श्रोते हो ऐका सावधान । नारायणहंसांचें संचरण । दु :संगीं परी नव्हेचि आचरण । अथवा मनींहि स्पर्शेन ॥१॥
गुर्जरदेशीं सुरतेसि गेले । तेथें के आप्तासि भेटले । तेणें ठेवोनिया नाहीं घेतले । परी वाटे लाविले द्रव्य देवोनी ॥२॥
मग नवसारींत तया द्रव्यावरी । व्यापार केलासे अल्पप्रकारीं । दशगुणें द्रव्य मिळालें निर्धारी । पुढें देशासी यावें जों ॥३॥
तंव त्या दुष्ट सांगातियानें । कंचनी राखोनि पाहणें । नारायणालागीही म्हणे । तूं एक पात्र ठेवी ॥४॥
तव कोपें नारायण बोलत । कीं आतां पुरें तुझी सांगात । देशीं मातापिता असती वाट पहात । तरी मज जाणें अवश्य ॥५॥
ऐसें बोलोनि नारायण निघाला । तों तोही लाजोनी संगें आला । परी मार्गी तस्कराचा पडिला घाला । प्रारब्धयोगें द्रव्य गेलें ॥६॥
तैसेंच निष्कांचन होऊनि । येउनि भेटले पितरांलागुनी । परी तळमळीमुळेम अल्पचि दिनीं । पुन्हां गेले हिंदुस्थाना ॥७॥
तो मित्रहि असे सांगातीं । पोहचले जावोनि ग्वाल्हेरीप्रति । तेथें तो मृत पावला निश्चितीं । दु :संग होता तो तुटला ॥८॥
मागाहून नारायणाचा मामा । पातला तेथें द्रव्यसकामा । शिंद्याची कांता नामें रुक्मा । ते सखी रेणुकाबाईची ॥९॥
तिसी कळलें वर्तमान । तिनें ठेवून घेतलें देऊन धन । परी तें तेथेंचि वेंचलें संपूर्ण । सदनाकडेही न येतां ॥१०॥
वडील बंधु भेटीसी आला । तो मात्र द्रव्य देऊनि मार्गस्थ केला । परी तोही नेदीच मातापित्याला । राहिला अन्यस्थानी ॥११॥
इकडे मामाभाचिया उभयतांसी । रुक्माबाई नेत दर्शनासी । ते विचार करिती जाली मानसीं । कीं यांसी वाटें लावावें ॥१२॥
आपुली खासगत पागा आदिकरुनी । याच्या द्यावी स्वाधीन करोनी । परी प्रारब्धाची भिन्न करणी । विक्षेप केला दिवाणें ॥१३॥
तेणें अनेक प्रकारें समजाविलें । बाईच्या मनांत विक्षेप घातलें । तेव्हां ययासी काढोनि दिधलें । छावणीबाहेरी ॥१४॥
नारायणहंसें आनंद मानिला । म्हणे ईश्वरु प्रपंचीं न गोवी मला । कांहीं संचय होता तो घेतला । पुढें जालें ते ऐका ॥१५॥
मातापिता हिंगणीस जे होते । ते परभणीस गेले मागुते । अनन्यगतिक होत्साते । मूळपदीं आले ॥१६॥
असो मानव कीं दानव । कीं तयाहून थोर असो देव । दैवापुढें उपाव । कुणाचाही न चले ॥१७॥
हे समजोनि हंसनारायण । परभणीस करिते जाले गमन । तों मार्गामध्यें एक भेटला ब्राह्मण । तेणें द्रव्य मागितलें ॥१८॥
होतें तें द्रव्य तया देऊन । परभणीस आला नारायण । मायबाप अति पावले शीण । परी उपाय नाहीं ॥१९॥
पुढें परभणीमाजीं काम पागेंचें । नारायणासी जालें साचें । तेणें उपजीवन होत प्रपंचाचें । कांहीं वेचे धर्मार्थ ॥२०॥
स्त्रिसीहि ऋतु प्राप्त झाला । फळशोभनाचा समारंभ केला । परी संतोष नसे नारायणहंसांला । संगही घडे साचौ मासीं ॥२१॥
अंतरीं तळमळ परमार्थाची । किंचितही प्रपंची नसे रुची । अवधि पहातसे सुटकेचि । परी प्रारब्ध न सोडित ॥२२॥
मग नारायण विचार करी मनांत । की निष्कामकर्मी तरी असावें रत । उपासनाही असावी निश्चित । ते तरी सोडवी येथुनी ॥२३॥
तो कर्मउपासनेचा विधि कैसा । घडला जो का नारायणहंसा । प्रतिदिनीचा प्रकार अल्पसा । बोलिजे अवधारा ॥२४॥
ब्राह्मी मुहूर्ती उठावें । शौचविधीसी संपादावें । संध्यास्नानप्रात :स्मरणासी करावें । अरुणीदयीं स्नान ॥२५॥
पुढें आसनविधि भूशुध्दि । प्राणायामादि भूतशुध्दि । अंतर्मातृकाबहिर्मातृकेचा विधि । पापपुरुषविसर्जन ॥२६॥
कलशादिकांचें करुनि स्थापन । श्रुतिस्मृतिपुराणोक्त आचमन । प्राणायाम उभयही मार्जन ।अर्ध्यदान यथाविधि ॥२७॥
प्रतिअर्ध्यास न्यास ध्यान । आवाहन आणि विसर्जन । चतुर्थ अर्ध्य प्रायश्चितार्थ देउन । पुन्हां आचमन तीन प्रकारें ॥२८॥
शापमोचनादि ध्यान न्यास । यथाविधि करावे मुद्रेस । पुढें आरंभ करावा जपास । सह्स्त्रसंख्या गायत्रीचा ॥२९॥
प्रात :काळी उभे राहोन । जप करावा परे वाचे कडोन । नंतर उत्तर न्यास ध्यान मुद्रा करोन । उपस्थान म्हणावें ॥३०॥
पुढें पंचायतन -शिव -पूजा करावी । मानस पूजाही यथासांग व्हावी । नंतर पागाही अवलोकावी । लिहिणें तें लिहावें ॥३१॥
मागुती स्नान करोनी माध्यान्हीचें । यथाविधान माध्यान्हसंध्येचें । सूर्योपस्थान करोनि साचें । ब्रह्मयज्ञ करावा ॥३२॥
मातापिताहि असतां । देवऋषितर्पण करावें तत्त्वतां । आर्यमादिही पितरां समस्ता । तृप्त करावें ॥३३॥
परी ब्रह्मयज्ञापूर्वी जप । सावित्रीचा करावा ससंकल्प । तो पश्यंती वाचेनें बैसोनि साक्षेप । सहस्त्र संख्या ॥३४॥
वैश्वदेव नैवेद्य बलिहरण । यथाविधी अतिथिपूजन । मंडळींसहित करावें भोजन । पुढें अवलोकावे ग्रंथ ॥३५॥
भगवद्गीता शिवगीता । सहस्त्रनामें तिन्ही गुरुगीता । हा स्त्रोतपाठ होतसे तत्त्वतां नियमेकडोनी ॥३६॥
मध्यें व्यवसायही करावा । सर्व लोक राजी राखावा । निदिध्यासही असे बरवा । शिव -राम -नामांचा ॥३७॥
अस्तमानीं भस्मस्नान । यथाविधि संध्या संपूर्ण । जप करावा मध्यमा वाचेन । तुर्ये पदेसी सरस्वतीचा ॥३८॥
नंतर भजनही करावें । आरतीशेजारतीसी म्हणावें । फलाहारादि सर्व सारावें । मग निवांत बैसावें एकांतीं ॥३९॥
तेथें मानस पूजा करावी सांग । अथवा करुणारुप मनासी उद्योग । तेथें कवित्त्वें उमटावे प्रसंग । जैसा आल्हाद मनाचा ॥४०॥
नंतर निद्रा सुखें करावी । उत्थानीं पूर्ववत वर्तणूक व्हावी । कवित्त्वें कांहीं लिहून ठेवावी । कांहीं जावी विस्मरें ॥४१॥
कोठें कांहीं अधिक देखिलें । तें तें पाहिजे अंगें केलें । एक वेळे जें देखिलें कीं ऐकिलें । तें तें येतसे स्वयेंचि ॥४२॥
सदा अंतरामाजीं तळमळ । कीं कधी तुटेल ही कर्मखळखळ । केव्हां परमार्थसुखाचा होय सुकाळ । केव्हां गुरु दयाळ कृपा करी ॥४३॥
असो पागेचेंही काम निघालें । पुढें सरदेशपांडेगिरीचें जालें । हद्रे आणि अर्धापुर महाले । असतीं दोन्ही ॥४४॥
परी फिरणेंचि लागे सदा । दो स्थळीचा पहावा धंदा । आणि पूर्वरीती कर्मही सदा । भजनासहित होतसे ॥४५॥
स्त्रियेंचे नाम लक्ष्मीबाई । तेही आणोनि घालितसे आई । पेशकारीचे दप्तर ते समयीं । लिहित असे हद्रियाचे ॥४६॥
द्रव्य जें होईल उत्पन्न । त्याचा तेथील जो वेंच होऊन । कांहीं विभाग देतसे दान । कांहीं धाडी पितरांकडे ॥४७॥
नंतर शहरासीहि जाणें जालें । तेथिल काजही संपादून आणिलें । पुढें यजमानाचें मन फिरलें । वेतनाविशीं ॥४८॥
हें पाहून त्यागिलें काम । सदनीं राहिले चालविती कर्म धर्म । परी मन झालें उदास परम । त्याग करावा वाटे ॥४९॥
परी अंतरीं सुचतसे उपाय । कीं नुसधा त्याग करुनि काय । जेणें परमार्थाची सापडे सोय । यास्तव ग्रंथ धांडोळित ॥५०॥
दासबोध आणि दीपरत्नाकर । भागवत -एकादशाची टीका सुंदर । आणीकही प्राकृत ग्रंथप्रकार । अध्यात्माचे पाहिले ॥५१॥
साधूंची लक्षणें कैसी कैसीं । वर्तणूक असे जैसी । अनुभवा आणी तैसी तैसी । क्षांति दांति आदि ॥५२॥
देहींच देव असे खरा । त्याची प्राप्ति ज्ञानद्वारां । परी न येचि निर्धारा । गुरुवांचूनि ॥५३॥
उपक्रम उपसंहार तत्त्वांचा । कोण व्यापार असे कवणाचा । माया ईश जीव जगताचा । आरोप मिथ्याही कळला ॥५४॥
भूतांचीं रुपें भौतिकाची प्रतीति । हें कळलें असे निश्चिती । जितुकी जाणावयाची रीति । शब्दें केली ॥५५॥
आत्मा ब्रह्म हेंही कळलें । परी निश्चयासी नाहीं आलें । कां जें गुरुमुखें विवरिलें । नाहीं म्हणुनी ॥५६॥
गुरुविण ज्ञान न जोडे । हें निश्चयें कळलें उघडें । तरी गुरुराज कधीं भेटती कोडें । केव्हां सांकडें निरसेल ॥५७॥
ऐसेंच लागलें असे ध्यान । मज कैसें होइल गुरुदर्शन । गोड न लागे अन्नपान । सर्व भोगांसी मन विटलें ॥५८॥
कवणासी बोलूं जातां मनीं । अंतरीं आठवे मोक्ष पाणी । कोण कार्य कवणा अनुसंधानीं । विसरुन जावें ॥५९॥
मृदुशय्या कीं कठिण त्वचेसी । स्त्री कीं पुरुष न ये स्मरणासी । गुरुराजा बैसला दृढ मानसीं । दुसरें आठवूं नेदी ॥६०॥
नेत्रांसी कांहीं जरी भेटे । गुरुचि मनीं आला वाटे । मज बोध करील काय नेटे । खुणा सांगेल कीं मज ॥६१॥
येरी ते अज्ञान संसारिक । ते काय सांगती बापुडे विवेक । तेणे अधिकचि वाटतसे शोक । विकल अतिशय ॥६२॥
बहु बोलणें असे काय । जैसी पडली व्याघ्रसमुदायीं गाय । तैसें चित्त व्याकुळ होय । वास पाहे कैवारियाची ॥६३॥
गायीसी वाटे कीं कोणी येता । मज होईल काय सोडविता । तैसे सदा उद्वार होती चित्ता । परी ते सफळ कैचे ॥६४॥
कोणी साधु वेषधारी मिळाले । तयांसि जाऊनि पुसतां वहिले । आधीं म्हणती मंत्र घे पहिलें । पुढें मोक्षपद अंतीं ॥६५॥
तयाचें ओळखावें चिन्ह । परी न दाखवावें त्या बोलून । ऐसे धुंडिले बहुतकरुन । तेथें परमार्थ अप्राप्त ॥६६॥
तेणें अधिकच तळमळ । जैसें तान्हेलें मृग पाहे मृगजळ । परि नाढळतां परमार्थरुप जळ । कामनातृषा हरेल कैसी ॥६७॥
कोणी म्हणती भजन करावें । तेणें तत्काळ परलोका जावें । एक म्हणती स्वधर्मींच रत असावें । तेणें लोकांतरप्राप्ति ॥६८॥
एक म्हणती करावें दान । एक म्हणती तीर्थाटण । एक म्हणती पुरश्चरण । करितां सुटे ॥६९॥
एक म्हणती देव भेटावया । अतिशय झिजवावी काया । हें ऐकतां करीन म्हणे निश्चया । परी दृढ कोणी न करिती ॥७०॥
कोणी म्हणे योग करावा । एक म्हणे कासया पाहिजे गोवा । एक म्हणती भावार्थ असावा । अनन्या रक्षी देव ॥७१॥
ऐसें ऐकुनिया जीवीं । सगुणीं अति आवडी उठावी । करुणा भाकितसे बरवी । एकांतीं अटाहास्यें ॥७२॥
प्रल्हाद ध्रुवबाळ उध्दरिलें । गजेंद्रअजामीळार्थ धांवणें केलें । आतां काय असेल जालें । कांहीं कळेना ॥७३॥
कोणी म्हणती मुद्रा करावी । तेणें ब्रह्मरुपाची ओळखी व्हावी । तेही करितां लखलखी उठावी । परी तृप्ति कैची ॥७४॥
कोणी अजपाचें निरुपण केलें । षडचक्रें समात्रा निरोपिलें । न्यासध्यानही सर्व ऐकिले । तेही प्रतिष्ठिले अंतरीं ॥७५॥
कोणी म्हणती आकाशचि ब्रह्म । येर मायेचा दृश्य विभ्रम । हें ऐकतां हाचि धरिला नियम । सर्वदा चित्तीं ॥७६॥
जेणें कांहीं सांगितलें तयासी । पुसों जाय कीं ब्रह्मलक्षणें कैसीं । ते वडाची साल लाविती पिंपळासी । तेव्हां उगेचि बैसावें ॥७७॥
एक संन्यासी होता भेटला । तो गुरु म्हणोनी भाव धरिला । तयासी तुर्येचा विचार पुसिला । तो म्हणे माझें वृध्दपण ॥७८॥
आतां सर्व जालें विस्मरण । हें ऐकुनीहि भावार्थ नव्हे न्यून । या घटीं न सांगा जरी मजलागून । तरी अन्य देह धरुन सांगाल ॥७९॥
परी तळमळ अधिकची उठे । केव्हां गुरु कृपा करील वाटे । कोणतेही व्यापारीं अंतरीं उमटे । गुरुत्त्वचि सदा ॥८०॥
पूजा जप कीं मानसपूजनीं । गुरुचि आठवतसे ध्यानीं । आसनीं शयनीं कीं भोजनीं । गुरुविण असेना ॥८१॥
स्तोत्रें सहस्त्रनामें गुरुचि । मुखें उच्चार मनीं गुरुरुपचि । कवणासी संभाषण करितांहि साची । गुरुविस्मृति पडेना ॥८२॥
येर व्यापार तो सर्व राहिले । एकाचे अन्यथाच होऊं लागले । सर्व म्हणती हें कैसे जाहलें । वेडिया ऐसें ॥८३॥
स्वप्नींही गुरुचि आला वाटे । ते वेळ खडबडोनिया उठे । हे गुरो आरोळी देत नेटें । धावतां पडे अडखळोनी ॥८४॥
मागुती उठोनी म्हणे काय जालें । गुरुरायें स्वरुप काम लोपविलें । अहा प्रारब्धा त्त्वां घर बुडविलें । अहा चांडाळा ब्रह्मया ॥८५॥
अहा विष्णु हे सदाशिवा । गुरुरुप धरुन प्रगटाल केव्हां । अहो हे दत्तगुरुराज स्वभावा । कां भेटी मज न द्या ॥८६॥
अरण्यामाजीं उगेंचि फिरावें । आठही दिशा अवलोकावें । गुरु आला आला ऐसेंहि वाटावें । मागुती तगमग ॥८७॥
एक स्थळीं निवांत बैसावें । अंतरीं गुरुसी सतत घ्यावें । एकाएकीं खडबडोनि उठावें । जावोनी भेटावें वृक्षा ॥८८॥
गुरु गुरु म्हणोनि हाका मारी । हे सनत्कुमारहो कां न या झडकरी । हे नारद याज्ञवल्कि कपिल ब्रह्मचारी । हे जनकां तूंहि न येसी ॥८९॥
अरे तुज रामें जातां निरविलें कीं माझे भक्ता पाहिजे संरक्षिलें । तें काय तुज विस्मरण पडिलें । कीं देखिलेंच नाहीं मज ॥९०॥
हे राम हे कृष्ण हे दिनकरा । हे निवविसीना कां तूं चंद्रा । अगा हे वानररुपा अंजनीकुमारा । तूं कां निवांत बैससी ॥९१॥
अहा गुरुराया समर्था सज्जना । तुजही न ये माझी करुणा । हे निवृत्ति ज्ञानदेवा मजसी दीना । काई कृपा न करा ॥९२॥
हे मुकुंदराज शिवरामस्वामी । काय जाला हो केशवस्वामी । हे रंगनाथा तुज अंतर्यामीं । कळवळा कां न ये ॥९३॥
हे कबीर तुकारामा । अगा हे कल्याणा सुखआरामा । कोणी गुरुभक्त कां गुरुपादपद्मा । प्रार्थना न करिता ॥९४॥
अगा गुरुराया तुझें ब्रीद । गात असती चारी वेद । आतां काय झाली कृपा मंद । कीं संवाद विसरसी ॥९५॥
कीं विश्वचक्षु अंधळा जाला । कीं वेदार्थनादें बहिरावला । कीं विश्वरुपियाचे सर्व देहाला । सुनबहिरी जाली ॥९६॥
मागुती एक सुचली बुध्दि । कीं मीच असे थोर अपराधी । म्हणोनि न भेटे मज कृपानिधि । जवळी असोनी ॥९७॥
मी कामक्रोधें असे वेष्टिलों । मदमत्सरांचे मेळीं पडिलों । स्वजनाविषयांचे प्रीतीं गुंतलों । यास्तव दयाळू न ये ॥९८॥
तरी प्रतिज्ञा माझी असे ऐसी । आधीं मारीन जिवेंचि कामासी । क्रोधाचें रक्तपान या समयासी । करीन नि :शेष ॥९९॥
मदमत्सरासी निर्दाळीन । आशा -पापिणीचा तो घेतला प्राण । आतां अहंकारही जितचि धरीन । तरिच म्हणवीन जन्मलों ॥१००॥
जरी इतुकें हें मी न करितां । हे गुरु मुख दाखवीन तुज तत्त्वतां । मज ते जनिलीच नाहीं माता । मलविसर्ग केला ॥१०१॥
अजागलस्थ जैसें स्तन । कीं उगाचि जड जालों पाषाण । बोलिलें न करी जरी वचन । तरी मज सज्जनें त्यागावें ॥१०२॥
ऐसें बोलोनि नाहीं राहिला । विवेकवैराग्य साह्य करिता जाला । रणशूर वैरियावरी जैसा उठावला । भुजा आफळोनी ॥१०३॥
गुरुविण दुजें कांहीं नेणे । तरी इह कीं पर पदार्थ असती कवणे । येणें गुणें काम पावला मरणें । जेवी पतंग दीपावरी ॥१०४॥
गुरुराजचि एकरुप सारा । निंदास्तुतीसी कोण येथें दुसरा । ऐसिया योगें क्रोध एकसरा । दग्ध जाला ॥१०५॥
मद मत्सर दंभ लालुची । हे तरी गिळिले आवेशेंचि । स्वजन -आप्तादिया माझे पणाची । नरडी घोटिली ॥१०६॥
मीपणावरिहि उठावला । परि तो आपणामाजीं लपोनि राहिला । तो न जाय कधींहि वधिला । कैवारियाविण ॥१०७॥
तो स्थूलरुपें जरी पाहतां । करुं जाय तयाचे घाता । तंव तो सूक्ष्मत्त्वें उठे अवचिता । त्यापुढें सामर्थ्य न चले ॥१०८॥
हे जाणोनि कैवारिया हाका मारी । हे धांव धांव गुरुमाय झडकरी । परी प्रतिबंध न निरासितां निर्धारी । भेटती ना गुरुनाथ ॥१०९॥
परंतु निश्चयो जो अंतरिचा । किमपि उणा नव्हे भाव जीवाचा । नित्य वाटतसे चौगुणा साचा । स्वजनीं कीं विजनीं ॥११०॥
मागुती आठवीतसे मानसीं । कीं गुरुराया अझोनि कृपा न करिसी । परि मी न सोडी निश्चयासी । कल्पांत पावेतों ॥१११॥
देह जरी नासोनि जाय । परी मन तो दुसरें न होय । ऐसेंचि अनंत जन्म होतां पाय । न सोडी सहसा ॥११२॥
कृपा न होतां गुरुस्वामीची । मी घेईन जरी प्रपंचरुचि । तरी कोटिसंख्या ब्रह्महत्येची । गणति मस्तकीं बैसो ॥११३॥
जरी गुरुविण मी पदार्थ देखेन । किंवा अनेकांचे शब्द ऐकेन । तरी गुरुहत्येंचें पाप गहन । माझिया मस्तकीं ॥११४॥
बहुत बोलणें कासयासी । सर्व अर्पणचि केलें गुरुसी । आतां उचित दिसेल तें समर्थासी । करोत ब्रीदरक्षणार्थ ॥११५॥
येणें रीती नारायणहंस । तळमळीतसे रात्रंदिवस । ऐसेंच लोटले षणमास । सदगुरुविरहें ॥११६॥
जन्मादारम्य तो उदासीनता । क्षणक्षणा विस्मय होतसे चित्ता । परी व्यापारांत विस्मर तत्त्वतां । पडत होता कांहींसा ॥११७॥
यया षण्मासा माझारीं । विस्मरचि नसे एक क्षणभरी । अवस्था होतसे जे जे अंतरीं । तितुकी वैखरीं बोलवेना ॥११८॥
परी मुमुक्षेसी कळावा अधिकार । या हेतु संकेतें अल्पसें उत्तर । बोलिलें चिमणें बाळें निर्धार । यया वरोनी समजावें ॥११९॥
इति श्रीमद्वंसगुरुपध्द्ति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । नारायणहंसाख्यान निगुती । तृतीय प्रकरणीं ॥३॥