नारायणहंसाख्यान - सज्जनगडीं समर्थभेट

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


जय जय सदगुरु जगन्निवासा । परात्परा नारायणहंसा । मुमुक्षुसाधका शिकवसा अभयप्रदा ॥१॥

नारायणहंस स्वच्छंदें चालिले । जन्मभूमी -परभणीसी आले । तेथें मातापितरांसी भेटले । ते दु :खग्रस्त अति ॥२॥

तेथें एकमासपर्यंत राहुनी । अनेक रीती प्रबोधिली जननी । ते अबोध परी शोक मात्र दूर करोनी । तेथोनिया निघाले ॥३॥

वेष पाहतां दिसे बावळा । परी स्थितीनें ब्रह्मादिकां आगळा । वस्त्र फाटकें परी ब्रह्मगळाळा । घोटोनि बैसे ॥४॥

मस्तकीं केश भुरभुरा उडती । सर्वांगासी लेपिली विभूती । माळा भगवें ना कुबडी हातीं । सहज गती चालिले ॥५॥

चालो वाटे तरी चालावें । नातरी मन माने तेथें बैसावें । कोणी घालितां अन्न खावें । नसतां पडावें धरणीं ॥६॥

मना आलें तरी माळेविण जप । मना आलें तरी स्नानाचा साक्षेप । मना आलें तरी गुरुमूर्तीचें रुप । ध्यानीं आठवावें ॥७॥

मनीं आवडतां भजन करावें मना आलें तरी नाचूं लागावें । ना तरी दोन दोन कोस पळावें । मार्ग कीं आडवाट नेणती ॥८॥

केव्हां उगेच दगडाऐसें बैसावें । केव्हां उठोनि मार्गी चालावें । केव्हां पश्चिमेचे पूर्वेस परतावें केव्हां उत्तरेचे दक्षिणे ॥९॥

कोणी पुसिलें अथवा गांजिलें । कोणी लोटिलें कीं जेवविलें । एक रुपचि अंतरीं दृढ जालें । दुजा भाव नव्हे ॥१०॥

कोणी कोठोनी आलां पुसतां । विजयपुराहुनी आलों तत्त्वतां । कोठें जाणें असे ऐसें म्हणतां । सांगावें आनंदगडा ॥११॥

असो ऐसें फिरतां फिरतां । जांबेसी आले असती अवचिता । पांच रात्र तेथें जाला राहविता । सेकदार दाजी ॥१२॥

इतर ग्रामीं एक रात्र रहावें । क्षेत्रीं तरी तीन रात्र वसावें । हे समर्थाची जन्मभूमी जाणोनि स्वभावें । पांच रात्र राहिले ॥१३॥

पुढें गुंजमूर्तीसी सूर्यग्रहण । स्वच्छंदें करोनि गंगास्नान । गुरुमंत्राचें केलें पुरश्वरण । मग तेथोनि पुढें चालले ॥१४॥

कोणी जरी कांहीं दिधलें । तरी मुखीं माय घ्यावें तेतुलें । कोणी बलात्कारें पदरीं बांधिलें । तरी पंचा त्यागुनी पळावें ॥१५॥

उकंडगांवीं उत्तरेश्वरापासीं । नाना श्रोत्री भेटला हंसस्वामींसी । तेथें भागवत ऐकिलें दिननिशीं । एकमासपर्यंत ॥१६॥

तेणें ओळखून खुणा पुसिल्या । त्या त्या अधिकारा ऐशा तया सांगितल्या । तयाच्या सदवृत्ति असती लागल्या । नारायणहंसचरणीं ॥१७॥

पुढें रामपुरीमाजीं आले । तेथें रामचंद्र बाबा भेटले । उभयतां खुणेसी बाणले । मग आले शेवतिया ॥१८॥

तेथें राहोनि दहा दिवस ज्ञानेश्वरी आणिली मनास । तेथोनी आले राजापुरास । तेथें एक वेडा उमजविला ॥१९॥

तेथोना तलवडियासी आले । नागनाथहंसांचें स्थळ आठविलें । तया देवीपासीं पांच रात्र राहिले । परी भोजन झालें एकदां ॥२०॥

तेथें गोंधळी एक होता भला । तयासी अजपेचा मार्ग दाविला । पुढें खांडवीमाजीं येतां आला । आला वेडा म्हणती लोक ॥२१॥

तेथें लोकीं उदंड सळिलें । परी दोघानीं चिन्ह ओळखिलें । तया सीतारामा आनंदभटा सांगितलें : । मानसपूजाविधान ॥२२॥

पांच दिन तेणें घेतलें ठेवून । मौनेंचि पळून निघाले तेथून । नंतर नामलगांवा येतां एक ब्राह्मण । माहुलीकडील भेटला ॥२३॥

तो दत्तात्रेय म्हणुनि पाठी लागला । म्हणतसे कृपेसरिसें अन्नवस्त्र पाहिजे मजला । तयासी धोंडे मारुन परता सारिला । पुढें बीडही ओलांडिलें ॥२४॥

आनंदगडीं एकरात्र राहून । चौसाळिया राहती एकदिन । पुढें विटेमाजी अति आवडी येऊन । स्वामींची भेटी घेतली ॥२५॥

पुढें तडोळियासी पातले । दहा दिवस तेथें राहिले । माघ वद्य नवमीचें शेष घेतलें । तया स्थळीं ॥२६॥

तेथुनी लेणियापासीं बोंबल्या मारुती । तया अरण्यांत तीन राती । तेथें बाळोबाची भेटी जाली आयती । तेणें सदनीं नेले प्रार्थुनी ॥२७॥

तो भावार्थी अनन्य प्रज्ञामंद । तया निदिध्यासाचा लाविला छंद । त्याची कांता साळू नाम्नी तिसी विशद । मंत्र -उपदेश केला ॥२८॥

पुढें तुळजापुरासी आलिया । चवदा दिवस लोटले ठायीं तया । तेथें सखारामबाबा रक्तपितिया । परी अंतरीं समाधानी ॥२९॥

तो समानशील आणि शांत । त्याचें मनासी मिळालें मनोगत । प्रतिदिनींहि संवाद सुखें करित एकत्रवासें ॥३०॥

मग निघोनी तुळजापुरीहुनी । मार्गी चालतां नववें दिनीं । पातले डोमगांवालागुनी । संवत्सरप्रतिपदेसी ॥३१॥

रामनवमी हनुमज्जयंती । पक्ष एक राहिले त्या स्थळावरुती । सखारामबावाची कीर्तनवचनोक्ति । ऐकिली वेदांतपर ॥३२॥

मनीं भाविलें कीं हा असे ज्ञानी । परी आजचि ओळखी न देवूं यालागुनी । तों जनार्दन उत्पात पंढरपुराहुनी । आलेसे उत्साहा ॥३३॥

तेणें नारायणहंसां ओळखून । सखारामबावासी सांगितलें जाऊन । नंतर सत्कार करिते जाले आपण । केव्हां संवादहि होय ॥३४॥

नंतर सर्वही मिळून । जाते झाले पंढरीलागून । मार्गात परस्परे बाणली खूण । त्रिवर्ग -एकमेकांची ॥३५॥

मग सखारामबाबा नारायणहंसांसी । विसंबती ना क्षणभर मानसीं । एकत्रचि राहिले पंढरीसी । मासपक्षपर्यंत ॥३६॥

परी एक शय्या एक आसन । एकत्र स्नान एक भोजन । ग्रामांत फिरतांहि सहगमन । सदा वेवादन सुखानुभावें ॥३७॥

अंतर्हेतु नारायणहंसांचा । एकदा सज्जनगड पहावा साचा । एके दिनीं मध्यान्हीं भास स्वप्नांचा । जाला तो बोलिजे ॥३८॥

जनार्दन उत्पाताचे माडी आंत । त्रिवर्गहि निद्रा करिती निवांत । संप्रदायी विजनें असती घालित । तेणें निद्रिस्थ त्रिवर्ग ॥३९॥

तंव स्वप्नामाजीं नारायणहंसांसी । बैसलियापरि वाटे आसनासी । मांडीवरी देखिलें सखारामबावासी । उसें देउनि निजलेती ॥४०॥

सखारामें कंठीं घालुनी । म्हणती ओळखिलें काय मज लागुनी । नारायणहंस म्हणती मुखेकडुनी । कीं डोमगांवकर असा ॥४१॥

तंव बोलती कैचा सखाराम । कोठोनि काढिलें गांव डोम । मी असे सज्जनगडधाम - । निवासी समर्थ ॥४२॥

तुज भेटी द्यावी वाटली चित्तीं । म्हणोनि पातलों सत्वरगती । तंव आवाळूंहि देखिलें भाळावरुती । आणि जटाही मस्तकीं ॥४३॥

पूर्वी भासली ते आकृति लोपली । सांग समर्थाची मूर्ति देखिली । पाहतां चित्तवृत्ति आनंदली । नारायणहंसांची ॥४४॥

त्या आंनदें नेत्र झाकिले । पुन्हां जागें होउनि नेत्र उघडिले । तंव माळवदाची काष्ठें देखिलें । तेणें तळमळिलें अंतर ॥४५॥

पुनरपि नेत्र झांकोनी जों पाहती । तों समर्थांची मूर्ति मांडीवरुती । निरखितां तें स्वप्न ना जागृति । परी मूर्ति स्पष्ट निजेली ॥४६॥

नंतर समर्थे मुख कुरवाळुनी । बोलते जाले मधुरवाणी । तळमळ कां वाटली होते मनीं । या असत्याच्या वियोगें ॥४७॥

मी तिही अवस्थेंचा जाणता । अखंड असे तुझिया अतौता । आणि बोधहि करुन त्यावरुता । ऐक्यता दाविली तुझी माझी ॥४८॥

हें समाधानही तुज बाणलें । दृढतर मजलागींही कळलें । आजी मिथ्यात्त्वें साकार दाखविलें । त्याच्या वियोगें तळमळ कां ॥४९॥

आता तूंचि मी अससी परिपूर्णं । कल्पांतीही भावूं नको आन । मग विनविता झाला नारायण । जी जी सत्य सत्य ॥५०॥

मग वंदोनि मौन धरिलें । स्वसुखींच मन समरसलें । मागुती समर्थ बाहते जाले । आशीर्वचनेंकडोनी ॥५१॥

तुझिये समाधानासी भंग । कालत्रयीं नव्हेल उमग । परी एक चालवावा पुढें मार्ग । सिंदूरवर्णवस्त्राचा ॥५२॥

पूर्वी झगा उध्दवस्वामींचें अंगाचा । तया सेंदूर लागला मारुतीचा । तोचि मार्ग चालावा हेतु अमुचा । परी आजवरी चालिला नाहीं ॥५३॥

तस्मात तुजपासुन जो संप्रदाय । वाढेल जो का यथान्वय । तया सिंदूरवर्णवस्त्राचा उपाय । चालविला पाहिजे ॥५४॥

इतुकें बोलोनि अंतर्धान पावले । मग नारायणहंस उठोनि बैसले । सखारामबावासी उठविलें । सर्व वृत्तांत सांगितला ॥५५॥

उभयतांही सप्रेम होउनी । एकमेकां प्रवर्तले आलिंगनीं । त्या सुखाची मर्यादा वाखाणी । ऐसा कवण ॥५६॥

सखारामबावा करी विनंति । जी माझी पुरवावी चित्तवृत्ति । येउनि राहावें डोमगांवाप्रति । मी सेवाधार आहे जंव ॥५७॥

तंव नारायणहंस निवेदिती । माझिया सर्व करण्याची जाली समाप्ति । कोठेतरी करावी वस्ती । देह असे तोंवरी ॥५८॥

परी मी सज्जनगडा एकदा जाऊन । येईन डोमगांवालगुन । तस्मात तूर्त जावें जी स्वयें आपण । भेटी होईल पुढती ॥५९॥

नंतर सखारामबावा डोमगांवासी । जाते जाले स्वस्थानासी । परी ध्यास लागला एकमेकांसी । परस्परा उभयतां ॥६०॥

पुढें नारायणहंस पंढरिये राहिले । सज्जनगडाजावया सिध्द जाले । तंव जनार्दन उत्पातें ठेवून घेतलें । तो म्हणे मी जाऊं नेदी ॥६१॥

नारायणहंस म्हणे चातुर्मास । येथेंचि राहूं परी एक मानस । तुमचें सदनीं नव्हेलचि वास । तरी बाहेरी स्थळ दाखवा ॥६२॥

मग प्रदक्षिणेच्या वाटेवरी । एक सुंदर असे वोवरी । पूर्णाश्रमस्वामी तथा माझारीं । राहत असती ॥६३॥

या स्थळीं नारायणहंस राहिले । प्रतिदिनींहि भेटीस उत्पात येते झाले । केव्हां हंसराजही भेटीस जाती वहिले । तयाचें सदनीं ॥६४॥

असो पूर्णाश्रमस्वामीहि परिपूर्ण । अविट तृप्ति सहज समाधान । तेंही पाहतां हंस नारायण । संतुष्ट जाहले ॥६५॥

उभयतांचे संवाद होती । तेणें परस्परें संतोषती चित्तीं । उभयतांसीहि वाटे सुसंगति । न विसंबिती एकमेकां ॥६६॥

एके दिवशीं स्वामीसी विस्मरण पडिलें । नारायणस्वामीम्हणोनि बाहिलें मग हंस वंदोनि पुसते जाले । जी जी मीं स्वामी कैसा ॥६७॥

तंव स्वामी बोलती आवेशेंसी । भगवें वस्त्रें असती आम्हांसी । परी तूं होसी पांढरा संन्यासी । यांत संशय असेना ॥६८॥

असो वोवरीमाजी असतां उभयतां । मंडळी मिळतसे सभोंवता । वेदांतचर्चा होतसे तत्त्वतां । सुखावरी सुख उचंबळे ॥६९॥

जनार्दन उत्पात बयाबाई । गोविंदबाबा बाळू सीताबाई । इत्यादि मिळताती समुदायी । मागुती जाती स्वस्वधामा ॥७०॥

ऐसा चातुर्मास आनंदें लोटला । तंव स्वामीसी हिंदुस्थानासी न्यावयाला । एक संभावित गृहस्थ आला । स्वामी जावया सिध्द जाले ॥७१॥

सर्वत्रांचेंहि उदास जालें मन । कीं आतां पुन्हां नोव्हे दर्शन । असो एकदिनीं सर्वी मिळून । तेथेंचि स्वयपाक केला ॥७२॥

भोजनसमयीं स्वामीनीं अपुलें । नारायणहंसां पात्र दिधलें । संन्यासी व्हाल निश्चयें कथिलें । हंसही म्हणती तथास्तु ॥७३॥

मागुती स्वामींसी हंसनारायण । बोलती कीं प्रेषोच्चार करा मजलागुन । तेंही मंत्र दिधला लिहून । कीं पाहिजे तेव्हां व्हा संन्यासी ॥७४॥

अमुक कोणी साक्षी लागे । अथवा संन्यासी असावा प्रसंगें । इतुकें ज्ञानियासी न लगे । आधीच विद्वत्ता असे ॥७५॥

तरी मनासी आवडेल तेव्हां । स्वतांच न्यास या रीती करावा । इतुकें सांगून सहजस्वभावा । स्वामी गेले हिंदुस्थाना ॥७६॥

एके दिनीं नारायणहंस आणि । जनार्दन उप्तात दोघे मिळोनी । विचार केला साहित्य मेळउनी । वामनस्वामींस पाचारिलें ॥७७॥

कातिक शुध्द सप्तमीचें दिवसीं । प्रेषोच्चार केला यथाविधिसी । परी दंडादि चतुर्थाश्रमकर्मासी । स्वीकारिलें नाहीं ॥७८॥

आधींच सर्वकर्मासी अतीत । स्थूळ वसनाचा त्याग करित । सूक्ष्मग्रंथि तोडिलें यज्ञोपवीत । कारणशिखाही उपडिली ॥७९॥

अकार भूर्लोक विश्वाभिमानी । तैसाचि उकार भुवर्लोक तैजसालागुनी । तिसरा स्वर्लोक मकार प्राज्ञ ते क्षणीं । ज्ञानोदयींचि नाशिला ॥८०॥

इतुकें पूवींच जालें असतां । वरुते लोकरीती मात्र वर्ण होता । तेही त्यागिले कर्मा समस्ता । शिखावसनयज्ञोपवीतसे ॥८१॥

शिखेसहित रुद्राक्षहि त्यागिला । जो का शिखरीं होता प्राप्त जाला । तो आण्णा उत्पातें स्वीकारिला । प्रसाद म्हणोनी ॥८२॥

काषाय वस्त्र मात्र स्वीकारिलें । परी संन्यासपध्दति -कर्म नाहीं केलें । तें तें सहज पूर्वीच असे घडलें । आतां स्थूल क्रिया कासया ॥८३॥

अष्टदेह पिंडब्रह्मांड । हाचि अष्टपर्व नारायणदंड । या सर्वत्रीं एकरुपता पाहणें वाड । हें स्वानुभवें हातीं धरणें ॥८४॥

कमंडलु हा पंचभूतांचा । चैतन्यजलें भरिला साचा । कमंडलु फुटतांहि पाणियाचा । नाश नव्हे कदा ॥८५॥

जितका जंगम प्राणी असे । तितुक्यामाजी सोहंजप होतसे । तितुका आपणचि करतों वाटतसे । हाचि जपु प्रणवाचा ॥८६॥

असो सकर्म न अकर्म । ना बोलवेनाचि निष्कर्म । सदा आप्तकाम पूर्णकाम । आत्माराम निजांगें ॥८७॥

परी मुमुक्षूसि करावा बोध । इतुकेंच उरलें करणें सुबुध्द । कारण कीं उपेक्षा नव्हेचि शुध्द । अधिकार जरी ॥८८॥

अधिकारहि नसे जयासी । तरी साधनें सांगावी तयासी । जेणें अधिकार यावा अनधिकारासी । परी अनन्य पाहिजे ॥८९॥

अज्ञानाविषीं करावी तळमळ । अनन्य भावार्थिया साधन सुकाळ । मुमुक्षु साधकासी तो प्रांजळ । ज्ञानोपदेश करावा ॥९०॥

ज्ञानी जरी पूर्ण मिनतां । तया संवाद करावा तत्त्वतां । कांहीं संशयहि जरी असतां । निर्मूळ व्हावा ॥९१॥

पाषांडी खळ जे जे असती । ते पस्तावुनि सोडावें चित्तीं । परी ते मळिन पडिले भ्रांतीं । तया मौनचि बरें ॥९२॥

हा परकी कीं आपुला न म्हणावा । तयासी हित उपदेशचि करावा । मजपासीं भाव तरी असो द्यावा । हेंचि अज्ञान करिती ॥९३॥

तूं पराचा अससी उपदेशी । हें तो मानसीं न ये कल्पांतेसी । अथवा मंत्र हा घ्यावा मजपासीं । हें कधींच न घडे ॥९४॥

उपदेश घ्यावया आले जे जे । तयां सर्व गुरुचि हा बोध कीजे । जैसा अधिकार जयाचा सहजे । तैसा दाविजे मार्ग तया ॥९५॥

कोणी पराचिये शिष्य असतां । भावार्थे जरि पुसों येतां । त्याचे गुरुसी उणीव न आणितां । तया हित तें सांगावें ॥९६॥

असो उपदेशापरतें करणें । आणिक नुरे काळीं कवणे । देहादिक स्नानभोजनें । परपेक्षा होती ॥९७॥

कोणी निंदिती कीं स्तविती । त्याची अंतरीं नव्हेचि विकृति । जैसीं बाळकें असती नेणतीं । त्यांचा अपराध नेणे पिता ॥९८॥

तेथें बाबाजी एक अधिकारी होता । तया बोधिलें शुध्द वेदान्ता । तयासी दृढ झाली कर्तृतंत्रता । परी त्रिपुटी मात्र उरली ॥९९॥

लक्ष्मणनामें एक मंदप्रज्ञ । तया शिकविलें चतुष्टय साधन । परी तो नष्ट भावहीन । भावार्थ सोडितां मुकला ॥१००॥

अण्णा उत्पात भावार्थी पाहिला । तया मानसपूजेचा निर्धार कथिला । गुरुपादुकाही दिधली पूजेला । आणि प्रास्ताविक वैराग्य ॥१०१॥

असो हंसदीक्षा घेतल्यावरी । तीन मास राहिले पंढरीं । तेथें एक आला ब्रह्मचारी । आसनादि विधि करित ॥१०२॥

तयाचें वैराग्य मात्र पाहुन । आणिलें अपुलिये संनिधान । सिध्दांत -वचनें सांगती प्रतिदिन । परी पूर्वचिन्हें पालटती ना ॥१०३॥

असो एकदा डोमगांवाहुन रामा नामें भेटला येउन । तेणें सांगितलें सर्व वर्तमान । कीं सखारामबावा स्मरती ॥१०४॥

ऐकतांचि हंसस्वामी बोलती । तो तरी आमुचा सखा निश्चिती । चला जाऊं त्याचे भेटीप्रति । हें मानलें ब्रह्मचारिया ॥१०५॥

पहिलें तो नारायणाचि नाम । पुढें घेतला जरी आश्रम । तरी नारायणतीर्थचि अनुक्रम । दीक्षागुरुनें ठेविला ॥१०६॥

असो नारायणतीर्थ आणि ब्रह्मचारी । डोमगांवा जावें म्हणोनि निर्धारी । वस्त्रपात्र पुस्तकें सारीं । वांटोनि निघाले उभयतां ॥१०७॥

ग्रामवासियां समजलें । ते बोळवित कित्येक आले । सहावें दिनीं डोमगांवा पोंहचले । कळलें सखारामबावासी ॥१०८॥

तेहीं बाहेर आडवें येऊन । समारंभें गेले घेउन । बहुतचि म्हणती उदेला सुदिक भेटीसरिसा ॥१०९॥

बाळाजीपंत अंबाबाई । तेही बोलाउन आणिलें ते समयीं । नित्य नूतन आनंदाची नवाई । संवादसुखेंकडोनी ॥११०॥

माघ वद्य रामनवमी । समाजासह जाली अनुक्रमीं । पुढें विचारिते जाले हंसस्वामी । संखारामबावासी ॥१११॥

आम्ही मातृभिक्षेसी जातसों वेगीं । पुढें तसेंच जाऊं उत्तरभागीं । ऐसें हें उत्तर ऐकता प्रसंगीं । वियोगदु :ख जाहलें ॥११२॥

अहा स्वामिराया मज विश्रांतिस्थळ । भेटलें तेणें आनंद सुकाळ । सर्वही प्रपंचदु :खाची तळमळ । विसरोनि गेलों ॥११३॥

आतां वियोग स्वामि मज न द्यावा । माझिये अंतरबाह्य जाणोनि भावा । सदा सयागचि असावा । माझी सेवा स्वीकारावी ॥११४॥

आतां मातृभिक्षेसी आपणां जाणें । तरी मागुती सत्वरचि येणें । तुम्ही आम्ही जाऊं सहगमनें । सज्जनगडासी ॥११५॥

मज सांडोनि पुढें होय गमन । तरी माझीयें कंठाची तुम्हां आण । मी संतसेवेचा असे दीन । हें अन्यथा न घडावें ॥११६॥

तंव स्वामी हंस बोलती वाणी । तुम्ही नि :संशय असतां ज्ञानी । समागम इच्छितां अनुदिनीं । तरी धन्य करणी तुमची ॥११७॥

आम्हांसीहि ऐसिया संगविण । काय करणें कोठें राहुन । परी त्वरितचि येतों जाउन । घेउनि गुरुदर्शना ॥११८॥

तंव बाळोबाही स्वामीचे भेटी । आला असे उठाउठी । तया समागमें देऊनि वाटीं । लाविलें अश्विनीसह ॥११९॥

शेवाळिया जाउनि लक्ष्मणहंसांची । भेटी घेतली असे साची । नंतर मातृभिक्षा घेउनि तैसेंचि । परतोनि आले मासा एका ॥१२०॥

सखारामबावासी आनंद जाला । म्हणती स्वामि बोलिल्या ऐसें आला । असो चातुर्मास जालिया जाऊं वहिला । सज्जनगडासी ॥१२१॥

सखारामबावासी कैसें जालें । कीं दरिद्रिया निधान जोडलें । म्हणोनि तारतम्य असे ठेविलें । जामातापरी ॥१२२॥

बहुत कासयासी बोलणें । उभयतांचे देह मात्र दोन । परी एकरुप अंत :करण । कोणतेही काळीं ॥१२३॥

नातरी नारायणहंसस्वामीनें । संगति कोणाचीच न धरणें । हे एकरुप म्हणोनिच होणें । सहवास एकत्र ॥१२४॥

सदा पंचदशीची व्हावी चर्चा । अनुभवें अनुभव दुणावे साचा । जैसा दीपाचा आधार होता दीपाचा । तळीचा अंधार नासे ॥१२५॥

ते व्युत्पन्न हे अनुभवी । ते कर्तृतंत्र या वस्तुतंत्र पदवी । एवं उभयतांची मेळणी व्हावी । तेव्हां ऐक्य सहजची ॥१२६॥

एकें शब्दार्थ काढावा । एकें स्वानुभवें लेववावा । ऐसा होता जाला मेळावा । ऐक्य -पदवीचा ॥१२७॥

नारायणहंसस्वामींनीं पहिलीं । रुपावळीहि नाहीं ह्मणितली । परी संस्कृत -व्युत्पत्ति बाणली । आपेंआप ॥१२८॥

श्रुति -उपनिषचांचेही सकळ । अर्थ होऊं लागती प्रांजळ । सखारामबावासी निवळ । वस्तुतंत्रता बाणली ॥१२९॥

जरी सखारामबावाचे सांप्रदायी । तयासी आज्ञा करिती ते समयीं । अरे मजसी भेद कालत्रयीं । न कल्पावा कवणें ॥१३०॥

कांहीं पुसणें तें स्वामींसी पुसा । अन्यथा कल्पूं नका भाव सहसा । निष्कपट भाव जाणोनि ऐसा । संतोष हंस स्वामींसी ॥१३१॥

असो पुढें काशीनाथबाबा । आणि पांगरीकर रामबावा । हे काशी करोनी आले स्वभावा । डोमगांवा भेटीसी ॥१३२॥

तेणें उभयतांसी पांगरिये नेलें । गंगोदकेंसी अभिषेकिलें । मांवदेंहि सर्व सांग जालें । पुढें गेले तुळजापुरा ॥१३३॥

नंतर पंढरीसी येऊन । पातले सज्जनगडालागुन । तेथें यात्रेची दाटी जाली संपूर्ण । माघ वद्य नवमीची ॥१३४॥

आवडी नारायणहंसस्वामींची । सिध्द जाली बहुता दिवसांची । संगति सोडोनि सखारामाची । एकटे दर्शनासी गेले ॥१३५॥

राममूर्तींचें तो बाहेरुन । सहजचि केलें अवलोकन । पुढें जावोनि विवरीं दर्शन । समाधीचें घ्यावें ॥१३६॥

यास्तव आले मधील गाभारियांत । पुढें रीघ नव्हे यात्रा दाटली समस्त । म्हणोनि नेत्र लावोनि बैसले तों त्वरित । एक अदभुत जाहलें ॥१३७॥

चरणीं पादुका जटा मस्तकीं । आवाळें भालीं मूर्ति ऐसी निकी । येउनि उठवितसे एकाएकीं । म्हणती दर्शन घ्यावें ॥१३८॥

पाहतांचि खडबडोनि उठिले । एकमेकां आलिंगन पडिलें । तंव समर्थ स्वामींसी बोलते झाले । कीं स्मरण असे पंढरिचे ॥१३९॥

इतुकें बोलोनि समर्थ सज्जन । तत्क्षणीं पावले अंतर्धान । परी स्वामींसी वियोग न वाटे पूर्ण । समाधान म्हणोनि ॥१४०॥

दर्शन जालें म्हणोन माघारें फिरती । तंव एक रामदासियें धरिलें हातीं । नेऊनि समाधीपासीं निश्चिती । सोडिलें सहज ॥१४१॥

इकडें सखारामबावा दर्शन घेऊनि । बैसले मंडपामाजीं जाऊनि । मग म्हणती स्वामी कोठें आहेत पहा शोधुनी । कोणी सांगती राउळांत ॥१४२॥

मग स्वत : येऊनि हातीं धरिलें । बिर्‍हाडासि घेऊनि गेले । असो सप्तदिन तेथें राहिले । मग आले सातारिया ॥१४३॥

चाफळीं जाऊन रामनवमीं । करिते जाले अनुक्रमी । पुढें कृष्णातीरीं नांदग्रामीं । चातुर्मासीं राहिले ॥१४४॥

नंतर पंढरीसी मागुती आले । तेव्हां नारायणहंसांसी चित्तीं वाटलें । की एका गृहीं न राहावें वहिलें । एकाची सेवा घेउनी ॥१४५॥

भ्रमरा ऐसे आम्ही फिरावें । गंध -क्षुधेचें मात्र हरण करावें । परी गृहस्थकमळा सुकूं न द्यावें । हा धर्म आमुचा ॥१४६॥

तस्मात येथेंचि रहावें आतां । कीं संचारा जाऊं मागुता । म्हणोनि सखारामबावासी न पुसतां । जाऊनि बैसले व्यासापासीं ॥१४७॥

तेव्हां सखारामबावासी । स्वस्थ न वाटेचि मनासी । धुंडीत येऊनि हंसस्वामींसी । विनविते जाले ॥१४८॥

हेंचि सख्यत्त्व काय तुमचें । मज डोंगरीं सोडुनी तापाचे । जाणें हें योग्य काय साचें । असे कीं काय ॥१४९॥

तस्मात ऐसें कदा न करावें । सख्य अंतरीं खरेंचि असावें । येउनी डोमगांवी रहावें । मजपासी सदा ॥१५०॥

मज या संस्थानीं अथवा घरीं । हे तंव तापचि असती सारीं । परि मी निवेन भेटीनंतरी । संवादसुखें ॥१५१॥

मी जरी उद्योगींहि असतां । अथवा बाह्य देशावरी जातां । परी मज भरंवसा वाटेल चित्ता । कीं भेटतां सुखी होईन ॥१५२॥

ऐसिये करुणावचनेंकडून । प्रीतीनें घेत असती मोहून । ते प्रीति तो नव्हेचि उल्लंघन । कांहीहीं केल्या ॥१५३॥

सबळ काष्ट भ्रमर कोरी । परी कमळासी ढका न लावी भर जरी । तेवीं मीपणादिकांही परते सारी । परी प्रीतीचें सख्य तुटेना ॥१५४॥

एवं काय काय भाषण उभयतांचें । होत असे जें जें साचें । तें तें बोलवेना कदा वाचे । विस्तारभयेंकडून ॥१५५॥

असो हरएक प्रयत्नेंकडोन । श्रीनारायणहंसालागुन । डोमगांवा आणिलें तें बाळ चिमण । कथा बोलेल पुढें ॥१५६॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । नारायणहंसाख्यान निगुती । सप्तम प्रकरणीं ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP