आतां सद्वुरुहंसप्रसाचें । गुरुभक्तिलक्षण बोलेन विशदें । रुद्रहंसाचे गुरुसेवेचे छंदें । वर्तणें कैसें तें ॥१॥
सद्वुरु निद्रिस्थ असतां शयनीं । आपण उभा कर जोडोनी । जागृति होतांचि मस्तक चरणीं । ठेवुनी पादुका पुढें करी ॥२॥
शौचक्रियेच्याही सेवेसी । स्वतां करी आपणचि निजकरेंसी । पादक्षालनहि घाली वेगेसी । धूतवस्त्र स्वयें देत ॥३॥
गंधमालापुष्पेंसहित । निजकरें गुरुपूजा करित गुरुचें भोजन जालिया असे सेवित । उच्छिष्ट गुरुचें ॥४॥
आसनें वसनें अस्तरनें । तें तें स्वहस्तें सिध्द करणें । तांबूलादि सदा घेऊन राहणें । पाहिजे तेव्हां देतसे ॥५॥
सदा पादसंवाहन । अथवा रहावें कर जोडून । मार्गी चालतां पाठीं गमन । वाहनीं तरी सन्निध ॥६॥
उष्ण पाणियामाझारी । निजांगें वरुती छत्र धरी । किंवा स्वयें विंजणा वारी । आणि उदकझारी समागमें ॥७॥
आणि कवणासींच न बोले । सदा सेवेसी देह विकिले । देहाचें सुखावरी बिंदुलें घातलें । अवळिया येवढें ॥८॥
कोणी बळें जेऊं घालितां । स्वयें करी तळमळ चित्ता । कीं विलंब लागला सेवा न घडतां । तेव्हां जाय तें सांडूनी॥९॥
जितके गुरुचे जागृती व्यापार । होत असती जे जे साचार । त्या त्या व्यापारासेवेसी तत्पर । निमिष्य अवसर पडोंचि नेदी ॥१०॥
रात्रींही पूजा सांग करी । उपहाराचें शेष अंगिकारी । तांबूलादि भोग पुर्वीलपरी । देत असे सप्रेमें ॥११॥
सदगुरु निजतां शय्येवरी । आपण आवडीं चरण चुरी । झोंप जरी येतां चरणांवरी । मस्तक ठेऊनि झोंप घे ॥१२॥
ऐसें हें कायिक सेवन । सेवीत असे रांत्रदिन । आतां वाणीचें कैसें भजन । अवधारा अल्पसें ॥१३॥
वाणी एक उपलक्षण । परी सर्व इंद्रियां गुरुसेवन । मुख्य वैखरीनें स्तवन भजन । गुरुगुर जयशब्दें ॥१४॥
गुरुवचनचि श्रवणें ऐकावें । गुरुचें आलिंगणें त्वचेनें स्पर्शावें । गुरुचें रुपचि नेत्रें पहावें । गुरुरस चाखी जिव्हा ॥१५॥
घ्राण गुरुचरणमोद सेवित । पाणी गुरुपाशीं देत घेत । पादेंद्रिय गुरुप्रदक्षिणा करित । अन्यत्र गमन नाहीं ॥१६॥
एवं हे सेवा वाचिक । आतां कैसी ते ऐका मानसिक । अंत :करणस्फूर्ति उठतां निश्चयात्मक । गुरुरुप सदा ॥१७॥
गुरुरुप संकल्प मनाचा । गुरुरुप निश्चय बुध्दीचा । गुरुचिंतन चित्त साचा । अभिमान घेतसे ॥१८॥
सर्वदा मनन करी गुरुदेव निर्धारु । मी सेवाधार गुरुचा किंकरु । गुरुचैतन्यरुप चित्सागरु । मी तरंग वरी ॥१९॥
गुरु कल्पतरु मी कल्पक । गुरु भज्य मी असें भजक । गुरुपूज्य मी असें पूजक । मी सेवक गुरु सेव्य ॥२०॥
गुरु चिंतामणि मी मागता । मी याचक गुरु मोक्षदाता । गुरु मेघ मी चातक जलसेविता । गुरु चंद्र मी चकोर ॥२१॥
गुरु कामधेनु पान्हावली । मी वत्स दुग्ध पीतसें खालीं । गुरुमायेच्या वोसंगा मिरासी घेतली । म्यां तान्हुल्यानें ॥२२॥
गुरु विष्णु मी गरुड असें । गुरु ब्रह्मदेव म्यां वाहिलें हंसें । गुरु सांब तरी मी नंदी विलसें । गुरु इंद्र मी ऐरावत ॥२३॥
गुरु आकाश मी पांखरुं । गुरु सागर मे जलचरु । अथवा मी पांथिक गुरु दामोदरु । विश्रांति पावलों ॥२४॥
गुरुपदनौकामाजी बैसलों । कीं पदकमळीं मी भ्रमर लुब्धलों । कीं गुरुपाद कृपादृष्टीनें धालों । बाळक मी कूर्मीणीचें ॥२५॥
गुरु बैसे मी सिंहासन । गुरु निद्रिस्थ मी शय्या आपण । गुरु चालतां मी रज :कण । मी वाहन गुरु बैसती ॥२६॥
गुरुस्नानाची मी रंगशिळा । गुरुरुपाचा मी देखणा डोळा । गुरु अमृत मी घें गळाळा । अमर होवोनी ॥२७॥
गुरु वक्ता तेथें मी श्रोता । गुरु ऐकती तरी मी विनविता । गुरु पाहती तरी मी समस्तां । दृश्याकार होतसें ॥२८॥
असो ऐसें मनीं जें जें आठवे । तें तें गुरु किंवा आपण अघवे । या दोहींवांचोन पदार्थच न संभवे । तिसरा या जगीं ॥२९॥
ऐसी गुरुभक्ति रुद्राराम । अंगे करितसे उत्कृष्ट परम । हें पाहून वोळले सदगुरु सप्रेम । चिमणिया बाळावरी ॥३०॥
इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । रुद्रहंसाख्यान निगुती । चतुर्थ प्रकरणीं ॥४॥