रुद्रारामहंसाख्यान - विज्ञानमय कोशांचा विवेक

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


श्रीगुरु माधवहंसस्वामी । अति हर्षून अंतर्यामीं । पाठी थापटून कृपासप्रेमी । म्हणती ऐक बापा ॥१॥

प्राणमय ब्रह्म नव्हे म्हणसी । तरी अवधारी निश्चयेसी । अन्य आत्मा आधार असे यासी । प्राणमयाहुनी ॥२॥

तोचि जाणिजे मनोमय । येणेंचि प्राणमय पूर्ण होय । तरी हाचि ब्रह्म उत्पत्ति स्थिति प्रलय । सर्वांची मनोमयीं ॥३॥

याही कोशाचे अंगे पाचे । यजुर्वेदचि शिर याचें । ऋग्वेद दक्षिण पक्ष असे साचे । साम तोचि उत्तर पक्ष ॥४॥

आदेश आत्मा या कोशाचा । अथर्वांगिरस पुच्छ साचा । तरी विचार करीं गा मनोमयाचा । ब्रह्म होय कीं नव्हे ॥५॥

येथें विद्याविद्या असती दोनी । हेहि पाहिजे विचारोनी । ऐसें गुरुवचन रुद्रारामें ऐकोनी । विचार करिता जाला ॥६॥

सकंल्पविकल्पात्मक मन । तया इंद्रियद्वारा बहिर्गमन । यास्तव ज्ञानेंद्रियषटाक मिळोन । मनोमय कोश बोलिजे ॥७॥

संकल्प होता मन उमसे । जगहि उद्ववे तयासरिसें । जों काल मन तों काल जग असे । मनाभावीं नाशे सर्व ॥८॥

तस्मात मनचि कारण सर्वांसी । उत्पत्ति -स्थिति -संहारासी । आणि निमित्त मन बंधमोक्षासी । विद्याविद्यात्मक म्हणोनी ॥९॥

अविद्यावशें विषयासक्ति । तेणेंचि बंध होय जीवाप्रति । ब्रह्म जाणोनि विषय मावळती । तेव्हांचि मुक्ति साधका ॥१०॥

विषय ग्रहणासी मनचि साधन । तेंचि मन होतां विवेकसंपन्न । तरी उद्ववे ऐक्यब्रह्मज्ञान । उपदेशमात्रें ॥११॥

या कोशाचें यजुर्वेद शिर । ऋक साम दोनी पक्ष दक्षिणोत्तर । हे वेदत्रयीही बहुधा क्रियापर । मनें कल्पिले ॥१२॥

तिहीमध्येंहि ज्ञानकांड असतां । नेणून कल्पिली क्रियापरता । याचि हेतू तिन्ही अंगें पाहतां । अविद्यात्मक मनोमयाचे ॥१३॥

तया वेदत्रयीच्या आधारें । मन कमींच वर्ते व्यापारें । तेणेंचि पापपुण्याचे संस्कारें । जीवा उंचनीच योनी ॥१४॥

तरी अनंत सुकृताच्या नेटें । विरक्तिबळें विविदिषा उमटे । तयासीच सदगुरु सत्शास्त्र भेटे । ज्ञानोपदेशा कारण ॥१५॥

याचि कारणें मनोमय कोशीं । आदेश आत्मा बोले सायासी । कारण कीं पूर्विली -अविद्या -निरासीं । विद्या उपजे मना ॥१६॥

संकल्पें मी देह म्हणे ते अविद्या । विकल्पें मी देह नव्हे ते विद्या । एवं उभयात्मक मन असे साद्या । म्हणोनि उपदेश मना ॥१७॥

अन्न प्राणमय कोश दोनी । हे अविद्यात्मक म्हणोनी । या उपदेश नव्हे जडालागुनी । तस्मात मनचि पात्र उपदेशा ॥१८॥

विज्ञानीं म्हणावा जरी उपदेश । तरी ते विद्यात्मक दोनी कोश । आनंदमय तो विचारितां अविनाश । परी विज्ञानही विद्या ॥१९॥

मन होय नव्हे जो संकल्प धरी । बुध्दि त्याचा निश्चय मात्र करी । ते वृत्ति ज्ञानात्मकचि खरी । म्हणोनि विद्यात्मक विज्ञान ॥२०॥

विद्यात्मकासी उपदेश नलगे । मना ज्ञान होतां निश्चय करी वेगें । यास्तव बोलिले असे प्रसंगें । मनचि योग्य उपदेशा ॥२१॥

ज्ञानोत्तरकाळीं जे मनोवृत्ति । ते बुध्दिसहित ब्रह्मात्मैक्यप्रतीति । तेचि जीवन्मुक्ताची स्थिति । पुच्छ मनोमयाचें ॥२२॥

अथर्वांगिरस नामें वेदांताचा । उषनिषद्वाग सारांश शब्दाचा । पूर्वपक्ष त्यागून सिध्दांताचा । बोध होय मनाला ॥२३॥

एकदां नि :संशय बोध जाला । तो पुन्हां न जाय मावळला । तस्मात अथर्वांगिरस पुच्छत्त्वें सिध्दांत केला । श्रुतीनें तो सत्य ॥२४॥

हे वेदाचींच पांच अंगें । मनोमयकोशासी श्रुति सांगे । तरी मनाची स्फूर्तिच चहू वाचेंत वागे । तेंचि शब्द ब्रह्म ॥२५॥

ऐसें हें मन सर्वां कारण । परी नव्हे हें ब्रह्म निर्गुण । जें पाहतसें ब्रह्मीचें ज्ञान । तरी तेंचि ब्रह्म कसें ॥२६॥

आणि मनासी उत्पत्ति स्थिति संहार । क्षणक्षणा त्रिगुणाचे विकार । तरी निर्गुण निराकार । ब्रह्म मन कैसें ॥२७॥

मन उद्ववून सवेंचि नासे । तरी या सत्यत्त्व कोठें असे । सुषुप्तिकाळीं अभाव होतसे । तस्मात मन नाशवंत ॥२८॥

मन हें परप्रकाशें वर्ते । जाणत्याचें साक्षित्त्व विषया निवडितें । आणि मन जेधवां नासून जातें । ते जाणणें नाशे त्यासवें ॥२९॥

डोळा असतां उपनेत्रें दिसे । डोळियाविण काय तया भासे । मनही साक्षियोगें जाणतसे । परी तें चिद्रूप नव्हे ॥३०॥

चिद्रूपत्त्वाभावीं जड म्हणावें । आतां आनंदरुपताही न संभवे । सदा सुखदु :ख शीणचि व्हावें । जागृति -स्वप्न -व्यापारीं ॥३१॥

सुख असे म्हणुन पाहूं जाय । मग ओळखून पाहे जो विषय । तंव तेथें सुखाची प्राप्ति न होय । मग चिळसुनी फिरे ॥३२॥

सुखचि जरी असतें मना । तरी सुखेच्छा करी कासया नाना । तस्मात सुखदु :खाची करी कल्पना । यास्तव मन नव्हे आनंदरुप ॥३३॥

ऐसा मनोमय कोशाचा करुनि विचार । माधवहंसांसी घालोनि नमस्कार । सर्व सांगितला बोधिला प्रकार । कीं मना ब्रह्मत्त्व मायिक

॥३४॥

जी जी मन असज्जडदु :खात्मक । ब्रह्म सच्चिदानंद निश्चयात्मक । तरी मज सांगावे आवश्यक । ब्रह्म तें कोणतें ॥३५॥

ऐसें रुद्रारामाचें उत्तर ऐकतां । अति संतोष जाला चित्ता । म्हणती ऐक बापा विचारवंता । मन ब्रह्म नव्हे जरी ॥३६॥

तरी मनाहुनी अन्य आत्मा होय । जेणें पूर्ण असे मनोमय । तेचि ब्रह्म विज्ञानमय । सर्व भूतांसी कारण ॥३७॥

विज्ञानापासुनी सर्व भूतें जालें । होतां विज्ञानमयाच राहले । शेवटीं विज्ञानमयींच लया गेले । तस्मात ब्रह्म जाणे विज्ञान ॥३८॥

याही कोशासी पांचचि अंगें । तेही विचारुन पहा वेगें । भृगवल्ली श्रुतीच सांगे । अवधारि तेंचि ॥३९॥

या विज्ञानाचें श्रध्दाचि शिर । ऋतु दक्षिण पक्ष सत्य पक्ष उत्तर । योगात्मा महा पुच्छ साचार । हे पांच अंगें ओळखी ॥४०॥

या कोशीं एक विद्या असे । तरी विचार करी बा मानसें । सत्य ब्रह्मत्त्व या असे कीं नसे । पाहे विज्ञानमया ॥४१॥

वचन ऐकतां रुद्राराम । विज्ञानाचा विचार करी परम । विज्ञान म्हणजे बुध्दीसी नाम । हे ही अंत :करणवृत्ति ॥४२॥

संकल्प जो करावा मनें । तयाचा निश्चय बुध्दीनेंचि करणें । अथवा इंद्रियद्वारां विषयाकार होणें । हेचि लक्षणें बुध्दीचीं ॥४३॥

बुध्दीसिही इंद्रियांवांचोन । जागृतीचे व्यापार न होणें । तस्मात पंच ज्ञानेंद्रिय बुध्दि मिळुन । नांव पावलें विज्ञानमय ॥४४॥

