श्रोते ऐका सावधान परम । हंसदास दीक्षित जो नि :सीम । तयाचे क्रियेचा अनुक्रम । नित्यनैमित्तिक बोलूं ॥१॥
हंसदासें हंसउपासन । सदा सदगुरुचें पादसेवन । अर्चादि हे हंसगुरुच म्हणून । अर्चनादिक करावें ॥२॥
मुख्य राममूर्ति कीं मारुती । तेवीच दत्तात्रेयाची मूर्ति । आणि श्रीशंकर पार्वतीपति । पूजेसी योग्य ॥३॥
परी हे भिन्न भिन्न न पहावें । एक हंसरुपचि जाणावें । आणि सर्वही जितुके देव । तेही एक हंसगुरु ॥४॥
मुख्य तरी निर्गुणोपासन । तें न कळे साधका पूर्ण । तरी सर्व भूतें पहावी समान । हंससदगुरुरुपें ॥५॥
हेंहि न टके जया मंदासी । तेणें अर्चावें अर्चादिकांसी । परी पहावें चारीही मूर्तीसी । एकरुपत्वें ॥६॥
सदा सदगुरुचें सन्निधान । अथवा संतसंगतिविवरण । अध्यात्मश्रवणावांचून । अन्य आवडी नसावीं ॥७॥
जरी न कळेचि अर्थ आपणा । तरी तेंचि ऐकावें दृढमना । बहु श्रवण होतां अंत :करणा । अर्थही स्फूरुं लागे ॥८॥
सदा एकांतचि सेवावा । व्यापाराचा न पडावा गोवा । सगुणीं कीं निर्गुणीं भाव असावा । अथवा श्रवणमननीं ॥९॥
आतां प्रतिदिनीं ते नेम कोणते । तेचि ऐका बोलिजेते । ब्राह्मी मुहूर्ती उठावें निश्चिते । झोपेपासुनी ॥१०॥
प्रथम आचमन करुनि नेत्रासि उदक । लावोनि आठवावें गुरुचें रुपक । अथवा उपासनामूर्ति हंस एक । भावें स्मरावें ॥११॥
मग आसनीं सदृढ बैसावें । तेथें निर्गुणध्यान आदरें घ्यावें । अथवा सगुणाचें ध्यान करावें । मानसपूजनादिक ॥१२॥
तशीच मानसमूर्ति आठवून । करावें करुणारुप भजन । आर्चादि मूर्तीसीहि आठवून । काकड आरती करावी ॥१३॥
नंतर शौचविधीतें सारावें । आचमन मुखमार्जन करावें । तेव्हांचि प्रात :स्नान संपादावें । भस्मलेपन यथामंत्रें ॥१४॥
चैलाजिनकुशोत्तर आसन । त्यावरी आसनादि मंत्रविधान । भूशुध्दि आदि जरी आवडे मन । तरी करावें सर्व ॥१५॥
यथाधर्म जें स्वहितकर्म । संध्या अर्ध्यादि गायत्रीजप नियम । नंतर मूर्तिपूजा समंत्र सनाम । पुष्पगंधधूपदीपीं ॥१६॥
स्नानापूर्वी जरी मानसपूजा । न जाली तरी येथें करावी वोजा । मानसपूजा अगत्य गुरुराजा । आवडे अत्यंत ॥१७॥
नातरी न्यास ध्यान करुन । आरंभावें गुरुमंत्रजपालागून । तेरा शतें जपाचीं गणन । रुद्राक्षमालेनें ॥१८॥
जपांतींही पूर्ववत । न्यास ध्यान करावें नेमस्त । तीर्थ सेवून गुरुचरणामृत । मग भीक्षेसी निघावें ॥१९॥
गळा मेखळा वरी सैली । शिरवेष्टनी शिरीं बांधिली । रुद्राक्षमाला पाहिजे घेतली । योगदंड हातीं ॥२०॥
भिक्षेसी निघतां अथवा घरोघरीं । नंतर आलिया माघारी । हे तिन्ही श्लोक मुखीं उच्चारी । जय हंसनाथ म्हणोनी ॥२१॥
क्षुधेची करुं जातसों निवृत्तिही । तरी स्वामि आज्ञेस दासासि देहि ॥
त्वरें येतसों अंतरीबाह्यसाक्षा । जगी संत आसंत मागोनि भिक्षा ॥१॥
यथाशक्ति जे द्यावि ते मान्य भिक्षा । अतीथी अलो भागि मी हे निरीक्षा ॥
तणें तृप्त होऊन जें ब्रह्म चिंतू । तयाशीर्वचें कोटिगूणित अस्तु ॥२॥
मिळाली असे स्वामि जे अर्थ भिक्षा । कृपादृष्टिनें हंसराजा निरीक्षा ॥
असे ग्राह्य कीं स्वामि आज्ञा दियावी । हरोनी क्षुधा पादसेवा घडावी ॥३॥
ऐसी भिक्षा मागुनी येतां । सदगुरुहंसें आज्ञा देतां । विनियोग करावा तत्वतां । यथाविधीसी ॥२२॥
पुढें माध्यान्ह स्नान करावें । माध्यान्ह संध्या ब्रह्मयज्ञादि सारावें । उरलें असेल जें कर्म स्वभावें । संपादावें सांग ॥२३॥
नैवेद्य वैश्वदेव अतिथिपूजन । अगत्य घडावें सहस्त्र कामें त्यागून । हें मुख्य हंसदासासी उपासन । तरी अंतरापासून घडावें ॥२४॥
जरी जप ध्यान पूजास्थानीं । असतां अतिथि आला सदनीं । तरी ते सर्वही त्यागूनि । पूजा आदर तयाचा ॥२५॥
असो अतिथिसह भोजन जालिया । किंचित वामकुक्षीहि करोनिया । प्रवर्तावें श्रवणादि उपाया । संतसंगें कडोनी ॥२६॥
साधुज्ञानियांशी नम्र होउनी । पुसावें आवडेल जें जें मनीं । अथवा भाविक साबडे असतां कोणी । तया सांगावें ठाऊके तें ॥२७॥
समान जे जे आपणा ऐसे । चर्चा करावी मित्रत्व मानसें । कवणाचेंहि मन भंगे त्रासे । ऐसें कदा न बोलावें ॥२८॥
सदा हंसगुरुचें भजन । हंसरुपें ग्रामदैवताचें दर्शन । मागुती अस्तमानीं करावें स्नान । संध्याजपादि ॥२९॥
सशक्त तरी स्नान त्रिकाळ । अशक्त तरी करावें एकवेळ । भस्मस्नान वस्त्रांतर केवळ । करोनि ब्रह्मकर्म सारावें ॥३०॥
भगवदीता गुरुगीता । पाठ करावी रामगीता । सहस्त्रनामादि तत्वतां । स्तोत्रें पाठ करावी ॥३१॥
भीमरुपी हनुमत्कवचादि । पाठ करावी आवडी उपनिषदादि । पुढें मूर्तीची आरती पंचपदी । यथासांग दासबोध ॥३२॥
नंतर गुरुमूर्ति आठवून । यथासुखें करावें शयन । ब्रह्मचर्य नैष्ठिक असावें आपण । भाषण नसावें स्त्रियेसी ॥३३॥
गृहस्थ तरी पत्नी आपुली । वांचून मातेसमान पाहिजे देखिली । असो येणें रीती स्थिति सांगितली । नित्यकर्माची ॥३४॥
दीक्षितें मठ जरी असे केला । तरी इनाम घेउनि उपजीवनेला । आपुले सोडूं नये भिक्षेला । त्यांत होईल तें करावें ॥३५॥
विवाह मौजीबंधन बारसें । वास्तु फळशोभन श्राध्दादिदर्शे । येथें भोजन घडावें अपैसे । भक्तिहीन गृह वर्जावें ॥३६॥
भक्तिवैराग्य ज्ञानावांचून । ग्रंथाचें नायकावें निरुपण । भ्रांत पाषांडासी संभाषण । सहसा करुं नये ॥३७॥
मध्यावर्ति करुं नये बाजारहाटा जाऊं नये । देणें घेणें कदा घडूं नये । निस्पृहासी ॥३८॥
न करावें निष्कारण भाषण । आणि न घडावें मद्यपान । द्यूतादि कर्मणुकीचे खेळन । न करावें सहसा ॥३९॥
न सांपडावें पाषांडमतीं । व्यसन कोणतें नसावें निश्चिती । नृत्यगोंधळाची प्रीति । सहसा नसावी ॥४०॥
मंत्रयंत्रादि शिकूं नये । अंगाराधुपारा करुं नये । भविष्य कवणासी सांगूं नये । अथवा ठकवण ॥४१॥
अगांतुकीसी जाऊं नये । वार लाउनी जेऊं नये । आपुली भिक्षा सोडूं नये । अथवा मधुकरी ॥४२॥
राजद्वारासी न जावें । रिकामटेकडी न बैसावें । शय्येवरी न निजावें । कदा निस्पृहें ॥४३॥
आणिक जें जें नित्यकर्म । सहसा करुं नये अधर्म । कदा कवणाचेंही वर्म । बोलोंचि नये ॥४४॥
आतां नैमित्तिक आचरावें । तें अल्पसें बोलिजेल ऐकावें । मंत्राचें पुरश्वरण करावें । यथाविधीसी ॥४५॥
मंत्राचीं अक्षरें जितुकी । तितुके लक्षीचे नेमणुकी । परी कलियुगी चौगुणी निकी । संख्या घडावी ॥४६॥
राममारुतीदत्तजयंती । हे करीत जावे यथाशक्ति । पुण्यतिथीहि हंसपध्दती । करीत जाव्या ॥४७॥
शनिवारीं निराहार कीं उपोषण । एकादशी शिवरात्रीं निरशन । गुरुवारीं गुरुपूजाविधान । कीर्तन एकादशीसी ॥४८॥
आपणासी येतां स्वयें करावें । नातरी होई तेथें ऐकावें । कीर्तन करुन द्रव्य न घ्यावें । प्रार्थून देतां ही ॥४९॥
यात्रा पूजा मोलें न घडावी । अनुष्ठानेंही कवणाचीं न करावी । आशा तो देशधडी लावावी । प्रारब्धाऐसें वर्तावें ॥५०॥
इतुकें जया आवडतें आचरण । तेणेंचि हे हंसदीक्षा घेउन । नातरी पूर्ववत असावें तेण । इहपर सुख होय ॥५१॥
त्या गृहस्थाची आचरती रीति । बोलेन कांहीं यथामति । सावधान असावें श्रोतीं । पुढील प्रकरणीं ॥५२॥
इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । हंसदासाचरण निगुती । चतुर्थ प्रकरणीं ॥४॥