करावया जगदुद्वारासी । व्यक्ति धरोनि वर्तणें गुरुसी । असो नागनाथहंस चालले उत्तरेसी । मातापुर मागें टाकिलें ॥१॥
तेथून एक चिकणी ग्राम । त्या सन्निध एक नदी परम । ग्रामापासून दूर दुर्गम । कडे तुटले असती ॥२॥
तेथें ओघामाजी एक चंड शिळा । हंसनाथे देखिली डोळा । आणि जाली असे माध्यान्हवेळा । उष्णकाळमासीं ॥३॥
लाही फुटे ऐसे दगड तापले । परी त्या शिळेवरी जाऊनि बैसले । पाद असतीं उदकीं सोडिले । वरी उष्ण लागत ॥४॥
धनाबाईही स्नान करोनि । बैसली असे दूर सन्निधानीं । पुढें ग्राम जें कां असे चिकणी । तेथील देशपांड्या एक ॥५॥
त्याचे नाम सदाशिवराव । तो सर्व संपत्तीनें असे सदैव । शिबिकेंत बैसोनि स्वयमवे । तयाच मार्गी पातला ॥६॥
तंव एकाएकीं खडकावर । मूर्ति देखिली परम सुंदर । तेज पाहतां जैसा दिनकर । किंवा अरुणोदय ॥७॥
दीर्घबाहु दीर्घह्र्दय । सर्वांगही सपिंड होय । गौरवर्ण जें सेंदूरमय । किरणें दीप्ति फांकत ॥८॥
सदाशिवराव मनीं विचारी । ह्मणे माझें भाग्य उंचावलें अंबरी । तरी ऐसी हे मूर्ति नेत्रीं । देखिली प्रत्यक्ष ॥९॥
तत्काळचि शिबेकेंतुन । उडी टाकुन घाली नमन । उभा राहे हात जोडूण । परी प्रार्थना करवेना ॥१०॥
तेज देखिलें महा अदभुत । कांहीं बोलवेना किंचित । मग धनाबाईसी हात जोडित । म्हणे माते सांगे मज ॥११॥
तुम्ही उभयतां असा कोण । मज वाटे कीं शिव पार्वती आपण । माझा भाग्योदय जाला पूर्ण । तरी ग्रामाकडे चलावें ॥१२॥
तंव धनाबाई असे बोलत । आम्ही वनस्थ वनीं संचार करित । तूं अससी ऐश्वर्यवंत । उष्ण लागेल तुज ॥१३॥
तरी जावें तुवां वेगेंसी । महाराज असती स्वच्छंद मानसीं । उठती येथून भावेल चित्तासी नातरी बैसती येथें ॥१४॥
मागुती सदाशिवराव बोले । मज जाववेल कैसें वहिलें । हे स्वामी ग्रामाकडे पाहिजे आले । कृपा करुनि दासावरी ॥१५॥
मागुती घाली नमस्कार । विनवीतसे जोडोनि कर । तेव्हां महाराज उठिले सत्त्वर । चिकणीकडे चालले ॥१६॥
तंव तो बोले धनाबाईसी । शिबिकेंत बैसवावें माझें मानसीं । तरी प्रार्थना करोनि स्वामीसी । कामना पुरवावी ॥१७॥
तंव धनाबाईनें खुणाविलें । ते नायकती चाले उगलें । तैसेचि नागनाथहंस चालिले । मागें धनाबाई ॥१८॥
सदाशिवरावही चरणीं चालत । ग्रामासन्निध पातले त्त्वरित । तंव नदीतटाकीं एक विवर अदभुत । परम रम्य देखिलें ॥१९॥
तया विवराचिये द्वारीं । जाऊन बैसले निर्धारी । धनाबाईही शेजारीं । जावोनि बैसे ॥२०॥
तंव सदाशिवराव करी ग्लानी । हात जोडोनि बोले नम्रवचनीं । जी जी महाराज चलावें सदनीं । मी दासानुदास ॥२१॥
तंव धनाबाई असे बोलत । कांहीं आग्रह न करी किंचित । सदना जावोनि तुवां त्वरित । भोजनादि सारावें ॥२२॥
नंतर येउनि भेटीसी । महाराजाची इच्छा जैसी । भोजन करावें वाटे मानसीं । तेव्हां तुज सांगेन ॥२३॥
तंव तो म्हणे आपणांते टाकुन । म्यां कैसें करावें भोजन । येरु बोले साहित्य दे पाठवून । आणि तूं भोजन करी ॥२४॥
ऐकतां मातेचे वचनासी । सदाशिवपंत गेला सदनासी । सामुग्री पाठविली वेगेंसी । परी ते तैसीच ठेविली ॥२५॥
धनाबाईनें महाराजाकडे । पाहुनि बोलती जाली कोडें । म्हणे महाराज मनीं जरी आवडे । तरी पाक करीन ॥२६॥
तंव महाराज उत्तर न देती । उगेंचि हसावया लागती । प्रेमाश्रु आले नयनाप्रति । पाहुन सती विनवी ॥२७॥
जी जी महाराज काय जालें । कोणतें आश्चर्य मनीं वाटलें । तंव बहु आदरें बोलते जाले । म्हणती ऐक वो सखये ॥२८॥
या विवरामाजी कूप एक । त्यांत कृष्णमूर्ति निश्चयात्मक । असे परम सलक्षणात्मक । बहुता काळाची ॥२९॥
तया हेतु कृष्णमूर्तीचा । असे कीं प्रगट व्हावें साचा । परी अवकाश असे सुमुहूर्ताचा । तेव्हां प्रगट होय ॥३०॥
तों काळ आम्ही भोजन । सर्वथाही न करुं जाण । निंबाचा पाला आणि वाटुन । येरु आणी सत्वर ॥३१॥
मग उभयतांनीं खाउनी पाला । उदक घेउनि ढेंकरु दिधला । पुढें एक वटवृक्ष देखिला । जावोनि बैसले त्या तळीं ॥३२॥
सदाशिवरावहि भोजन सारोनी । येवोनि बैसला सन्निधानीं । हात जोडोनि करी विनवणी । जी रात्रीं येथें न रहावें ॥३३॥
येथें व्याघ्राचा असे संचार । तरी ग्रामांत चलावें हा हेतु माझा फार । विवरीं राहतांही विंचु विखार । असती जुनाट ॥३४॥
तंव धनाबाई म्हणे गा आम्हांसी । व्याघ्र -सर्प -भय नाहीं निश्चयेसी । तूं कल्पना न करी कांहीं मानसीं । समर्थ इच्छे ऐसा वर्ते ॥३५॥
परी तयासी न पडे भरंवसा । रक्षण ठेविलें दाही दिशा । मग आठवी आपुलिये मानसा । जे वाडा येथें बांधवा ॥३६॥
तया नदीचिये तीरीं । विवरापासोनि अल्प दुरी । चहूकडुनि भिंती जाल्या चारी । तों काळ वडामुळीं राहिले ॥३७॥
केव्हा विवरांत जावोनि बैसावें । केव्हां वटतळवटी बसावें । ऐसे पक्ष मास लोटाले बरवे । मग विनवी सदाशिव ॥३८॥
या वाडियामाजीं तरी रहावें येऊन । तेव्हां होईल माझें समाधान । ऐकतांचि महाराज उठो । वाडियांत प्रवेशले ॥३९॥
माळवदही तेथें होतें । जावोनि बैसले त्या अतौते । सदाशिवराव हर्षला चित्तें । पुढें काय करिता जाला ॥४०॥
वस्त्र पात्र शय्या आसन । सामोग्रीनें भरिलें सदन । परी न करिती उभयतां भोजन । पाला आणोनि खाती ॥४१॥
एके दिनीं धनाबाईपाशीं । सदाशिव विनवी अति सायासी । कीं भोजन करावें आणि मज सेवेसी । सत्पात्र करावें ॥४२॥
तंव धनाबाई म्हणे अवधारी । येथें कृष्णमूर्ति स्थापिसी जरी । तरीच भोजन घडेल निर्धारी । मनोगत ऐसा समर्थाचा ॥४३॥
येरु म्हणे आज्ञा होतां आपुली । मूर्ति आणोनि स्थापीन वहिली । परी या ग्रामीं मूर्ति देखिली ना ऐकिली । नाहीं वडिलांपासोनी ॥४४॥
मागुती बोले माता धना । नवी मूर्ति आणावी नलगे जाणा । या विवरीं असे परमसुलक्षणा । ते अल्पदिवसा प्रगटेल ॥४५॥
सदाशिवपंत मागुती विनवीत । जी माते माझा एक पुरवावा हेत । मजसी समर्थे बोलावें निश्चित । आणि उपदेश द्यावा ॥४६॥
तंव माता बोले बापा सखया । तुज सांगत असे एक उपाया । दामोदरभारती शिखरीं असे तया । बोलाउनी आणीं येथें ॥४७॥
तयाचा आणि महाराजांचा । अति प्रेमा असे साचा । तो ऐकतांचि समाचार येथीचा । धांवोनि येईल ॥४८॥
ऐकतांचि तेणें पत्र पाठविलें । इकडील वर्तमान ऐका वहिलें । नागनाथमहाराज शिखराहून गेले । तया दिवसापासोनी ॥४९॥
दामोदरभारती अति उदास । वनीं हिंडे पाहतसे आस । आहारनिद्राही नावडे त्यास । निदिध्यास महाराजांचा ॥५०॥
कधीं भेटेल गुरुमाउली । माझी उपेक्षा कां समर्थे केली । तंव वार्ताही अल्पसी श्रुत जाली । कीं उभयतां गेले उत्तरेस ॥५१॥
इतुकियांत सदाशिवपंताचें । पत्र आलें वाचिलें साचें । कीं येथें येणें जालें महाराजांचें । आपणही यावें ॥५२॥
ऐकतांचि दामोदरभारती । नाचूं लागले आनंदोनि अति । तयाची शिष्यीण सखूबाई होती । तिसी म्हणती त्वरा करी ॥५३॥
तिनें पाक करोनि घातिलें भोजन । तंव सेना सिध्द जाली संपूर्ण । शिबिकेमाजीं निघाले बैसून । सखूबाईही समागमें ॥५४॥
रात्रीचा दिवस करोनी । पातले चिकणीच्या सन्निधानीं । सदाशिवपंत आडवा जावोनी । आणोनि राहविले ॥५५॥
महाराज कोठें असती म्हणवुन । चालिले शिबिकेंतुन उतरुन । सदाशिवपंत हस्तीं धरुन । महाराजासन्निध नेले ॥५६॥
मूर्ति पाहतांच गहिंवर दाटला । म्हणे मज कांही वियोग दिधला । म्हणउन साष्टांग घातिला । तेव्हां कळवळोनि उठिले ॥५७॥
आलिंगिती समर्थ उचलोनी । मग बैसउनी कुरवाळिती वदनीं । खेदाचें कारण काय बोले वचनीं । आत्मत्त्वीं वियोग कोठें ॥५८॥
आत्मा ब्रह्म परिपूर्ण । तेथें कोठें मीतूंपण । देहसंबंधा इच्छील जरी मन । तरी केव्हांही वियोग होय ॥५९॥
येणे रीती उपदेशुनी । पावविला पूर्ण समाधानीं । जाली द्वैताची धुळधाणी । विचारद्वारा ॥६०॥
एकें दिनी दामोदरभारती । महाराजांसी करी विनंति । जी कृपा करावी सदाशिवावरुती । हेतु बहुत तयाचा ॥६१॥
तंव नागनाथ बोलती साई ऐके । तुज वर्तमान सांगतों निकें । या विवरामाजीं निश्चयात्मके । एक कृष्णमूर्ति असे ॥६२॥
तरी वाद्यपूजादि सामोग्री । वेगीं सिध्द करावी सारी । मूर्ति आतांचि येइल बाहेरी । ते सेव्य होय सदुसी ॥६३॥
ऐकतांचि सर्व सिध्दता केली । विवरद्वारी दाटी जाली । मंगळवाद्यध्वनि लागली । जयशब्दे गर्जती ॥६४॥
हंसगुरु म्हणती अगा कृष्णा । चिरकाळ राहिलासी गुप्तपणा । आतां सदाशिवाची पुरवी तृष्णा । प्रगट होउनी ॥६५॥
ऐसें हंसाचें ऐकतां उत्तर । मूर्ति आली विवराबाहेर । सर्व ही करिती जयजयकार । आनंद थोर जहाला ॥६६॥
एक जुनें देऊळ ओस होतें । तेथें स्थापिलें तया मूर्तीतें । आणि सांगती सदाशिवपंतातें । कीं जन्मअष्टमी करीत जावी ॥६७॥
मग दामोदरभारती बोलती । आतां भोजन मिळावें एक पंक्तीं । बहु बरें हंसराज म्हणती । सहस्त्रभोजन करावें ॥६८॥
तेव्हां सामोग्री सिध्द करोन । करिते झालें संतर्पण । तेव्हां सारिते जालें भोजन । एकपंक्तीं ॥६९॥
गुरुहंस आणि धनाबाई । सदाशिवपंत दामोदरसाई । भोजन करिते जाले ते समयीं । आनंद जाला सर्वां ॥७०॥
आणिक एके दिनीं दामोदरसाईसी । सदाशिवपंत विनवी सायासी । जी उपदेश देववा मजसी । तेव्हां हंसांसी प्रार्थित ॥७१॥
जी सदाशिवपंताचा हेतु बरवा । उपदेश घेउन करावी सेवा । तरी समर्थे मनोरथ पुरवावा । तेव्हां बोलती सदगुरु ॥७२॥
तयासी ज्ञानाचा नाहीं अधिकार । परी सांगूं रामनाम परम मंत्र । याचा अधिकारी होईल पुत्र । तो होय पात्र ज्ञानासी ॥७३॥
ऐकतां सदाशिवपंता बोलाउन । मंत्र देवविला पूजा करुन । तेणें भंडारीचें पत्र दिधलें दान । गुरुदक्षिणेसी ॥७४॥
तंव नागनाथहंस बोलती । तूंचि ग्रामासी रक्षी अती । उत्साह करीत जावें प्रीती । आदि करोनि नवमी ॥७५॥
सदाशिव म्हणे मी सेवाधार । स्वामीच्या पदाचा किंकर । सेवा करीन अहोरात्र । परी नांव असावें स्वामींचें ॥७६॥
तथास्तु म्हणती करी जाय । तेव्हां सदाशिव जाला आनंदमय । उत्साह करीतसे यथान्वय । आणि प्रतिदिनीं भोजन ॥७७॥
कृष्णाचे देवळाभोंवतीं । वाडाहि बांधिला सत्त्वरगती । ब्राह्मणभोजनें तेथेंचि होतीं । आणि वस्ती याचकांची ॥७८॥
एकें दिनीं दामोदरभारतींसीं । धनाबाई आणि सखूबाईसी । घेउन बैसले जाऊनि विवरासी । एकांतीं बोलते जाले ॥७९॥
अगा साई या सखूच्या अंतरीं । तळमळ असे होऊन अधिकारी । तरी उपदेश करुनि निर्धारी । समाधान कां न करिसी ॥८०॥
साई ह्मणे आपणचि करावें । सखूचें अंतर निववावें । तेव्हां तयेसी बोधिलें बरवें । ब्रह्मात्मज्ञान ॥८१॥
एकदां विवरामाजीं हंस एकट । जाऊन बैसले असतां नीट । दामोदरभारती जावोनी स्पष्ट । बोलता जाला ॥८२॥
आपण विवरामाजीं बैसतां । परी आम्हां बैसवेना या आतौता । तरी आज्ञा द्यावी जी त्वरिता । एक गुंफा बाधूं ॥८३॥
बहु बरें म्हणता क्षणीं । एक गुंफा बांधिली आवडीकरोनी । तेथें चौघे बैसती जावोनी । केव्हां बाहेर संचरती ॥८४॥
असो या रीती एक वर्ष लोटलें । एके दिनीं अदभुत वर्तते जालें । अचळनाथ हिंदुस्थानांतुन आले । महाराजांचे भेटी ॥८५॥
तयाची योगामाजी पूर्ण गती । दैदीप्यमान जेवी अग्निमूर्ति । सिध्दिसामर्थ्यही असे अति । परी ज्ञानाविशीं उणे ॥८६॥
चिकणीपासोनि दोन कोस । अरंभी ग्राम तेथें केला वास । कारण कीं समजावें नागनाथहंसास । बोलावितां भेट द्यावी ॥८७॥
इकडे चौघे विवरांत बैसले । हंसगुरुंसी मनीं कळलें । उभय बाहू स्फुरुं लागले । नेत्रीं आल्या अश्रुधारा ॥८८॥
साई म्हणे जी कोणता विस्मय । जाला तो सांगुन निववा ह्रदय । तंव बोलते जाले आनंदमय । एक सखा मज भेटूं आला ॥८९॥
येथून दो कोसावरी आहे । तरी तुम्ही तेथें जावें लवलाहे । संगें सदाशिवपंता घेऊन पाहे । आणावें तया जावोनी ॥९०॥
आज्ञा वंदोनि साई निघाले । संगें सदाशिवपंतासि घेतले । चरणचालीच अरंभीसि आले । तेथें उभी देखिली मूर्ति ॥९१॥
दोनी हस्त काखेंत घातले । चिकणीकडे पाहती उगले । तंव उभयतां जावोनि साष्टांग केले । राहिले हात जोडोनी ॥९२॥
तेज पाहतां न फुटे शब्द । मग दामोदर बोले मंद मंद । जी नागनाथ इच्छिताती सुखसंवाद । भेटी होउनि आपुली ॥९३॥
ऐकतांचि बोलती वचनीं । भेटीकरितांचि आलों दुरोनी । तैसेंचि निघाले सत्वर गमनीं । पाठीं धांवती दोघे ॥९४॥
सदगुरुहंस बाहेरी आले । एकमेकां उभयतां देखिले । धांवोनि गाढ आलिंगन पडिलें । जेवी शिव आणि विष्णु ॥९५॥
तैसेचि एकमेकां हातीं धरुन । विवरीं प्रवेशले दोघेजण । तेथें बोलावयाचें तें बोलून । बाहेर आले ॥९६॥
तेही गौड ब्राह्मण असती । हंसराज बोलती तयांप्रति । भोजनाची कैसी असे रीति । येरु बोलती स्वहस्तें करुं ॥९७॥
आग्रह पाहोनी सामोग्री दिधली । नदीतीरीं जावोनि थाळ घातिली । तंव ते पेटेना कष्ठी होउन पेटली । तंव भाजेना भाकर ॥९८॥
तेव्हां मनीं आठवला विचार । कासया पाहिजे कर्मठप्रकार । प्रसाद सेवन करावा एकत्र । तेव्हां नदींत सर्व टाकिलें ॥९९॥
येऊन भेटले नागनाथहंसा । कांहो विचार जाला असे कैसा । अचळनाथें शब्द ऐकोनि ऐसा । म्हणती एकत्र प्रसाद घेऊं ॥१००॥
मग धनाबाईनें पाक केला । त्रिवर्ग बैसती भोजनाला । दामोदर विनवी अचळनाथाला । भोजन जालियावरी ॥१०१॥
आपण कर्मठ असतां ब्राह्मण । धनाबाईचें नाहीं फळशोभन । तरी कैसें केले सांगा भोजन । तंव बोलतीं अचळनाथ ॥१०२॥
अद्यापि फळशोभन नाहीं जालें । मग नागनाथांप्रति येउनी बोलिले । हें काय जी आग्रहें चित्त कां व्यापलें । प्रारब्ध भोगिलें पाहिजे ॥१०३॥
तंव नागनाथ म्हणती वृध्दपण । उभयतांचेहि भोग न इच्छी मन । तरी कासया पाहिजे समाधान । स्वत :सिध्द असतां ॥१०४॥
अचलनाथ बोलती हें नव्हे बरें । आमुचे मानिलें पाहिजे उत्तरे । तथास्तु म्हणोनि स्वीकारितां आदरें । साहित्य सिध्द केलें ॥१०५॥
फळशोभन गजरेंसि करुन । होतें जाले ब्राह्मणसंतर्पण । रात्रीं उभयतांसी करविती शयन । एक मंचकावरी ॥१०६॥
सदाशिवपंत दामोदरभारती । सखूबाईसहित आनंदती । असो दुसरे दिनीं पांचही मिळती । एकत्र गुंफेमाजीं ॥१०७॥
नागनाथहंस सर्वांप्रति । भविष्य सांगते जाले प्रीति । एक कन्या दोन पुत्र होती । परी वांचेल एक पुत्र ॥१०८॥
असो अचळनाथ दामोदरसाई । हंसराज धनामाय सखूबाई । हे पांचही वर्तताती एके ठायीं । बहुत काळ लोटला ऐसा ॥१०९॥
आसनीं कीं शयनीं भोजनी । पांचही राहती एकत्र स्थानीं । ब्रह्मचर्चा होत अनुदिनीं । ते सुख वर्णवेना ॥११०॥
यथामतीनें चिमणें बाळ । अल्पसें बोलिलें वाचें बरळ । पुढील कथा ऐकोत सकळ । श्रोते जन परमार्थी ॥१११॥
इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । नागनाथहंसाख्यान निगुती । षष्ठ प्रकरणीं ॥६॥