ते बुध्दि स्वप्नजागरीं होतां उत्पन्न । जगही करितसे निर्माण । बुध्दीमुळेंचि जगाचें वर्तण । आणि लयही विज्ञानीं ॥४५॥

सुषुप्तिकाळीं सर्व जग नासत । बुध्दीसहित इंद्रिय लीन होत । तस्मात विज्ञानमयचि समस्तांत । कारण असे ॥४६॥

परी मन जिकडे जिकडे ओढी । तिकडेचि निश्चयासह घाली उडी । प्रपंची तरी बध घे परवडी । ब्रह्म निवडितां तोडी बंधन ॥४७॥

मन जैसें ब्रह्मज्ञाना साधन । तेवींच निश्चयात्मक विज्ञान । या हेतू श्रध्दा शिर हें वचन । विज्ञानमयीं श्रुति बोले ॥४८॥

पदार्थमात्राची श्रध्दा घेतां । बंधनचि करी अज्ञाना दृढता । तेचि सत्य वस्तूची आवडि होतां । मोक्षासीहि बुध्दि कारण ॥४९॥

याचि हेतू श्रुति विज्ञानमयासी । बोलिली ऋतु सत्य दक्षिणोत्तरांसी । उभय एकार्थ पक्षद्बयाविशी । श्रध्दा व्हावी वृत्तीसी ॥५०॥

ऐसें हें ब्रह्म जाणावयाचें साधन । आधीं जालेंसे निर्माण । परी जीवासी कैसें हो अज्ञान । सुविद्याही नेणती ॥५१॥

अविचारें बळेंचि अज्ञान घेती । पदार्थ सत्य त्याचा निश्चय करिती । तेणें उगीच जन्मती मरती । वासना दृढ करोनी ॥५२॥

तरी साधकें ऐसें न करावें । पदार्थमात्र विवेकें त्यागावें । या बुध्दिवृत्तियोगें अवडावें । सत्य परब्रह्म ॥५३॥

सत्याच्या ठायीं वृत्तीचा संयोग । तोचि आत्मा विज्ञानाचा योग । श्रुति बोलिली असे लागवेग । अभ्यासाकरितां ॥५४॥

उत्थानापासून पुन्हां झोपेवरी । कीं यावत्प्राण असे शरीरी । ब्रह्माकारता वृत्तीसीं खरी । हाचि अभ्यास योगोक्त ॥५५॥

अवसर न द्यावा कामादिकांसी । एकतान अभ्यास दिवानिशीं । परिपक्वता होतां स्फुरे वृत्तीसी । भूमत्त्व आपुलें ॥५६॥

आकाशही जथें एकदशी । तें मी ब्रह्म वाटे अविनाशी । याचि हेतू श्रुति बोले सायासीं । कीं मह : पुच्छ प्रतिष्ठा ॥५७॥

एवं विज्ञानमयाचे पांच अंगें । सुविद्यात्मकचि श्रुति सांगे । या रीती अभ्यासावें वेगें । साधकें साधन ॥५८॥

परी साध्य ब्रह्म साधन बुध्दि । म्हणोनि विज्ञान ब्रह्म नव्हे कधीं । आणि ब्रह्मलक्षणें शेष निरवधी । कोठें असती येथें ॥५९॥

सुप्तिकालीं बुध्दीचा क्षय । होउनी उरे आत्मा अद्वय । हा सर्वजनांचा अनुभव होय । तरी विज्ञान सद्रूप नव्हे ॥६०॥

आता चिद्रूप जरी बुध्दि असती । तरी झोपेमाजीं नेणिवेते जाणती । स्वप्नजागरीं जाणिव दिसती । आत्मप्रकाशामुळें ॥६१॥

तस्मात परप्रकाश बुध्दि जड । स्वप्रकाश आत्मा असे वाड । आणि सुखदु :खें शिणतां निवाड । आनंदही नाहीं ॥६२॥

जेथें सच्चिदानंद नसे । तें असज्जडदु :खात्मक असे । तरी विचारें पाहतां ब्रह्मत्त्व कैसें । असे विज्ञाना ॥६३॥

ऐसें विचारुनि रुद्राराम । स्वामीपासीं बोले अनुक्रम । जी जी विज्ञानमय नव्हे ब्रह्म । तरी यथार्थ वर्म मज सांगा ॥६४॥

ऐसा विचारवंत सत्शिष्य पाहुनी । हंसराजांचे आनंद न माय मनीं । आतां चिमणिया बाळकालागुनी । आनंदमय उपदेशिती ॥६५॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । रुद्रहंसाख्यान निगुती । षष्ठ प्रकरणीं ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP