक नगरीं । तेथें अग्निहोत्री नांदत ॥९॥

हरभट नाम असे तयांचें । राधिका नाम असे पत्नीचें । उभयतां सेवन करुन अग्नीचें । रहाती तया ग्रामीं ॥१०॥

तया राधिकेसी उत्तमदिनी । गर्भ राहिला भर्त्यापासुनी । तेव्हां दोघेंही आनंदले मनीं । पुत्रोत्साह करिती ॥११॥

श्रोतीं अवधान असावें बोला । राधिकेसी जो गर्भ राहिला । तो सत्यसंकल्प उमटला । माधवस्वामींचा ॥१२॥

तो गर्भ पांच महिन्यांचा होतां । डोहळे होती मातेच्या चित्ता । उगेंचि बैसावें वाटे एकांता । कवणासीं न बोलावें ॥१३॥

कांहींच गृहधंदे न करावे । उगेंचि पडून रहावें । भस्मचि अंगासी चर्चावें । रुद्राक्ष बांधावे आवडीं ॥१४॥

ऐसें डोहळे पाहून अग्निहोत्री । म्हणे हा कोण साधु आला उदरीं । योगभ्रष्ट दिसतो माझिये अंतरी । प्रपंच न करी हा कदा ॥१५॥

असो भरतांचि नवमास । पुत्ररत्न जन्मलें सुरस । जातकर्मादि पिता सायास । करिता जाला ॥१६॥

रुद्राक्षचि असे जया आराम । या हेतू नाम ठेविलें रुद्राराम । परी तें बाळ अंतरीं शांत परम । रडे तरी अल्पसें ॥१७॥

दिवसेंदिवस जालें थोर । परी जडत्वचि त्याचा विहार । बोलणें तरी अल्पमात्र । ध्यानधारणा अंतरीं ॥१८॥

भस्मरुद्राक्षांवरी अतिप्रीति । अलंकार किमपि नावडती । सदा लोळे राखेवरतीं खेळणेंही दुजें नाहीं ॥१९॥

मायबाप जरी बोलाविती । एकाचे एक बोले त्यांप्रति । अथवा बोलूंच नये जडमति । बधिरवत राहे ॥२०॥

बापें केलें मौंजीबंधन । गायत्री शिकविली बलात्कारेंकरुन । कांहीं पढवितां न म्हणे वचन । मारितां जडत्त्वें पडे ॥२१॥

रागें रागें भोजन न घालितां । तैसाचि राहे कांहीं न मागतां । मग कळवळूण घालितसे माता । ऐसीं अकरा वर्षे लोटलीं ॥२२॥

वरुतींच दाखवीतसे जडपणा । परी अंतरीं सावधान असे मनना । आणि सदा राहे ध्यानधारणा । श्रवणकीर्तनी प्रीति ॥२३॥

केव्हां बाहेर गेला सहजीं । पुन्हां स्वत : न ये वाडियामाजीं । जयासी आपुलें किंवा शेजी । जन्मलें नाहीं ॥२४॥

मग मायबापें जाऊन आणावें । कष्टून म्हणती या काय करावें । जरी उगेंचि आतां सोडून द्यावें । तरी लोक सर्व हसतील ॥२५॥

मग ते दोघे विचार करिती । येथें कांही नसे अपुली वृत्ति । कोठेंही भिक्षा मागून करणें उदरपूर्ति । तरी यात्रा कां न करावी ॥२६॥

काशी ऐसें क्षेत्र पाहूनी । तेथेंचि रहावें जाऊनी । या मुलासी सोडावें देवस्थानीं । मग तयाचें प्रारब्ध ॥२७॥

अथवा मी घेईन संन्यास । कांतेसी म्हणे रक्षीं तूं या मुलास । तंव ते म्हणे मज कासयास । पाहिजे जोजार ॥२८॥

या मुलासी देवस्थानी सोडावें । तुम्ही संन्यास घेऊन रहावें । मीहि सेवीन पादपद्म बरवें । गुरु म्हणोनि आपुलें ॥२९॥

मग उभयतांही निघाले । काशीचे मार्गास लागले । जडरुप चिमणें बाळहि संगे घेतलें । चालती नित्य एक योजन ॥३०॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । रुद्रहंसाख्यान निगुती । प्रथम प्रकरणीं ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP