नागनाथहंसाख्यान - उमरावतींत शिष्यसंप्रदाय

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति, युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे. 

श्रीनागनाथहंसांचें चरित्र । उत्त्तरोत्तर पवित्रापवित्र । मुक्त मुमुक्षु बध्दांचे श्रोत्र । ऐकतां चित्त तुष्टे ॥१॥

एक महामुनिबाबा संत । तेही आले राहिले समाजांत । परी ते राहती सदा उन्मत । भलते स्थळीं पडावें ॥२॥

अथवा चिंध्याचें गाठोडें घेवोनि । फिरावें ग्रामीं अथवा वनीं । बळें आणावें भोजना लागोनी । बळें शयनीं निजवावें ॥३॥

असो एक वराडदेशाचा । अधिपति रायराजाराम नामाचा । तेणें उपदेश घेतला महाराजांचा । अति संभ्रमेंकरोनी ॥४॥

तेणें यवनरायापासून । चार ग्रामें आणिलें करुन । अधिकाधिक होती संतर्पण । उत्साहादिक ॥५॥

आणिक एक बाळाजीपंत । तोही मुमुक्षु बुध्दिमंत । तयाचें वांछित होतें चित्त । कीं उपदेश घ्यावा ॥६॥

वराडामाजीं गरुडग्रामीं । एक साधु विख्यात बगाजी नामीं । तयाचा उपदेश घ्यावा नेमीं । ऐसी बहुत आवडी ॥७॥

एकदां स्वप्नामाजीं येऊन । उपदेशिलें पंतालागुन । परी सांगितलें कीं उपदेश जाऊन । नागनाथांचा घ्यावा ॥८॥

जागें होतां विस्मय पावला । म्हणे सदगुरु कां न भेटती मजला । मागुती झोंप येतां स्वप्न देखूं लागला । बगाजीबावा आले ॥९॥

अगा संशय कासया करिसी । भेद नागनाथा नाहीं मजसी । तूं जातांचि पुसतील तुजसी । कीं कासया धाडिलें बगाजीनें ॥१०॥

ऐसा प्रत्यय तुज बाणतां । उपदेश घ्यावा तुष्टोनि चित्ता । तथास्तु म्हणोनि निघोनि तत्त्वतां । अंजनगांवा पातला ॥११॥

देखताचि महाराज म्हणती । स्वप्नीं तुज बगाजी कोण मंत्र सांगती । तोचि मंत्र सांगू गा तुजप्रति । जरी पाठविलें अम्हांकडे ॥१२॥

खूण पावतांचि घेतला उपदेश । राज्यकारण सोडिलें नि :शेष । सेवा करोनि राहिला संतोष । ज्ञानें समाधानही पावला ॥१३॥

पुढें तयाचे कुंटुंब मुलें । गुरुहंसें तत्त्काळ आणविले । जोंवरी द्रव्य तोंवरी सर्व वेंचिलें । पुढें भिक्षा मागतसे ॥१४॥

तेणें ग्रंथ केले असती । गुरुचरित्र वर्णिले यथामति । आणिक एक कथा अदभुत श्रोतीं । सावध परिसावी ॥१५॥

वाईदेशाकडिल दोघे ब्राह्मण । सदनीं असतां अति संपन्न । मोक्ष इच्छेचे अधिकारी होउन । निघाले दोघे बंधु ॥१६॥

ते तीव्रप्रज्ञही असती । केवळ निजसमाधान इच्छिती । पाहत हिंडले जितुकी जगती । शेवटीं हंसदर्शना आले ॥१७॥

तेज पाहतांचि आनंदले । कीं येथें कार्य साधेल वहिलें । मग उपदेश घेवोनि समाधान पावले । ऐक्यानुभूतीचें ॥१८॥

तों मागाहुन त्यांची सेनासंपत्ति । धुंडित पातली अंजनगांवाप्रति । परि ते आम्ही न जाऊं म्हणती । मग दृढ बोधोनि लाविले ॥१९॥

राजारामबावा वामनबुवा । सरस्वतीबाई आदि समान बरवा । उपदेश घेती तितुक्यांचे नांवा । कोठवरी बोलावें ॥२०॥

पांडुरंग वार्‍याचें वर्तमान । उपदेश जाला तो केला कथन । तेणें हटयोग आरंभ करुन । निवांत सदनीं राहिला ॥२१॥

तयाच्या कन्या कांता आणि माता । तळमळती खावयाविण तत्त्वतां । एके दिनीं पांडुरंग जाला येता । खोलींतून बाहेरी ॥२२॥

अंतरीं हेलावा समाधिसुखाचा । तंव मातेनें हात धरोनि कन्येचा । पुढें आणोनि बोलतसे वाचा । म्हणे हे खाती काय हाडें ॥२३॥

ऐकतांचि विरक्तिचिये त्रासें । कन्या टंगडी धरोनि फेंकितसे । तेणेंचि त्रासें लागलें पिसें । बहकोनि धांवत ॥२४॥

वस्त्र पात्र जानवें त्यागुन । नदींत उडी टाकी जाऊन । तैसाचि पूरें जातसे वाहुन । योजनें पांच सहा ॥२५॥

परडीग्रामीं सिध्देश्वर । तया देवळाचे शिखरावर । जाऊनि बैसला निघोनि सत्त्वर । नदीप्रवाहांतून ॥२६॥

इकडे ते माता मुलें बाळें घेउनी । आली हंसापुढें शंख करी वाणी । म्हणे पांडुरंग वेडें लागूनि गेला वाहोनी । यया नदीमाजीं ॥२७॥

बहुत आटाहास्य तो ऐकतां । दामोदरभारतीसी म्हणती तत्त्वतां । भिक्षा मागवून एका शिष्याचें हाता । यांचा निर्वाह चालवी ॥२८॥

तथास्तु म्हणोनि शिष्य एक धाडोनि । भिक्षा आणोनि टाकावी त्यांचे सदनीं । इकडे न पुसतां हंस कवणालागोनी । निघाले शोधासी ॥२९॥

क्षणमात्रें सिध्देश्वरापासीं आले । तेथें पांडुरंगासी दृष्टी देखिलें । निमिष्य एक तीर्थावरी बैसले । तों जाहलें अदभुत ॥३०॥

मारुतीराय कळवळला अंतरीं । म्हणे नागनाथ शिणतसे भारी । तेव्हां निजांगें फकीराचा वेष धरी । आलों म्हणे गा नागनाथा ॥३१॥

फकीर पाहतांचि हंसराज वंदिती । फकीर म्हणे कां शिणला चित्तीं । भूक लागलीसे येरु म्हणती । तंव तो म्हणे चाल देउळीं ॥३२॥

मग उभयतां गेले देउळांत । फकीर म्हणे जेवूं ये त्वरित । भाकरी काढिल्या खादल्या अदभुत । आतृप्तिवरी ॥३३॥

मग नागनाथें ग्रास मोडुन । फकिराचे मुखीं घातिला जाण । येरें तो चाऊन हंसासि धरुन । मुखांतुन मुखीं घातला ॥३४॥

आणिक नागनाथ विनविताती । जी जी माझी असे विनंति । तें बाळ असे जें देउळावरुती । तयासी प्रसाद द्यावा ॥३५॥

बहु बरें म्हणतां त्या बोलाविलें । तयासी भाकर एक देते जाले । तो खातां खातांचि मन उमजलें । वंदितसे सावधपणें ॥३६॥

तीर्थावरी पाणी प्यावयासी । उभयतां येती त्या समयासी । तंव पांडुरंग विनवी गुरुहंसासी । जी आपण बाटलों कीं ॥३७॥

तंव म्हणती देउळीं जाऊनि पाहे । येरु जाता जाला लवलाहे । तों तेथें महाभुजंग बैसला आहे । तेणें फूत्कार टाकिला ॥३८॥

तया फूत्कारासरिसा पडिला । हंसराज येवोनि पाहति तयाला । म्हणती स्वामी याचा संशय फेडिला । पाहिजे कृपाळुवें ॥३९॥

मग नागाचा वेष टाकुन । स्वकीय निजरुप केलें प्रगटमान । पांडूरंगा उठविलें थापटून । तंव मारुती देखिला ॥४०॥

मग वंदुनी त्रिवर्गही बैसती । संवाद ज्ञानदर्चा करिती । तेणें बोध ठसावला चित्तीं । पांडुरंगाचें ॥४१॥

तेव्हां मारुती गुप्त जाला । हंसराज म्हणती आतां चला । मग निघोनि लागती जों मार्गाला । तंव संभार पातला ग्रामाहुनी ॥४२॥

मग शिबिकेमाजीं बैसोनी । पातले अंजनगांवांलागोनी । सर्व भोजनें सारिती आनंदोनी । आणिक पुढें काय जालें ॥४३॥

गुरुनानकाचा नातु एक । संगें नानकपंथीचें कटक । येता जाला आवश्यक । अंजनगांवासी ॥४४॥

तयासी सांगितलें कोणी । कीं आपुला गौड ब्राह्मण असोनि । रामदासी जाला भ्रष्टोनी । ऐकतां ऐसे कोपला ॥४५॥

सर्व परिवारासहित । बैसला येवोनि सदना आंत । दुराग्रहें असे वल्गना करित । निवांत ऐके हंसराज ॥४६॥

मागुती बोले तो पंथी नानक । बरें होणार तें जाहलें निश्चयात्मक । परी मज दंड द्यावा आवश्यक । नगदी लक्ष द्रव्य ॥४७॥

आणि तूप साकर आदिकरुन । साहित्य द्यावें आम्हांलागुन । नातरी करुं नेदी तुम्हां भोजन । आणि आम्हीही न करुं ॥४८॥

तंव नागनाथ म्हणती आम्ही फकिर । सर्व खाऊं हे कण्या भाकर । या विरहित काय असे साचार । तीन दिवस बैसतां ॥४९॥

परी तो नायकेचि महाखळ । उपवासीच बैसले असती सकळ । तैसाचि जाहला सायंकाळ । तंव सर्व मंडळी क्षोभली ॥५०॥

दामोदारभारता चौधरी महिमा । आणि तो राय राजारामनामा । बोलतीं कीं आज्ञा द्यावी आम्हां । तरी काढोनि यास देऊं ॥५१॥

तंव महाराज म्हणताती तयां । ऐसें न प्रवर्तावें अन्याया । सामोपचारेंचि सांगोनिया । भोजनें घालावीं ॥५२॥

मग बहुतापरी सांगती । परी तो नायकेचि मंदमति । मग लोटतांचि मध्यराती । अपूर्व वर्ततें जालें ॥५३॥

गुरुनानक निजांगें प्रगटले । तया नातासी अतिशये ठोकिलें । म्हणे त्त्वां पायरीसी पाय लाविले । अरे मीचि कीं नागनाथ ॥५४॥

याचि समर्थे पूर्वी मजला । हुरमुजी दिधलें पाहे वहिला । तयासी क्षोभविलें तरी घडला । अन्याय थोर ॥५५॥

मग येवोनि महाराजांकडे । उचलोनि आलिंगिलें गाढे । बापा सखया पाहे मजकडे । अन्याय क्षमा करी ॥५६॥

गळियांतील सैली काढोनि । घालूं पाहे कंठस्थानीं । तंव नागनाथ बोलती हंसोनी । जी जी हा विधि नव्हे ॥५७॥

मी तरी रामदासी असे जालों । लोक हसती कीं जरी सैली ल्यालों । मज शांतवन करुं आला तरी पावलों । नाहीं स्वामि कोपा ॥५८॥

ऐसेंचि बोलतां प्रगटले समर्थ । तेव्हां साष्टांग नमिती नानक नागनाथ । समर्थे सैली घेवोनि स्वहस्त । कंठीं घातली ॥५९॥

मग समर्थ आणि गुरुनानक । म्हणती सखया करवावा पाक । भोजनें करुनि निश्चयात्मक । आम्ही जाऊं उभयतां ॥६०॥

मग सर्वांसी आज्ञा दिधली । अति त्त्वरा पाकनिष्पत्ति केली । सर्वही मंडळी एकत्र बैसली । समर्थ नानक सांगती ॥६१॥

भोजनें होवोनि विडे दिधले । मग हंसांसी पुसोनि उभयतां गेले । नंतर सैली गळा घालिते जाले । मेखळेवरी ॥६२॥

दीर्घ शरीर सरळ संपूर्ण । अरुणोदय ऐसा गौर वर्ण । त्यावरी मेखळा शोभायमान । सैलीसहित ॥६३॥

एके दिनीं एक ब्राह्मण । पंढरीसी आला जाण । तेथें करीत बैसले संध्यास्नान । वाळवंटी देखिले ॥६४॥

इकडें असती अंजनगांवी । इकडें पंढरीसीही ब्राह्मणें पाहावी । तो विनवी म्हणे जी मज द्यावी । जपालागी माळ ॥६५॥

तंव हंसरायें अर्धी माळ तोडोनी । दिधली तेथें बोलती सुवचनीं । तुवां अंजनगांवां यावे दर्शनी । तेव्हां उरली अर्धी देईन ॥६६॥

इकडे अंजनगावीं जों पाहती । अर्धी माळ निघे गोमुखी अतौती । तंव ते शिष्य विनवून पुसती । की अर्धी माळ काय झाली ॥६७॥

मग हंसराय दिवाणजीसी । बोलती कीं तिथि मांडून ठेवी वेगेसी । पुढें दोन महिने होतां अंजनगांवांसी । तो ब्राह्मण पातला ॥६८॥

महाराजांसी नमस्कार करोनी । बोलता जाला अर्धी माळ द्या मज लागोनी । अर्धी माळ दिधली अमुक दिनीं । पंढरीसी वाळवंटी ॥६९॥

मग ते अर्धी माळ दाखविली । हे अर्धी तयासी मेळविली । एवं सगळी माळ तया दिधली । आश्चर्ये पाहती सर्व ॥७०॥

सर्व म्हणती येथेंचि असतां । पंढरीसी गेले केउता । तो ब्राह्मण म्हणे आले होते तत्त्वतां । हे अर्धी माळ मज दिधली ॥७१॥

एके दिनीं अचळनाथांसी । हंसराज बोलती वचनासी । जी आपण जावें बद्रिकाश्रमासी । तथास्तु म्हणोनि ते गेले ॥७२॥

एकदा अळजपुराहून । महाराजांसी आलें बोलावण । तेव्हां हनुमंतपुरी पानमलबाबासी घेऊन । गेले शिष्याचे भेटी ॥७३॥

तेथें कांहीं काळ राहुन । ग्रामाकडे करितां गमन । मध्ये करजगावीं घेतले ठेवुन । अमृतरायें सत्शिष्यें ॥७४॥

इकडे धनाबाई सदनीं राहिले । एके दिनीं काय वर्ततें जालें । तमाखु आणी सेवकासी बोलिलें । तो म्हणे तमाखु नाहीं ॥७५॥

तथास्तु म्हणोनि बैसली निवांत । तंव वाणियाच्या वेषें जानकीकांत । जुडी घेवोनि अकस्मात । येता जाला ॥७६॥

धना माता म्हणे कासया श्रमला । तमाखुविण कोण अर्थ उरला । बरें असे या जुडीवरी वहिला । शेवटचि होईल ॥७७॥

एके दिनीं दामोदरभारतीसहित । नखीपुरी आणि मंडळी समस्त । बैसले असतीं तयांसी बोलत । निजमुखें धनाबाई ॥७८॥

महाराज ग्रामासी गेले असती । या देहाचा काळ आला सन्निधगति । तंव नखीपुरी बोलतसे प्रीती । कीं वायु कोंडोनि बैसावें ॥७९॥

मग धनाबाई म्हणे हें काय । काळवंचना करुं नये । तुम्ही तीनशतें वर्षे वाचूनि उपाय । काय केला असे ॥८०॥

कोटि वर्षेहि देह ठेविला । तरी हा देहलोभ दृढ जाला । ऐसी या देहलोभें परमार्थाला । कैसें पावती न कळे ॥८१॥

ऐसें ऐकतांचि नखीपुरी । म्हणे माते ! सत्य हे गोष्ट खरी । आतां हे तनु त्यागोनि निर्धारी । परमधामा पावेन ॥८२॥

परी मार्गप्रतिक्षा महाराजांची । आलिया आज्ञा घेऊनि त्यांची । जाईन हे सत्य वाणी साची । तोंवरी आपणही असावें ॥८३॥

मग धनाबाई असे बोलत । अंतसमयीं येतील हे निश्चित । समर्थांची भेटी होतांचि त्वरित । अवघि पुरेल ॥८४॥

तंव तो दिवसहि पातला । धनामाय सांगे सर्वांला । अजि माध्यान्हीं जाणें असे मजला । तेव्हां महाराजही येती ॥८५॥

परी रामकृष्णा पाचारा सदनीं । तंव दिवाणजी आणी बोलावुनी । दहा वर्षांचे वय तया क्षणीं । तया बाळाचें ॥८६॥

त्यासी मांडीवरी बैसविलें । माता म्हणे म्यां नाहीं ऐकिलें । तरी तूं भजन करी वहिलें । मज पुढें स्वमुखें ॥८७॥

बरें म्हणोनी चिपळ्या विणा । चाळही बांधिले असती चरणां । उभा राहुनी करितसे भजना । सप्रेमें अट्टाहास्यें ॥८८॥

मध्यान्हकाळाची वेळ आली । तेव्हां सर्वांसी बोलती जाली । मार्गाकडे पहा रे या काळीं । महाराज आले कीं नाहीं ॥८९॥

सर्वही म्हणती न आले अझोनी । तंव धनामाता म्हणे आले पहा नयनीं । पाहती जों दरवाजियांत येवोनी । तंव महाराज आले ॥९०॥

तेव्हां आले आले हा शब्द उठला । धनाबाईसी वृत्तांत कळला । तों महाराज उतरोनि धनाबाईला । पाहूं गेले सत्त्वर ॥९१॥

उभयतां दृष्टादृष्टि जाली । धना म्हणे जी वेळ जवळ आली । महाराज म्हणती पाहिजे त्त्वरा केली । येरी ठेवी मस्तक चरणीं॥९२॥

तेव्हांचि प्राणही जाले स्थिर । साहित्य करिते जाले सत्त्वर । परी रामकृष्ण भजनींच तत्पर । त्यासि हें ठाउके नाहीं ॥९३॥

सर्वी तयासी तेथेंचि ठेविलें । मग अवघेचि बाहेरी संगें गेले । दहन करोनी परतोनि आले । तंव तो भजनींच निमग्न ॥९४॥

हांका मारितांही बोलेना । नाचे उडे करी भजना । मग बळें बैसउनी त्याचिया वदना । कुरवाळिती हंस ॥९५॥

मग हळूं हळूं सावधानता आली । तेव्हां म्हणे वो माता काय जाली । ऐकतांचि सर्वही रडती जाली । तेव्हां कळतें जालें ॥९६॥

मग तेणें जो अटाहास्य केला । तो न वचे जाय समजाविला । असो दिवाणजीनें तैसाचि निजविला । झोंपही लागली ॥९७॥

पुन्हा जागा जालिया रडे । दिवाणजी समजावितसे कोंडें । हरप्रकारे तयासी विसर पडे । ऐसें करिती ॥९८॥

तधीपासोनि रामकृष्णबाल दिवानजीसी न सोडी एक हेळ । असो नखीपुरीहि तयाचि वेळ । महाराजा पुसोनि जाती ॥९९॥

वनीं जावोनि देह ठेविला । पानमलही जाताती भराला । हनुमंतपुरीही हिंदुस्थानाला । जाते जाले ॥१००॥

औरंगाबादेसी महामुनी । बावासी नेती बळेंकडोनी । इकडे दामोदरभारती लागोनी । जा म्हणती महाराज ॥१०१॥

शिखरीचा कारभार पहावा । येथें राहूं नये सदैवा । भेटीची इच्छा होईल जेव्हां । तेव्हां येत जाणें ॥१०२॥

तथास्तु म्हणोनि तोही गेला । तों राय राजाराम भेटीसी आला । म्हणे अखंड दर्शन व्हावें मजला । तरी उमरावती रहावें ॥१०३॥

तंव महिमाजी विनवी स्वभावें । जी जी मज टाकून न जावें । तयासी बोलती तुझें स्वभावें । निदान जवळी आलें ॥१०४॥

तयाचा ऐसा साता दिवसांत । महिमाजीचा आला अंत । नंतर उमरावतीस गेले त्त्वरित । रामकृष्णासी घेवोनी ॥१०५॥

कांहीं मंडळी सेवेसी राहिली । कांहीं पुसोनि स्वसदना गेलीं । नंतर उमरावतीस सदगुरु माउली । जगदुद्वार करितसे ॥१०६॥

ऐसी हे नागनाथगुरुंची कथा । वर्णिली असे मति यता । साकल्य सांगतां न पुरे सर्वथा । वाणी आणि मन ॥१०७॥

आतां पुढील अष्टकीं लक्ष्मणहंसांची । कथा बोलिली असे साची । तेचि ऐकती श्रोते चिमणिया बाळाची । बोबडी वाणी ॥१०८॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । नागनाथहंसाख्यान निगुती । अष्टम प्रकरणीं ॥८॥

एकंदर ओ . सं . ६२५ .


References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP