सदगुरुहंसाचे प्रसादें । हंसदासा विनवी छंदें । हंसदासआचरण अनुवादें । बोलणें ऐका ॥१॥
भाविक जन संसारत्रासें । हंसगुरुंचा मंत्र घेतसे । तेणें नित्य नियमादि आचरावें कैसें । ह्रदयशुध्दि व्हावया ॥२॥
त्यांत दीक्षा घेउन हंसदास । सेवीत असे हंसगुरुदेवास । तया दीक्षेचा प्रकार मानस । एकाग्र ऐका ॥३॥
तया दीक्षेंतही दोन प्रकार । ब्रह्मचर्य कीं सपत्नीक साचार । या उभयांच्या क्रियेंत मात्र अंतर । परी दीक्षा एकरुप ॥४॥
आधीं दीक्षीतासी आवडी मानसीं । असावी कीं मी लागेन परमार्थासी । हें ओळखूनि गुरुनें तयासी बहिर्दीक्षा द्यावी ॥५॥
अंतरीचे आवडी वांचून । बहिर्दीक्षा तेंचि विटंबन । तस्मात अंतरीं मुख्य उदासीन । तया बाह्य दीक्षा शोभे ॥६॥
ते बहिर्दीक्षा ते कोणती । काय चिन्हें असावी त्याप्रति । तेचि आधीं बोलिजेती । मग क्रियाचरण बोलूं ॥७॥
प्रथम भगवें वस्त्र असावें । परी कावी हुरमुजीचें न करावें । हंसदासासी उपासन बरवें । श्रीमारुतीचें असे ॥८॥
म्हणुनि मारुतीसी जो प्रियकर । लेपिला असे सदा सेंदूर । त्या शेंदुरें रंगवावी दोनीं वस्त्र । मेखला कीं शिर वेष्टन ॥९॥
उदासवस्त्र या नाम साचें । प्रयोजन काय ऐका याचें । पदर चर्चिलें उध्दवस्वामींचें । सेंदूर झग्याचें कीर्तनीं ॥१०॥
तें पाहोनि समर्थ सज्जन । मनीं कल्पिला भाव भिन्न । कीं वस्त्रें करावी सेंदूरवर्ण । उध्दवाचे संप्रदायी ॥११॥
परी ते गोष्ट मनींच ठेविली । पुढें नारायणहंसा आज्ञा केली । तस्मात सेंदूरवस्त्राची पध्दति चालिली । पाहिजे हंसदासासी ॥१२॥
परी एक मेखला कटीं असावी । ते जानूपर्यंत मात्र पडावी । त्या परिस अधिकोत्तर नसावी । कीं पादस्पर्श न व्हावा ॥१३॥
आणि शिरीचें वस्त्र रंगवावें । त्याविण दुजें कद न स्वीकारावें । अन्य वस्त्र तें श्वेतवर्ण असावें । परिधानादिक ॥१४॥
ब्रह्मचर्ये घालावी कौपीन । कटिबंदासहित श्वेतवर्ण । गृहस्थें करावी वस्त्र परिधान । तेणें कौपीन घालूं नये ॥१५॥
श्वेत ऊर्णाची वेणी घालून । त्याची सैली सोळापदरी करुन । मेखळेवरी घालावी प्रमाण । नाभीपर्यंत तिचें ॥१६॥
हें नानकें नागनाथहंसांसी । दिधली असे अति सायासी । म्हणोनि घालिजे हंसदासीं । उदास मेखळेवरी ॥१७॥
योगदंड असावा हातीं हे दत्तात्रेयांची आज्ञा निश्चिती । जालीसे नारायणहंसाप्रति । यास्तव पध्दति चालवावी ॥१८॥
पद्मासन घालून बैसतां । उंची असावी कंठाखालुता । आडवी फळी तेही तत्वतां । चतुर्विशति अंगुळें ॥१९॥
रुद्रारामाचा प्रसाद रुद्राक्ष । नारायणहंसांसी मिळाला प्रत्यक्ष । त्यावरी श्रीदत्तीं दिधली साक्ष । यास्तव माळारुद्राक्षाची ॥२०॥
जपही रुद्राक्षमाळेनें करावा । एक रुद्राक्ष शिखेसी बांधावा । एक यज्ञोपवीतासीहि असावा । हंसदासाचे ॥२१॥
शैवदीक्षेचिये परी । भस्म लेपावें सर्व शरीरीं । त्रिपुंड्र द्वादश टिळे त्यावरी । शोभावे यथोक्त ॥२२॥
गंधही वरी आडवें लावावें । तुंबिणीपात्र सदा स्वीकारावें । अन्य धातुपात्रासी न स्पर्शावें । देवतार्चनाविन ॥२३॥
इतुकें चिन्हें हंसदासाचें । बहिरंगत्वें असावे दीक्षेचे । परी अंतरीं अनन्यत्व साचें । हंससदगुरुपदीं ॥२४॥
आतां पुढील प्रकरणीं चिमणें बाळ । हंसदासाची क्रिया सकळ । हंसप्रसादें बोलेल केवळ । त्या रीती विरक्तें वर्तावें ॥२५॥
इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । हंसदासाचरण निगुती । तृतीय प्रकरणीं ॥३॥