नागनाथहंसाख्यान - रुद्रारामहंसांची भेट

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


सिंव्हाद्रिपर्वतीम सर्वतीर्थी । वस्ती केलीसे नागनाथीं । दामोदर आणि भवानीभारती । करिती सेवा ॥१॥

परी शुध्द परमार्थाचें रुप । कळलेंचि नाहीं विचाररुप । योगाभ्यास जप तप । हें मात्र साधिलें ॥२॥

एके दिनीं नागनाथांसी । अनुताप उदभवला मानसीं । जेणें सध्याच पावे समाधानासी । गुरुवचनामृतें ॥३॥

म्हणे मी बाळपणापासोनी । निघालों स्वजनसंपत्ति त्यागूनि । परी अद्यापि सुख कां मजलागूनि । जीवन्मुक्तीचें नव्हे ॥४॥

कवणचीहि इच्छा न करितां । पाला खावोनि वांचविलें जीविता । परी अद्यापि निजसुखाची वार्ता । फळली नाहीं ॥५॥

एकाग्रपणें जप केला । बहुत कष्टविलें देहाला । परी सुख कां प्राप्त नाहीं मजला । सदा तळमळ ॥६॥

बहु कष्टें साधिला योग । नाना सिध्दीही बोळल्या अंगें । परी स्वसुख तें शुध्द अभंग । मज प्राप्त नव्हे ॥७॥

जोंवरी ब्रह्मांडी वायु राहे । तोंवरी झोपेपरी सुख आहे । उत्थानकाळीं ते कदा न लाहे । जीवन्मुक्तदशा ॥८॥

जलीं तुंबिणी जेंवि रोधितां । तैसें मनपवन विरे वायु कोंडिता । सोडितांचि उसळे अधिक वरुता सिध्दिचेंनि बंधने ॥९॥

योगिरायें सांगितलें मजसी । कीं देहपातानंतरी मुक्त होसी । परी देह असतां नेणो जिवन्मुक्तीसी । तरी ते मुक्ति साच केवी ॥१०॥

कोण गुरु मज भेटेल । सर्व सुख ये देहीं दावील । केधवां प्रतीति पूर्ण होईल । त्रिविधा परी ॥११॥

ऐसा अंतरीं होउन उदास । सांडिले जप तप योगाभ्यास । गुरु आठवी रात्रंदिवस । आहारही गोड न लागे ॥१२॥

निद्रा न ये मन व्याकुळ । भाषण नावड अंतरी तळमळ । स्त्रीसुख तो नेणती जैसें बाळ । एक गुरुचा ध्यास लागला ॥१३॥

उगेंचि डोंगरी असे हिंडत । कोणीहि भेटतां अकस्मात । हा असेल काय सदगुरु दत्त । कृपा करुं आला मज ॥१४॥

ऐसा लागला जो निदिध्यास । अंत :करणशुध्दि म्हणावी यास । योगादिकांचे केले जे सायास । त्याचेंचि हें असे फळ ॥१५॥

सदगुरुचा आठव मनीं । गुरुगुरु हीं अक्षरें वाणीं । आणि इंद्रियांच्याहि श्रेणी । गुरुसेवे तप्तर ॥१६॥

ऐसा छंद लागे जयासी । सदगुरु काय दूर असे त्यासी । भेटी होईल अल्पचि काळेसी । गुरुशिष्यांची ॥१७॥

इकडे तुंगणीमाजीं रुद्राराम । असतां सहजस्थिति निष्काम । अंतरीं होता जाला उदगम । कीं मातापुरा जावें ॥१८॥

एक शिष्य अश्व एक । घेउनि निघाले अवश्यक । पावले असती निश्चयात्मक । सिंव्हाद्रि पर्वता ॥१९॥

पर्वत वेंघता शिष्याचे करीं । घोडा देउन चालिले पादचारी । तों नागनाथ हिंडे उदास अंतरीं । तेणें एकाकी मूर्ति देखिली ॥२०॥

रुद्रारामहंसें ही तये वेळीं । नागनाथा देखिलें नेत्रकमळीं । ह्मणती हा भेटला बहुत काळीं । आत्मीय आपुला ॥२१॥

हा ज्ञानासी असे सत्पात्र । तरी ज्ञान उपदेशावें स्वतंत्र । परी प्रश्न करी जरी हा अणुमात्र । तेव्हां गुप्त तें प्रगटवूं ॥२२॥

इतुकी अंतरीं कल्पना केली । एका बैसले वृक्षाखालीं । हे देखोनिया सांष्टाग घाली । नमस्कार नागनाथ ॥२३॥

हात जोडोनि उभा राहे । न्याहाळून मुखाकडे पाहे । विनविता जाला लवलाहे । जी आपण कोण असा ॥२४॥

मज वाटतसे स्वकीय चित्तांत । कृपेसहित भेटला श्रीदत्त । माझा भाग्योदय उद्ववला अदभुत । दर्शन दिधलें महाराजा ॥२५॥

ऐसें बोलतांचि नागनाथें । हसोनि बोलूं आरंभिलें समर्थे । दत्तचि असा ऐसे हे मनोरथे । तरी मी दत्तचि असे ॥२६॥

मीहि दत्त तूंहि दत्त । दत्तरुपचि जग हें समस्त । तरी संशय कासया किंचित । होय कीं नव्हे म्हणोनी ॥२७॥

आरंभी कोण असा जें पुसिलें । तें देहासीं कीं आत्म्यासी सांग वहिलें । आत्मरुप तरी सर्वत्री एक संचलें । तरी पुसिलें तें व्यर्थ ॥२८॥

देहासी जरी तूं कोण पुससी । तरी हे पंचभूतात्मक निश्चयेसी । येथेंही प्रश्न करणें कासयासी । पाहिजे बापा ॥२९॥

दत्त असाल हा संशय । तरी तूं मी हें जग दत्तमय । येथेंही प्रश्न करणें हें काय । असंभव दिसे ॥३०॥

इतुकें खंडणोत्तर गुरुचें । परी अभेद रसाळ निष्कर्षाचें । हें नागनाथें ऐकतां साचें । आनंदें करी साष्टांग ॥३१॥

मागुती हात जोडोनि विनवित । स्वामींची आज्ञा कीं तूं मी हें जग दत्त । परी मजला नव्हे ऐसी प्रतीत । अज्ञानास्तव ॥३२॥

देह निराळा आत्मा निराळा । परी तत्त्वांचा मिळाला मेळा । तेणें एकरुपचि भासे सकळां । तेव्हां तूं मी हे कल्पिती ॥३३॥

पुसिल्याविण व्यवहार चालेना । त्या रीतीच म्यांही केली प्रार्थना । तरी स्वामि माझिया पालटावें अज्ञाना । मी शरण चरणां अनन्य ॥३४॥

ऐसी विनंति करोनि मागुती । साष्टांग घातिलें चरणांवरुती । हंसगुरु कळवळोनि चित्तीं । उचलोनि धरिलें ॥३५॥

बापा तुझे मनोरथ पुरती । हें सत्यचि जाण माझी वचनोक्ति । परी आधीं कोण मी जाण निश्चिती । ऐक बोलिजेल ॥३६॥

आदिनारायण तोचि हंस । तेथून चतुरानन पावला उपदेश । तेंचि तेणें ज्ञान अविनाश । ठेविलें वसिष्ठीं ॥३७॥

श्रीराम विष्णूचा अवतार । वसिष्ठें बोधिला अभेदविचार । पुढें कलियुगी होऊनिया नर । जगदुद्वार करी मारुती ॥३८॥

तया समर्था हंसराजासी । उपदेशी श्रीराम स्वमुखेशीं । तेचि पुढें उध्दवस्वामींसी । कृपेंने उपदेशिती ॥३९॥

माधवस्वामी मुख्य माझे गुरु । उध्दवहंस ते परम गुरु । तेंही उपदेशिला होता ज्ञानविचारु । तोचि मजप्रति दीधला ॥४०॥

तरी तोचि बोध तुज जरी । अपेक्षा असतां सांगूं निर्धारी । परी सांग आधीं जन्मापासुनी आजवरी । काय काय केलें आणि कोण तूं ॥४१॥

ऐसें ऐकतांचि नागनाथ बोले । सदृढ वंदोनिया पाउलें । माझें जन्म दिल्लीमाजी जालें । शुकानंदाचें उदरीं ॥४२॥

उदंड संपत्ति सदनीं असतां । त्यागोनि निघालों तात मरतां । का स्वमुख पावावें अपरोक्षता । यास्तव वन सेविलें ॥४३॥

तेहतीस वर्षे निंब खाउनी । एकाग्र प्रवर्तलों अनुष्ठानीं । पुढें हटयोगही केला बळेंकडोनि । आणि सिध्दिही प्राप्त मज ॥४४॥

परी स्वसुख ते अपरोक्ष केवळ । न भेटेचि मज बहु होय तळमळ । तरी स्वामि मज भेटला दयाळ । तें सुख माझें मज द्यावें ॥४५॥

ऐसें बोलोनि साष्टांग घातले । नेत्रोदकें चरण क्षाळिले । अनन्यत्त्व देखोनि आलिंगिलें । सदगुरुहंसें ॥४६॥

ऐक बापा माझी वचनोक्ति । आम्हीं राहतसों तुंगणीप्रति । तेथें तुवां यावें निश्चिती । गंगातटाका ॥४७॥

आम्हीं येथें राहूं दिन तीन । मग ग्रामाप्रति करुं गमन । तुवां समागमें चलावें आपण । अथवा मागून यावें ॥४८॥

तंव नागनाथ म्हणे जी निश्चयेसी । मी येईन तुंगणीमठासी । परी येथें न कळावें कोणासीं । कळतां मज जावों न देती ॥४९॥

येथें दामोदरभारती मजपाशी । तत्पर असे दिवस कीं निशीं । वियोग न साहे माझा तयासी । परी न पुसता येईन ॥५०॥

आतां चलावें तीर्थावरी । क्रमाव्या येथें तीन रात्री । नंतर जावें तुंगणिये गोदातीरीं । मीही मागोनि येतसों ॥५१॥

इतुके उभयतां बोलत असती । तों तेथें पातला भवानीभारती । बोलूं लागला नागनाथांप्रति । म्हणे म्यां बहुत धुंडिलें ॥५२॥

तंव नागनाथ म्हणती गा सुमटा । हे वृध्द साधु यासी चढवेना वाटा । मग तो म्हणे मी उचलोनिया नेटा । तीर्थावरी जाईन ॥५३॥

इतुके बोलोनी रुद्रारामांसी । उचलोनि पाठीं घेतले सायासी । आणोनि बैसविलें तीर्थापाशीं । मागोनि अश्व शिष्यही आले ॥५४॥

मनीं रुद्राराम विचारिती । कीं अधिकार नसे या गोसावियाप्रति । परी माझी सेवा केली निश्चितीं । तरी यास काय द्यावें ॥५५॥

यासी पूर्ण अधिकार यावा । ऐसा प्रसाद कांहीं द्यावा । मग एक रुद्राक्ष काढोनि बरवा । देते जाले भवानीसी ॥५६॥

परी तो मंदभाग्य ठायीचा । म्हणे मज प्रसाद मिळाला साधूचा । येणें द्रव्य मिळेल मज साचा । ऐसाचि भाव कल्पी ॥५७॥

भावने ऐसें तयासी धन । मिळालें परी जो जाला कृपण । पुढें कांहीं शिकला शब्दज्ञान । तेव्हां पाषांडी तया सर्व म्हणती ॥५८॥

जैसें व्यालामुखी पडतां जळ । तयाची होत असे गरळ । असो साधूनें काय करावें खळ । ठायीच पडिला ॥५९॥

इकडे रुद्रारामहंस स्वतंत्र । तेथें राहुनिया तीन रात्र । जाते जाले ग्रामा पवित्र । गंगातीरीं तुंगिणीसी ॥६०॥

इकडे नागनाथहंसांचे भेटी । दामोदरभारती ये उठाउठीं । बहु आदरें बोलतसे ओठीं । जी मज एक देणगी द्यावी ॥६१॥

जोंवरी देहांत प्राण असे । तोंवरी वियोग न व्हावा अपैसे । एकत्र स्थळीं उभयतांनीं ऐसें । रहावें वाटत ॥६२॥

तस्मात मज सोडोनि कवणे स्थळीं । न जावें जी कवणेहि काळीं । तंव नागनाथ बोलती मुखकमळीं । अवश्य संग घडेल ॥६३॥

परी मध्यंतरी कांहीं कांही वियोग । कांहीं घडेल संयोग । हा प्रारब्धाचा ऐसाचि योग । असे कीं साई ॥६४॥

असो रात्रीमाजीं एके दिनीं । धनाबासी संगें घेउनी । जाते जाले ग्रामा तुंगणी । न कळतां कवणासी ॥६५॥

दामोदरभारती जों प्रात :काळीं । पर्णकुटिकेंत येउन न्याहाळी । तों उभयतां न दिसती नेत्रकमळीं । तेव्हा घाबरला अती ॥६६॥

नागनाथा हे परम सखया । मज टाकून गेलासी एकटिया । मज केंवि कंठेल स्थानीं यया । तुजहून मी परेदेशी ॥६७॥

ऐसा आक्रोश करीत हिंडे वनीं । परी वार्ताहि नायके श्रवणीं । असो तळमळीत राहे निशिदिनी । आहार निद्राहि नावडे ॥६८॥

इकडे तुंगणीसि नागनाथ आले । गंगेमाजीं स्नान केलें । उदक पुष्पें उपायनें घेतलें । भेटी चालिले गुरुचे ॥६९॥

मठामाजीं पाहतां जावोनी । हंसमाय देखिली स्वनयनीं । साष्टांग घातले अवनी । अष्टोत्तरशतें ॥७०॥

गुरुराज म्हणती गा पाडसा । पुरे करी श्रमलासी डोळसा । काय अपेक्षा असेल जे मानसा । तें सांगें मी करीन ॥७१॥

नागनाथ हस्त जोडोनि विनवी । कृपेनें मज पादसेवा द्यावी । तेणें पावेन मी पार पदवी । ज्ञानहि पावोनि ॥७२॥

हंस म्हणती गा बहुत उत्तम । बहु सार ग्रहण केलें परम । मग राहिले सेवाचि नियम । करोनी वधुवरे ॥७३॥

तंव भोजनाची वेळ आली । कृपेनें गुरुमाय बोलती जाली । तुझी गौड आम्हीं द्राविड पंक्ति पावली । एक कैसी जाय ॥७४॥

नागनाथ म्हणे महाराजा । मज काज नसे लोक लाजा । प्रसाद सेवीन नको हा भाव दुजा । जात्यभिमानाचा ॥७५॥

मग प्रतिदिनींही उभयतां । पंक्तीचे शेष घेती तत्त्वतां । परी उभयांसीहि गुरुसेवेपरता । दुजा लाभ नाहीं ॥७६॥

ऐसे तीन वर्षे लोटलीं । एकभावें गुरुसेवा केली । तेणें गुरुमाय प्रसन्न जाली । म्हणती याचें सुख यासी देवुं ॥७७॥

आतां पुढिलिये प्रकरणा आंत । ज्ञानोपदेश होईल निश्चित । तेंचि चिमणें बाळ बोलेल संकेत । अल्पमात्रेकडोनी ॥७८॥

इतिश्रीमध्दंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । नागनाथहंसाख्यान निगुती । चतुर्थ प्रकरणीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP