जय जय सदगुरुहंससमर्था । या मुमुक्षुजनांच्या स्वकीय हितार्था । आणि अत्रुटित चालवावें परमार्था । यास्तव मूर्तिमान होसी ॥१॥
गंगेचिया उत्तरतीरीं । द्वित्रितीय योजनाचिये माझारी । एक परभणी नामें नगरीं । विख्यात असे ॥२॥
तेथें एक रामचंद्रपंत । साहुकार असे विख्यात । तया गंगाधर नामें जाला सुत । लग्न त्याचें पिता करी ॥३॥
यादवबावा कोयाळकर । तयाचा पुतणियाचा कुमर । बाळाजीपंत नामें वसे अहोरात्र । भाळवणीसी ॥४॥
तयाची कन्या रेणुकाबाई । गंगाधरपंता योजून ते समयीं । लग्न लाविलें परभणीचे ठायीं । पुढें राहाते जाले ॥५॥
परी गंगाधरपंतें साहुकारी । नाहीं केली कदा निर्धारी । मामलती कराव्या कीं पेशकारी । करीत असे ॥६॥
परी तया गंगाधरपंता । तमोगुणाची असे अधिकता । रजोगुणी असें रेणुका माता । प्रथम सुता प्रसवली ॥७॥
परी तोही कोपिष्ठ असे जाला । जैसा वेणाचा देह मथितां भिल्ल निघाला । तो अरण्यामाजीं मुनीनें पाठविला । हाही अव्हेरिला संतीं ॥८॥
पुढें सुदिनीं सत्त्वगुणी होत्साता । सुमुहूर्ती रमती ते उभयतां । गर्भ राहिला तत्क्षणीं तत्त्वतां । तोचि नारायणहंस जन्मे ॥९॥
जैसें वेणदेहाचें पुन्हा केलें मंथन । तेथें प्रगटला पृथुराजा आपण । तो मुनिवर्ये राज्यासनीं स्थापून । जयशब्द करिती ॥१०॥
तैसेंच गंगाधररेणुकेपासून । निर्माण झाला शुध्द सत्त्वगुण । तोचि संतजनीं नारायण । हंसपदीं बैसविला ॥११॥
असो गर्भी असतां रेणुकाबाईचे । सोहळे होताती डोहळियाचे । उपायनेंही येती जनांचे । वाद्येंही वाजती ॥१२॥
परी रेणुकाबाईसी गोड न लागे । एकांती जाऊनि बैसे वेगें । मज नको हे वैभवाचें सोंगें । त्याग करी वस्त्रालंकार ॥१३॥
आप्तजनही नावडती । नामें बाहतां त्रासे चित्तीं । साधुसज्जनांची उठतसे प्रीति । श्रवणकीर्तन आवडे ॥१४॥
असो ऐसें नव मास लोटतां । प्रसवती जाली दिव्य सुता । श्रावण मासीं श्रवण अभिजिता । वरी जन्मलें बाळ ॥१५॥
अभिजित मुहूर्तींच माध्यान्हकाळीं । बाळ जन्मे गंगाधरकुळीं । वाद्येंही वाजती कल्लोळीं । ब्राह्मण मंडळी मिळाली ॥१६॥
गंगाधरे विधिविधानेसी । पुत्रमुख पाहिलें हर्षोनि मानसीं । द्रव्य वांटितसे ब्राह्मणांसी । उत्साह होत आनंदें ॥१७॥
गुंडभटजी आदिकरुन । बहुत मिळाले असती ब्राह्मण । ते करिते जाले जातकवर्णन । सर्व स्वजन ऐकती ॥१८॥
समस्त मंडळी ऐका हो प्रीती । हा होईल राजा चक्रवर्ती । अथवा ब्रह्मवेत्ता स्वसंवेद्य चिन्मूर्ति । सर्व योगियांसी मंडण ॥१९॥
सुखासनीं आरुढ व्हावें । अथवा सुखरुपचि असावें । हें कदाही अन्यथा नव्हे । आमुची वाणी ॥२०॥
गुंडभट म्हणे माझें ऐका वचन । याचे चरणीं ऊर्ध्वरेखा पूर्ण । हा विष्णूचा अंश असे जाण । नारायण नाम याचें ॥२१॥
मग सर्व नारायणनामें बाहती । स्वजनांसीही आनंद अति । पंधरा महिने जंव लोटती । तंव यवनें संपत्ति लुटविली ॥२२॥
रोजगारही निघाला । यावा सर्व खुंटून गेला । कांहीं शेषधनें निर्वाह चालविला । परी गंगाधर उदास ॥२३॥
पिता बंधु परभणीस राहिले । सकुटुंबें गंगाधरें गमन केलें । देशमुखें पेडगांवीं राहविलें । कांहीं एक काळ ॥२४॥
गंगाधरपंत विचारी मनीं । कीं ब्राह्मणाची मिथ्या झाली वाणी । कैचा राजा परी दारिद्र्य मजलागुनी । आणि पदभ्रष्ट झालों ॥२५॥
तंव एक सामुद्रिकचिन्हें -जाणता । येऊन भेटला गंगाधरपंता । तेणें सामुद्रिकचिन्हें तत्त्वतां । पाहिलीं बाळाचीं ॥२६॥
एकचि चक्र करांगुळीसी । उर्ध्वरेखा असे चरणासी । हा राजाचि व्हावा निश्चयेसी । परी एकचिन्हें प्रतिबंध असे ॥२७॥
जें कां शंकराचें सौभाग्य । तेंचि पूर्ण असे वैराग्य । तेणें नव्हेल प्रवृत्तीचें भाग्य । आणि एकस्थळीं न राहे ॥२८॥
परीक्षक म्हणे माझी गोष्टी समजा । हा होईल योगियांचा राजा । न राहे कदा प्रपंच समाजा । अथवा एके स्थळीं ॥२९॥
परी होईल बुध्दिमान वरिष्ठ । सर्वां प्रियकर होईल स्पष्ट । कांहीं काळ संगी राहे पुढें भ्रष्ट । जाईल तुमचे हातीचा ॥३०॥
ऐसें ऐकतां गंगाधरपंत । जयाचें प्रपंचीं अतिशय चित्त । जगदुद्वारक उदरीं जन्मला सुत । परी तयासी आवडेना ॥३१॥
असो लोकाचे रीती वरुता । उपनयनादि जाला करिता । परी म्हणे काय करावें या सुता । प्रपंचा उपेगा न ये ॥३२॥
असो उपनयन जालियावरी । निघती यात्रेस झडकरी । तुळजापूर आणि पंढरी । सोनारीही सांग केली ॥३३॥
रेणुकाबाईचें माहेरा भाळवणीं । तेथें राहिलें कांहीं एक दिनीं । पुढें निघते जाले तेथोनी । टाकळसिंगा गेले ॥३४॥
मिरजगांवीं बाभुळगांवीं । कांहीं काळ राहती पाटेगांवीं । तेथूनि कोयाळास मंडळीं सर्वी । राहती जाली ॥३५॥
ऐसें जन्म जालियापासून । लागलें असे सर्वांसी भ्रमण । पिता तळमळीतसे अनुदिन । म्हणे मरे तरी बरे होतें ॥३६॥
परी कैसें कैसें बाळकासी । स्फुरण होतसे मानसीं । तेंचि सावधान ऐका वेगेसी । अल्पसें बोलूं ॥३७॥
सानपणापासून । कोणी हांक मारितां नारायण । विस्मय पावतसे आपण । म्हणे हें काय अदभुत ॥३८॥
‘ ना ’ काय ‘ रा ’ हा कोठीचा । ‘ ये ’ कैसा ‘ ण ’ कार असे कैचा । चारी मेळउनी बोलताती वाचा । नारायण ऐसें ॥३९॥
हा देह तरी आतां जन्मला । गर्भी असोनी बाहेर कैसा आला । नंतर नाम हें ठेविलें मजला । हें काय अदभुत ॥४०॥
लहानाचें मोठें कैसें होतें । तरुण होऊन वृध्दत्त्व येतें । पुढें झिजून नाहीसें होतें । चालतें बोलतें कैसें नेणो ॥४१॥
ऐसा उद्वार उठे चित्ता । मागुती हरपे खेळूं जातां । आणिकही एकटें उगें बैसतां । विस्मय उपजे ॥४२॥
हे अवयव कवणे रीती जाले । गर्भामाजीं काय खाउनी वांचले । या गर्भापूर्वी कोठून असेल आले । कीं नवे झाले येथें ॥४३॥
जड म्हणों तरी चळतें कैसें । चंचळ म्हणों तरी उडोन जात नसे । दूरही दृष्टी करुनि पाहतसे । ऐके शब्द दूरिचा ॥४४॥
हाका मारिता ओ म्हणो लागे । शिव्या देतां मन कैसें भंगे । गोंजारितां हर्षतसें वेगें । हें काय हो आश्चर्य ॥४५॥
निजतां झोंप कैसी लागती । जागें होतां व्यापार कैसें होती । बोलतां अक्षरें कोठुनी निघती । आणि राहती कोठें ॥४६॥
कांहीं पाठ केलिया कवणे स्थळीं राहे । म्हणों जातां येतसे लवलाहे । हें काय हो आश्चर्य आहे । ऐसा विस्मय सदा ॥४७॥
कोणी कांहीं शिकवितां शिके । चांगुलें वर्तुणुकेसी मानी निकें । कुमार्गासी आचरतां फिकें । वाटतसे मानसीं ॥४८॥
लिहिणें वाचणिया न लगे वेळ । स्वयेंचि होतसे करतळामळ । खुंटे जरी असतां सकळ । तर्के अर्थ काढी ॥४९॥
हिशेब कितेब जरी अनधीत । युक्तीनें योजितसे नेमस्त । सर्व जनांसी आश्चर्य वाटत । पिताही विस्मित होतसे ॥५०॥
पोथी वाची अर्थ सांगे । अदभुत पाहतां रडूं लागे । चरित्रें सगुणाचीं ऐकतां प्रसंगें । अति आवडी उपजे ॥५१॥
साधूचें लक्षण अथवा वर्तणूक । ऐकतां होतसे परम साशंक । म्हणे मजलागीं ऐसीं निश्चयात्मक । चिन्हें येतील कधीं ॥५२॥
आणिकही भाव उठतसे चित्तीं । हे चंद्रसूर्य कोठोनि निघती । चांदण्याहि चालती लखलखती । आणि हे राहतीं कोठें ॥५३॥
देवाचें रुप तें असे कैसें । आणि तो कवणे स्थळीं राहतसे । हे होत असेल कैसें कैसें । किडामुंगी मनुष्यादि ॥५४॥
ठायीं ठायीं देव देउळें । दाटलीं असती सगळे । देवासी पाहाती साधूचे डोळे । ते हे प्रतिमा कीं दुसरे ॥५५॥
प्रतिमा तरी कैशा बोलती । अन्य देव तरी मज कां न भेटती । कोठें ऐकिलें कीं भजन करितां प्राप्ति । होय तेव्हां भजन करुं लागे ॥५६॥
रामकृष्णादि अवतार । ऐकोनि ध्यान करी सुंदर । दत्तात्रेय ब्रह्मा विष्णु हर । तयांचे ध्यान भजन ॥५७॥
आणि क्षणक्षणा विस्मित चित्त । म्हणे देव हे असती बहुत । कोणता थोर म्हणावा यांत । कवणाच्या भजनें सुख व्हावें ॥५८॥
मागें बहुत साधु झाले । ते ते बहुता देवांसी भजिनले । तस्मात हे अवघे़चि असती थोरले । किंवा कैसें नेणों ॥५९॥
असो कोण जो असेल थोरला । तो कृपाळू येवोनि भेटो मजला । तेणें कां आव्हेरु माझा केला । यास्तव रडे सप्रेमें ॥६०॥
कोणी पाहे तरी उगाचि बैसे । परी तळमळीत असे मानसें । एखादे वेळे अंतरीं वाटतसे । कीं देवा ठायीं पाडीन ॥६१॥
हा मनुष्यदेह मज लाधला । आतां हर प्रयत्नें पावेन देवाला । मी साधूच होईन स्वलीला । जन्ममृत्यु चुकवीन ॥६२॥
ऐसें केव्हां केव्हां वाटतसे । केव्हा केव्हां तळमळी मानसें । केव्हां स्वजनांसीहि रंजवीतसे । मी प्रपंच करीन नेटका ॥६३॥
असो कोयाळकर कुळकरणी याची । नोवरी पाहोनि स्वयें माताचि । पिता नसतां सामुग्री लग्नाची । सिध्द करोनी लग्न केलें ॥६४॥
नोवरीसी पाहतां आनंदे । सवेंचि मागुनी मन खेदे । हे मिळतील गोडबोले मैंदे । मज प्रपंची गोवावया ॥६५॥
मागुती म्हणे हे काय मज गोविती । क्षणा त्यागोन विचरेन क्षिती । असो जोंवरी असेल यांचा संगति । तरि मीही स्वाधीन नव्हे ॥६६॥
असो लग्न जालिया कोयाळीं । तेथुनि निघाले अल्पचि काळीं । मांडवगणीं सहित मंडळी । जावोनिया राहिले ॥६७॥
तेथेंही अल्पकाळ राहिले । परी मुल बाळें अन्नवस्त्रें पिडिलें । द्रव्य होतें ते निपटूनि वेचलें । पात्रेंही खादले मोडोनी ॥६८॥
तेव्हां गंगाधरपंत म्हणे चित्तीं । कोठें जावें रोजगाराप्रति । वर्षसामास फिरोनिया येती । परी रोजगार न लागे ॥६९॥
इकडे रेणुकाबाईची बहिणी । वृत्तिवंत असे ग्रामीं हिंगणी । तेथें राहिली मुलें सर्व घेवोनी । परी खावया कांहीं नसे ॥७०॥
वडील पुत्र स्त्रियेसी घेउनी । वेगळा राहिला मांडवगणीं । रेणुका राहिली माजीं हिंगणी । घेउनी दोनी सुतें ॥७१॥
तंव गंगाधरपंत पातले । अत्यंत खंति करीत बैसले । नारायणासी म्हणते जाले । कीं आतां कैसें करावें ॥७२॥
वडील पुत्र तो अति मंदमति । त्याचा भरंवसा न ये आम्हांप्रति । तूं शहाणा असून प्रारब्धाची गति । अनुकूल नसे तुज ॥७३॥
तंव नारायण म्हणे घाबरुं नये । एके दिनीं तरी उदय होय । प्रयत्नाचा करित जावा उपाय । साडूं नये धैर्यासी ॥७४॥
एके दिनीं स्वयें नारायणें । विचार केला आपुल्या मनें । कीं अल्पकाळ सूख द्यावें वडिलाकारणें । नंतर प्रपंचत्याग करुं ॥७५॥
इतुकियांत एक मित्र भेटला । तो म्हणे रोजगारा चाल जाऊं वहिला । तो अति दु :संग मिळाला । जार आणि कपटरुपी ॥७६॥
तें प्रारब्धभोगाचे महिमान । की तें प्रारब्धचि जन्मलें मूर्तिमान । असो उभयतां कवणा न पुसता गमन । करिते जाले ॥७७॥
तो दु :संग अति असून । तयाच्या दुर्गुणां नातळे नारायण । तेंचि पुढलिये प्रकरणीं बाळ चिमण । बोलेल यथामति ॥७८॥
इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । नारायणहंसाख्यान निगुती । द्वितीय प्रकरणीं ॥२॥